A serene waterfall cascades down rocky outcrops, surrounded by lush green trees and dense vegetation in a vibrant forest setting. The water glistens as it flows, creating a tranquil atmosphere amidst the natural beauty of the jungle.

अरण्यॠषी मारुती चितमपल्ली

चित्तमपल्ली यांनी जंगलाचे ६५ वर्षांचे प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुभव आपल्या २१ पुस्तकांमध्ये संकलित केला आहे, ज्यात दोन विश्वकोशांचा समावेश आहे. ज्ञानाचा हा खजिना इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये भाषांतरित होणे गरजेचे आहे, जेणेकरून भारतासह उर्वरित जगातील निसर्गप्रेमींना त्याचा लाभ घेता येईल.

मारुती चितमपल्ली यांचा जन्म १९३२ साली नागपूर येथे झाला. त्यांचे वडील एका मिलमध्ये काम करत असत​. अर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही चितमपल्ली यांनी स्कॉलरशिप मिळवून शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर कॉलेज शिक्षण घेताना काही अडथळे आले, मात्र नंतर कोइंबतूर येथे फॉरेस्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांना आपल्याला आवडता विषय सापडला आहे याची जाणीव झाली.

शिक्षण पूर्ण केल्यावर महाबळेश्वरला त्यांची पहिली पोस्टींग झाली. भारत सरकारच्या वनविभागात त्यांनी ३६ वर्षे काम केले. १९९० साली निवृत्त झाल्यानंतरही निसर्गाशी त्यांचा संबंध सुटला नाही. भारतातील जंगलांविषयीचा त्यांचा अनुभव ६४ वर्षांचा आहे.

वन महाविद्यालयातील प्रशिक्षणादरम्यान, चितमपल्ली यांच्या लक्षात आले की अभ्यासक्रम फक्त​ जंगलाच्या व्यावसायिक पैलूंशी संबंधित आहेत, जसे की लाकडाची लांबी आणि रुंदी, त्याची किंमत इत्यादी. स्वातंत्र्योत्तर भारतात सेवा बजावत असतानाही त्यांच्या बहुतेक सहकाऱ्यांना निसर्गसौंदर्याची कधी जाणीवही झाली नाही. याउलट चितमपल्ली यांना लेखकाची संवेदनशीलता लाभली होती, ज्यामुळे ते निसर्गाशी एकरूप होऊ शकले. एकदा ते म्हणाले होते, “मी माझ्या आयुष्यात कधीही प्राणी मारला नाही. मी आत्महत्या कशी करू शकतो?” सुरुवातीच्या काळात वनाधिकाऱ्यांनी पक्षी निरीक्षक असणे अपेक्षित नसल्याने त्यांच्या काही सहकाऱ्यांकडून त्यांची अनेकदा खिल्ली उडवली जात असे.

चितमपल्ली यांना निसर्गाविषयी तीव्र कुतूहल आहे. अनेक पक्षी त्यांच्या इंग्रजी नावांनी ओळखले जातात पण त्यांची मराठी नावे अज्ञात आहेत हे त्यांच्या लक्षात आले. संस्कृत भाषा हा पक्षी आणि प्राण्यांच्या वर्णनाचा खजिना आहे, हे लक्षात आल्यावर वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी पंडितांकडून संस्कृत शिकण्यास सुरुवात केली. पुढे जर्मन आणि रशियन भाषेतील पक्ष्यांवरील आधुनिक साहित्याची मोठी श्रीमंती लक्षात येताच त्यांनी त्या भाषाही शिकण्यास सुरुवात केली. चितमपल्ली यांना सागरी पक्ष्यांची नावे सापडत नसल्याने ते महाराष्ट्रातील रायगड किनाऱ्यावर सहलीला गेले, मच्छीमारांना भेटले. इंग्रजी पुस्तकांतून पक्ष्यांची छायाचित्रे दाखवून त्यांची स्थानिक नावे, मूलस्थाने (हॅबिटॅट​), वर्तन लिहून ठेवायचे.

गोनिदा आणि नरहर कुरुंदकर यांसारख्या नामवंत मराठी लेखकांना
भेटल्यावर चितमपल्ली यांना लेखनाची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी लिहायला सुरुवात केली. त्यांचे पहिले पुस्तक पक्षी जाए दिगंतरा १९८१ मध्ये प्रकाशित झाले आणि ते बेस्ट सेलर ठरले. तेव्हापासून ते सातत्याने लिहीत आहेत. पक्षी कोश आणि प्राणी कोश यांसह २१ प्रमुख ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत​. पक्षीकोशामध्ये ४५०+ पक्ष्यांची सविस्तर माहिती आहे, ज्यात १८ भाषांमध्ये त्यांच्या नावांचा समावेश आहे, तर प्राणीकोशामध्ये ५००+ प्राण्यांची माहिती आहे. सध्या ते मस्त्य कोश आणि वृक्षकोश या पुस्तकांवर काम करत आहेत. नागपूर विद्यापीठातील बीए,एमए मराठी अभ्यासक्रमासाठी त्यांची दोन पुस्तके वाचणे आवश्यक आहे.

चितमपल्ली यांच्या लिखाणाचा आवाका पाहून थक्क व्हायला होते. एकट्याने विश्वकोश लिहिणे किती कठीण काम असेल याची कल्पना करता येईल का? शिवाय इंटरनेट किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इथे काहीच उपयोग होत नाही कारण या विश्वकोशातील माहिती जंगलातील ६५ वर्षांच्या संशोधनातून गोळा केलेली आहे.

वैदिक ऋषींनी हंसाच्या घरट्यांचे सविस्तर वर्णन करण्यापासून ते महाभारतातील पक्ष्यांच्या वर्तणुकीच्या सांकेतिक वर्णनापर्यंत पक्षी, प्राणी आणि निसर्ग यांच्या सविस्तर वर्णनांनी संस्कृत वाङ्मय भरलेले आहे. संस्कृत साहित्याचे सखोल ज्ञान असलेल्या चितमपल्ली यांनी या वन्यजीव तपशीलांची पडताळणी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. उदाहरणार्थ, संस्कृत वाङ्मयात चकोर नावाने ओळखला जाणारा पक्षी हा पौराणिक पक्षी आहे, असे सर्वमान्य होते. चकोर हा नेपाळ आणि पंजाबमध्ये आढळणारा खरा पक्षी असून कीटक, मुळं वगैरे खातो हे चितमपल्ली यांनी सिद्ध केले. किंवा ‘नीर क्षीर विवेक’ हे प्रसिद्ध संस्कृत सुभाषित​ म्हणजे पाण्यात खोलवर असलेल्या कमळाचे दाणे फाडण्यासाठी आणि आतील दुधाळ पांढरा पदार्थ चोखण्यासाठी हंस मान बुडवतो तेव्हा त्याच्या वर्तनाचे वर्णन यात केले आहे, हे चितमपल्ली यांनी दाखवून दिले. ‘ऑटर्स’, ‘ग्रे लॅग गूज’ आणि ‘हेरॉन्स’ यांच्यावरील त्यांचे सविस्तर शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर झाले आहेत. भारत सरकारच्या सेवेत असताना कर्नाळा पक्षी अभयारण्य, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची उभारणी आणि देखभालीसाठी त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. विदर्भातील नवेबांधगाव येथे पक्षी संग्रहालय उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

हा लेख लिहिण्याचे कारण एक युट्युब व्हिडिओ. बेंगळुरू येथील पक्षी निरीक्षकांची ही अनौपचारिक बैठक होती आणि प्रास्ताविकात त्यांनी भारतातील पक्षी निरीक्षणाच्या इतिहासाविषयी सविस्तर माहिती दिली. चितमपल्ली यांनी या क्षेत्रात दिलेल्या अफाट योगदानाबद्दल ते अनभिज्ञ होते, हे पाहून मी निराश झालो. त्यात त्यांचा दोष नव्हता. या वगळण्यामागचे कारण म्हणजे चितमपल्ली यांच्या पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर झालेले नाही.

चित्तमपल्ली यांनी जंगलाचे ६५ वर्षांचे प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुभव आपल्या २१ पुस्तकांमध्ये संकलित केला आहे, ज्यात दोन विश्वकोशांचा समावेश आहे. ज्ञानाचा हा खजिना इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये भाषांतरित होणे गरजेचे आहे, जेणेकरून भारतासह उर्वरित जगातील निसर्गप्रेमींना त्याचा लाभ घेता येईल.

चितमपल्ली यांना त्यांच्या पुस्तकांसाठी तसेच निसर्ग संवर्धनातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुण्यातील ऍडवेंचर फाऊंडेशनने त्यांच्या सन्मानार्थ ‘मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ या पुरस्काराची स्थापना केली आहे. नुकताच त्यांना पद्मश्री या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले. नैसर्गिक जीवन आणि निसर्गाचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी समर्पित असलेल्या जीवनाचा हा एक योग्य सन्मान आहे.


Cover of the Marathi book 'Chakavachandan : Ek Vanopnishad' by wildlife researcher, naturalist, conservator, and successful Marathi writer Maruti Chitampalli.

चितमपल्ली यांचे जीवन आणि त्यांनी केलेल्या विविध कार्यांची माहिती त्यांच्या ‘चकवाचांदण : एक वनोपनिषद’ या पुस्तकातून घेतली आहे.

Lead image : Rudy and Peter Skitterians from Pixabay

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *