केम छो? मजा मां

मला शब्द निरखायचा छंद आहे १. एखादा शब्द अचानक समोर येतो, त्याला वेगवेगळ्या बाजूंनी बघितलं की त्याचे अनेक पदर उलगडत जातात. इतर भाषांबाबत हे सहजपणे होतं कारण नवीन भाषा शिकताना बरेच शब्द परिचित नसतात. पण मराठीच्या बाबतीत काही कळायच्या आतच शब्दांशी मैत्री झाली होती त्यामुळे मराठी शब्दांचं वेगळेपण कळायला त्या शब्दांकडे थोडं लांब उभा राहून,…

मला शब्द निरखायचा छंद आहे . एखादा शब्द अचानक समोर येतो, त्याला वेगवेगळ्या बाजूंनी बघितलं की त्याचे अनेक पदर उलगडत जातात. इतर भाषांबाबत हे सहजपणे होतं कारण नवीन भाषा शिकताना बरेच शब्द परिचित नसतात. पण मराठीच्या बाबतीत काही कळायच्या आतच शब्दांशी मैत्री झाली होती त्यामुळे मराठी शब्दांचं वेगळेपण कळायला त्या शब्दांकडे थोडं लांब उभा राहून, अलिप्तपणे बघावं लागतं.

असाच एक शब्द आहे मजा. एक ‘म’ आणि एक ‘जा’. या दोन अक्षरांमध्ये कितीतरी अर्थ भरले आहेत. जवळून पाहिलं तर विचित्र वाटतो, पण हे तर काहीच नाही. जेव्हा आपण मजा वापरतो तेव्हा खरी मजा येते. पहिली गोष्ट म्हणजे मजा नेहेमी येते किंवा जाते. ती जेव्हा येत असते तेव्हा ती येतच राहते, मग काहीतरी होतं आणि सगळी मजा जाते. ही कुठून येते आणि कुठे जाते तिलाच ठाउक. मग दुसर्‍या दिवशी लोक विचारतात ‘मजा आली का?’ जेव्हा लोकांना तिच्या येण्याची अपेक्षा किंवा खात्री असते तेव्हा ते इतरांना म्हणतात, “चल ना, मजा येईल.” कधीकधी मजा लुटताही येते.

पण ही नुसती प्रवासातच असते असं नाही. जेव्हा ती येते तेव्हा लोक मजा करतात. ”लॉंग विकेंडेना, मजा करा लेको.” आणि जे लोक नेहेमी अशी मजा करतात ते मजेत असतात, पण मजेदार किंवा मजेशीर मात्र असू किंवा नसू शकतात. लोकांना ही विशेषणं लागली की थोडी वेगळीच मजा होते. यांचा अर्थ किंचित स्क्रू ढिला किंवा विचित्र स्वभाव असाही होऊ शकतो, “आमचा बॉस ना, मजेशीर प्राणीये एकदम.” म्हणजे बॉस विनोदीही असू शकतो किंवा ज्याचा मोबाईल नेहेमी मिटिंगमध्ये वाजतो असाही असू शकतो. आणि कुणीच मजा न करताही ती आली तर ती होते. लहान मुलांच्या आयुष्यात ही नेहेमी होते पण तेव्हा तिला आणखी एक ज लागतो, “आज किनई शाळेत मज्जाच झाली.” काही लोक मजेचं स्त्रीलिंगी रूप स्वीकारत नाहीत. त्यांना ‘मझा’ येतो. हा मझा म्हणजे आपल्या मजेचा गंभीर काका वगैरे वाटतो. मजा म्हणजे मिलीमधली जया असेल तर मझा म्हणजे गोलमालमधला उत्पल दत्त. बराच शिस्तशीर आहे. मजा गल्लीबोळात कुठेही हुंदडते, हा मझा येतो पण जाताना फारसा दिसत नाही आणि करता येतो की नाही याबद्दल शंका आहे. फक्त बिचारा नेमाने येत राहतो. मझा वापरण्यात तेवढी मजा येत नाही.

मजा फक्त मराठीत आहे असं नाही. मात्र हिंदीत गेल्यानंतर जांबुवंताचा ‘ज’ जाऊन जहाजाचा ‘ज’ येतो . हिंदीतही मजे लेना, मजे करना, मजे होना, मजे लूटना अशी रूपे आहेत. “जाडों में गर्म चाय की चुस्कीयों के मजे लूटो.” हिंदीत मजेदार बर्‍याच अर्थी वापरला जातो – रोचक, वैविध्यपूर्ण, विनोदी – मजेदार चुटकुले, मजेदार किस्से. मात्र ‘पकोडे बहोत मजेदार बने है’ इथे मजेदारचा अर्थ स्वादिष्ट. जी गोष्ट मजेदार असते तीच मजेकी बातही असते. “मजे की बात यह है की..” अशी वाक्याची सुरूवात बरेचदा दिसते. मजा गुजराथीतही आहे पण तिकडे फारसा वशिला नसल्याने “केम छो? मजा मां” च्या पुढे गाडी जात नाही.

शब्द कसे तयार होतात आणि रूळतात हे बरेचदा कोडंच असतं. “टू ऍंड अ हाफ मेन” मालिकेत सात-आठ वर्षांच्या जेकला शाळेत शिक्षिकेला मधलं बोट दाखवल्याबद्दल शिक्षा होते. तो बापाला बाकीची बोटं दाखवतो आणि विचारतो, “फिल एनीथिंग?” बाप नकारार्थी मान हलवतो. जेक मधल्या बोटाकडे बघतो आणि म्हणतो, “आय डोंट गेट इट. हू डिसाइड्स?” मजासारखे शब्द भेटले की मला नेहेमी असाच प्रश्न पडतो. मजा येते आणि जाते, चालत, पळत किंवा धावत का नाही? हू डिसाइड्स? भाषाशास्त्रामध्ये याची उत्तरं मिळणं अपेक्षित असतं आणि मिळत असतीलही. पण भाषाशास्त्रातले निबंध इतके क्लिष्ट असतात की आमच्यासारख्या पामरांना त्याचा काहीच उपयोग नाही.

स्वत:च्या ब्लॉगवर काही खरडलं तरी चालतं. अपनी गली में टॉमी भी शेर होता है. हे शाळेत लिहीलं असतं तर शिक्षकांनी कान पकडून विचारलं असतं, “निबंध लिहायला सांगितला होता ना? हे काय लिहीलय? अभ्यास म्हणजे काय मजा वाटते का तुला?”

———————

१. चांगला संवादलेखक असेल तर चित्रपट बघताना हे आपोआप होतं. हृषिदांच्या चुपके-चुपके मध्ये गुलजारने ‘परिमल तो तुम्हारा बहोत दोस्त है’ अशी वाक्यरचना वापरली आहे. ‘परिमल और तुम्हारी बहोत दोस्ती है’ असं पुस्तकी वाक्य न टाकता ‘बहोत दोस्त है’ असं म्हटल्यावर त्याला एक वेगळाच टच येतो. या चित्रपटातले बरेच संवाद मस्त आहेत. उदा. “मुझे बॉटनी का बी तक नही आता. कहीं किसी ने पूछ लिया के तितली फूल पर क्यों बैठती है तो क्या जवाब दूंगा?”

२. याचं एक वेगळं रूप म्हणजे कट्ट्यावरचे लोक ऐश करतात. ऐश करता येते किंवा होते.

३. पहिल्यांदा दिल्लीला गेलो तेव्हा एक मुख्य आकर्षण हे होतं की मनसोक्त हिंदी ऐकायला आणि बोलायला मिळेल आणि तसं झालंही. भाषा मनसोक्त ऐकण्यात एक वेगळंच सुख असतं.