द ट्रायल

काफ्काचे कोणतेही पुस्तक वाचताना बहुतांशी पहिली प्रतिक्रिया उमटते ती म्हणजे वाचक भंजाळून जातो. हे नेमकं चाललंय काय असा प्रश्न त्याला पडतो. एखाद्याचे डोळे बांधून त्याला बरंच चालवत नेलं आणि मग डोळ्यावरची पट्टी काढून टाकली तर त्याची जशी अवस्था होईल तशी काहीशी अवस्था या वाचकाचीही होते. पट्टी काढलेला माणूस आजूबाजूला बघतो, आपण कुठे आहोत याचा शोध घेताना आजूबाजूला ओळखीच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न करतो. पण जर त्या माणसाला भूलभुलैयातच नेऊन सोडलं असेल किंवा आजूबाजूच्या खुणा फसव्या असतील तर मात्र त्याचा गोंधळ अजून वाढत जातो. काफ्काच्या वाचकालाही बरेचदा असा अनुभव येतो, पण हे सगळं नैसर्गिक आहे. किंबहुना हे झालं तर तुम्ही योग्य मार्गावर आहात असं समजायला हरकत नाही. काफ्काला तुमच्याकडून हेच अपेक्षित आहे.

काफ्का पहिल्यांदा वाचण्याआधीच त्याच्याविषयी आणि त्याच्या साहित्याविषयी उत्कृष्ट ते इथे जन्मला-इथे वाढला-थोर लेखक-मॅजिकल रिअलिझ्मचा जनक-तरीही प्रसिद्धीपासून वंचित राहिला-(हाय रे दैवा!) केवढी ही शोकांतिका-असे म्हणून अर्ध्या-एक पानात काफ्का उरकणे असे सर्व प्रकारचे लेखन आपण वाचलेले असते. तुम्हाला साहित्याची आवड असेल तर काफ्काचा उल्लेख तुमच्या नजरेखालून गेला नाही असे होणे अशक्य आहे. त्याच्या ‘द ट्रायल’ या कादंबरीच्या मी वाचलेल्या प्रतीच्या प्रस्तावनेचे पहिलेच वाक्य आहे, “The thought that there is anything fresh to be said of Franz Kafka’s ‘The Trial’ is implausible.” हे खरे आहेच, शिवाय प्रत्येक समीक्षक त्याच्या परीने काफ्काचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. बहुतेक वेळा काफ्काचे साहित्य वाचण्याआधी त्यावरचे लेखच वाचले जातात आणि यामुळे मूळ साहित्य न वाचताच ते काय आहे याबद्दल बरेचदा ठाम असे पूर्वग्रह निर्माण होण्याचा संभव असतो.

Book cover of The Trial

‘द ट्रायल’ ही कथा आहे जोसेफ के ची. के एका बॅकेत हेडक्लार्क आहे. कथा सुरू होते तीच एका नाट्यमय घटनेने. के झोपेतून जागा होत असताना दोन अधिकारी त्याच्या खोलीत येतात आणि त्याला अटक झाली आहे असे सांगतात. खरे तर या ठिकाणी अटक का झाली आहे, त्यामुळे काय होणार, यातून के कसा सुटणार हे प्रश्न लगेच मनात येतात आणि त्यांची उत्तरेही यथावकाश मिळतील अशी वाचकाला अपेक्षा असते. इथे काफ्का पहिला धक्का देतो. एकोणिसाव्या शतकात युरोपियन साहित्यामध्ये डिकन्स, टॉलस्टॉय यांच्यासारख्या लोकप्रिय लेखकांचे साहित्य वास्तववादावर (Realism) आधारलेले होते. या काळात प्रसिद्ध असलेल्या साहित्यामध्ये काही अलिखित नियम पाळले जात होते. एक म्हणजे कथा सांगणार्‍या निवेदकाला कथानकातील सर्व महत्वाच्या घटनांची पूर्ण माहिती असते. वाचकाचे काम फक्त कथा वाचून निवेदक काय म्हणतो आहे ते समजून घ्यायचे इतकेच असते. दुसरे म्हणजे निवेदक ही सर्व माहिती वाचकाला देईल (कदाचित लगेच देणार नाही, पण यथावकाश नक्कीच देईल) याची वाचकाला पूर्ण खात्री असते. काफ्का यातले काहीच करत नाही. के ला अटक झाल्यावर अटक का झाली आहे हा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. के च्याही मनात हा प्रश्न येतो, पण अधिकारी याचे उत्तर देण्याचा अधिकार आमच्याकडे नाही असे सांगतात. नंतर के ही हा प्रश्न विचारणे सोडून देतो आणि बचाव कसा करायचा याच्या तयारीला लागतो. के ही परिस्थिती निमूटपणे स्वीकारतो ही बाब आश्चर्यकारक आणि महत्वपूर्ण आहे. याचा अर्थ केच्या भूतकाळात त्याने काही गुन्हा केलेला असतो का? निवेदक याचे उत्तर देत नाही. इथे वाचकाने आपापली उत्तरे शोधणे अपेक्षित असते. थोडक्यात, द ट्रायलमध्ये निवेदकाचा (आणि पर्यायाने काफ्काचा) जेवढा सहभाग आहे तितकाच सहभाग वाचकाचाही असणे अपेक्षित आहे.

वास्तववादापासून फारकत घेणार्‍या आणि आधुनिकतावादाचा (Modernism) स्वीकार करणार्‍या लेखकांनी निवेदनाच्या वेगवेगळ्या शैली निवडल्या आहेत. व्हर्जिनिया वूल्फची वाक्यरचना सवय होईपर्यंत क्लिष्ट वाटू शकते. तिला पूर्णविरामाऐवजी अर्धविराम (;) जास्त आवडतात त्यामुळे अनेक अर्धविरामांनी सजलेले वाक्य संपेपर्यंत वाचकाची दमछाक होऊ शकते. याउलट जेम्स जॉइसच्या प्रत्येक वाक्यामध्ये इतके (धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, मिथिकल) संदर्भ/कोट्या/विडंबनं/निर्देश/भाषेचे चमत्कार/अप्रत्यक्ष उल्लेख/शब्दखेळ असतात की एक वाक्य घ्यावं, त्यावर विचार/संशोधन करून त्याचे अनेक अर्थ समजून घ्यावेत, हे होईस्तोवर एक-दोन दिवस/आठवडे/महिने जातात, मग पुढचं वाक्य घ्यावं – अशी परिस्थिती असते. (अर्थात हे एक मत आहे. आणखी एक मत असंही आहे की या सर्वांकडे दुर्लक्ष करून जॉइस सरळ वाचायला घ्या आणि तुम्हाला त्यातून काय मिळतं ते बघा.) काफ्का या दोघांपेक्षा वेगळा आहे. त्याची भाषा समजायला अजिबात कठीण नाही. फक्त परिच्छेद पाडण्याची त्याला आवड नसल्याने वाचायला थोडं कठीण जाऊ शकतं. मात्र वाचलेलं कळण्यात अडचण येत नाही. अडचण येते ती त्याचा अर्थ लावण्यात. एक गृहीतक सुरूवातीलाच स्वीकारले तर अर्थ लावणे सोपे होऊन जाते. ते म्हणजे हे साहित्य वास्तव आणि स्वप्न यांची सरमिसळ आहे. (मुराकामी त्याच्या कथांविषयी बोलताना बरेचदा हेच स्पष्टीकरण देतो.) अर्थात असे मानले तर वास्तव कोणते आणि स्वप्न कोणते हे ठरवावे लागतेच. ही अडचण अधिक तीव्रपणे जाणवू लागते कारण लवकरच आपल्या लक्षात येते की निवेदकावर पूर्ण भरवसा ठेवून चालणार नाही. आणि हा काफ्काचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे. काफ्का वाचताना असे अनेक मार्ग किंवा दृष्टीकोन एकाच वेळी उपलब्ध असतात.

काफ्काचे साहित्य म्हटलं की गूढ, निराशावादी, विषण्ण करणारे काहीतरी अशी एक लोकप्रिय समजूत आहे. अशा प्रकारच्या लिखाणाचे किंवा परिस्थितीचे वर्णन अरण्यासाठी इंग्रजीत Kafkaesque असे विशेषणही आहे. या भावना काफ्काच्या साहित्यामध्ये भेटतातच पण याखेरीज काफ्काचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची विनोदबुद्धी. पण याबद्दल फारसे बोलले जात नाही. काफ्काचा विनोद ‘डार्क ह्यूमर’ या प्रकारात मोडतो. याचे एक उत्तम उदाहरण ‘द ट्रायल’मध्ये बघायला मिळते. काफ्काला ज्या कोर्टाने दोषी ठरवले आहे ते कोर्ट म्हणजे नेहेमीचे कोर्ट नाही. यथावकाश के एका वकिलाकडे सल्ला घेण्यासाठी जातो तेव्हा तो वकील हे कोर्ट कसे चालते याची माहिती देतो. न्यायव्यवस्था, त्यातील भ्रष्टाचार यावर विनोदी शैलीमध्ये केलेली पण तरीही मर्मभेदी टीका वाचनीय आहे. के ची उलटतपासणी होईल पण के वर काय आरोप आहेत ते शेवटपर्यंत गुप्तच ठेवण्यात येतील. के लाच नव्हे तर त्याच्या वकीलालाही हे आरोप काय आहेत हे कळणार नाही. कोर्टाचे कामकाजही गुप्तच राहील, फक्त के दोषी आहे किंवा नाही हे त्याला शेवटी कळू शकेल. न्यायाधीश अत्यंत चोख आहेत पण तरीही वकील न्यायाधीशांना खाजगीत भेटून आपला अशिल निर्दोषी आहे हे पटवून (!) देऊ शकतो. अशा प्रकारच्या खटल्यामधून तीन प्रकारचे निर्णय लागू शकतात. एक म्हणजे के ची निर्दोष मुक्तता होऊ शकते पण हे आजपर्यंत झाल्याचे वकिलाने पाहिलेले नाही. दुसरी शक्यता म्हणजे वरकरणी मुक्तता. केच्या वकिलाने न्यायाधीशांना ऍफेडेव्हिट दिले तर ते त्याला तात्पुरते मुक्त करू शकतात पण त्याला कधीही परत अटक होऊ शकते. आणि अटक झाली तर परत पहिले पाढे पंचावन्न. तिसरी शक्यता – तारीख पे तारीख! जवळजवळ एका शतकानंतरही आजच्या न्यायव्यवस्थेशी हे वर्णन किती जुळते हे लक्षात आल्यावर काफ्काच्या द्रष्टेपणाची ओळख पटते.

‘द ट्रायल’ लिहीले गेले त्यानंतर अवघ्या वीस वर्षातच जर्मनीमध्ये ज्यूंचा अमानुष छळ आणि हत्याकांड घडले. हे कथानक येणार्‍या काळाची पूर्वसूचना होते का अशा प्रकारचे अंदाज अनेकदा केले गेले आहेत. काफ्काला नेमके असे काही होणार आहे याची कल्पना आली नसली तरी सत्ताधीशांची मानसिकता आणि त्याचे परिणाम याची त्याला चांगलीच माहीत होती. पण याखेरीज द ट्रायल कडे इतर दृष्टीकोनांमधूनही बघता येते हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. (तुलनेने १९८४ किंवा ऍनिमल फार्मसारखी पुस्तके ‘डाव्या विचारसरणीचा विरोध’ या एकाच दृष्टिकोनातून लिहिल्याचे जाणवते.) ख्रिस्ती आणि ज्यू धर्माच्या अनुषंगाने या कथेमध्ये अनेक संदर्भ आहेत मात्र यांची माहिती होण्यासाठी मुळात या दोन धर्मांची आणि त्यांच्या विचारांची जवळून ओळख असणे आवश्यक आहे. साहजिकच युरोपियन किंवा अमेरिकन वाचक आणि भारतीय वाचक हे पुस्तक वाचतात तेव्हा त्यांच्या आकलनामध्ये फरक असणे अपेक्षित आहे. (या दोन धर्मांचा अभ्यास असणारे भारतीय वाचकही आहेतच पण ते बहुसंख्य नसतील ही शक्यता जमेस धरली आहे.) याव्यतिरिक्त संघटना, कुटुंबव्यवस्था, तत्वज्ञानातील शरीर-मन यांची देकार्तने केलेली विभागणी, लेखनाच्या काळात काफ्काची मानसिक अवस्था आणि त्याचे लेखनात उमटलेले पडसाद यासारख्या अनेक दृष्टीकोनांमधून काफ्काच्या साहित्याचे विश्लेषण केले गेले आहे. यावर लोकांनी स्वतंत्र पुस्तके लिहीली आहेत. जोसेफ के चा नेमका अपराध काय? तो त्याला शेवटपर्यंत कळत नाही तरीही त्याला अपराधी का वाटत राहतं? याचं एक बर्‍यापैकी उघड स्पष्टीकरण ख्रिस्ती धर्मातील ‘ओरिजिनल सिन’च्या रूपात देता येते. ऍडम आणि इव्हने केलेल्या “पापासाठी” तमाम मानवजातीला दोषी धरले जाते आणि ते ही कोणताही प्रतिवाद न करता आपला अपराध स्वीकार करतात. इथे चर्च आणि धर्मगुरू यांचे प्रतीक कोर्टाच्या रूपात आहे. कोर्टाप्रमाणेच धर्मगुरूंनाही कोणताही जाब विचारता येत नाही, केवळ ते जो निर्णय देतील तो निमूटपणे स्वीकारणे एवढेच अपराध्याच्या हातात असते.

हे पुस्तक इंग्रजीमधून वाचणारे सर्व वाचक आणि काफ्का यांच्यामध्ये आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे ती म्हणजे अनुवादक. काफ्काने सर्व पुस्तके जर्मन भाषेत लिहीली आणि ती लिहीताना त्याने जे शब्द वापरले त्याला विशेष अर्थ होते. उदा. या पुस्तकात कायदेशीर कार्यवाहीसाठी काफ्का Verfahren हा शब्द वापरतो, पण या शब्दाचा आणखी एक अर्थ ‘ठरवलेल्या मार्गापासून ढळणे’ असाही होतो. अशा प्रकारचे शब्दखेळ काफ्का फक्त गंमत म्हणून करतो आहे की यातून त्याला आणखी काही अभिप्रेत आहे याबद्दल मतांतरे आहेत पण इंग्रजीत वाचताना हे सगळेच ‘लॉस्ट इन ट्रान्सलेशन’मध्ये गमवावे लागते. काफ्काने ‘द ट्रायल’च्या सुरूवातीचे आणि शेवटचे प्रकरण सर्वात आधी लिहीले. बाकीच्या प्रकरणांमध्ये काही अपूर्ण आहेत. या प्रकरणांचा क्रम कसा लावायचा याबद्दलही मतांतरे आहेत. काफ्काने याबद्दल निश्चित सूचना दिलेल्या नाहीत त्यामुळे घटनांच्या क्रमावरून प्रकरणांच्या क्रमाचा अंदाज बांधावा लागतो.

काफ्का, दस्तोयेव्ह्स्की यासारख्या लेखकांचे वैशिष्ट्य असे की एकदा पुस्तक वाचून संपवले म्हणजे तुम्ही सुटलात असे कधीच होत नाही. याचे कारण या पुस्तकांमागे तत्वज्ञानाची भक्कम बैठक असते. काफ्कावर नित्शेचा बराच प्रभाव होता. अस्तित्ववादाच्या (Existentialism) प्रमुख पुरस्कर्त्यांमध्ये काफ्काचे नाव घेतले जाते, अर्थात काफ्काच्या काळात अस्तित्ववाद अधिकृतपणे अस्तित्वात यायचा होता. या साहित्याच्या मुळाशी माणसाच्या अस्तित्वाचा अर्थ, स्वत्वाचा शोध, फ्री विल किंवा अध्यात्मवाद (spiritualism) या सारख्या संकल्पनांचा उहापोह असे मूलभूत प्रश्न असतात. तत्वज्ञानाचे प्राध्यापकही वर्गात शिकवताना या साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. इथे मला वैयक्तिक पातळीवर एक प्रश्न नेहेमी पडतो तो म्हणजे यात किती खोल जायचे आणि कुठे थांबायचे? तत्वज्ञानात शिरायचे म्हटले तर ते एक जंगल आहे. पार सॉक्रेटीस, अरिस्टॉटल पासून सुरूवात करून देकार्त, हेगल यांना मुजरा करून नित्शे, सार्त्र यांच्याशी गप्पा मारून वितगनश्टाइनपर्यंत पोचतापोचता तुमचं एक आयुष्य कुठे जाईल कळणारही नाही. आणि तरी यात गेल्या तीस-चाळीस वर्षातले तत्वज्ञ आलेलेच नाहीत. मग बाकी ज्या हजार गोष्टी करायच्या आहेत त्या कधी करायच्या? म्हणजे वेळ हा एक मुद्दा झाला.

दुसरा मुद्दा म्हणजे हे सर्व तत्वज्ञान युरोसेंट्रिक आहे. इथल्या मातीशी त्याचा सरळ संबंध जोडता येईल किंवा कसे हा स्वतंत्र आणि गहन विषय आहे. कोणत्याही तत्वज्ञानाचा विचार करताना विविध संस्कृती, त्यांचे वैविध्य, तत्वज्ञान आणि संस्कृती यांचे गुंतागुंतीचे नाते हे सर्व घटक लक्षात घ्यायला हवेत. तत्वज्ञान आणि विज्ञान यांच्यात हा मूलभूत फरक आहे. विज्ञानाला ही बंधने लागू पडत नाहीत. पण बरेच तत्वज्ञ हा भेद न मानता विज्ञानाप्रमाणेच तत्वज्ञानातही चुकीच्या कल्पनांचा त्याग करून प्रगती करता येते असे मानतात. पाश्चात्य तत्वज्ञान मूलभूत आणि बाकीच्या संस्कृतींमधून आलेले तत्वज्ञान कमअस्सल असे मानल्यामुळे आलेला हा एकांगीपणा आता काही पाश्चात्य तत्वज्ञांनाही जाणवू लागला आहे.

बरेचदा तत्वज्ञानात खोल गेल्यावर शब्दांच्या भूलभुलैय्यापलिकडे काही आहे का अशी शंका यायला लागते. (इथे अर्थातच हा भूलभुलैय्या समजून घेण्याची बौद्धिक कुवत नाही ही शक्यता आहेच पण त्यामुळे वैयक्तिक पातळीवर फारसा फरक पडत नाही. कुवत नसेलच तर ती या जन्मात येण्याची शक्यता नाही आणि मग निष्कारण दगडावर डोके आपटणे अजूनच व्यर्थ वाटायला लागते. मग सिसिफस आठवतो. The irony is now complete! ) शेवटचे, आतापर्यंतचा अनुभव असा की काही अपवाद वगळता बरेचदा तत्वज्ञान समजून घेतल्यानंतरही शेवटी जे हातात पडते ते एकतर इतके ऍबस्ट्रॅक्ट असते की व्यावहारिक जगात त्याचा उपयोग होत नाही किंवा उपयोग होण्यासारखा असेल तर ती बाब जिला ‘इनसाइट’ म्हणता येईल अशी क्वचितच असते. तत्वज्ञानाकडे बघण्याचा माझा तरी दृष्टीकोन व्यावहारिक असतो. साइनफेल्डमध्ये इलेन (अगदी वेगळ्या संदर्भात!) म्हणते तसे ‘गिव्ह मी समथिंग आय कॅन यूज.’

वर वेळेचा मुद्दा आलाच आहे. काफ्काचं एक पुस्तक अगदी प्राथमिक पातळीवर समजून घेण्यात जितका वेळ जातो त्या वेळात एक-दोन डिकन्स/हेमिंग्वे/सॉमरसेट मॉम यांची पुस्तके वाचून व्हायला हवीत. पुस्तक थोर आहे हो, त्याबद्दल वाद नाही पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही ना! (हा मुद्दा जॉइसच्या बाबतीत आणखीनच ठळकपणे जाणवतो. युलिसिस समजून घेण्यात जितका वेळ जाईल तेवढ्या वेळात एक नवीन भाषा सहज शिकून होईल.) बरं, या मार्गाने गेलं आणि हे तत्वज्ञान आत्मसात केलं तरी ते अंतिम सत्य आहे असं नाही. या लेखकांनी वास्तववादाचा त्याग केला म्हणून वास्तववाद बाद झाला असं नाही. आजही पॅट बार्कर, जॉइस कॅरल ओट्स यांच्या सारखे लेखक वास्तववादावर आधारलेल्या लेखनातून आयुष्याचं अत्यंत प्रभावी चित्रण करतच आहेत. विसाव्या शतकातील आधुनिक साहित्याच्या लेखकांनी बाह्य परिस्थितीवर लक्ष न देता त्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या मानसिक आंदोलनांचे चित्रण करण्यावर भर दिला. (यासाठी वूल्फने ‘स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस’ची शैली वापरली.) आजच्या आधुनिक जगाचे वर्णन करण्यासाठी हा मार्ग प्रभावी आहे हे नक्की, पण हाच एकमेव मार्ग आहे हे अलिखित गृहीतक बंधनकारक वाटते.

मी काफ्कासारख्या लेखकांची पुस्तके वाचताना नेहेमी किमान काही महिन्यांचे अंतर ठेवतो. एकापाठोपाठ एक दस्तोयेव्हस्की वाचला तर सगळे जगच विषण्ण, भकास वाटायला लागते. (याला शैक्षणिक भाषेत ‘Existential angst’ असे गोंडस नाव आहे.) माझ्या नैसर्गिक प्रवृत्तीच्या हे विरूद्ध असल्याने त्याची तीव्रता कदाचित अधिक जाणवत असावी. एखाद्या साहित्यातून एकाच प्रकारचा सूर निघत असेल तर मला तरी बदल हवासा वाटतो, मग भले तो लेखक कितीही आवडीचा का असेना. या लेखकांनी आयुष्याकडे ज्या दृष्टीकोनातून बघितले आहे तो कॅलिडोस्कोपचा एक तुकडा आहे, पण तो तुकडा म्हणजे सगळे जग असे मानणे धाडसाचे वाटते. हे अर्थातच वैयक्तिक ठोकताळे आहेत. ते सर्वमान्य असतील असा कोणताही दावा नाही. पण ‘काफ्कावर लिहीण्यासारखे नवीन काही उरलेले नाही’ या प्रस्तावनेतील वाक्याशी सहमत असल्याने किमान वैयक्तिक अनुभव याची किंचित भरपाई करतील अशी आशा वाटते.

१९२४ मध्ये काफ्काचा क्षयरोग बळावला. यातून आपण वाचणार नाही अशी त्याची खात्री झाल्यावर त्याने आपले सर्व प्रकाशित आणि अप्रकाशित साहित्य मॅक्स ब्रॉड या मित्राच्या हवाली केले. सोबतच्या एका पत्रात त्याने लिहीले होते की आतापर्यंत प्रकाशित झालेले साहित्य वगळता बाकी सर्व नष्ट केले जावे. काफ्का गेल्यानंतर त्याच्या मित्राने या पत्रानुसार न वागण्याचा निर्णय घेतला आणि काफ्काच्या तीन कादंबर्‍या – द स्टोकर, द ट्रायल आणि द कॅसल – प्रसिद्ध केल्या. ‘द ट्रायल’च्या प्रस्तावनेत त्याने या निर्णयाचे विस्तृत स्पष्टीकरण दिले आहे. काफ्काचे साहित्य एक अमूल्य ठेवा आहे आणि त्यापासून जग वंचित राहणे योग्य नाही असे मॅक्सचे ठाम मत होते. कादंबर्‍या प्रसिद्ध करण्यामागे हे सर्वात महत्वाचे कारण असल्याची कबुली तो देतो. त्याचा हा निर्णय विसाव्या शतकातील पाश्चात्य साहित्याला कलाटणी देणारा ठरला. गेल्या शतकातील जवळजवळ प्रत्येक प्रमुख साहित्यिकाने काफ्काचा आपल्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडल्याची कबुली दिली आहे. द ट्रायलच्या हस्तलिखितावर कादंबरीचे नावही नव्हते पण या कादंबरीबाबत चर्चा करत असताना काफ्का नेहेमी हेच नाव वापरत असे त्यामुळे मॅक्सनेही तेच नाव कायम ठेवले.

द ट्रायल प्रताधिकारमुक्त असल्याने इथे उपलब्ध आहे मात्र या प्रतीमध्ये गाळलेली प्रकरणे नाहीत. काही प्रतींमध्ये गाळलेली प्रकरणे परिशिष्टांमध्ये दिलेली आहेत. मिळू शकल्यास अशी प्रत वाचणे अधिक योग्य.

——

चित्रे विकीवरून साभार.

१. तत्वज्ञानाचे विडंबन करावे ते फक्त वूडी ऍलननेच असा जागतिक कायदा पास करायला हवा. इथे वूडी मोकाट सुटला आहे. (तसाही तो सुटलेला कधी नसतो म्हणा!) यातील पहिली रूपककथा सरळसरळ ‘द ट्रायल’मधील रूपककथेवर बेतली आहे.

२. “There are more things in heaven and earth, Horatio,
Than are dreamt of in your philosophy.” ~ Hamlet, Act 1, Scene 5.

शेक्सपिअर नक्की माणूसच होता ना? लेखकांनी आज लिहीलेलं उद्यापर्यंत राहतंय की नाही अशी परिस्थिती असताना ह्या माणसाची शेकडो वाक्ये देश, काळ, संस्कृती असे कसलेही भेद न मानता चारशे वर्षांनंतरही ताजी कशी वाटतात?

३. मुराकामीच्या काफ्का ऑन द शोरवर द ट्रायलचा स्पष्ट प्रभाव जाणवतो. एक तर कादंबरीच्या नायकाचे नावच काफ्का आहे. शिवाय शेवटी त्याला जे दोन सैनिक भेटतात, तसेच दोन सैनिक द ट्रायलच्या शेवटी जोसेफ के लाही भेटतात. याखेरीज जोसेफ के कोर्टाबद्दल म्हणतो, “..it seemed as if it would be easy enough to get a purchase on this immeasurably vast organism by means of some hidden lever which admittedly he would have to first grope for in the dark; but that then it would be child’s play to grasp it, uproot the whole thing and shatter it.” संदर्भ, कथानक सगळे वेगळे असले तरी ‘काफ्का ऑन द शोर’ च्या क्लायमॅक्समध्ये नाकाताच्या तोंडातून बाहेर पडलेला रहस्यमय प्राणी आणि होशिनो यांचा जो सामना होतो त्याची प्रेरणा या एका ओळीत असावी असे वाटते.