मोहम्मद अली

सहा महिन्यांपूर्वी जर मला कुणी सांगितलं असतं की तू बॉक्सिंगवर लेख लिहिणार आहेस तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. मी कथकली किंवा भरतनाट्यमवर लिहीणं जितकं अशक्य आहे तितकंच हे ही होतं. तरीही आज हा लेख लिहितो आहे याचं सर्व श्रेय हॉलीवूडला. ‘रॉकी’ बरेचदा बघितला होता, नंतर ‘रेजिंग बुल’ बघितला. इस्टवुडचा ‘मिलियन डॉलर बेबी’ आणखीन एक…

सहा महिन्यांपूर्वी जर मला कुणी सांगितलं असतं की तू बॉक्सिंगवर लेख लिहिणार आहेस तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. मी कथकली किंवा भरतनाट्यमवर लिहीणं जितकं अशक्य आहे तितकंच हे ही होतं. तरीही आज हा लेख लिहितो आहे याचं सर्व श्रेय हॉलीवूडला. ‘रॉकी’ बरेचदा बघितला होता, नंतर ‘रेजिंग बुल’ बघितला. इस्टवुडचा ‘मिलियन डॉलर बेबी’ आणखीन एक उल्लेखनीय चित्रपट, मात्र पूर्वार्धात बॉक्सिगवर असलेला हा चित्रपट उत्तरार्धात इच्छामरणासारख्या गहन विषयाकडे जातो. यावर जास्त लिहून ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी रहस्यभेद करत नाही. मार्क वॉल्हबर्गची प्रमुख भूमिका असलेला ‘द फायटर’ हा चित्रपट लाइट हेवीवेट चॅम्पियन मिकी वार्ड याच्या आयुष्यावर आधारित आहे. जेक ग्लिनहालचा ‘साउथपॉ’ हा मागच्या वर्षी आलेला चित्रपट. यात एका चँपियनचा विजेतेपदाकडून सर्वकाही नष्ट होण्यापर्यंतचा प्रवास आणि नंतरची वाटचाल याचं चित्रण आहे. आणि शेवटी मोहम्मद अलीवर आधारित विल स्मिथचा ‘अली’. हा तुकड्यातुकड्यात चांगला आहे पण खरं सांगायचं तर विल स्मिथला ही भूमिका झेपलेली नाही. तो वागण्या-बोलण्यात (आणि विशेषतः चालण्यात) विल स्मिथच वाटत राहतो.

बॉक्सिंगवर इतके चित्रपट बघितल्यावर खेळ आवडला, पण चित्रपटातून सर्व कल्पना येतेच असं नाही. म्हणून मग मोहम्मद अलीचं आत्मचरित्र ‘द ग्रेटेस्ट स्टोरी’ वाचायला घेतलं. अलीचा जन्म केंटकी राज्यातील लुईव्हिल नावाच्या छोट्याश्या गावी झाला. अलीचं मूळ नाव कॅशियस क्ले. सुरुवातीला या नावाचा त्याला अभिमान होता. पण नंतर त्याला हे नाव आणि ख्रिस्ती धर्म त्याच्या गुलाम पूर्वजांची ओळख आहे असं वाटू लागलं. म्हणून त्याने इस्लाम धर्मात प्रवेश केला आणि तो मोहम्मद अली झाला. नंतर कुणीही त्याच्या जुन्या नावाने हाक मारलेली त्याला खपत नसे. म्हणूनच लेखातही त्याचा उल्लेख त्याच्या सध्याच्या नावानेच आहे.

अलीच्या घरी गरीबी इतकी की स्कूलबससाठीही पैसे नसायचे. मग अली रोज बसबरोबर शर्यत लावायचा आणि धावत शाळेत जायचा. मात्र मित्रांना सांगायचा की मला मोठेपणी हेवीवेट बॉक्सिंग चँपियन व्हायचं आहे, म्हणून मी रोज धावतो. लहानपणी एकदा बॉक्सिंग जिममध्ये गेल्यावर त्याला या खेळाचं आकर्षण वाटू लागलं. नंतर रीतसर ट्रेनिंग घेतल्यावर अलीची प्रगती झपाट्याने झाली. बॉक्सिंगसाठी जी नैसर्गिक प्रवृत्ती लागते ती त्याच्याकडे होती. १९६० साली रोम ऑलिंपिक्समध्ये त्याने सुवर्णपदक मिळवलं आणि एका अजोड कारकीर्दीची सुरुवात झाली.

अली असो, मार्टिन लूथर किंग असो किंवा ख्रिस रॉक असो – या आणि अशा प्रत्येक कारकीर्दीत एक समान घटक आहे – वर्णद्वेष. किंग यांच्या खाजगी आयुष्यावर पाळत ठेवून त्यांचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न झाला. आणि याचा शेवट त्यांची हत्या करण्यात झाला. केंटकीमध्ये अलीला लहानपणापासूनच वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पदोपदी अपमान, अवहेलना, कधीकधी जिवावर बेतणारे प्रसंग. सुवर्णपदक मिळवल्यावर अलीला वाटलं की आता आपले हे दिवस संपले. अमेरिकेसाठी इतकी मोठी कामगिरी केल्यावर आता तरी आपल्याला समान वागणूक मिळेल. त्याची ही आशा लवकरच फोल ठरली. एकदा तो एका मित्राबरोबर हॉटेलात गेला असताना हॉटेलच्या मालकाने आम्ही निग्रो लोकांना आत येऊ देत नाही असं सुनावलं. अलीनं त्याचं सुवर्णपदक दाखवलं – तो २४ तास हे पदक गळ्यात घालत असे – पण मालकावर त्याचा परिणाम झाला नाही. संतप्त आणि निराश होऊन बाहेर पडले तर एका बायकर गँगने अडवलं. गँगच्या म्होरक्याच्या गर्लफ्रेंडला ते सुवर्णपदक हवं होतं. ते दिलंस तर तू जाऊ शकतोस असं सांगितलं. खरं तर अली त्या सर्वांना पुरुन उरला असता पण मैदानाबाहेर हिंसा न करणे हे अलीचं एक वैशिष्ट्य होतं. त्यांना हुलकावणी देऊन अली आणि त्याचा मित्र बाइक्सवरुन घराकडे निघाले. गावाच्या वेशीवर परत गँगचा म्होरक्या आणि एक साथीदार आडवे आले आणि त्यांनी पाठलाग सुरु केला. दुसरा पर्याय नाही म्हणून अली आणि त्याच्या मित्राने सामना केला. म्होरक्या अलीच्या एका ठोश्यात गारद झाला. (वर्ल्ड हेवीवेट चँपियनला धमकी देणे याहून बिनडोक कल्पना काय असू शकते?)

या प्रसंगाचा अलीवर मोठा परिणाम झाला. आपलं सुवर्णपदक फक्त मुलामा दिलेलं आहे हे त्याला आधीच कळलं होतं, पण आता त्याचा पूर्ण भ्रमनिरास झाला. मारामारीनंतर घरी येताना तो नदीजवळ थांबला आणि त्याने ते सुवर्णपदक नदीत फेकून दिलं.

रोम ऑलिंपिक्सनंतर अलीची व्यावसायिक कारकीर्द सुरु झाली. लुईव्हिलच्या सात कोट्याधीशांनी मिळून त्याच्याबरोबर करार केला. यामागे अर्थातच पूर्णपणे व्यावसायिक हेतू होता. चांगल्या रेसच्या घोड्याची सट्टेबाजांना जी किंमत असते तीच या गोर्‍यांना अलीची होती. तो ‘विनिंग घोडा’ होता. वर्तमानपत्रांनी मात्र या घटनेला गोर्‍या लोकांचा उदारपणा वगैरे नावं देऊन त्यांचा उदोउदो केला. निदान यानंतर अलीची आर्थिक परिस्थिती सुधारली. नंतर या गोर्‍या लोकांचा जाच असह्य होऊ लागल्यावर त्याने करार मोडला.

कोणत्याही खेळातले बारकावे जसजसे लक्षात येऊ लागतात तसतशी त्यातली गोडी वाढत जाते. मला बेसबॉल विशेष आवडत नाही मात्र मला तो कळतही नाही. मी जर सहा महीने बेसबॉल बघितला तर कदाचित पुढचा लेख न्यूयॉर्क यँकीजवरही असू शकेल. (बेसबॉलवर ब्रॅड पिटचा ‘मनीबॉल’ हा चित्रपट बघण्यासारखा आहे.) बॉक्सिंगमध्ये दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे फिटनेस आणि स्टॅमिना. एका सव्वादोनशे पौंडाच्या सुपर फिट बॉक्सरचे ठोसे पंधरा राऊंड – ४५ मिनिटे – सहन करणे याला कल्पनातीत स्टॅमिना लागतो. ‘रॉकी’मध्ये जे जे व्यायाम दाखवले आहेत ते आणि इतर बरेच व्यायाम सतत करावे लागतात. इतर खेळात किंचित चूक झाली तर कदाचित चालून जाऊ शकतं, बॉक्सिंगमध्ये ते जिवावरही बेतू शकतं. हेन्री कूपरबरोबरच्या मॅचमध्ये तिसरा राउंड चालू असताना एक सेकंद अलीचं लक्ष पुढच्या रांगेकडे गेलं. तिथे एलिझाबेथ टेलर आणि रिचर्ड बर्टन बसले होते. दुसर्‍या क्षणाला त्याला आपल्या जबड्यावर एक जबरदस्त आघात जाणवला आणि तो खाली पडला. त्याचा जबडा मोडला आणि नंतर तीन महिने त्याला विश्रांती घ्यावी लागली.

बॉक्सिंगमध्ये अनेक डावपेच आहेत. प्रतिस्पर्ध्याचा डोक्यावर ‘जॅब’ मारले तर तो हात वर घेऊन बचाव करतो. मग त्याच्या बरगड्या आणि किडनी हे भाग उघडे पडतात आणि तिथे ‘बॉडी शॉट’ मारता येतो. तिथे बचाव करण्यासाठी हात खाली आले तर परत डोक्यावर मारता येतं. ‘नॉक आउट’ फक्त डोक्यावर मारुनच होतो असं नाही. मजबूत ‘किडनी शॉट’मुळेही प्रतिस्पर्धी गारद होऊ शकतो. मिकी वार्ड आणि अल्फोन्सो सँचेझ याच्या लढतीत वार्डने एक अनोखी स्ट्रॅटेजी वापरली. पहिले पाच राउंड तो फक्त बचाव करत राहिला आणि अल्फोन्सो पूर्ण ताकदीनिशी ठोसे मारत राहीला. आठव्या राउंडमध्ये वार्ड आक्रमक झाला आणि इतक्या वेळ आक्रमण करुन थकलेला सँचेझ एका ‘किडनी शॉट’मध्ये नेस्तनाबूत झाला. अली-फोरमन लढतीत अलीनेही हीच स्ट्रॅटेजी वापरली होती.

अलीचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो मैदानात अत्यंत चपळ होता. बहुतेक हेवी वेट चँपियन एखाद्या बुलडोझरप्रमाणे असतात. त्यांचे पाय फारसे हलत नाहीत. अली याला अपवाद होता. अलीच्या बहुतेक मॅचेसमध्ये त्याच्या प्रतिस्पर्ध्यीचे ठोसे हवेत जात असत कारण अली ठोसे चुकवण्यात वाकबगार होता. हवेत ठोसे मारुन मारुन प्रतिस्पर्धी थकला की अली आक्रमण करत असे आणि काही ठोश्यांमध्ये प्रतिस्पर्धी गारद होत असे.

अलीने बॉक्सर या प्रतिमेमध्ये असलेले बरेचसे स्टिरिओटाइप्स मोडले. अली कोणत्याही विषयावर स्वतः विचार करुन निर्णय घेत असे. व्हिएटनाम युद्ध चालू असताना अलीला सैन्यात भरती होण्याचा आदेश आला. यावर अलीने “व्हिएटनामी लोकांशी माझं वैर नाही” असं सांगून नकार दिला. अलीवर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्याचं विश्वविजेतेपद काढून घेण्यात आल. त्याच्यावर बॉक्सिंग खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली. हे सर्व केवळ तो निग्रो आहे म्हणून. अन्यथा खून आणि बलात्कारासारख्या गंभीर आरोपांचे खटले असलेले खेळाडू कोणतीही अडचण न येता खेळू शकत होते. अखेर चार वर्षे कोर्टात लढल्यानंतर सुप्रीम कोर्टाने अलीची ८-० अश्या एकमताने निर्दोष मुक्तता केली.

कवी लोक म्हणजे मृदू, कोमल हृदयाचे, सूर्यास्ताकडे बघून उसासे टाकणारे असा एक लोकप्रिय समज आहे. अलीने हा ही समज मोडीत काढला. त्याचा कविता वाचण्याचा आणि करण्याचा शौक होता. मैदानात प्रतिस्पर्ध्याला रक्तबंबाळ करणारा अली फावल्या वेळात लँगस्टन ह्युजेसच्या कविता वाचत असे. त्याच्या स्वतःच्या कविता मुख्यत्वे प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी असत. प्रतिस्पर्धी कितव्या राउंडमध्ये गारद होईल हे तो कवितेमधून सांगत असे. उदा. Sonny Liston is great, but he will fall in eight. आणि बरेचदा तसंच होत असे. व्हिएटनाम युद्धावर पत्रकारांनी विचारणा केल्यावर त्याने ही कविता वाचली.

Keep asking me, no matter how long
On the war in Viet Nam, I sing this song
I ain’t got no quarrel with the Viet Cong . . .

बॉक्सिंग हा हिंसक खेळ आहे हे उघड आहे. यात गंभीर दुखापत किंवा क्वचित मृत्यूही होऊ शकतो. बर्‍याच लोकांना हिंसा आवडत नाही आणि पर्यायाने बॉक्सिंगही आवडत नाही. हे मी समजू शकतो कारण मागच्या वर्षीपर्यंत मी ही याच गटात होतो. मग हा बदल होण्याचं कारण काय? हिंसा हा आपल्या मानसिकतेचा अविभाज्य भाग आहे. याचा अर्थ हिंसा करावी असा नाही. पण तिचं अस्तित्व नाकारावं असाही नाही. गांधीजींबद्दल आदर असूनही ‘अहिंसा परमो धर्मः’ मला पटत नाही कारण हे ‘ब्लँकेट स्टेटमेंट’ आहे. यापेक्षा नेल्सन मंडेलांचा दृष्टिकोन अधिक पटतो. मंडेलांनी सुरुवातीला गांधीजींचं अनुकरण करुन अहिंसेचा मार्ग पत्करला. त्यात यश येत नाही असं दिसल्यावर त्यांनी हिंसेचा मार्ग पत्करला. त्यांच्य मते अहिंसेचा मार्ग ही एक ‘स्ट्रॅटेजी’ आहे. उपयोग होत असेल तर जरुर वापरावी अन्यथा इतर मार्ग शोधावेत. आपल्याकडे जे दोन प्रसिद्ध गट आहेत, त्यांनी कित्येक वर्षे चर्चा करुनही जे साधलं नाही ते मंडेलांनी किती सहजपणे दाखवून दिलं.

हे थोडं अवांतर झालं पण मुद्दा हा की आपण रोज मारमार्‍या करत नसलो तरी याचा अर्थ आपल्यात हिंसा नसते असा नाही. हे समजून घेतलं तर हिंसेचा हवा तिथे नियंत्रित उपयोग करता येतो. आणि जर नाकारलं तर तिचे नको तिथे स्फोट होत राहतात. बॉक्सिंग हा आपल्यातील हिंसक प्रेरणेला स्वीकारणारा खेळ आहे असं मला वाटतं. यात हिंसा आहे पण क्रूरता नाही. याउलट स्पॅनिश बुल-फायटींग हा एक क्रूर खेळ आहे. तो मला कधीही बघवेल असं वाटत नाही.