ऍन ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट ऑन मार्स

ताजमहालाच्या समोर राहणार्‍यांना रोज उठून ताजमहाल बघितल्यानंतर काय वाटत असेल? की समोर काय आहे त्यांच्या लक्षातही येत नसेल? अतिपरिचय असल्यावर अशी अवज्ञा अनेक गोष्टींबाबत होते, किंबहुना गोष्ट जितकी वरकरणी सामान्य तितकी असं व्हायची शक्यता जास्त. आपण ज्या गोष्टींना गृहित धरून चालतो, त्या तशा नाहीत हे बरेचदा कळणे अवघड असते. यामागे ‘कॉमन सेन्स’ वापरून ठरवलेली गृहीतके बरेचदा असतात. मग एखादवेळेस अशा गृहीतकांना मुळापासून हादरा बसतो आणि आतापर्यंत आपण घोड्यासारखी झापडं लावून जगत होतो असं वाटायला लागतं.

ऑलीव्हर सॅक्स प्रख्यात न्यूरोसाएंटिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ. त्यांचं ‘ऍन ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट ऑन मार्स’ हे पुस्तक बर्‍याच दृष्टीकोनातून डोळे उघडायला लावणारं आहे. सॅक्स त्यांच्या विषयात तज्ज्ञ आहेतच, पण ते त्यांच्या रूग्णांकडे केवळ एक रोचक केस म्हणून न बघता त्यांच्यातल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. या पुस्तकात ते सात रूग्णांबद्दल बोलतात आणि याच्या अनुषंगाने ते काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. पुस्तक वाचल्यानंतर दृष्टीहीन किंवा स्वमग्न (autistic) लोकांबद्दल आपल्या समजुतींना परत तपासून बघायची वेळ आली आहे हे प्रकर्षानं जाणवतं.

Book cover of An Anthropologist On Mars

सॅक्स यांचा पहिला रूग्ण जोनाथन आय. एक प्रख्यात चित्रकार आहे. न्यूयॉर्कमध्ये ऍबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिस्ट (abstract expressionist) म्हणून त्यानं बरीच वर्ष काम केलं. १९८६ मध्ये कार मधून जात असताना एका ट्रकने धडक दिल्यामुळे तो बेशुद्ध झाला. नंतर रूग्णालयात तपासणी चालू असताना असं लक्षात आलं की त्याला अक्षरं किंवा रंग ओळखता येत नाहीत. काही दिवसांनी अक्षर ओळखता यायला लागली पण तो पूर्णपणे रंगांधळा झाला. कुठलीही गोष्ट त्याला काळ्या-पांढर्‍या आणि राखाडी रंगांमध्ये दिसायला लागली. तो चित्रकार असल्यामुळे याची भीषणता त्याला अधिक जाणवली. याआधी त्याचं जग रंगांवरच आधारलेलं होतं, सामान्य माणसापेक्षा रंगांशी त्याची अधिक जवळीक होती. प्रत्येक गोष्टीच्या रंगांच्या छटा त्याला तोंडपाठ होत्या. अपघातानंतर त्याला स्वत: काढलेली चित्रही परकी वाटायला लागली.

आपण रंग बघतो तेव्हा नेमकं काय होतं? शाळेत शिकवताना डोळा आणि क्यामेरा यांची जी तुलना केली जाते ती वास्तवापासून इतकी दूर आहे की आता बंद कराला हवी. सफरचंदावरून जे प्रकाशकिरण परावर्तित होतात त्यात बर्‍याच तरंगलांबी असतात आणि प्रकाशझोत कसा आहे यावर कोणते तरंग परावर्तित होणार हे अवलंबून असतं पण आपल्याला सफरचंदाचा रंग बदलताना दिसत नाही. मग रंग कोणता हे कुठ ठरतं, डोळ्यामध्ये की मेंदूमध्ये? मेंदूमध्ये रंगांचं विश्लेषण करण्यासाठी एक खास केंद्र असतं. हे केंद्र मेंदूच्या आठवणी आणि इतर भागांशीही संपर्क ठेवून असतं. आपल्याला एखादा रंग ‘दिसतो’ तेव्हा त्यामागे डोळ्यांनी दिलेली माहिती, आधीच्या आठवणी, आपल्या अपेक्षा या सर्वांचा सहभाग असतो. एखाद्या भाषेत एखाद्या रंगासाठी शब्द नसेल तर ती भाषा बोलणार्‍या लोकांना तो रंग ओळखता येत नाही. अर्थात लाल रंग दिसल्यावर मेंदूत जी संवेदना निर्माण होते ती म्हणजे लाल रंग हे का, कधी, कसे ठरते हा आणखी मूलभूत प्रश्न आहे. याचे उत्तर कदाचित ‘क्वालिया’ (qualia) म्हणजे नेमके काय हे कळल्यावर/कळले तर मिळू शकेल. (हा प्रश्न न्यूरोसायन्सची ‘होली ग्रेल’ म्हणून ओळखला जातो.)

जोनाथनला सुरूवातीला बसलेला धक्का ओसरल्यानंतर तो सावरला. त्यानं काळी-पांढरी चित्रं काढायला सुरूवात केली. रंग नष्ट झाले पण त्याच्या बदल्यात त्याची नजर घारीसारखी तीक्ष्ण झाली. त्यानं रात्री बाहेर पडायला सुरूवात केली. नंतर एकदा एका डॉक्टरांनी यावर नवीन उपचार करून बघायचे का असं विचारलं पण जोनाथननं त्यांना स्पष्ट नकार दिला.

सॅक्स यांचा आणखी एक रूग्ण चित्रकारच आहे. त्याचं नाव फ्रॅंको मन्यानी. फ्रॅंको इटलीमधील पोंतितो (pontito) या चिमुकल्या गावात जन्मला आणि वयाच्या बारा वर्षेपर्यंत तिथे राहीला. दरम्यान दुसर्‍या महायुद्धात नाझी सैनिकांनी पोंतितो उध्वस्त केलं. बरीच भ्रमंती केल्यानंतर फ्रॅंकोनं सॅन फ्रान्सिस्को इथं स्थायिक व्हायचं ठरवलं. याच काळात त्याला एका रहस्यमय आजारानं ग्रासलं. याच्या उपचारासाठी त्यानं काही दिवस इस्पितळात काढले. तापामध्ये बरळत असताना त्याला स्वप्नात पोंतितो दिसायला लागलं, तिथली घरं, चर्च, रस्ते. जागा झाल्यावरही हे थांबलं नाही, इस्पितळाच्या भिंतींवर, गादीवर सगळीकडे त्याला पोंतितोची स्पष्ट चित्रं दिसायला लागली. ही चित्रं त्रिमितीमध्ये होती आणि आपण एखाद्या व्हिडिओ गेममध्ये जसं वेगवेगळ्या बाजूंनी बघू शकतो तसं त्याला पोंतितो कोणत्याही कोनातून बघता येत होतं. मग त्यानं भिंतीवर दिसणारं चित्र पेन्सिलीनं गिरवायला सुरूवात केली. लवकरच हातात कधीही ब्रश न घेतलेल्या फ्रॅंकोनं पोंतितोची उत्कृष्ट चित्रं काढायला सुरूवात केली.

फ्रॅंकोच्या केसमध्ये सगळंच अद्भुत आहे. त्याला कोणता आजार झाला होता? यामुळं त्याच्या मेंदूवर काय परिणाम झाला? कोणतेही प्रशिक्षण नसताना व्यावसायिक पातळीची चित्रे काढणं त्याला कसं काय शक्य झालं? काही फोटोग्राफर पोंतितोला गेले आणि त्यांनी तिथले फोटो घेतले. फोटो आणि फ्रॅंकोची चित्रे यांची तुलना केल्यावर चित्रांमधील तपशील किती अचूक आहे याची खात्री पटली. आतापर्यंत नेणिवेत असलेली लहानपणची पोंतितोची चित्रं इतक्या स्पष्टपणे जाणिवेत कशी आणि का आली? प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. मात्र हजार-एक चित्रं काढल्यानंतर ‘मेमरी आर्टिस्ट’ (memory artist) म्हणून ओळखल्या जाणार्‍या फ्रॅंकोची चित्रं जगभर प्रसिद्ध झाली आहेत. त्याच्या चित्रांची प्रदर्शनं भरत आहेत.

‘तूरेत सिंड्रोम’ (Tourette syndrome) जगातील प्रत्येक देश, प्रत्येक वंशामध्ये आढळतो. याची प्रमुख लक्षणं म्हणजे हालचालींवर नियंत्रण नसणे, विशिष्ट हालचाली (समोरच्या वस्तूंना, माणसांना वारंवार स्पर्श करणे) परतपरत करणे, काही शब्द किंवा शिव्या देण्यावर नियंत्रण नसणे इ. ही लक्षणे पाहिल्यानंतर असा माणूस कोणतेही नाजुक काम करण्यास असमर्थ असेल असं वाटतं. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती फारच वेगळी आहे.

डॉ. कार्ल बेनेट कॅनडामध्ये सर्जन आहेत आणि त्यांना तूरेत सिंड्रोम आहे. सॅक्सला हे कळल्यानंतर त्यांचा यावर विश्वास बसला नाही. ज्याचे स्वत:च्या साध्या हालचालींवर नियंत्रण नाही तो माणूस सर्जनचे काम कसे करू शकतो? बेनेट यांनी सॅक्सना त्यांच्या दवाखान्यात येऊन शस्त्रक्रिया करताना मला स्क्र्ब करा असे आमंत्रण दिले. सॅक्स तिथे गेल्यानंतर त्यांनी जे बघितले ते अविश्वसनीय होते. बेनेट त्यांना विमानतळावर घ्यायला आले. गाडी चालवत असताना बेनेट यांच्या हालचाली चालूच होत्या. दोन्ही गुडघे स्टिअरिंग व्हीलच्या समान अंतरावर ठेवणे, समोरच्या काचेला वारंवार स्पर्श करणे इ. मात्र हे करताना गाडीवरचे नियंत्रण एकदाही सुटले नाही. दवाखान्यात शस्त्रक्रिया चालू होण्याआधी सॅक्स आता काय होणार याच्या प्रचंड दडपणाखाली होते. बेनेट यांनी सुरी हातात घेतल्यानंतर त्यांच्या संपूर्ण व्यक्तीमत्वात बदल झाला. शस्त्रक्रिया करत असताना त्यांनी एकही अनावश्यक हालचाल केली नाही, त्यांचा हात अतिशय स्थिर होता. अडीच तास शस्त्रक्रिया चालू असेपर्यंत बेनेट यांच्यामध्ये तूरेत सिंड्रोमचा मागमूसही नव्हता. शस्त्रक्रिया संपल्यानंतर परत उड्या मारणे, समोरच्याला स्पर्श करणे वगैरे चालू झाले. यशस्वी आणि विश्वासार्ह सर्जन म्हणून बेनेट यांची ख्याती आहे. त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांना तूरेत सिंड्रोमसकट स्वीकारले आहे. नंतर लाउंजमध्ये इतर डॉक्टरांबरोबर गप्पा मारताना बेनेट जमिनीवर लोळत, हवेत लाथा मारत होते. सॅक्स परतताना बेनेट यांनी त्यांच्या विमानातून त्यांना कॅलगरीपर्यंत सोडले. विमान चालवतानाही तूरेत कुठेही आडवा आला नाही.

दृष्टीहीन लोकांबद्दल आपले बरेच गैरसमज आहेत. त्यातील एक महत्वाचा म्हणजे दृष्टीहीनांसाठी सर्वात मूल्यवान भेट म्हणजे दृष्टी. चॅपलिनच्या सिटी लाइट्सपासून (City Lights) ते हिंदी चित्रपटांपर्यंत डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली रे झाली की दुसर्‍या क्षणाला पेशंटला दिसायला लागतं. खरं तर चित्रपट तिथं सुरू व्हायला हवा. जन्मापासून आंधळ्या असलेल्या व्यक्तींना बघता आलं तर त्यांचा सुरूवातीला आपण काय बघतो आहोत हेच त्यांना कळत नाही कारण त्यांचे सगळे जग स्पर्शावर आणि आवाजांवर अवलंबून असतं. एका रूग्णाला आपला कुत्रा कोणता आणि मांजर कोणतं हे स्पर्श केल्याशिवाय ओळखता येत नसे. त्यांच्या आधीच्या जगात माणसे येतात आणि जातात. दिसायला लागल्यावर रूंदी, खोली किंवा वेगवान वस्तू यांचा त्यांना अर्थबोध होत नाही. जन्मापासून किंवा बर्‍याच काळ दृष्टी नसलेल्या लोकांच्या मेंदूमध्ये या प्रकारची गणिते करण्यासाठी आवश्यक ती वाढ झालेली नसते. अचानक दृष्टी मिळाल्यावर मेंदूवर ताण येतो. बरेचदा रूग्ण डिप्रेशनमध्ये जातात आणि काही रूग्णांनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत.

सॅक्स अशाच एका रूग्णाची गोष्ट सांगतात. दृष्टी नसताना आपली सर्व कामे आत्मविश्वासपूर्वक करणारा हा तरूण दृष्टी आल्यानंतर सैरभैर झाला. आपण आपली ओळख गमावली आहे असं त्याला वाटायला लागलं. अखेर ताण सहन न झाल्यानं आणि इतर आजारांमुळे डोळ्यांमध्ये काही दोष नसतानाही त्याला परत अंधत्व आलं. इथे सॅक्स विचारतात, केवळ आपलं जग डोळ्यांवर चालतं म्हणून आपलं आयुष्य आत्मविश्वासानं जगणार्‍या अंध लोकांवर दृष्टी लादणं कितपत बरोबर आहे? अंधत्व जन्मापासून असेल तर मेंदू त्या जगात जगण्यासाठी आवश्यक ती तजवीज करून ठेवतो. त्यांचं जग आपल्यासारखं नसतं पण आपल्याइतकच समृद्ध असतं आणि काही बाबतीत आपल्यापेक्षा जास्त. नेत्रदानाच्या वारेमाप जाहिरातींमध्ये दीर्घकाळ अंध असलेल्या लोकांना दृष्टी मिळाल्यावर ज्या अडचणी येतात त्यांचा विचार केला जातो का?

पुस्तकाच्या शेवटच्या दोन प्रकरणांमध्ये सॅक्स एका महत्वाच्या पण गैरसमजांनी भरलेल्या विषयावर बोलतात – स्वमग्नता किंवा ऑटीझम. स्वमग्नतेबद्दल माहिती देताना चित्रफितींमध्ये नेहेमी लहान मुले दाखवली जातात. पण मोठे झाल्यावर ती कशी बनतात याबद्दल फारशी माहिती सहसा मिळत नाही. लहानपणी साधी कामेही न करता येणारी मुले स्वयंपूर्ण आयुष्य जगू शकतात यावर विश्वास बसणे कठीण आहे. पुस्तकाचे शेवटचे प्रकरण संशोधक टेंपल ग्रॅंडीनबद्दल (Temple Grandin) आहे. टेंपल स्वमग्न आहे तरीही अथक प्रयत्न करून तिने प्राणीशास्त्रामध्ये पी. एच. डी. मिळवली. या क्षेत्रातील तिचे काम उल्लेखनीय आहेच शिवाय स्वमग्नतेवरही तिने स्वत:च्या अनुभवातून बरेच लिखाण केले आहे.

टेंपलला सहा महिन्यांची असताना आईच्या कुशीत स्पर्श झाल्यावर गोठले गेल्याची संवेदना अजूनही आठवते. (स्वमग्न लोकांचे एक वैशिष्ट्य असे की त्यांना अगदी लहानपणीच्या गोष्टीही आठवतात. तुम्ही त्यांच्याशी बोलत असताना ते बोलणे, त्याचा टोन, शब्द जसेच्या तसे त्यांच्या मेंदूत नोंदले जातात.) सहा वर्षांची होईपर्यंत तिला बोलताही येत नव्हते. सुदैवाने या काळात मतिमंद मुलांसाठी असलेल्या शाळेत जाण्याची तिला संधी मिळाली. तिथे एक शिक्षिका आणि स्पीच थेरपिस्ट (speech therapist) यांनी तिला बोलायला शिकवले. बोलता यायला लागल्यावर जणू एक अडथळा पार झाला. इतर मुलांपेक्षा खूप हळू पण निश्चित अशी प्रगती दिसू लागली. संवाद साधता येत होता पण त्यातील भावना आणि परस्परसंबंध हे तिला गोंधळून टाकत असत, आजही टाकतात. रोमिओ आणि ज्युलिएट वाचल्यावर तिला हे असे का वागतात हे लक्षात येत नाही. ती स्वत:ची स्वस्था स्टार ट्रेक मधील यंत्रमानव डेटा सारखी आहे असे मानते. डेटाला माणसांबद्दल खूप उत्सुकता आहे, निरीक्षणातून तो माणसांबद्दल नियम बनवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांचे भावनिक व्यवहार त्याला बुचकळ्यात टाकणारे असतात.

याचा अर्थ टेंपलला भावना म्हणजे काय हे माहित नाही का? असे अजिबात नाही. प्राण्यांशी वागताना तिच्यात आमूलाग्र बदल होतो. तिला नेहेमी गाई, डुकरे यांच्याबरोबर काम करावे लागते. प्राणी दु:खी आहेत की आनंदी, बिथरले असतील तर त्यांना शांत कसे करायचे याची तिला अचूक माहिती आहे. गाईंच्या कत्तलखान्यात चालणार्‍या अमानुष प्रक्रिया बदलण्यात तिचा मोठा वाटा आहे. गाई मारताना शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना त्रास होऊ नये यासाठी तिने अनेक उपाय शोधून काढले. प्राण्यांच्या वेदना तिला सहन होत नाहीत पण माणसांबद्दल हे भावनिक बंध तिला ठेवता येत नाहीत. माणसे आणि त्यांचे व्यवहार तिला गुंतागुंतीचे वाटतात. तिचा प्राण्याच्या देखभालीचा व्यवसाय चालवताना सुरूवातीला तिला अनेक लोकांनी फसवले कारण खोटे बोलणे ही कल्पनाच तिच्या आवाक्याबाहेर होती. मात्र आता अनुभवातून ती सावध झाली आहे.

स्वमग्नतेवर टेंपलने बरेच काम केले आहे. स्वत:च्या अनुभवातून स्वमग्न लोकांना काय अडचणी येतात, स्वमग्न मुलांशी कसे वागावे अशा अनेक गोष्टीमवर ती मार्गदर्शन करत असते. तिच्या मते स्वमग्नता, स्किझोफ्रेनिया किंवा खिन्नता याबद्दल चीड येणे साहजिक आहे. पण याची दुसरी बाजू अशी आहे की असे लोक बरेचदा प्रतिभावंत असतात. तिच्या मते जर हे सर्व आजार मुळापासून दूर केले तर कदाचित जगातील प्रतिभाही नष्ट होईल आणि फक्त अकाऊंटंट लोक शिल्लक राहतील. पुस्तक वाचल्यानंतर त्यात विचारलेले प्रश्न वाचून आणखी प्रश्न पडतात. मानसिक दृष्ट्या निरोगी ही अवस्था खरंच अस्तित्वात आहे किंवा नाही अशी शंका येते कारण इथे रोगी आणि निरोगी अशी डिजिटल अवस्था नसते. दृष्टीहीन, मूकबधिर किंवा स्वमग्न लोक आपल्यासारखे जगत नाहीत म्हणून त्यांना आपल्या निकषांवर जगायला लावणे कितपत बरोबर आहे? याऐवजी त्यांना त्यांच्या जगात जास्तीत जास्त मोकळेपणाने कसे जगता येईल हा विचार करणे अधिक योग्य नाही का?

परत जाताना सॅक्स यांना टेंपल सोडायला आली होती. शेवटी ती थोडीशी भावनाविवश झाली होती. सॅक्स लिहीतात,

Temple, who was driving, suddenly faltered and wept. “I’ve read that libraries are where immortality lies….I don’t want my thoughts to die with me….I want to have done something….I am not interested in power or piles of money. I want to leave something behind. I want to make a positive contribution – know that my life has meaning. Right now, I am talking about things at the very core of my existence.” I was stunned. As I stepped out of the car to say goodbye, I said,”I’m going to hug you. I hope you don’t mind.” I hugged her – and (I think) she hugged me back.