ऑलिव्हर स्टोन आणि जेएफके

मला आवडणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘पोलिटिकल थ्रिलर’ हा जोन्र प्रमुख आहे. दुर्दैवाने या प्रकारचे चित्रपट विशेष लोकप्रिय होत नाहीत असा गैरसमज आहे त्यामुळे असे चित्रपट फार निघातही नाहीत आणि जे निघतात त्यातले चांगले चित्रपट फारच कमी असतात. मराठीत ‘सिंहासन’चा सन्माननीय अपवाद वगळता त्या दर्जाचा दुसरा चित्रपट आठवत नाही. ‘आंधी’चं वैशिष्ट्य हे की त्या काळात इंदिरा गांधींवर व्यक्तिरेखा बेतणे धाडसाचं काम होतं, पण ‘आंधी’ राजकीय चित्रपट म्हणता येणार नाही, फार तर राजकीय पार्श्वभूमी असलेला चित्रपट म्हणता येईल.

अशा परिस्थितीत हॉलिवूडकडे वळण्यावाचून पर्याय नाही. इथेही अशा प्रकारचे चित्रपट तुलनेने कमी असले तरी काही नावे नक्कीच लक्षात राहण्यासारखी आहेत. हॉलिवूडमध्येही राजकीय पार्श्वभूमी असणारे थ्रिलर बरेच आहेत – ‘ओडेसा फाईल’ पासून ते ‘एनिमी ऑफ द स्टेट’पर्यंत. पूर्णपणे राजकीय म्हणता येतील अशा चित्रपटात ‘थर्टीन डेज’ हा फारसा न गाजलेला चित्रपट महत्त्वाचा आहे. १९६२ मध्ये झालेल्या ‘क्युबन मिसाईल क्रायसिस’ च्या १३ दिवसांचं चित्रण यात आहे. या तेरा दिवसात केनेडी बंधूंनी हे प्रकरण कशा प्रकारे हाताळलं याचं चित्रण – अर्थातच अमेरिकेच्या दृष्टीकोनातून – या चित्रपटात आहे. अर्थात या दरम्यान नेमकं काय घडलं, केनेडी-कृश्चेव्ह यांनी गुप्त करार केला होता का यासारखे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत त्यामुळे चित्रपट कितपत खरा मानता येईल हा प्रश्नच आहे.

याच प्रकारचा दुसरा एक चित्रपट विशेष उल्लेखनीय आहे आणि तो म्हणजे ऑलिव्हर स्टोनचा ‘जेएफके’. केनेडी हत्या प्रकरणावर आधारित हा चित्रपट जिम गॅरिसनच्या ‘ऑन द ट्रेल ऑफ असॅसिन्स’ या पुस्तकावर बेतला आहे. केनेडी यांची हत्या ली हार्वी ओसवाल्ड याने केली असं तत्कालीन सरकारने नेमलेल्या समितीचं मत होतं. जिम गॅरिसन न्यू ऑर्लिन्सचा डिस्ट्रिक्ट अटर्नी. केनेडी यांची हत्या एका माणसाने केली नसून त्यामागे मोठा कट होता असं गॅरिसनचं मत होतं. केनेडी हत्या प्रकरणी दाखल झालेला एकमेव खटला गॅरिसन यांनी दाखल केला होता.

‘जेएफके’ स्टोनने अत्यंत वेगळ्या प्रकारे हाताळला आहे. काही दिग्दर्शक पडद्यावर स्वत:चं अस्तित्व फारसं जाणवू देत नाहीत, स्टोन याच्या उलट आहे. काय घडलं याबाद्दला त्याचा आणि पर्यायाने चित्रपटाचा एक दृष्टीकोन आहे आणि तो आपलं सर्व कौशल्य पणाला लावून प्रेक्षकांना आपली बाजू पटवून देतो. जणू एका बाजूला चित्रपटात गॅरिसनचा खटला चालू असतानाच दुसरीकडे स्टोन प्रेक्षकांसमोर आपला खटला मांडतो आहे. परिणामकारक पार्श्वसंगीत, रंगीत आणि कृष्णधवल यांचा अनोखा वापर, अचूक कट्स, भेदक संवाद आणि प्रभावी अभिनय या सर्वांच्या संयोगाने स्टोन तीन तासांहून अधिक असं हे नाट्य आपल्यासमोर उभं करतो.

इथे माझ्या आणखी एका आवडत्या चित्रपटाशी तुलना करण्याचा मोह आवरत नाही. वॉटरगेट प्रकरणावर आधारित पाकुलाचा ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’. इथे पद्धत अगदी विरुद्ध आहे. पाकुला आणि निर्माता रेडफर्ड यांनी हा चित्रपट नेहमीच्या हॉलिवूड शैलीत करण्याचं कटाक्षाने टाळलं. कमीत कमी पार्श्वसंगीत आणि कॅमेर्‍याची हालचाल, कुठेही मेलोड्रामा नाही यामुळे या चित्रपटाला एखाद्या डॉक्यूमेंटरीचं स्वरूप येतं. इथे आणखी एक फरक असा की वॉटरगेट प्रकरणात सर्व तपशील उघड झाले होते त्यामुळे कुठेही संदेहाला जागा नव्हती.

‘जेएफके’ स्टोनने अत्यंत वेगळ्या प्रकारे हाताळला आहे. काय घडलं याच्या ज्या अनेक शक्यता आहेत त्यापैकी एक (किंवा काही शक्यतांचं मिश्रण) स्टोन आपल्यापुढे मांडतो. काही दिग्दर्शक पडद्यावर स्वत:चं अस्तित्व फारसं जाणवू देत नाहीत, स्टोन याच्या उलट आहे. काय घडलं याबाद्दला त्याचा आणि पर्यायाने चित्रपटाचा एक दृष्टीकोन आहे आणि तो आपलं सर्व कौशल्य पणाला लावून प्रेक्षकांना आपली बाजू पटवून देतो. जणू एका बाजूला चित्रपटात गॅरिसनचा खटला चालू असतानाच दुसरीकडे स्टोन प्रेक्षकांसमोर आपला खटला मांडतो आहे. परिणामकारक पार्श्वसंगीत, रंगीत आणि कृष्णधवल यांचा अनोखा वापर, अचूक कट्स, भेदक संवाद आणि प्रभावी अभिनय या सर्वांच्या संयोगाने स्टोन तीन तासांहून अधिक असं हे नाट्य आपल्यासमोर उभं करतो.