मिर्झापूर सिझन २

‘मिर्झापूर सिझन २’ चा पहिला भाग जरा कंटाळवाणा वाटला. तीच ती गुंडगिरी, प्रत्येक दोन शब्दानंतर माता-भगिनी स्मरण​, डास​-चिलटे मारावीत तशी माणसे मारणे – हे सगळे कथानकाच्या ओघात आले तर ठीक वाटते. हे सोडून दुसरे काही कथानकच नसेल तर कंटाळा यायला लागतो. एक भाग बघितला आहे आता बहुधा फास्ट फारवर्ड करून शेवटी कोण मरतो आणि कोण…

‘मिर्झापूर सिझन २’ चा पहिला भाग जरा कंटाळवाणा वाटला.

तीच ती गुंडगिरी, प्रत्येक दोन शब्दानंतर माता-भगिनी स्मरण​, डास​-चिलटे मारावीत तशी माणसे मारणे – हे सगळे कथानकाच्या ओघात आले तर ठीक वाटते. हे सोडून दुसरे काही कथानकच नसेल तर कंटाळा यायला लागतो. एक भाग बघितला आहे आता बहुधा फास्ट फारवर्ड करून शेवटी कोण मरतो आणि कोण राहतो ते बघावे आणि मुक्ती मिळवावी.

पुढचे भाग बघितल्यावर अगदी सोडून देण्याइतकी वाईट आहे असे वाटत नाही. अभिनय चांगला आहे त्यामुळे एकदा बघू शकतो. पण आधीचा मुद्दा आत्ताही ग्राह्य आहे. सगळ्या सीझनचा एकच हेतू आहे – बदला. त्यामुळे हिंसाचार अती झाला आहे. हिंसाचार असणेही गैर नव्हे पण​ तो कसा दाखविला आहे यावर बरेचसे अवलंबून असते. ‘गॉडफादर’ हा गुन्हेगारीवरचा अजरामर चित्रपट​. पण त्यात पडद्यावर फारच कमी हिंसा दाखवली आहे. तरीही तो परिणामकारक आहे. मिर्झापूरमधली हिंसा बटबटीत आहे त्यामुळे ती बघायचा कंटाळा येतो. उघड हिंसा कलात्मक रीतीने दाखवणे फार कमी लोकांना जमते. टेरेन्टीनोची ‘किल बिल‘ मालिका ठळक अपवाद.

पंकज त्रिपाठी हा या मालिकेचा आधारस्तंभ. त्याचा अखंडा त्रिपाठी लक्षात राहतो. त्याची मुलाखत बघितल्यावर त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी किती समृद्ध हे लक्षात येतं.

‘गॉडफादर’वरून आठवले. सहाव्या एपिसोडमध्ये गोलू आणि गुड्डू बिहारमध्ये बोलणी करायला जातात तो प्रसंग गॉडफादरवरून जसाच्या तसा उचलला आहे. तिथे डॉन कोर्लिओने सोलोझ्झोबरोबर बोलणी करताना कोकेन व्यापाराला नकार देतो. इथे दद्दा अफीम व्यापाराला नकार देतो. आणि दद्दाचं पात्र ‘गेम ऑफ थ्रोन्स‘च्या टायरियन लॅनिस्टर​वर बेतलेलं आहे.

या सिझनची एक खासियत म्हणजे स्त्रियांना समान हक्क दिले आहेत​. त्यामुळे गुंडांबरोबर गुंडिणीही बघायला मिळतात​. (यक्ष : यक्षिणी, गुंड : गुंडिणी). ह्याआधी हे ‘सुबुर्रा : ब्लड इन रोम‘ या इटालियन मालिकेत बघितले होते.