विनोदनिर्मितीच्या टोकांचा प्रवास : माइक मायर्स आणि ऑस्टीन पॉवर्स मालिका

रॉबिन विलियम्स एका मुलाखतीत म्हणाला होता, “एखादी गोष्ट विनोदी असते किंवा नसते. यात मधले काही असत नाही. ऍंड इफ इट्स नॉट फनी, देन इट्स अ व्हॉइड.” मग स्टीफन हॉकिंग्जच्या आवाजात, “इव्हन हॉकिंग्ज वुड से, इट्स अ व्हॉइड.” (इथे थांबला तर तो रॉबिन विलियम्स कसला? नंतर – व्हेन यू कॉल हॉकिंग्ज, “धिस इज स्टीफन हॉकिंग्ज”, “आय वुड लाइक टू लीव्ह अ मेसेज..” “नो, धिस इज स्टीफन हॉकिंग्ज.” वगैरे.)

बरेच विनोदप्रकार आपल्याकडे फारच अभावाने हाताळले जातात किंवा अजिबातच नाही. प्रसिद्ध चित्रपटांचे विडंबन हा त्यातलाच एक प्रकार.
पाश्चात्य चित्रपटांमध्ये हा प्रकार बराच लोकप्रिय आहे. गॉडफादरवरून बनवलेला स्लाय स्टॅलोनचा ऑस्कर किंवा अपोकॅलिप्स नाऊ, प्लॅटून यावरून बनवलेली हॉट शॉट मालिका असे चित्रपट मनमुराद हसवतात. माइक मायर्सची ऑस्टीन पॉवर्स ही मालिका याच पठडीत बसते.

विनोदी कलाकारांचे विनोद आणि त्यांचे प्रकार पाहून त्यांच्या क्षमतेबद्दल अंदाज बांधता येतो. वूडी ऍलनचे विनोद ‘सेरेब्रल’ प्रकारात मोडतात तर मार्क्स बंधू कोट्या करण्यात पटाइत. (लेखन, दिग्दर्शनापासून जॅझ वादनापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असणार्‍या वूडी ऍलनची ओळख केवळ विनोदी कलाकार अशी करून देणे हा त्याच्यावर घोर अन्याय आहे याची जाणीव आहे.) माइकच्या बाबतीत या प्रश्नाचे उत्तर सहजासहजी मिळत नाही किंबहुना उत्तर मिळेलच याचीही खात्री नाही. ऑस्टीन पॉवर्स मालिकेत त्याचे विनोद अत्युत्तम ते अत्यंत टुकार अशा सर्व पातळींमध्ये मुक्त संचार करीत असतात. त्यातही टुकार विनोद करताना माइकची खरी पातळी यापेक्षा वर आहे आणि टुकार विनोद हा त्याच्या एका पात्राचा विनोदनिर्मिती करण्याचा दुबळा प्रयत्न आहे हे लक्षात आल्यावर प्रेक्षक हसावे किंवा नाही अशा गोंधळात पडतात. पण त्याला फारसा वेळ मिळत नाही कारण लगेच पुढच्या मिनिटाला नवीन विनोद/कोटी तयार असते.

ऑस्टीन पॉवर्स मालिका जेम्स बॉंड चित्रपटांचे विडंबन आहे. ऑस्टीन पॉवर्स हा बॉंडप्रमाणेच ब्रिटीश एजंट आहे आणि त्याचा ठरलेला शत्रू म्हणजे डॉक्टर एव्हिल. याबरोबरच डॉक्टर एव्हिलचा उजवा हात म्हणजे एका डोळ्यावर पॅच लावलेला नंबर वन, हेर दॉक्तर म्हणून त्याला हाक मारून दचकवणारी जर्मन आशिष्टन फ्राउ फार्बिसिना इ. पात्रेही आहेत. यात ऑस्टीन पॉवर्स आणि डॉक्टर एव्हिल या भूमिका माइकनेच केल्या आहेत. याशिवाय सर्व चित्रपटांमध्ये आणखी एक-दोन भूमिकाही तो समर्थपणे पार पाडतो. यातील काही श्रेयनामावली वाचल्याशिवाय ओळखताही येत नाहीत.

यातील विनोद इतक्या विविध प्रकारचा आहे की त्याचे शब्दांमध्ये वर्णन अशक्य आहे. एक-दोन चित्रपटांमध्ये डॉक्टर एव्हिलला शीतपेटीमध्ये ठेवले जाते आणि तो नसताना नंबर वन स्टारबक्समध्ये पैसे गुंतवून गुन्हेगारी करून मिळाले असते त्यापेक्षा कैक पटींने अधिक पैसे मिळवतो. किंवा ऑस्टीन पॉवर्स हातात सापडूनही डॉक्टर एव्हिल त्याला न मारता जेवायचे आमंत्रण देतो इ. मार्क्स बंधूंप्रमाणे शाब्दिक कोट्या, पीटर सेलर्ससारखे प्रसंगांमधून येणारे विनोद, प्रत्येक पात्राच्या तर्हेवाइक स्वभावाची अतिशयोक्ती केल्यानंतर होणारे विनोद आणि याखेरीज बॉंड पट, टीव्हीवरील टॉक शोज किंवा टर्मिनेटर हॉलिवूडपटांमध्ये येणारे नेहेमीचे प्रसंग या सर्वांचा विडंबनासाठी पूरेपूर उपयोग केलेला आहे. माइकला प्रत्येक चित्रपट लिहीण्यासाठी तीन वर्षे लागतात यावरून त्याच्या तयारीची कल्पना यावी. स्पिलबर्ग, टॉम क्रूझ, ब्रिटनी स्पिअर्स, टिम रॉबिन्स यासारख्या नावाजलेल्या कलाकारांनी त्याच्या चित्रपटात हजेरी लावलेली आहे.

इतकी स्तुती केल्यानंतर काही इशारे. ज्यांना अश्लील विनोदांचे वावडे आहे त्यांनी या चित्रपटांच्या वाटेला जाऊ नये. द्वयर्थी संवाद, अत्यंत बटबटीत वाटावीत अशी एक्सप्लिसिट दृश्ये, टॉयलेट ह्यूमर या सर्वांची यात रेलचेल आहे. जर कोणत्याही प्रकारचा विनोद पचवण्याची तयारी असेल तरचे हे चित्रपट पहावेत अन्यथा निराशा होईल आणि नंतर आम्हाला दूषणे देऊनही उपयोग होणार नाही. अर्थात या चित्रपटांमधील अश्लीलतेमुळे भारतात हे प्रदर्शित झाले आहेत का याची कल्पना नाही आणि झाले असल्यास भरपूर कात्री लावूनच झाले असणार याची खात्री आहे.