श्री चावुण्डराजे करवियले

रोमच्या कलोसियमजवळ उत्खनन करताना एक व्याकरणाचं हस्तलिखित सापडलं. याचा काळ अंदाजे इ. स. ३०० च्या आसपास असावा. यात एका भाषाशिक्षकाने त्याच्या विद्यार्थ्याच्या चुका दुरूस्त केल्या आहेत. त्या काळात लॅटीन ही राजभाषा होती. सगळे अधिकृत व्यवहार लॅटीनमधून चालायचे, पण रोजच्या संभाषणात ही कुठलीही सुरकुती न पडू देणारी भाषा कामाची नव्हती. त्यासाठी लोक लॅटीनची वेगवेगळी भ्रष्ट रूपे…

रोमच्या कलोसियमजवळ उत्खनन करताना एक व्याकरणाचं हस्तलिखित सापडलं. याचा काळ अंदाजे इ. स. ३०० च्या आसपास असावा. यात एका भाषाशिक्षकाने त्याच्या विद्यार्थ्याच्या चुका दुरूस्त केल्या आहेत. त्या काळात लॅटीन ही राजभाषा होती. सगळे अधिकृत व्यवहार लॅटीनमधून चालायचे, पण रोजच्या संभाषणात ही कुठलीही सुरकुती न पडू देणारी भाषा कामाची नव्हती. त्यासाठी लोक लॅटीनची वेगवेगळी भ्रष्ट रूपे वापरत असत. त्या विद्यार्थ्याने शब्दांची त्या काळी भ्रष्ट समजली जाणारी रूपे लिहीली होती आणि शिक्षकाने त्यावर काट मारून त्या शब्दांचे शुद्ध लॅटीन रूप लिहीले होते. हजार-बाराशे वर्षानंतर इटालियन भाषा अस्तित्वात आली तेव्हा विद्यार्थ्याने लिहीलेले शब्द अधिकृत झाले होते आणि शिक्षकाची लॅटीन भाषा लयाला जाण्याच्या मार्गावर होती.

हे आठवायचं कारण म्हणजे नुकतेच मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने काही लेख वाचले. दरवर्षी पावसाळा येतो तसंच नित्यनेमाने मराठी कशी धोक्यात आहे यावर लेखही येत असतात. लेखकाच्या आवडीनुसार हा धोका ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट या पातळीमध्ये कुठेतरी असतो. लेख मराठी कशी भ्रष्ट होते आहे, तिची दैन्यावस्था वगैरे नेहेमीच्याच चीजा वेगवेगळ्या सुरांमध्ये आळवणारे होते. इथे लेखकांशी काही प्रमाणात सहमत आहे. म्हणजे किमान वृत्तपत्रांमध्ये निर्दोष मराठी वाचायला मिळावं ही माफक अपेक्षा आहे. लेखक आणि संपादक भाषेच्या बाबतीत अधिक काटेकोर असायला हवेत. दुध, केशवसूत अशा चुका टाळायला हव्यात.

पण याचबरोबर मराठीचं बदलतं रूपही लक्षात घ्यायला हवं. पूर्वी सर्व इंग्रजी शब्द हद्दपार केले पाहीजेत असं म्हणणारे भाषारक्षक आता जरा मवाळ होत आहेत असं वाटतय. इंग्रजी शब्द चालतील, पण त्यांना मराठीचे नियम लागू पडत असतील तरच असा वेगळा वाटणारा पवित्रा काही लोक घेतात. अर्थात नंतरच्याच वाक्यात मराठीत परकीय शब्दांची भेसळ फार वाढली आहे आणि त्यामुळं मराठी भ्रष्ट होते आहे असं म्हणून समतोल साधला जातो. खरी गोम अशी आहे की इंग्रजी शब्दांसाठी संस्कृतमधून आणलेले प्रतिशब्द ज्याने तयार केले आहेत ते त्याच्याव्यतिरिक्त कुणीच वापरायला तयार नाही. काही दिवसांनी त्याला स्वत:लाही कंटाळा येतो. सारखं-सारखं भ्रमणध्वनी, कार्यालय किंवा उपाहारगृह कोण म्हणणार? प्रतिशब्द तयार करणं फार सोपं आहे, ते लोकांना वापरायला लावणं दहा-बारा मांजरांना एका रांगेत आणण्याइतकं अवघड आहे.

भाषा हे साधन आहे, साध्य नव्हे. भाषा जपायला हवी पण याचा अर्थ तिला राजपुत्र सिद्धार्थाप्रमाणे कोणत्याही दु:खी अनुभवापासून दूर ठेवायचं असा नाही. असं केलं तर भाषा कृत्रिम, तकलादू होते, तिचा आत्मा हरवतो. भाषेला संस्कृतीशिवाय वेगळं अस्तित्व नाही, भाषा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पण याचा परिणाम म्हणजे संस्कृती जशी बदलते तशी भाषाही बदलत जाते. मराठी आणि जगातील इतर सर्व भाषा बदलत आहेत आणि बदलत राहणार. त्यांच्यावर इतर भाषांचे अधिकाधिक प्रभाव पडत जातील. या संक्रमणातून जी तावून सुलाखून निघते त्या भाषेला आपला लहेजा असतो. त्यातून जी भाषा तगेल ते तिचे तत्कालीन स्वरूप. बाकी सगळं बदलत असताना भाषा तशीच राहील अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे.

इथे एक मूलभूत गैरसमज असावा असं वाटतं तो म्हणजे मोठमोठे भाषातज्ज्ञ, पंडित भाषेचे नियम ठरवतील आणि जनता निमूटपणे ते नियम पाळेल. असं झाल्याचं उदाहरण इतिहासात कुठेही सापडत नाही. जे घडतं ते नेमकं उलट असतं. जनता भाषा वापरते, तिला वेगवेगळी वळणे देते, तिच्यात वैविध्य आणते आणि भाषेचे अभ्यासक ते नियम संकलित करून त्याला व्याकरण म्हणतात. म्हणूनच प्रत्येक भाषेला तिची स्वत:ची अशी वैशिष्ट्ये असतात. यातूनच कोणतेही नियम नसताना प्रत्येक वस्तूला ती, तो, ते म्हणण्याचा प्रघात पडतो किंवा बहुतेक सर्व क्रियापदांची रूपं नियमानुसार वागत नाहीत. भाषा कवायत करणार्‍या सैनिकांप्रमाणे शिस्तीत वागत नाही, तिला मनसोक्त हुंदडायला आवडतं.

एखाद्या व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे भाषेत आमूलाग्र बदल होतच नाहीत असं नाही. पण ती व्यक्ती शेक्सपियर, दान्ते किंवा तुकाराम असावी लागते. यातही महत्वाचा मुद्दा असा की या सर्वांचा मूळ हेतू भाषेची समृद्धी नव्हता. त्यांना सखोल आशय असलेलं काहीतरी सांगायचं होत, त्यासाठी त्यांनी आपली भाषा निवडली. हे व्यक्त करण्यासाठी जिथे ती भाषा तोकडी पडत होती तिथे तिला नवीन आधार दिले, नवीन शब्द बनवले. या लोकांनी हजारांनी वाक्प्रचार तयार केले आणि ते आजही वापरात आहेत. का? कारण त्या वाक्प्रचारांच्या माध्यमातून त्यांनी जे व्यक्त केलं ते जनतेला विसरणं अशक्य झालं. फॅक्टरीमधून निघावेत तसे किलोकिलोनी नुसते नवीन शब्द तयार करायचे पण त्यातून व्हॅलेंटाइन डेच्या कविता आणि विडंबनं यापलिकडे काही निघणार नसेल तर असे शब्द आणि त्यामागचा आशय कुणाच्या लक्षात राहणार? भाषा बदलायची असेल तर त्यासाठी प्रतिभावंत कवी हवेत, पण असे प्रतिभावंत तयार करता येत नाहीत. फार फार तर ते तयार होतील असं वातावरण बनवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मराठीत गेल्या पन्नास वर्षात नवीन शब्दकोष झालेला नाही. नवीन शब्दांची भर घालून शब्दकोष अद्ययावत ठेवणं ही जबाबदारी जे पंडित भाषा बुडाली असं सतत ओरडत असतात त्यांची आहे.

जगातील सर्व भाषांमध्ये परकीय आक्रमण होतय म्हणून आरडाओरड चालू आहे. फ्रेंच मध्ये इंग्रजी शब्द, इंग्रजी आणि चिनी भाषेमधून तयार झालेलं चिंग्लीश. फ्रेंचवरून आठवलं, प्रत्येक वेळी मराठीची दुर्दशा सांगताना तिची तुलना फ्रेंच किंवा जपानी लोकांच्या भाषाप्रेमाशी केली जाते. “फ्रेंच बघा आपल्या भाषेवर किती प्रेम करतात नाहीतर आपण!” हा मराठीवर अन्याय आहे. फ्रेंच एका देशाची भाषा आहे. तिच्यामागे त्या देशाची संपत्ती, कित्येक शतके चालत आलेल्या साम्राज्याची ताकद आहे. फ्रेंच माणसाला जन्मल्यापासून मरेपर्यंत दुसरी कोणतीही भाषा आली नाही तरी त्याच्या देशात त्याचे काही बिघडत नाही. याउलट भारतात कुठेही जन्माला आलात तर किमान तीन भाषा शिकाव्याच लागतात, आणि कानावर किमान पाच-सहा भाषा नक्कीच पडतात. मराठी ही प्रादेशिक भाषा आहे, राष्ट्रीय भाषा नव्हे. तिला २२ अधिकृत आणि कित्येकशे बोलीभाषांच्या सहवासात रहावं लागत आहे. त्यांचा परिणाम तिच्यावर होणारच. महाराष्ट्राची तुलना फ्रान्सशी न करता भारताची तुलना युरोपशी करायला हवी.

लेखाच्या सुरूवातीला जे उदाहरण आलं त्याचा शेवट रोचक आहे. तेराव्या शतकापर्यंत इटालियन भाषेला स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. वेगवेगळ्या भागांमध्ये बोलल्या जाणार्‍या गावंढळ बोलीभाषा घरादारात वापरताना सगळेच वापरायचे पण साहित्य, कला किंवा अधिकृत व्यवहारांमध्ये लॅटीन श्रेष्ठ मानली जायची, तिथे या बोलीभाषांना प्रवेश नव्हता. तेराव्या शतकात दांते अलिगिएरीच्या रूपाने इटालियन भाषेला तिचा तारणहार मिळाला. ‘ला कॉमेदिया’ लिहीण्यासाठी दांतेनं लॅटीन न वापरता मध्य इटलीच्या तोस्कानी भागात बोलल्या जाणार्‍या बोलीभाषेची निवड केली. या भाषेला त्यानं इटालियन असं नाव दिलं. ला कॉमेदिया प्रकाशित झाल्यावर इटालियन लोक या महाकाव्याने वेडे झाले. ज्याच्या त्याच्या तोंडी दांतेच्या ओळी होत्या. इटालियन लोकांना त्यांची स्वत:ची अशी ओळख मिळण्यामध्ये कॉमेदियाचा महत्वाचा वाटा आहे. आजही कोणत्याही इटालियन माणसाला दांतेची पानेच्या पाने पाठ असतात. त्याचा वाक्प्रचार ऐकू आला नाही असा दिवस इटलीमध्ये काढणं अशक्य. रॉबेर्तो बेनिन्यीने केलेली कॉमेदियाची वाचने आजही हाउसफुल असतात.

मला मराठी लई आवडते. (आवडत नसती तर इथे इतकं खरडलं असतं का?) पण ती जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे किंवा ती बोलतो म्हणून मी सुदैवी असं मला वाटत नाही. बंगाली, उर्दू, इटालियन, जपानी, पंजाबी, मालवणी मला तितक्याच आवडतात. त्या मातृभाषा असत्या तरी हरकत नव्हती. ‘सारे जहां से अच्छा’ पटत नाही ते अशासाठी की ते खरं नाही. आपलीच रेघ सर्वात मोठी असं दाखवणं निदान आजच्या जगात तरी कालबाह्य मानलं जावं अशी अपेक्षा आहे.

—-

१. श्रवणबेळगोळ येथील हा शिलालेख मराठीतील पहिला शिलालेख आहे (इ. स. १११६-१७) असं मानलं जात होतं. अक्षी इथे सापडलेला इ. स. १०१२ मधला शिलालेख आता पहिला मानला जातो.

Comments

2 responses to “श्री चावुण्डराजे करवियले”

  1. Ashish Avatar

    तुमचे लेख परत वाचायला मिळाले याचा खूप आनंद आहे. अगदी खणखणीत!

    1. Raj Avatar
      Raj

      अनेक आभार​. मागे तुम्ही याबद्दल सुचवलं होतं ती प्रेरणा कारणीभूत ठरली.