मतांचं रिसायकलिंग​

मी हल्ली चित्रपटांवरचे लेख वाचणं सोडून दिलं आहे – अर्थात काही अपवाद वगळता. आणि सगळे लेख नव्हे, तर जे उत्कृष्ट म्हणता येतील असे लेख वाचणं सोडून दिलं आहे. लेखाच्या सुरुवातीलाच धक्कादायक वाक्य टाकलं (इथे “स्टंटबाजी करणं हा माझा प्रकृतीधर्म नाही हे आपण जाणताच” असं म्हणणारे विश्वासराव दाभाडे आठवले, असो.) तर वाचक शेवटपर्यंत टिकण्याची शक्यता वाढते…

मी हल्ली चित्रपटांवरचे लेख वाचणं सोडून दिलं आहे – अर्थात काही अपवाद वगळता. आणि सगळे लेख नव्हे, तर जे उत्कृष्ट म्हणता येतील असे लेख वाचणं सोडून दिलं आहे. लेखाच्या सुरुवातीलाच धक्कादायक वाक्य टाकलं (इथे “स्टंटबाजी करणं हा माझा प्रकृतीधर्म नाही हे आपण जाणताच” असं म्हणणारे विश्वासराव दाभाडे आठवले, असो.) तर वाचक शेवटपर्यंत टिकण्याची शक्यता वाढते असं नुकतंच मिनेसोटा, हेलसिंकी आणि इस्लामाबाद विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या एकत्रित संशोधनात सिद्ध झालं आहे. तर यामागचं कारण काय​? इथे खरं तर लेखात पाणी घालायला चांगली संधी आहे – माहिती-तंत्रज्ञानाचा विस्फोट​, सोशल मीडिया याडा-याडा. लेख कशावरही असो, त्यातली धकाधकीच्या जीवनावरची चिंता वाचून वीट आला आहे. त्यात एक प्यारा (किंवा प्यारी – समानता) यात घातला की उरले दोन प्यारे (किंवा प्याऱ्या). शेवटी किती लाइक्स मिळतात ते महत्त्वाचं. वाचकांचा धृष्टद्द्युम्न हेच आमचे ध्येय​! (संतोष रजेवर आहे.)

कोणत्याही गोष्टीवर आपण​ आपलं मत कसं बनवतो? इतरांची मतं वाचून किंवा ऐकून​. उदा. सरकार संविधानात बदल करणार अशी बातमी आहे. मी यावर एक-दोन लेख​, मुलाखती, संपादकीय वाचतो, माझं मत बनवतो आणि एखादं वेळेस लेख लिहितो. मग ज्या वाचकांनी हे इतर लेख वाचलेले नसतात त्यांना लेख लय भारी वाटतो, ज्यांनी वाचलेले असतात त्यांना सो-सो वाटतो. किंवा ‘ग्लोबल वोर्मिंग’वर पुस्तक वाचलं, त्याची माहिती देणारा लेख लिहिला. हे करताना माझा वाटा फक्त माहितीचं संकलन आणि ती पुस्तक न वाचताही कुणालाही कळावी अश्या भाषेत मांडणं हा असतो. तरीही लोक वाचतात कारण सगळं पुस्तक वाचण्याइतका वेळ​/इंटरेस्ट बहुतेक लोकांना नसतो. कोणत्याही गोष्टीवरचं आपलं मत हे सतत आपण जे वाचतो, बघतो, ऐकतो आणि अनुभवतो त्यानुसार बदलत असतं. राजकारणापासून ‘ग्लोबल वोर्मिंग’पर्यंत कोणत्याही विषयावर मत बनवायचं असेल तर इतर मते वाचल्याशिवाय पर्याय नाही. थोडक्यात, कोणत्याही विषयावरचं माझं मत हे त्या-त्या विषयात जे तज्ञ लोक आहेत त्यांच्या मतांचं रिसायकलिंग असतं. फार​-फार तर एखाद्या लेखात मतं एकत्रित करून त्यावर भाष्य केलेलं असतं किंवा लेखकाने या सर्व मतांचा आढावा घेतलेला असतो. बरेचदा लेखक ही तसदीही घेत नाहीत​. काफ्कावर दोन जाहिरातींमध्ये दाटीवाटीने बसविलेल्या इन​-मीन तीन प्यारांचा लेख​. पहिल्या प्याऱ्यात इथे जन्मला, इथे बागडला, खूप खस्ता खाल्ल्या, मॅजिकल​ रिअलिझ्मचा जनक इ. इ. (इथे मॅजिकल​ रिअलिझ्म म्हणजे काय हे सांगण्याची तसदी घ्यायची गरज नाही, माहिती कोंबणं महत्त्वाचं)

इथे मुद्दा येतो की असा एखादातरी विषय आहे का की ज्यावर मी इतरांचं न ऐकता माझं मत बनवू शकतो आणि ते मत ग्राह्य मानलं जाऊ शकतं? माझ्या मर्यादित वकुबानुसार असे दोन विषय दिसतात – पुस्तके आणि चित्रपट​. या विषयांवर कोणतंही मत असलं तरी ते चूक किंवा बरोबर नसतं, उलट आवडनिवड सापेक्ष असते असं म्हणून वेळ मारून नेता येते. दुसरं असं की हल्ली चित्रपट बघण्याआधी त्यावरचा लेख वाचला तर चित्रपट बघण्याचा अनुभव कमअस्सल झाल्यासारखा वाटतो. समीक्षकाचं चित्रपटावरचं लेखन म्हणजे एका प्रकारची रोरशाक टेस्टच बनली आहे – त्यावरून चित्रपट कसा आहे यापेक्षा समीक्षकाच्या आवडीनिवडीच अधिक लक्षात येतात​. कुणाला हॉलिवूड अजिबात आवडत नाही, कुणाला बॉलीवूड​. कुणाच्या मते निओरिअलिझ्म आणि सत्यजित रे म्हणजे सिनेमाचा सर्वोच्च बिंदू, तर कुणाच्या मते क्युब्रिक आणि स्कोरसेझी सर्वोत्कृष्ट​. यात काही गैर आहे असं अजिबात नाही, आवडीनिवडी प्रत्येकाच्या असतातच​. फरक हा की समीक्षा करताना त्यावर शक्यतो निष्पक्षपणे लिहिणं अपेक्षित असतं ते होत नाही. समीक्षकाच्या जागी जर मी मला ठेवलं तर हे किती अवघड आहे याची कल्पना येते. कधीकधी एकाच माणसाला ‘डॉन​’, ‘गॉडफादर​’, ‘राशोमोन’ आणि ‘अंदाज अपना अपना’ हे सगळं आवडू शकतं हेच मान्य नसतं कारण प्रेक्षकांची आणि चित्रपटांची विभागणी काटेकोर असते. रे म्हणजे ‘पाथेर पांचाली’, ‘चारुलता’ फारतर ‘महानगर​’. दि सिका म्हणजे ‘बायसिकल थीव्ह्ज’​. हे समज पूर्णपणे खोटे आहेत असं नाही पण ही या दिग्दर्शकांची अपुरी ओळख आहे. दि सिकाचं नाव घेतलं की त्याने सामान्य माणसांकडून ‘बायसिकल थीव्ज’ सारखा गंभीर चित्रपट कसा करवून घेतला यावर अनेक प्यारे वाचायला मिळतात​. पण याच दि सिकाचा ‘यस्टरडे, टुडे ऍड टुमारो’ फारसा चर्चेत येत नाही – ऑस्कर मिळून सुद्धा! इथे त्याने नवखे कलाकार न घेता मार्चेल्लो मास्त्रोय्यानी आणि सोफिया लोरेन सारखे कसलेले कलाकार घेतले. (निओरिअलिझ्म म्हणजे अंतिम सत्य या मताच्या विरोधात हा पुरावा पुरेसा ठरावा.) शिवाय हाताळणीही हलकीफुलकी, काहीशी विनोदी ठेवली. मार्चेल्लोला नेहमी गंभीर भूमिकांमध्ये बघायची सवय असेल तर तो विनोदी भूमिकाही किती समर्थपणे हाताळू शकतो याचं हा चित्रपट उत्तम उदाहरण आहे.

समजा, तुम्हाला यासुजिरो ओझुचं नावही माहीत नाही. (मलाही काही महिन्यांपूर्वी माहीत नव्हतं.) त्याचा चित्रपट बघण्याचा योग आला तर त्याआधी तुम्ही त्यावर एक दोन लेख वाचता. मूळ लेख जर उत्कृष्ट असेल तर (उत्कृष्ट नसला तरीही बहुतेक वेळा तो उत्कृष्ट लेखांवर आधारित असतो त्यामुळे त्यात रिसायकल्ड मतं सापडण्याची शक्यता अधिक​.) तर अर्ध्या-एक तासात तुम्हाला ओझुची सगळी वैशिष्ट्ये रेडीमेड मिळून जातात – कॅमेऱ्याची हालचाल अगदी कमी, चित्रीकरणाचे नेहमीचे नियम तोडलेले, पात्रं बरेचदा पाठमोरी दाखवलेली इ. इ. तासाभरात तुम्ही ओझुवर एक लेखही लिहून टाकू शकता – हाय काय आन नाय काय​! नंतर चित्रपट बघताना तुम्ही काय करता? जे वाचलं त्याचा पडताळा घेता कारण चित्रपट सुरू व्हायच्या आतच तुमचं ओझुविषयी एक मत बनलेलं असतं. एकदा एक मत बनलं की आपण त्याच चश्म्यातून सगळीकडे बघतो. म्हणूनच होम्स सगळी तथ्ये समोर आल्याशिवाय कोणतंही मत बनवीत नसे. दुसरा पर्याय म्हणजे ओझुविषयी कोणतीही माहिती न मिळवता कोऱ्या मनाने चित्रपट बघणे. सध्या मी हा पर्याय स्वीकारलेला आहे.

हे पुस्तकांच्या बाबतीतही खरं असायला हवं पण तसं अजून तरी आढळलेलं नाही – काही अपवाद वगळता. मी मुराकामीच्या पुस्तकांचे ‘अर्थ’ लावणारे लेख वाचणं सोडून दिलं आहे. तरीही पुस्तक वाचणे आणि चित्रपट बघणे यामध्ये काही मूलभूत फरक आहेत​. पुस्तक वाचताना मेहनत करावी लागते, पात्रे प्रसंग​, घटना डोळ्यासमोर आणाव्या लागतात​. चित्रपटात हे सगळं तयार असतं. उगीच का बहुतेक लोक वाचायचा कंटाळा करतात​? दहा जिने चढून जाणे आणि लिफ्टचं बटण दाबणे यात जो फरक आहे तोच पुस्तक वाचणे आणि त्यावरचा चित्रपट बघणे यात आहे. ही चित्रपटांवर किंवा चित्रपट बघणाऱ्यावर टीका नाही उलट चित्रपट या माध्यमाची जबरदस्त ताकद दाखविण्याचा प्रयत्न आहे. पुस्तक वाचताना काही तास ते कित्येक महिने जाऊ शकतात​, अनुभव खंडित असतो. चित्रपट दोन​-तीन तासात एकाग्रपणे बघण्याचा दृक​-श्राव्य अनुभव आहे. म्हणूनच मला एकाच दिवशी सात-आठ चित्रपट बघणाऱ्याविषयी (किंवा दिवसाला एका पुस्तकाचा फडशा पाडणाऱ्या बुकरच्या जजांविषयी) आदरयुक्त कुतूहलमिश्रित हेवा वाटतो. म्याट्रिक्समध्ये निओ जसं सगळं मेंदूत डाउनलोड करतो तसा काहीसा प्रकार​. कोरी पाटी घेऊन चित्रपट बघण्याचा अनुभव वेगळा असतो. इथे अर्थातच ज्यांच्यावर विचार करावा लागतो असे चित्रपट अपेक्षित आहेत​.

लेख टीकात्मक नाही. जे लोक लेख वाचून चित्रपट बघतात ते चूक असंही म्हणणं नाही. उदाहरण द्यायचं झालं तर काही लोकांना नवीन शहर बघताना टुरिष्ट गाइड आणि गायडेड टूर आवडते. इथे फायदा असा की शहराची मुख्य आकर्षणे कमीत कमी वेळात बघून होतात​. काही लोकांना शहराची जुजबी माहिती घेऊन मग मनाला वाटेल तसं फिरायला आवडतं. या प्रकारे चित्रपट बघितला तर तो अनुभव अविस्मरणीय असतो हे मात्र नक्की. मग ‘पास्तिश’ म्हणजे काय हे ठाऊक नसलं तरी चालतं पण ‘किल बिल १’ मध्ये शेवटचा बर्फातील मारामारीचा प्रसंग ‘sheer visual poetry’ या प्रकारात मोडतो हे सांगण्यासाठी समीक्षकाची मदत लागत नाही.

पोलिन केल​ महान समीक्षका (की समीक्षक​?) आहेत​ पण तोटा असा की त्यांचा लेख वाचल्यावर चित्रपटाविषयी न बघताच इतकी सखोल आणि आशयपूर्ण​ माहिती मिळते की नंतर चित्रपट बघताना त्याची छाप पुसणे केवळ अशक्य असतं. याचा अर्थ​​ चित्रपटांविषयी वाचन सोडून दिलं आहे असा नाही. चित्रपटाच्या इतर गोष्टी उलगडून दाखविणारे लेख नेहमीच रोचक असतात​. निओरिअलिझ्म म्हणजे काय याविषयी माहिती असेल तर ते चित्रपट बघताना अनुभव नक्कीच समृद्ध होतो. कुरोसावाचं आत्मचरित्र वाचल्यावर त्याच्या चित्रपटांकडे बघण्याची दृष्टी अधिक व्यापक होते. थोडक्यात सांगायचं तर (टू लेट​) कुरोसावा किंवा अंतोनियोनी या लोकांनी जिवापाड​ मेहनत घेऊन चित्रपट केले आहेत आणि त्याद्वारे ते मला काहीतरी सांगू इच्छित आहेत​. इथे मला समीक्षकाच्या मध्यस्थाची गरज नाही. चित्रपट बघितल्यानंतर वाटलंच तर लेख जरूर वाचेन पण चित्रपटाचा पहिला अनुभव घेताना शक्यतो पाटी कोरी असावी असा प्रयत्न आहे. म्हणून हल्ली लेख वाचताना हे जरूर बघा, इथे दिग्दर्शकाने अमुकसाठी अमुक प्रतीक वापरलं आहे, इथे त्याला असं म्हणायचं आहे अशी वाक्ये आली की मी लेख वाचणं सोडून देतो. निदान एखाद्या क्षेत्रात तरी मला रिसायकल्ड मत असण्यापेक्षा स्वतः​:चं मत असणं अधिक आवडेल​.