कवीमनाचा गुप्तहेर : जॉन ल कारे

पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर कधीकधी कोणती पुस्तकं कुठे ठेवली आहेत यावरून बरेच अंदाज बांधता येतात. लॅंडमार्कमध्ये फेरफटका मारताना इंग्रजी पुस्तकांचे दोन वेगवेगळे विभाग दिसले. एक होता ‘फिक्शन’ आणि दुसरा ‘लिटररी फिक्शन’. फिक्शनखाली लोकप्रिय लेखक – ग्रिशॅम, क्राइकटन, डॅन ब्राऊन, स्टीफन किंग. लिटररी फिक्शन खाली उच्च वर्गातील लेखक, बहुतेकांना नोबेल मिळालेलं किंवा मिळेल अशी चर्चा असलेले – पामुक, मारक्वेझ, मुराकामी, रश्दी. हे पाहिल्यावर मला पहिल्या वर्गातील लेखक इकॉनॉमी क्लासमध्ये दाटीवाटीने, अंग चोरून बसले आहेत आणि दुसऱ्या वर्गातील लेखक मायक्रॉफ्ट होम्सच्या ‘डायोनिजिझ क्लब’च्या मेंबरांप्रमाणे कुणाकडेही लक्ष न देता आपल्यातच मग्न आहेत असं एक चित्र उगीचच डोळ्यासमोर आलं. ही जी वर्गवारी आहे ती फक्त लॅंडमार्कपुरतीच मर्यादित नाही, न्यूयॉर्कर, पॅरिस रिव्ह्यू सारख्या मासिकांपासून पार नोबेल कमिटीपर्यंत या वर्गवारीचे वेगवेगळे पडसाद दिसत असतात. याबद्दल बरंच लिहीलं गेलं आहे. एक म्हणजे पहिल्या वर्गाचं मुख्य ध्येय वाचकांचं मनोरंजन करणं हे आहे तर दुसऱ्या वर्गातील लेखकांना त्यापलिकडे जाऊन काहीतरी शोधायचं असतं. कधीकधी हा शोध इतका टोकाचा असतो की हे लेखक वाचकांचा विचार न करता फक्त स्वांतसुखाय लेखन करतात की काय अशी शंका यावी. दुसरा मुख्य फरक पुस्तकाच्या विषयांमध्ये आहे. मनोरंजन करणारी पुस्तकं नेहेमी गुप्तहेर, सायन्स फिक्शन, रहस्यकथा असे विषय निवडतात तर लिटररी फिक्शन वर्गातील लेखकांचे विषय बहुतकरून रोजच्या आयुष्यातील घटना असतात. या वर्गातील वैविध्य लक्षात घेता असं सामान्यीकरण खरं तर योग्य नाही पण हा मुद्दा उलट्या दिशेने मांडला तर कदाचित अधिक सुसह्य होईल. उच्चभ्रू वर्गातील लेखक रहस्य किंवा गुप्तहेर यांच्या वाट्याला जाताना फारसे दिसत नाहीत. एखादा इशिगुरो प्रयत्न करतो पण तो ही फारसा यशस्वी होत नाही.

इथे एक रोचक मुद्दा येतो. गुप्तहेरांच्या कथा भले रोमांचक आणि म्हणून मनोरंजक असतील पण ती ही शेवटी माणसंच असतात. त्यांचं आयुष्य, त्यातले निरनिराळे पदर कोण उलगडून दाखवणार? जेम्स हेडली चेस किंवा फ्रेडरिक फोरसिथ यांच्या कथांमध्ये प्लॉट आणि त्यातील रोमांचक वळणे याला इतके महत्व असते की त्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. आणि हेमिंग्वे वगैरे यांच्या वाटेलाच जात नाहीत. पण ही दोनच टोकं आहेत का? यातला मध्यममार्ग पत्करून गुप्तहेरांचं वास्तविक चित्रण करणारा लेखक नाही का?.

उत्तर आहे हो. असा किमान एक लेखक आहे, जॉन ल कारे.

ल कारेची बरीच वैशिष्ट्ये आहेत. याचे गुप्तहेर कधीही बॉंंडप्रमाणे परफेक्ट नसतात. साधारण पन्नाशीच्या पुढचे, बरंच जग पाहिलेले, बहुतेक वेळा विचारपूर्वक आणि संथ कृती करणारे असे असतात. अगाथा ख्रिस्तीचा हर्क्यूल पायरो यांच्या जवळ जातो पण क्लायमॅक्सला पायरोही ‘सेंटर ऑफ अट्रॅक्शन’ बनतोच. याउलट ल कारेचे नायक बहुतेक वेळा शेवटपर्यंत पडद्यामागेच राहणं पसंत करतात. नायकाला जे साध्य करायचं असतं ते साध्य होतं पण इतक्या सहजपणे की तुम्ही वाचक नसता तर तुम्हाला या ठिकाणी काही घडतं आहे याचा पत्ताही लागला नसता. किंबहुना क्लायमॅक्सच्या ठिकाणी जे सामान्य लोक असतात त्यांना शेवटपर्यंत याचा पत्ता नसतो. ‘स्मायलीज पीपल’ मध्ये शीतयुद्ध शिगेला पोचलेलं असताना क्रेमलिनचा एक गुप्तहेर फोडायचा असतो. संपूर्ण कादंबरीत हे नाट्य चालू असतं पण शेवटी मात्र गुप्तहेर शरण येतो तेव्हा सकृतदर्शनी क्लायमॅक्स अत्यंत साध्या रीतीने घडतो. एका पूलाच्या या बाजूला जॉर्ज स्मायली आणि त्याचे अनेक साथीदार आपापली ठिकाणं पकडून बसलेले असतात. रात्रीची वेळ, स्मायली उंचावरून दुर्बिणीतून पुलाकडे बघत असतो. अखेर ठरलेल्या वेळेला एक हॅट घातलेली व्यक्ती पुलावरून इकडे यायला लागते. ती इकडे आल्याबरोबर अंधारातून चार-पाच लोक पुढे येतात, एक कार येते आणि तिच्यातून ते लगेच रवाना होतात. स्मायली दुर्बिणीतून त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहतो.

इंग्रजीत ज्याला poignant म्हणता येईल असा हा शेवट ल कारेच्या बऱ्याच कादंबऱ्यांमध्ये दिसतो. अगाथा ख्रिस्तीची कथा संपली की एक दुष्ट आणि बाकीचे सुष्ट अशी विभागणी होते आणि दुष्टाला शिक्षा होते. ल कारेच्या कथांमध्ये अशी विभागणी करणं अवघड किंवा अशक्य असतं. मुळात ल कारेचे स्मायली किंवा इतर नायक रूढार्थाने नायक नसतात. त्यांच्यात चांगले आणि वाईट दोन्ही गुण असतात, त्यांचा भूतकाळही बरेचदा आक्षेपार्ह असतो. आयुष्यात त्यांनी अनेक तडजोडी केलेल्या असतात, मर्त्य माणसांमध्ये असू शकणारे सर्व दोष त्यांच्यात असतात. कथा संपल्यानंतर नायकाचा हेतू सफला झाला म्हणून आनंद होण्याऐवजी वाचकाला वेगळेच प्रश्न पडतात. या प्रश्नांमधून कधी राजकीय प्रक्रियेची निष्फळता समोर येते तर कधी इस्त्राईल-पॅलेस्टाइनसारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नांवर आणखी किती आयुष्यं बळी जाणार आहेत या जाणीवेमुळे अस्वस्थ व्हायला होतं.

ल कारेनं ब्रिटीश सरकारतर्फे काही वर्षे गुप्तहेरखात्यात काम केलं होतं. नंतर त्यानं कादंबऱ्या लिहायला सुरूवात केली. त्याचं खरं नाव डेव्हिड जॉन मूर कॉर्नवेल. पुस्तकांसाठी टोपणनाव शोधत असताना बसमधून त्याला एका शिंप्याच्या दुकानाच्या नावाचा बोर्ड दिसला – ल कारे. तेच नाव त्यानं निवडलं. त्याची ‘द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड’ ही कादंबरी गाजल्यानंतर या क्षेत्रात त्याचं स्थान निश्चित झालं. सुरूवातीला जॉर्ज स्मायलीच्या कथा लिहील्यानंतर त्यानं इतर नायक आणि विषय हाताळले. शीतयुद्ध आणि त्यातील गुप्तहेरकथा याबरोबरच इस्त्राइल-पॅलेस्टाइन संघर्ष (द लिटल ड्रमर गर्ल), औषध कंपन्यांनी आफ्रिकेमध्ये उपचारांच्या नावाखाली माणसांना गिनिपिग म्हणून वापरणं (द कॉन्स्टन्ट गार्डनर) किंवा रशियातील शस्त्रविक्री करणारे माफिया (सिंगल ऍंड सिंगल) असे अनेक विषय त्याने हाताळले आहेत.

ल कारे स्वत: माजी गुप्तहेर असल्यानं त्याचे या बाबतीतले तपशील अचूक असणारच पण इतर विषयांवर लिहीतानाही त्याचं फिल्डवर्क पक्कं असतं. कादंबरी नसती तर ‘रिपोर्ताज’ म्हणता यावं इतके तपशील दिलेले असतात. यासाठी त्याची काम करायची पद्धत अनोखी आहे. पहिल्यांदा तो जो कथेचा विषय आहे त्याच्याशी संबंधित एखादा चांगला खबऱ्या निवडतो. त्याच्यामार्फत ओळख काढत-काढत मुख्य माणसापर्यंत पोचतो आणि त्याला प्रत्यक्ष भेटून माहिती मिळवतो. हा माणूस म्हणजे एखादा माफिया डॉन, गुप्तहेर किंवा ड्रग डीलर असतो. नाइटक्लबसारख्या ठिकाणी अशा लोकांना भेटून, त्यांना विश्वासात घेऊन स्वत:बद्दल बोलतं करणं हे अशक्यप्राय वाटणारं काम ल कारेला चांगलं जमतं आणि यातूनच त्याची कथा, त्यातील पात्र, प्रसंग उभे राहतात. कदाचित यामुळेच की काय, ल कारेची पात्रं, त्याच्या कथा खऱ्या वाटतात. त्याच्या प्रत्येक कथेच्या प्रस्तावनेमध्ये ज्यांनी बहूमूल्य मदत केली आहे पण ज्यांची नावे देता येणार नाहीत असे लोक हमखास असतात.

इथपर्यंतही सगळं ठीक आहे. बेस्टसेलर लिहीणारे अनेक लेखक बरीच तयारी करतात. ग्रिशॅमही कथा लिहीताना भरपूर संशोधन करतो, स्वत: वकील असल्याने त्याचं कायद्याचं ज्ञानही सखोल आहे. पण ल कारे या सर्वांच्या पलिकडे जावून काहीतरी देतो. त्याने केलेया निसर्गाच्या वर्णनांमध्ये एक ‘लिरिकल क्वालिटी’ असते जी गुप्तहेरकथांमध्ये अपेक्षित नसते. अशा वेळी चुकून आपण सॉमरसेट मॉम किंवा डिकन्स तर वाचत नाही ना अशी शंका यायला लागते. (डिकन्स ल कारेचा आवडता लेखक आहे.) पण हे क्षणभरच टिकतं, ल कारे यात वहावला जात नाही. कथेचा बाज कुठेही ढिला होऊ न देता ज्याला लिटररी म्हणता येईल अशा प्रदेशात क्षणभर फेरफटका मारून परत येणं ही ल कारेची खासियत म्हणता येईल.

त्याचे गुप्तहेरही बरेचदा असं करतात. ‘द लिटल ड्रमर गर्ल’ची गुप्तहेर नायिका शत्रूच्या तावडीत असताना स्वत:वर नियंत्रण ठेवण्यासाठी इलियटच्या कविता किंवा ‘ऍज यू लाइक इट’ चे संवाद म्हणते तर पाळत ठेवण्याच्या कामावर असताना धुक्यात वेढलेली घरं, त्यात दिसेनासा होणारा रस्ता पाहून जॉर्ज स्मायलीला हर्मन हेस्सच्या ओळी आठवतात,

Strange to wander in the fog….

no tree knows another.

—-

१. या वर्गातील लोकांच्या चेहेऱ्यावरचे भाव बघायचे असतील तर टॉम ऍंड जेरीच्या कार्टून मालिकेतील एक भाग पहावा. यात टॉम पाश्चात्य शास्त्रीय संगीतकार आहे. कॉन्सर्टमध्ये वाजवताना त्याच्या चेहेऱ्यावरून आणि देहबोलीतून स्नॉबिशनेस नुसता उतू जातो आहे, अर्थात जेरी येईपर्यंतच!

२. हा मुद्दा थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातूनही मांडता येईल. सगळ्या गुप्तहेरकथांमध्ये सीआयए, केजीबी, एमआय ५-६ – अगदी इस्त्राईलची मोस्सादही असते. भारताचं काय? दोन-तीन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं अमर भूषण यांच ‘एस्केप टू नोव्हेअर‘ हे पुस्तक या दृष्टीने महत्वाचं ठरावं. २००५ मध्ये भारताच्या रीसर्च ऍंड ऍनालिसिस विंग – रॉचे जॉइंट सेक्रेटरी – मेजर राबिंदर सिंग सीआयएचे हस्तक असल्याचे उघडकीला आलं. हे स्पष्ट होईपर्यंत सिंग बायकोबरोबर काठमाडूमार्गे अमेरिकेला रवाना झाले होते. या सर्व ऑपरेशनचं नेतृत्व अमर भूषण यांच्याकडे होतं. ‘एस्केप टू नोव्हेअर’ जरी कादंबरी असली तरी ती या सत्यघटनेवर आधारित आहे त्यामुळे यातून किमान रॉचं काम कसं चालतं यावर थोडा प्रकाश पडावा. (ही अजून वाचलेली नाही.)