आपल्याकडे कोणत्याही च्यानेलवरच्या मुलाखती पाहील्या तर मुलाखत घेणे या प्रकाराविषयी एकूणातच प्रचंड अज्ञान, अनास्था दिसते. मुलाखत घेण्याचे उद्देश कोणते, ती कशी घ्यावी, कशी घेऊ नये अशा बर्याचशा महत्वाच्या मुद्यांचा विचारही केलेला दिसत नाही. अर्थात याचा अर्थ सगळेच मुलाखत घेणारे एकाच पातळीवर आहेत असा अजिबात नाही. करण थापर किंवा विनोद दुआसारखी मंडळी उत्तम मुलाखत घेतात मात्र त्यांचा उद्देश शोधपत्रकारिता असल्याने मुलाखतीचे क्षेत्र मुख्यत: प्रसिद्ध व्यक्तींना वादग्रस्त विषयांवर बोलते करणे आणि शब्दात पकडणे असा होतो.
अर्थात परदेशी च्यानेलवरही फारसा वेगळा प्रकार नाही. लॅरी किंगचा ‘सिक्टी मिनिट्स’ उल्लेखनीय होता पण इथेही बरेचदा प्रकाशझोतात असणार्या व्यक्ती असायच्या आणि विषय वादग्रस्त, त्यामुळे मर्यादा यायच्या. बाकी ‘एलेन डीजनरेस’ किंवा ‘डेव्ह लेटरमॅन’ वगैरे प्रयत्न चांगले आहेत पण इथे मुलाखत हा एकच उद्देश नाही, दहा-बारा आयटम करायचे, त्यापैकी मुलाखतीला मिळणार सात मिनिटे, त्यात विचारणारा काय विचारणार आणि बोलणारा काय बोलणार.
हे जे सगळे निष्कर्ष आहेत मुलाखत कशी असावी याचा आदर्श बघायला मिळाल्यानंतरचे आहेत. जपानमध्ये असताना एखादा इंग्रजी च्यानेल सापडतो का हे बघण्याच्या प्रयत्नात हा कार्यक्रम सापडला. एकदा सापडल्यावर त्याकडे पाठ फिरवणे अशक्य होते. मुलाखत कशी असावी याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ब्राव्हो च्यानेलवरचा ‘इनसाइड द ऍक्टर्स स्टुडिओ’ हा कार्यक्रम.
‘इनसाइड द ऍक्टर्स स्टुडिओ’ आणि वर उल्लेख केलेले आणि न केलेले कार्यक्रम यांच्यामध्ये बरेच मूलभूत फरक आहेत. या कार्यक्रमचा सह-निर्माता आणि होस्ट जेम्स लिप्टन हा स्वत: एक अभिनेता आहे. या मुलाखती पेस युनिव्हर्सिटी आणि मायकेल शिमर सेंटर फॉर आर्टस यांच्या सहयोगाचे फलित आहेत. पेस युनिव्हर्सिटी इथल्या ऍक्टर्स स्टुडिओ ड्रामा स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रातील दिग्गज कसे काम करतात हे बघायला मिळावे हा या मुलाखतींचा मुख्य उद्देश आहे. मुलाखतींंचे शूटींग करताना वेळेचे बंधन नसते, नंतर यातून साधारण एक तास (किंवा जास्त) असा भाग संपादित केला जातो. मुलाखतीमध्ये कोणतेही वैयक्तिक प्रश्न विचारले जात नाहीत. मुलाखतीच्या आधी जेम्स लिप्टन ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याच्याबद्दल सर्व माहिती गोळा करतो. बरेचदा अभिनेते ‘हे तुला कसे माहीत?’ असे म्हणून आश्चर्यचकित झालेले दिसतात. पण इथेही अभिनेत्याला अवघडल्यासारखे वाटेल अशा गोष्टींचा उल्लेख चुकूनही केला जात नाही.
जेम्स लिप्टन स्वत: कमीत कमी बोलतो आणि पाहुण्याला बोलतं करतो. हे करताना वातावरणात कुठेही उत्तरे मिळण्याची घाई दिसत नाही. एखाद्या प्रश्नाला पूर्ण उत्तर मिळाले नाही तर एखाद्या गुन्ह्याच्या मागावर असलेल्या डिटेक्टीव्हप्रमाणे त्याचा पाठपुरावा करणे असले प्रकार अजिबात नाहीत. कोणताही औपचारिकपण न बाळगता दिलखुलास गप्पा पण त्यातही अवांतर टाइमपास न होऊ देता कलाकाराचे काम, त्याची त्याकडे बघण्याची दृष्टी, त्यामागची त्याची विचारसरणी अशा अनेक गोष्टी या गप्पांमध्ये सहजपणे समोर येतात. मधून-मधून कलाकाराच्या उल्लेखनीय चित्रपटांचे तुकडे दाखवले जातात, त्याच्या अनुषंगाने आणखी चर्चा होते. हे सगळे नेहेमीपेक्षा वेगळे आहे हे कलाकारांनाही जाणवते आहे हे स्पष्ट दिसते. टॉम हॅंक्स दुसर्यांदा या कार्यक्रमात आल्यावर उस्फूर्तपणे म्हणाला, “इथे यायला मला नेहेमी आवडतं. इतर कार्यक्रमांमध्ये बोलावल्यावर आमच्यावर स्टार म्हणून वागाण्याचं दडपण असतं. तीन मिनिटात हायपर होऊन आमच्या नवीन चित्रपटाबद्दल सांगायचं असतं. इथे तसं कोणतही दडपण नसतं.”
या कार्यक्रमात हॉलीवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली आहे. कपोला, स्पिलबर्ग, जीन हॅकमन, रॉबर्ट रेडफर्ड, मेरील स्ट्रीप.. यादी मोठी आहे. सिंपसन किंवा एव्हरीबडी लव्हज रेमंड यासारख्या लोकप्रिय मालिकांचे कलाकारही इथे येऊन गेले आहेत. मार्लन ब्रॅंडो आणि कॅथरीन हेपबर्न यांनी मात्र बरेचदा विनंती करूनही येण्यास नकार दिला तर ग्रेगरी पेक यांनी अखेर विनंती मान्य केली पण त्यानंतर थोड्याच काळात त्यांचा मृत्यू झाला. कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुलाखत संपल्यावर लिप्टन पाहुण्यांना एका प्रश्नावलीत असलेले दहा प्रश्न विचारतो. ही प्रश्नावली फ्रेंच मुलाखतकार बर्नार्ड पिव्हू यांनी लेखक मार्सेल प्राउस्ट यांच्या प्रश्वालीला आधार मानून तयार केली आहे. तुमचा आवडता आणि नावडता शब्द कोणता, आवडता आणि नावडता आवाज कोणता या प्रकारचे हे प्रश्न असतात. यांची उत्तरे व्यक्तीमत्वाचे काही पैलू समोर आणतात असे मानले जाते. सर्वात शेवटी ड्रामा स्कूलचे विद्यार्थी पाहुण्यांना प्रश्न विचारतात.
सगळ्याच मुलाखती बघण्यासारख्या आहेत. मला सर्वात जास्त आवडलेल्या मुलाखतींपैकी एक रॉबिन विलियम्सची होती. हा एकमेव पाहुणा असा होता की ज्यापुढे लिप्टनचे काहीही चालले नाही. याचे कारण आल्यापासूनच रॉबिन जो सुटला तो थांबायचे नावच घेईना. स्टॅंड अप कॉमेडी आणि इम्प्रॉव्ह साठी लागणारी विनोदबुद्धी, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा यावर तासभर बोलूनसुद्धा जे सांगता आले नसते ते त्याने करून दाखवले. हा कार्यक्रम दोन भागात सादर केला गेला. याखेरीज कपोला, डस्टीन हॉफमन, क्लिंट इस्टवूड, केव्हिन स्पेसी अशा अनेक मुलाखती अनेकदा बघण्यासारख्या आहेत.
कोणताही बडेजाव न करणारा साधा सेट, अगदी मोजके असे पार्श्वसंगीत, टीआरपी, प्रायोजक यांची फिकीर न करता ‘कंटेंट इज किंग’ हे सूत्र मध्यवर्ती ठेवून तयार करण्यात आलेली ही मालिका खरे तर प्राइम टाइमला दाखवायला हवी. आपल्याकडच्या च्यानेलवर हा कार्यक्रम कुठे दिसतो का हे बघण्याचा प्रयत्न केला, शेवटी एका दुर्लक्षित च्यानेलवर सापडला. वेळ होती शनिवारी सकाळी ८.३०! सुदैवाने युट्यूबवर याचे बरेच भाग आहेत. ग्लॅमरच्या मुखवट्यामागे दडलेला कलाकार, त्याचा प्रवास, कलेच्या साधनेमध्ये अत्युच्च पातळी गाठण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न हे सर्व बघायचे असेल तर ही मालिका जरूर पहावी.