समाजमनाची विविध आंदोलने तात्कालिक आवर्तनांमधून जात असताना त्यांना निरखून पाहिले असता त्यांचे प्रकटन तेव्हा बोलल्या जाणार्या भाषेमधूनही होते असे जाणकारांच्या अनुभवास आले आहे. जाणकार म्हणजे अर्थातच आम्ही, ह्यॅ ह्यॅ ह्यॅ. थोडक्यात सांगायचे तर, कमिंग स्ट्रेट टु द बिंदू (रेखा,हेलन) विदाउट बिटींग (रंजीत,डॅनी) अराउंड द झुडूप आय टेल यू, दुबईस्थित व्यावसायिक पक्या डेंजर यांनी म्हटल्याप्रमाणे जो [१] पब्लिक के दिल मे र्हैता हय, वोईच उसकी जुबान पे आता हय. हा साक्षात्कार आम्हाला होण्याचे कारण म्हणजे सध्या आंतरजालावर बर्याच ठिकाणी दिसणारा Awwwwww! हा उद्गार-कम-आश्चर्य-कम-इमोसनल-अत्याचार वाचक शब्द. बहुतेक वेळा मांजरांच्या चित्राखाली हा आढळतो आणि याच्या उद्गारकर्त्या म्हैला अंदाजे सव्वा महिना ते ९७ वर्षे या वयोगटातील असतात. हा शब्द जितका लांब तितकी उद्गारकर्तीणीची भावणा अधिक तीव्र असा अंगठ्याचा नियम [२] लावता येतो. या शब्दाची इतर रूपेही आहेत. शो श्वीट किंवा शो क्यूट हे त्याचेच प्रकार.
क्यूट नक्की कशाला म्हणायचे? सवयीनुसार क्यूटची व्याख्या बदलू शकते का? माझ्या बेडरूमच्या खिडक्यांना जाळ्या आहेत. एक दिवस संध्याकाळी जाळीच्या बाहेरच्या बाजूला एक पालोबा दिसले. पालोबाईही असतील कदाचित. जाळीवरून हळूहळू फिरणारे त्यांचे पाय पाहून मला जुरासिक पार्कमधील टी-रेक्स आठवला. (लाइफ, फाइंड्स अ वे.) हळूहळू त्यांची सवय झाली, त्यांचे डेली रूटीनही लक्षात आले. दिवसभर बाहेर उन असल्याने जाळीत ताणून द्यायची आणि रात्री शब्दश: माशा मारायला निघायचे, हाय काय अन नाय काय. बिलं भरणे, डेंटिस्टकडे जाणे असली फालतू कामे करायला ते काय उत्क्रांत झाले होते का? मग एके दिवशी दुसर्या खिडकीच्या जाळीत एक पालपिल्लू दिसले. त्याची फिरण्याची इष्टाइल पाहून त्याचे नाव ठेवले – पालुस. मग शिणियर पालोबा आठवले, त्यांच्यावर अन्याय का? मग दोघांची नावे ठेवली – पालुस जुनियर आणि पालुस सिनियर. (नाहीतरी हल्ली पितापुत्रांना सिनियर-जुनियर म्हणायची फ्याशन आहेच्चे.) पालुस जुनियर मांजराच्या पिल्लाइतका क्यूट नसला तरी पिल्लू क्याटेगरीत असल्याने चालून जातो. पालुस सिनियर अचानक दिसले तर दोन क्षण पोटुसमध्ये खड्डुस पडतो, पण ती अमिग्डलाची करामत.
आमचे पूर्वज याच अमिग्डलाच्या भरवशावर शिकारी करायला निघायचे. अमिग्डला म्हणजे ‘क्रांतीवीर’ सिनेमात ज्याला नाना पाटेकर ‘छोटा दिमाग’ म्हणतो ती. एखाद्या झुडुपातून खसफस ऐकू आली की थांबून लढायचे की धूम [३] ठोकायची याचा निर्णय क्षणार्धात करावा लागायचा. अर्थात कधीकधी निर्णय चुकायचा. म्हणजे वाघ समजून धूम ठोकावी आणि कोल्ह्याचे पिल्लू निघावे असाही प्रकार व्हायचा. मग रात्री गुहेत शेकोटीच्या आसपास गप्पांचा फड रंगल्यावर त्या कोल्ह्याच्या पिलाचे रूपांतर सिंहात व्हायचे आणि कथेला रंग चढायचा. आज कोल्ह्याच्या जागी क्लायंट असतो आणि आपण त्याला कसे गंडवून कॉन्ट्रॅक्ट दुपटीच्या दरात मिळवले याची सुरस कथा ग्लासातील बर्फाच्या किणकिणणार्या पार्श्वसंगीतावर सांगितली जाते. इतपत उत्क्रांती [४] व्हायला गेलाबाजार ३०,००० वर्षे लागली, आहात कुठे? [५] उत्क्रांती या शब्दाची शोकांतिका ही की यात क्रांती हा शब्द दडलेला आहे. क्रांती म्हटले की मनोजकुमारने भारतीय सिनेरसिकांवर केलेला अत्याचार आठवतो. त च्या जागी ट करून हिंदी बोलणारे टॉम अल्टर, बॉब क्रिस्टो आठवतात. आपण उत्क्रांत झालो आहोत यावरचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो.
तळटीपा :
[१] अमरू उपराष्ट्राध्यक्ष नव्हेत. पीजे : जो बायडेन पाळण्यात असताना त्यांची आई कोणते गाणे म्हणायची? उत्तर : बाळा जो जो रे.
[२] अंगठ्याचा नियम अर्थात रूल ऑफ थंब. जेव्हा आपल्याकडे लोक अंगठा वापरत होते किंवा कापून घेत होते तेव्हा हा अंगठ्याचा नियम वापरून पाश्चात्य संशोधकांनी अनेक शोध लावले, प्रगती केली आणि आपल्याला अंगठा दाखवला. त्यांची प्रगती झाली म्हणून आपली पॅसेंजर झाली. तेव्हा ते तसे झाले म्हणून तर आत्ता हे असे झाले. असो.
[३] चित्रपट नव्हे. ‘नवरंग’मध्ये संध्याला पाहून जी ठोकावीशी वाटते ती धूम.
[४] उत्क्रांतीवरून आठवलं. शाळेत आम्हाला उत्क्रांतीचा धडा सरमळकर बाईंनी शिकवला. मी, सावड्या, लेल्या आणि शिर्क्या मागच्या बेंचांवर भंकस करत बसायचो. लेल्याची आई रोज डब्यात थालपीटं, कोथिंबीरीच्या वड्या द्यायची. लेल्याच्या वाट्याला एखादा तुकडा यायचा, बाकी आम्हीच संपवायचो. प्रिलिमच्या आधी लेल्यानं बातमी आणली, “उत्क्रांतीचा प्रश्न पंधरा मार्काला येणार आहे, गॅरंटेड.” तसा सावड्या मला विचारतो, “इचिभना, उत्क्रांती म्हणजे काय रे सुर्व्या?” मी म्हणालो, “मला तरी कुठे माहितेय? डेक्कनक्वीनने कधी शिकवलं कुणाला माहीत?” असो. गेले ते दिवस.
[५] आहात कुठे ही नक्की काय भानगड आहे? या प्रश्नाला काही अर्थ आहे का? काही लोकांचा हा आवडता प्रश्न आहे. अंबानीने ढमके अब्ज देऊन घर [अ] बांधले, आहात कुठे?
तळतळटीपा :
[अ] अंबानीने जे बांधले त्याला घर म्हणणे म्हणजे मार्लन ब्रॅंडोला ‘आग ही आग’ मध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका देण्यासारखे आहे. पण आमच्या मध्यमवर्गीय शब्दकोषात याला साजेसा शब्दच नाही त्याला आम्ही काय करणार? फार तर बंगला. आमच्या पालुसची धाव घर, १-२ बीएचके यापलिकडे जात नाही. थिट्या मध्यमवर्गीय जाणिवांच्या घुसमटीचे प्रकटन करण्यासाठी आविष्काराची निकड भासणे, त्या निकडीचे रूपांतर रक्ताळलेल्या बोथट जखमांच्या खपल्यांमध्ये होणे, त्या खपल्यांवर चढलेला खुंटलेल्या संवेदनांचा पिवळसर-जांभळा रंग, कधी त्रिज्येमधून तर कधी परिघाबाहेरून भाग न जाणारे अपरिमेय गणित, भागाकारात हच्चा घेतला तरी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढींच्या उसवलेल्या झग्यातून कुरकूरणारी बोथट मनांची आक्रंदने, चेंगीझ खानपासून राखी सावंतपर्यंत हेलपटलेल्या झगझगीत रूपेरी वाफांच्या मनस्वी झिलया, नेणीवेच्या शुभ्र कॅनव्हासवर रंगांचे अजीर्ण होऊन सकाळी सकाळी ज्याक ड्यानियल्सची आंबट-करपट ओकारी व्हावी तत्सम रेखाटलेला आदिम जाणिवांचा कलाविष्कार, हीच आजच्या भगभगीत, ओशट, तडकलेल्या बूर्झ्वा भावनिक आंदोलनांची शोकांतिका आहे.