शाळेच्या वर्षाचा शेवटचा दिवस. गणिताचा तास चालू आहे. शिक्षक आज सिलॅबसबाहेरचं बोलणार आहेत. कट.
एक जण सरपण गोळा करून त्यावर शेंगा भाजतो आहे. सरपणाचे लाकूड समोर नुकत्याच पाडलेल्या घरांचे आहे. घरे बेकायदा होती. बहुधा.
त्याचा मित्र येतो, त्याचेही घर गेले आहे. अंधार पडल्यावर ते रस्त्याच्या कडेला दबा धरून बसतात. एक कार येते. त्यात ज्या माणसाने या सर्वांच्या घराचे कागद विकत घेतले तो आहे. दोघे त्यावर हल्ला करतात. पैसे, कागद ताब्यात घेतात. कार पेटवून देतात. कट.
शिक्षक सांगतो आहे.
Imagine a solid where you can’t divide inner and outer—a Möbius-type solid. The universe—infinite, endless—we can’t seem to tell its inside from its outside. This simple Möbius strip conceals many truths.
चो से-हुई यांच्या ‘द ड्वार्फ‘ या कादंबरीची सुरूवात अशी होते. कादंबरी नेहेमीपेक्षा बर्याच बाबतीत वेगळी आहे. कादंबरी लिंक्ड नोव्हेल (कोरियनमध्ये याला yŏnjak sosŏl असे म्हणतात.) स्वरूपात आहे. याचा अर्थ कादंबरीतील प्रत्येक प्रकरण एक छोटी गोष्ट आहे. अशा प्रकारची कादंबरी लिहीताना निरनिराळे लेखक एक-एक प्रकरण लिहीतात. मात्र इथे लेखक एकच आहे. या गोष्टी स्वतंत्रपणेही वाचता येतात आणि सगळ्या गोष्टी सलग वाचल्या तर त्याला कादंबरीचे स्वरूप येते. किंबहुना सुरूवातीला चो से-हुई यांनी या गोष्टी विविध कोरियन मासिकांमध्ये प्रकाशित केल्या होत्या. नंतर त्या एकत्रित करून ड्वार्फ तयार झाली.
कादंबरीचा विषय बेसुमार औद्योगीकरण आणि त्यापायी भरडली जाणारे कामगार लोक हा आहे. १९७०च्या दशकात दक्षिण कोरियात पार्क चुंग ही यांची सत्ता होती. पार्क यांचे मूळ सैन्यातील होते. त्यांनी देशही हुकूमशाहीनेच चालवला. द.कोरियाची आज जी भरभराट दिसते आहे, त्यामागे त्या काळातील श्रमजीवी वर्गाचे केलेले शोषण आहे. चो से-हुई यांनी या कथा या काळातच लिहील्या. कथा लिहीताना त्यांच्या डोळ्यासमोर तेव्हाचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचे हे ध्येय होतेच, पण त्याचबरोबर सरकारच्या सेन्सरशिपपासून बचावही तितकाच महत्वाचा होता. त्या काळात कोरियन नागरिकांवर अनेक बंधने होती. अगदी स्त्रियांच्या केसांच आणि स्कर्टची लांबीही ठरलेली असे. या सर्वांना तोंड देत चो से-हुई यांनी त्या काळातील ज्वलंत प्रश्नांना तोंड फोडले आहेच, शिवाय हे करताना कलेच्या दृष्टीकोनातून एक मास्टरपीस तयार करण्यातही ते यशस्वी झाले आहेत. हे सर्व लक्षात घेतले तर कादंबरीचे किमान दोन वाचकवर्ग ठळकपणे समोर येतात. एक म्हणजे त्या काळातील सामन्य कोरियन जनता, जिला ही कादंबरी सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव करून देते. आणि दुसरा म्हणजे यात समोर दिसते आहे त्याच्या पलिकडे अजून काही आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करणारे वाचक.
गोष्टीतील मुख्य पात्र ड्वार्फ़, त्याची बायको आणि तीन मुले. ड्वार्फला जन्मापासून शारिरीक व्यंगामुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि त्यांचा अंत होईल अशी चिन्हे नाहीत. त्याने बरीच कामे करून पाहिली, नळ दुरूस्तीपासून डोबार्याबरोबर खेळ करण्यापर्यंत. सगळीकडे हाल-अपेष्टा. कुठेच, कधीच आशेचा किरण दिसला नाही. यावर त्याच्या कल्पनेत एक उपाय आहे आणि तो म्हणजे समाजात सर्वांना सारखी वागणूक, सारखी संपत्ती मिळायला हवी. कुणाकडेही अधिक संपत्ती आली तर सरकारने त्याला गुन्हेगार ठरवून ती संपत्ती सर्वांना सारखी वाटून द्यावी. कथेमध्ये मोबियस स्ट्रीप आणि तिचे त्रिमितीय स्वरूप क्लेन बॉटल यांचा उल्लेख येतो. लेखक या भूमितीय प्रकारांची आयुष्याशी सांगड घालू पहातो. मोबियस स्ट्रिपवर फिरण्याचा अंत नाही त्याचप्रमाणे या लोकांच्या यातनांचाही अंत नाही. याची आवर्तने सुरूच रहाणार. याखेरीज परत-परत तरूणपणी ध्येयवादाची स्वप्ने बघणारी आणि कालांतराने त्यातील फोलपणा कळून निराशेच्या गर्तेत जाणारी पात्रे भेटतात.
कुठल्याही कथेच्या दृष्टीने दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. कथेचा निवेदक कोण आहे आणि कथा कुणाच्या दृष्टीकोनातून सांगितली जात आहे. ड्वार्फमध्ये प्रत्येक प्रकरणात निवेदक बदलतो, इतकेच नाही तर बरेचदा एकाच कथेमध्ये, वेगवेगळे निवेदक आणि स्थलकाल यांची वाचकाला कुठलीही पूर्वसूचना न देता सरमिसळ केलेली आहे. संवादांमध्ये भूतकाळ आणि वर्तमानकाळ दोन्हींचे संवाद एकापाठोपाठ एक येतात. त्यामुळे निवेदनाला ‘स्ट्रीम ऑफ कॉनशसनेस’चे स्वरूप येते. वेगवेगळ्या निवेदकांमध्ये ड्वार्फची तीन मुले आणि शेवटच्या प्रकरणात कारखान्याच्या मालकाचा उद्दाम आणि काहीसा विकृत असा मुलगा हे येतात मात्र कथानायक ड्वार्फ कधीच येत नाही. त्यामुले त्याच्या मनाची अवस्था इतरांच्या वर्णनातूनच कळते. या सर्वांमध्ये बरेचदा काही वाक्ये थेट वाचकाला उद्देशून आहेत असे वाटते आणि हा वाचक त्या काळातील दडपशाहीला सामोरी जाणारी कोरियन जनता आहे हे लक्षात घेतले तर हा समज आणखी दृढ होतो. उदा.
A nation without dissenters is a disaster. Who is bold enough to try
to establish order based on violence?
अनुवाद उत्कृष्ट आहे यात वादच नाही पण जिथे रूपक किंवा प्रतीकांचा प्रश्न येतो तिथे अनुवाद तोकडा पडतो. एक उदाहरण म्हणजे ड्वार्फ़चे नाव. याबाबत त्याचा मुलगा म्हणतो,
The older man didn’t realize the meaning of Father’s name: kumppuri, reflecting the desire of poor parents for a son to become wealthy.
इथे अनुवाद झाला आहे पण एका मर्यादेपलिकडे त्या संस्कृतीची ओळख असल्याखेरीज याचे महत्व कळणे अशक्य आहे.
काही लेखकांचे साहित्य वाचताना आपण ३६० अंशात १६ क्यामेरे लावून घडणारे प्रसंग बघत आहोत असे वाटते. कथेत घडणार्या प्रत्येक गोष्टीतील प्रत्येक सेकंदाचे चित्रण आपल्यासमोर असते. चो से-हुई याचे दुसरे टोक पकडतात. निवेदन छोट्या वाक्यांमध्ये, पात्राच्या भावनांचा विचार न करता, काहीशा अलिप्तपणे केलेले आढळते. मृत्यूसारख्या प्रसंगालाही ३-४ ओळींच्या वर जागा नाही. बहुतेक प्रसंगाचे वर्णन तुटकच, पण एखादे वाक्य इतके प्रभावी की त्या तुटकपणामुळे जो मोकळा कॅनव्हास तयार होतो त्यात वाचक आपसूक त्याच्या मनातील रंग भरून टाकतो.
आधुनिक कोरियन साहित्याच्या सर्वोच्च कलाकृतींमध्ये या कादंबरीला गणले जाते. कादंबरी वाचल्यानंतर याची सत्यता पटते.