मागे आम्ही विश्वसुंदरी मिस चिनी यांची मुलाखत घेतली होती. मुलाखतीनंतर आमच्या कार्यालयात पत्रे, इमेल, एसएमएस आणि फोन यांची सुनामी आली. यापैकी बहुतेक फोन भारत आणि भारताबाहेरील बोक्यांकडून होते असं आमच्या लक्षात आलं कारण फोनवर बरेचदा नुसतं घर्र. . .घर्रर्र. . ऐकू येत असे. (याउलट फोन मांजरीचा असेल तर ‘हिस्स्स’.) तेव्हा या लोकाग्रहाला आणि बोकाग्रहाला मान देऊन आम्ही चिनी यांची आणखी एक भेट घ्यायचं ठरवलं.
‘माझिया बोक्याला आणि मलाही काहीच कळेना’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर चिनी यांची भेट झाली.
“मिस चिनी, तुमची मागची मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर जगभरातील बोक्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे.”
“न मिळायला काय झालं? बोके सगळे इथून-तिथून सारखेच. हुंगेगिरीशिवाय दुसरा उद्योग असतो का मेल्यांना?” चिनी नाक उडवत म्हणाली.
“तुमच्या मालिकेला अमाप लोकप्रियता मिळाली आहे. आता शूटिंग चालू आहे त्या प्रसंगाबद्दल काही सांगाल का?”
“आमची स्क्रिप्ट टॉमीने पळवल्यापासून गेले सातशे एपिसोड आम्हाला सतत कथानक इंप्रोवाइज करायला लागतय.”
“म्हणजे नेमकं काय करता?”
“प्रत्येक एपिसोडची सुरुवात एका कलाकाराच्या अंग चाटण्याच्या दृश्याने होते. हे स्लो-मोशनमध्ये, तीन ऍंगलमधून तीन-तीन वेळा दाखवायचं. आता जे शूटिंग चाललं आहे त्याचा सिक्वेन्स असा आहे. मी बसले. मी पेंगले. मी उठले. मी पेंगले. मी उजवा पंजा चाटला. मी पेंगले. मी डावा पंजा चाटला. मी पेंगले. मी आळसले. मी झाडावरच्या पक्ष्यांकडं बघितलं. .घर्र. . .घर्रर्र. . चिमण्यांचं वजन वाढलेलं दिस्तै..घर्र. . .घर्रर्र. . न वाढायला काय झालं? फुकटचे दाणे हादडायचे दिवसभर . .घर्र. . .घर्रर्र. . मागच्या वर्षी एक मिळाली होती त्यानंतर सगळा उपासच उपास. .दूध पिऊन दिवस काढावे लागतैत कसेबसे. . घर्र. . .घर्रर्र. . काय तिची तंगडी होती, अहाहा. . घर्र. . .घर्रर्रघर्र. . .घर्रर्र”
“मिस चिनी?”
“घर्र. . .घर्रर्र. . चिमणी..तंगडी….आपलं काय म्हणत होते मी?”
“दृश्याचा सिक्वेन्स.”
“हं तर असं करत करत वीस-एक मिनिटं जातात.”
“याबद्दल तुमच्या प्रेक्षकांची तक्रार येत नाही का?”
“बहुतेक प्रेक्षकही पेंगतच असतात. आणि एपिसोडच्या शेवटी आम्ही एक मिनिट लेझर शो दाखवतो. तेव्हा सगळे प्रेक्षक पडद्यावर उड्या घेतात. मग कथानकाची कुणाला आठवणच राहात नाही.”
“याव्यतिरिक्त तुम्ही एक नवीन भाषा निर्माण करत आहात, त्याबद्दल काही सांगाल का?”
“जगभरात इंग्रजी म्यावांची एक वेगळी भाषा आहे – लोलक्याट्स. ही भाषा वापरून परदेशी म्यावां अभिव्यक्तीची नवनवी दालनं पंजाक्रांत करत आहेत. आता तर चक्क बायबलचा या भाषेत अनुवाद झालाय. आणि इथे मात्र मराठी म्यावां अजूनही माणसांचीच भाषा वापरतायत. हे बदललं पाहिजे. यासाठी आम्ही माऊभाषा चळवळ सुरू करत आहोत.”
“माऊभाषेचं स्वरूप कसं असेल सांगता येईल का?”
“हे आत्ताच सांगणं अवघडै. भाषा यडचाप टॉमीसारखी आज्ञाधारक नस्ते कै. तिला म्यावांसारखं चौफेर, मनमुराद हुंदडायला आवडतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्यावांच्या आयुष्यातील विविध क्रियांसाठी आम्हाला नवीन क्रियापदांची गरजे. आमच्या कितीतरी नेहमीच्या क्रियांना शब्दच नैयेत. या दिशेने,” चिनीने उजवा पंजा वर करून एक दिशा दाखवली, “एक प्रयत्न म्हणून मी एक कविता केलीय.”
“गवतात काहीतरी हललं, मी सावधले
टॉमीची चाहूल लागे, मी दुडदुडले
अंगावर पाणी पडलं, मी सुरकुतले
दुधावर साय आली, ऑमनॉमनॉमनॉमनॉम, मी चकितले
पक्सी उडून गेले, ऑमनॉमनॉमनॉमनॉम, मी हताशले”
“हे पक्षीऐवजी पक्सी काय म्हणून?”
“ही रचना माऊविक्रिडीत वृत्तामध्ये आहे. वृत्त सांभाळण्यासाठी असा बदल करावा लागला.”
“अरे वा, हे नवीनच वृत्त दिसतंय. याचे नियम काय आहेत?”
“नियम अजून ठरायचेत.”
“रचना आधी आणि नियम नंतर? हे कसं काय ब्वॉ?”
“त्यात काय मोठं? तुमच्यात नाही का, आधी आक्रमण करुन देशाची वाट लावायची आणि नंतर डब्ल्युएमडी शोधायचे, असं करत?”
“हो, ते ही खरंच म्हणा. आणि हे ऑमनॉम काय? हे पण वृत्तच का?”
“माऊविक्रिडीत वृत्तामध्ये हा खास बफर टाकलाय. हा आम्ही परदेशी म्यावांकडून उसना घेतलाय. खाण्याचा उल्लेख आला की आमचं आपलं आपॉप घर्र. . .घर्रर्र. . सुरू होतं. मागे एका कविसंमेलनात अध्यक्ष बोका ‘घर थकलेले संन्यासी’चं वाचन करत होता पण कविता पूर्ण झालीच नै. ‘पक्षांची घरटी होती’ (ऑमनॉमनॉमनॉमनॉम) असा उल्लेख आल्यावर कवी आणि श्रोते अर्धा तास घर्र. . .घर्रर्र. . करत होते. शेवटी शेजारच्या बिल्डींगमधले कुत्रे उठले तेव्हा सुटका झाली. हे टाळण्यासाठी हा बफरे. अर्थात पुढच्या ओळी आल्या आणि घरटी असलेलं झाडं कुणीतरी तोडलं हे कळलं तसे श्रोते बिथरले. मग संमेलन रद्द करावं लागलं.”
“बरं, मला एक सांगा मिस चिनी, परवा रात्री तुम्ही आणि ‘बी’ बिल्डींगमधला पिंगट बोका आमच्या खिडकीखाली भांडत होता ते कशाबद्दल?”
“ओह, तुम्ही ऐकलं वाटतं?”
“दोघेही काळी सात वर होता, त्यामुळे इच्छा नव्हती तरीही ऐकावं लागलं. आम्हीच नाही सगळ्या बिल्डींगनी ऐकलं.”
“माऊभाषेचा उत्कर्ष कसा करायचा याबद्दल आमचे जरा तीव्र मतभेद झाले, त्यावरून वादावादी झाली.”
“पण नंतर मी टॉर्च मारला तर तुमच्या तोंडात उंदीर होता.”
“नॉन्सेन्स, इट्स नॉट द माऊस, इट्स द प्रिन्सिपल.”
“अरेच्चा, हा वाक्प्रचार तर आमच्याकडेही वापरतात आणि बहुतेक वेळा परिस्थितीही अशीच असते. फक्त माऊस च्या जागी मनी असते- मनी म्हणजे पैसा या अर्थी, तुम्ही नाही बरं का.”
तेवढ्यात शॉट रेडी झाला. माऊभाषेच्या उत्कर्षाबद्दल आशा व्यक्त करुन मिस चिनी यांनी काढता पंजा घेतला.