राणाजी म्हारे

नवा देश, नवा पुरावा (खरा की खोटा माहीत नाही, आधी सगळ्यांना मारू, नंतर विचार करू), लगेच मानवतेचे पाठीराखे तयार. आक्रमण! ओबामा किंवा त्याआधीच्या अध्यक्षांना संस्कृत येत नसावं पण ‘यदा यदा ही धर्मस्य’चा सोईस्कर अर्थ लावून प्रत्येक अध्यक्ष युद्ध करायच्या कारणाची वाट बघत असतो. १९६२ पासून सरासरी दर तीन वर्षांत एक आक्रमण असा रेट आहे, आहात…

नवा देश, नवा पुरावा (खरा की खोटा माहीत नाही, आधी सगळ्यांना मारू, नंतर विचार करू), लगेच मानवतेचे पाठीराखे तयार. आक्रमण! ओबामा किंवा त्याआधीच्या अध्यक्षांना संस्कृत येत नसावं पण ‘यदा यदा ही धर्मस्य’चा सोईस्कर अर्थ लावून प्रत्येक अध्यक्ष युद्ध करायच्या कारणाची वाट बघत असतो. १९६२ पासून सरासरी दर तीन वर्षांत एक आक्रमण असा रेट आहे, आहात कुठे? सो मेनी ब्याड गाइज, सो लिटल टाइम. जणू हे सोडून इतर कुणाला मानवतेची चाडच नाही. आता काय कारण तर म्हणे सिरीयाच्या सरकारने रासायनिक शस्त्रे वापरली. सिरीयामध्ये गेली दोन वर्षे यादवी युद्ध चालू आहे, लाखो लोक मेले. तोपर्यंत यांना जाग आली नव्हती. बंदुकांनी हवे तेवढे लोक मारा, नो प्रॉब्लेम. रासायनिक शस्त्रे म्हटल्याबरोबर सगळे खडबडून जागे झाले. इराकमध्ये यांच्या सैनिकांनी डिप्लिटेड युरेनियम, नापाम, फॉस्फरस वापरलं त्याचे परिणाम तिथल्या कैक पिढ्या भोगतील. पण तिथली मुलं अपंग जन्माला येत आहेत, कर्करोगाचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे तरी त्याच्याशी युद्धाचा काही संबंध नाही असं म्हणून हात झटकायला हे मोकळे. अहो, अजून व्हिएटनामची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत तर इराक लांबची गोष्ट. मरतील तर मरू देत तिच्यायला, डास, चिलटं मारताना आपण विचार करतो का? भाषणं देताना ‘प्रोटेक्टींग अमेरिकन पीपल’ची टेप सारखी वाजवली की झालं. काळजी करू नका, नो बूट्स ऑन ग्राउंड. सगळे अमेरिकन सुरक्षित राहतील. ड्रोनहल्ले करू, सैनिकांनाही मजा येते एसी रूममध्ये बसून माणसं मारायला. द न्यू ३-डी डिसप्ले इज लाइक, ऑस्सम, ड्यूड​.

सिरीयामध्ये यादवी युद्ध चालू आहे. अतिरेकी, जनता, सरकारी फौजा सर्वांची सरमिसळ झालेली आहे. सामान्य जनतेचे होणारे हाल सांगून सोय नाही. आता आक्रमण केलं तर कुणावर बॉम्ब टाकणार? त्यामुळे निरपराध लोक मरतील त्याचं काय? आणि हे सर्व केल्यानंतर प्रश्न सुटण्याची अजिबात शक्यता नाही. जरी असादला मारलं तरी सध्या इराकमध्ये जो गदारोळ चालू आहे तोच इथेही होणार. हं, एक गोष्ट मात्र आहे. सिरीयाचा भूगोल तेलाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. सिरीयाविरुद्ध सैनिकी कारवाई करण्याचा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाने फेटाळून लावला. कॅमेरुन यांचा प्रस्ताव इंग्लंडच्या संसदेने फेटाळला. ओबामा यांनी लिबियाविरुद्ध कारवाई करताना कॉंग्रेसची परवानगी नव्हती तरी त्याची पर्वा केली नाही. अमेरिका आणि फ्रान्स हे दोनच देश कारवाई करण्याच्या पक्षात आहेत पण फिकर नॉट. ओबामांच्या आले मना, तेथे कोणाचे चाले ना. एकदा ठरवलं की नियम वगैरे किस झाड की पत्ती. आणि फ्रान्स, इंग्लंड निमूटपणे त्यांच्या मागे जाणार. जर्मनीसारखा स्वतंत्र विचार करण्याची कुवत किंवा इच्छा त्यांच्यामध्ये नाही. सगळे विचारवंत या विषयांवर कसे गप्प बसतात, तसंच.
—-
सकाळ झाली. दैदिप्यमान दिनकराने आपल्या सहस्रावधी किरणांच्या साहाय्याने पृथ्वीला नवजीवन द्यायला सुरुवात केली. यातील काही किरणे पांढऱ्या घराच्या दिशेने कूच करती जाहली. घराला स्पर्श करण्याआधी किरणे एक सेकंद थबकली. पांढऱ्या घराला स्पर्श करण्याआधी किरणे नेहमीच थबकत असत. घराच्या एका खिडकीतून किरणे आत गेली. त्या खोलीत निर्बलांचे तारणहार, दुर्जनांचे कर्दनकाळ, पृथ्वीची शेवटची आशा असणारे नोबेल शांतता पारितोषिक विजेते भो ओबामा गाढ निद्रेत होते. ओबामांच्या गालावर पडण्याआधी किरणे एक सेकंद थबकली. भो ओबामांना स्पर्श करण्याआधी किरणे नेहमीच थबकत असत. गालावर पडल्यावर किरणांची ऊर्जा ओबामांच्या त्वचेमध्ये पसरली. ही ऊर्जा त्यांच्या त्वचेच्या खाली असलेल्या ७-हायड्रोकोलेस्टेरॉल या रेणूंच्या दिशेने गेली. ऊर्जेला पाहिल्यावर रेणू काही काळ थबकले. ओबामांच्या त्वचेतील ७-हायड्रोकोलेस्टेरॉल रेणू ऊर्जेला पाहिल्यावर नेहमीच थबकत असत. ऊर्जेला भेटल्यानंतर ७-हायड्रोकोलेस्टेरॉल रेणूंचे प्री-व्हिटामिन डी रेणूत रूपांतर झाले. त्वचा गरम असल्याने या रेणूंचे लगेच व्हिटामिन-डी रेणूंमध्ये रूपांतर झाले – अर्थातच एक सेकंद थबकल्यानंतर. परत एक सेकंद थबकल्यानंतर हे रेणू ओबामांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करते झाले. ही सगळी थबकाथबकी – आदरापोटी होती. अदर दॅन आदर, दुसरं कोणतंही कारण नव्हतं.

भो ओबामांना जाग आली. त्यांची नजर डावीकडच्या फडताळावर गेली. तिथे नोबेल शांतता पारितोषिक एक सेकंद थबकून पडलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात चमकत होतं. ते पाहिल्यावर भो ओबामांचं मन अपार करुणेनं भरून गेलं. ही करुणा जगातल्या सर्व लोकांसाठी होती. त्यांचं भाग्य थोर म्हणून त्यांना माझ्यासारखा दूरदर्शी, हुरहुन्नरी, धोरणी, गुणी, वाणी नेता मिळाला. नोबेल मिळालं यावरूनच माझी श्रेष्ठता सिद्ध होते. आइनस्टाइन, हेमिंग्वे, आंग सान सू क्यी, किसिंजर… नाही, नाही किसिंजर नाही. डॅम इट, (इथे त्यांनी कोठारे ष्टाइलमध्ये मांडीवर चापट मारली की नाही हे कळायला मार्ग नाही. ती माहिती क्लासिफाइड आहे.) नेमक्या नको त्या वेळेला नको ती नावं आठवतात. परत पहिल्यापासून..आइनस्टाइन, हेमिंग्वे, आंग सान सू क्यी, ओबामा. हं, आता कसं बरोबर वाटतंय. मुद्दा काय की माझ्यात काहीतरी गुण पाहूनच त्यांनी नोबेल दिलं असेल ना? काहीतरी केल्यानंतर नोबेल मिळालं तर त्याचा अर्थ ते काम नोबेलपात्र होतं. पण मला तर आधीच नोबेल मिळालंय. म्हणजे आता मी जे करणार आहे ते सगळं नोबेल पात्रच आहे. QED. मनाचं काठोकाठ समाधान झाल्यानंतर भो ओबामा उठले. आज खूप मोठं काम करायचं होतं. बऱ्याच दिवसांनी एका देशावर आक्रमण करायची संधी आली होती.

कॅमेरा झूम होत पांढऱ्या घरावर स्थिरावतो. मागच्या ब्याकग्राउंडमध्ये गाणं वाजायला लागतं

राणाजी म्हारे, गुस्से में आए, ऐसो बलखाए, अगियां बरसाए, घबराए म्हारो चैन
जैसे दूर देस के टावर घुस जाए रे एरोप्लेन

राणाजी म्हारे, ऐसो गुर्राए, ऐसो थर्राए, भर आए म्हारे नैन
जैसे सरे आम इराक में जाके जम गए अंकल सॅम
जैसे हर एक बात पे डिमोक्रसी में लगने लग गयो बॅन
जैसे बिना बात अफगाणिस्तां का बज गयो भय्या बॅंड