द कॅज्युअल व्हेकन्सी

रोलिंगबाईंची नवीन कादंबरी मागच्या आठवड्यात प्रकाशित झाली. विशेष गोष्ट म्हणजे प्रकाशित होण्याआधी आणि समीक्षकांनी त्यांचा निर्णय देण्याआधीच कादंबरी यशस्वी झाली होती कारण हॅरी पॉटरनंतर त्यांच्या पोतडीतून वेगळं काय येणार याच्या उत्सुकतेपोटी ती वाचली जाणार हे उघड होतं. रोलिंगबाईंनाही हे ठाऊक होतं, “मी आता काही लिहिलं तरी लोक वाचणार.” असं त्या मुलाखत देताना म्हटल्या होत्या.

कादंबरीबद्दल रोलिंगबाईंच्या फ्यानलोकांना पडलेला मुख्य प्रश्न म्हणजे हॅरी पॉटरच्या तुलनेत ही कादंबरी कुठे आहे? एका वाक्यात सांगायचं झालं तर हॅरी पॉटर आणि या कादंबरीत काहीही साम्य नाही. आता बारकाईनं बघायला गेलं तर काही साम्यस्थळं सापडू शकतील पण ती फारशी महत्त्वाची नाहीत. हॅरी पॉटरचं विश्व जादुई होतं, तिथे काहीही अशक्य नव्हतं. कॅज्युअल व्हेकन्सी मगल्सच्या जगातली आहे. कोणतेही चमत्कार, योगायोग या कादंबरीत घडत नाहीत. ‘डेउस एक्स माकिना’च्या साहाय्याने शेवटी सूत्रे जुळून येत नाहीत. सर्वात महत्त्वाचा फरक कादंबऱ्यांच्या टोनमध्ये आहे ज्याचं मूळ दोन्ही वेगवेगळ्या जॉन्रमध्ये आहे. हॅरी पॉटरच्या कथा मुलांसाठी होत्या, त्यात नेहमी अशा कथांमध्ये आढळणारा सुष्ट आणि दुष्ट असा संघर्ष होता, जी सर्वसाधारणपणे चांगली समजली जातात अशा मूल्यांचा पुरस्कार होता. कॅज्युअल व्हेकन्सीमध्ये रोलिंगबाईंनी दुसरं टोक गाठलं आहे. कादंबरी प्रौढांसाठी आहे त्यामुळे यात शारीरिक आणि मानसिक हिंसा, वर्णभेद, आत्महत्या असे विषय हाताळताना लेखिकेने कोणताही मुलाहिजा ठेवलेला नाही, अपशब्दांची रेलचेल आहे. इथे कोणतंही पात्र सुष्ट किंवा रूढार्थाने नायक/नायिका म्हणता येणार नाही. प्रत्येकात चांगले आणि वाईट गुण आहेत फक्त त्यांचं प्रमाण कमी-जास्त आहे त्यामुळे वाईट गुण कमी असलेली किंवा ‘न्यूट्रल’ पात्रं तुलनेने चांगली वाटतात. हॅरी पॉटरमध्ये याला फारसा वाव नव्हता तरीही – ज्याला सुष्ट म्हणावं की दुष्ट असा प्रश्न पडतो – असं सेव्हरस स्नेपचं गुंतागुंतीचं पात्र कथानकाचा महत्त्वाचा भाग होतं.

आतापर्यंत वर्तमानपत्रांमधून कादंबरीचा मूळ कथाभाग उघड झालेला आहे. पॅगफर्ड या काल्पनिक शहराच्या काउन्सिलचा सदस्य बॅरी फेअरवेदर मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे अचानक मरण पावतो. त्याची काउन्सिलमधील जागा रिकामी होते – कॅज्युअल व्हेकन्सी. ही जागा पटकावण्यासाठी शहरातील विविध मंडळींची हालचाल सुरू होते. शहराचा प्रथम नागरिक आणि काउन्सिलचा अध्यक्ष हॉवर्ड मॉलिसनचा मुलगा माइल्स, शहरातील शाळेचा उपमुख्याध्यापक कॉलिन वॉल आणि कुणाशी फारसा परिचय नसलेला सिमॉन प्राइस असे तीन उमेदवार या जागेसाठी पुढे येतात. मॉलिसन, वॉल, प्राइस या कुटंबांमधील सदस्य, फेअरब्रदरची बायको मेरी, परमिंदर आणि विक्रम जवांडा हे डॉक्टर कुटुंब आणि सरकारी मदतीवर पूर्णपणे अवलंबून असणारे वीडन कुटुंब – आई टेरी आणि तिची दोन मुलं – सोळा वर्षांची क्रिस्टल आणि तीन वर्षांचा रॉबी – ही या कादंबरीतील मुख्य पात्रे आहेत. शहर छोटं आहे – खरं तर स्मॉल टाउनला खेडंही म्हणता यावं – त्यामुळे या सर्वांपैकी कुणाच्याही आयुष्यात काही घडलं तरी ते गुप्त राहत नाही.

मोठ्यांचं राजकारण चालू असताना त्यांच्या मुलांचं आयुष्यही लेखिकेला तितकंच महत्त्वाचं वाटतं. टीनएजर वयोगटातील कोणत्याही अधिकाराला न जुमानणाऱ्या मुलांच्या मनात काय चाललेलं असतं याचं चित्र इथे बघायला मिळतं. अशा चित्रीकरणासाठी रोलिंगबाईंनी एक अनोखी शैली वापरली आहे. निवेदकाचं निवेदन चालू असतानाच मध्ये कंसात स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेसच्या जवळ जाणारे विविध पात्रांच्या मनातले विचार येत राहतात. त्यामुळे अशा प्रसंगाचं चित्र वाचकाला दोन पातळ्यांवर मिळतं – एक म्हणजे नुसतं बघितलं तर जे दिसेल ते आणि दुसरं त्यांच्या मनातले सुप्त हेतू, न दाबता येणारे विचार, भावना. याचा परिणाम कधीकधी विनोदी म्हणावा असा होतो. उदा. कॉलिन वॉल, त्याची बायको टेस, डॉ. परमिंदर, समाजसेवक के यांचं काउन्सिल मिटिंगबद्दल बोलणं चालू असतं. के शी बोलणं टाळावं म्हणून परमिंदर तिने दिलेले रिपोर्ट वाचण्याचं नाटक करते पण तिच्या मनात वेगळेच विचार चालू असतात. तिकडे आपण मेहनतीनं केलेला रिपोर्ट डॉक्टर इतक्या काळजीपूर्वक वाचत आहेत म्हणून के ला आनंद होतो. तिच्या मनात वेगळंच द्वंद्व चालू असतं पण वरकरणी ती कॉलिन पॅगफर्डच्या इतिहासावर जे बोलत असतो त्याला मान डोलवत असते. कॉलिनला आपल्याला इतका चांगला श्रोता मिळाला आहे याचा आनंद होतो आणि तो आणखी उत्साहाने बोलू लागतो. अनेक वर्षे तीच रेकॉर्ड ऐकून कंटाळलेली त्याची बायको टेस आपल्या विश्वात हरवून जाते आणि सगळ्यांसाठी आणलेली बिस्किटं एकटीच फस्त करते. हे दोन पातळ्यांवरचं वर्णन यशस्वी होतं याचं कारण लेखिकेची जबरदस्त निरीक्षणशक्ती. याचा आणखी एक परिणाम म्हणजे या सगळ्या लोकांचे मुखवटे आणि आतले चेहरे लख्ख दिसतात.

पुस्तकातील काही गोष्टी खटकतात, त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोलिंगबाईंची भाषा. हॅरी पॉटर मुलांसाठी असल्याने भाषा सोपी असणं अनिवार्य होतं. मात्र इथे प्रौढांसाठी लिहिताना कधीकधी रोलिंगबाई कसरत करत आहेत असं वाटतं. जणू ग्रासकोर्टवर विम्बल्डन सहजगत्या जिंकलेल्या खेळाडूची क्ले कोर्टावर फ्रेंच ओपन खेळताना दमछाक व्हावी तसं काहीसं. त्यातही काही वेळा भाषा उत्तम आणि काही वेळा फारच सामान्य असे चढउतार दिसत राहतात. एखाद्या दिवशी बाईंचा मूड लागला आणि उत्तम लिहिलं, दुसऱ्या दिवशी मूड नव्हता असं वाटत राहतं. हे माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या लक्षात यावं याचं आश्चर्य वाटलं. असे चढउतार लेखनात नैसर्गिकपणे येतातच पण पुनर्लेखन आणि संपादन यानंतर ते दिसू नयेत अशी अपेक्षा असते. उत्तरार्धातील भाषा – जिथे नाट्यमय घटना आहेत – ती तुलनेनं चांगली जमली आहे. पूर्वार्धात पात्रं आणि जागा यांचं वर्णन करताना उपमा देण्यात मात्र बाई कमी पडतात. उदा. “A black suit was hanging in dry-cleaner’s polythene in his bedroom, like an unwelcome guest.” इथे एक मिलीसेकंद विचार केल्यानंतर बाईंना काय म्हणायचं आहे हे कळतं. तरीही बेडरूममध्ये पाहुणा लटकला आहे अशी प्रतिमा काही काळ डोळ्यापुढे येते. कथेतील मुलं आंतरजालावर बरेचदा असतात. पैकी परमिंदरची मुलगी सुखविंदर हिला ‘ब्राउन स्किन’ मुळे फेसबुक वॉलवर रोज एक ट्रोल मेसेजेस पोस्ट त्रास देत असतो आणि त्यामुळे ती त्रस्त झालेली असते. पन्नासएक पानानंतर तीच मुलगी ‘एस्क्यूएल इंजेक्शन कोड’ वापरून एक वेबसाइट हॅक करते. मग या मुलीला पन्नास पानं आधी फेसबुकची प्रायव्हसी सेटिंग का बदलता येऊ नयेत? तिसरं म्हणजे पुस्तकाचं कव्हर. ‘डोंट जज बुक बाय द कव्हर’ वगैरे ठीक आहे, पण लाल आणि पिवळे रंग वापरून इतकं अनाकर्षक कव्हर करायचं कारण कळलं नाही. एक शक्यता आहे – इंग्लंडमधील काउन्सिलच्या मतपत्रिकेशी याचं साधर्म्य असू शकतं. तरीही वेगळं कव्हर करता आलं असतं असं वाटतं.

हे कच्चे दुवे असूनही कथानकाचा रसभंग होत नाही कारण वाचकाला गुंतवून ठेवणाऱ्या व्यक्तिरेखा आणि कथानक ही रोलिंगबाईंची शक्तीस्थानं आहेत. त्यामुळे एकदा वाचायला सुरूवात केल्यावर पुस्तक खाली ठेवावंसं वाटत नाही. पॅगफर्ड आणि लगतचंच तुलनेनं आधुनिक यारविल या दोन शहरांमधील तणावाचे संबंध, दोन काउन्सिल आणि सरकारी यंत्रणा यांच्यातील विवादाचे मुद्दे यासारखे विषय हाताळताना लेखिकेने एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. इंग्लंड आणि इतर प्रगत देशांमध्ये असणारी वेलफअर यंत्रणा आणि तिच्या अनुषंगाने उभे राहणारे प्रश्न. पॅगफर्डमध्ये असणारं व्यसनमुक्ती केंद्र बंद करण्याचा काउन्सिलच्या काही सदस्यांचा प्रयत्न चालू असतो. स्वतः:ची जबाबदारी न उचलणाऱ्या नागरिकांना सरकारने फुकट पोसू नये असं यांचं म्हणणं असतं. सध्याच्या अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा हाच मुद्दा आहे. (हॅरी पॉटरचं पहिलं पुस्तक लिहीत असताना स्वतः: रोलिंगही वेलफेअरवर अवलंबून होत्या. ती मदत मिळाली नसती तर माझं काय झालं असतं ठाऊक नाही अशी कबुली त्यांनी दिली आहे.) प्रत्यक्षात हा प्रश्न वरकरणी दिसतो तितका सोपा नाही. टेरी वील्डन हेरॉइनच्या आहारी गेलेली असते, याचे भीषण परिणाम तिच्या मुलांना भोगावे लागतात. याचं चित्रण करताना लेखिकेने कोणतीही भीडभाड ठेवलेली नाही. स्वार्थी राजकारण आणि पूर्वग्रह यांच्या बळावर घेतलेल्या निर्णयांची किंमत समाजाच्या सर्वात खालच्या वर्गाला कशी चुकवावी लागते हे इथे दिसतं.

कोणतंही पुस्तक, चित्रपट याविषयी प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात. याची कारण बरीच आहेत. एक म्हणजे आपला मेंदू प्रत्येक नवीन अनुभवाला आधीच्या संदर्भांच्या फूटपट्ट्या लावून मोजत असतो. हे मोजमाप फिट बसलं तर आपल्याला ती गोष्ट पटते, आवडू शकते. यालाच ‘रिलेट करणं’ असंही म्हणतात. कधीकधी फूटपट्टी चुकीची असते किंवा तो अनुभव मोजण्यासाठी लागणारी पट्टीच मेंदूत नसते. तसं झालं तर ‘हे काय केलं आहे?’ असा अविश्वास वाटू शकतो. कॅज्युअल व्हेकन्सी वाचताना काही संदर्भ आठवले. कॉलिन आणि टेसचा कुणाचीही आणि कसलीही कदर न करणारा मुलगा – फॅट्स – जॉइस कॅरल ओट्सच्या जॉन रेड्डी हार्टची आठवण करून देतो तर क्रिस्टलमध्ये मिलेनियम त्रिधारेच्या लिझबेथ सलांदरची झलक दिसते. काही वर्षांपूर्वी शेड्डारमधल्या प्रागैतिहासिक गुहा बघायला जाण्यासाठी ब्रिस्टलवरून बस पकडली होती. मध्ये एका छोट्याश्या खेड्यात बस बदलावी लागली. तिथल्या स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये शिळोप्याच्या गप्पा हाकणारे पेन्शनर, नंतर बसमध्ये चढलेली शाळकरी मुलं, एकीच्या हातातलं ट्वायलाइट – अशी काही चित्रं मेंंदूनं एका कोपऱ्यात कधीतरी लागतील म्हणून ठेवून दिली होती, त्यांच्यावरची धूळ झटकली गेली.

हॅरी पॉटरचे फ्यान लोक हे पुस्तक वाचतीलच. शहरापासून दूर अश्या खेड्यांमधलं अजिबात रोमॅंटिक वगैरे नसणारं वास्तव बघायचं असेल तर हे पुस्तक इतरांनी वाचायला हरकत नाही. डेली मेलमध्ये सेलेब्रिटींच्या बातम्यांव्यतिरिक्त रोज ज्या बातम्या येतात त्या प्रकारच्या बातम्यांमागचं चित्र काय असतं याची एक चुणूक कॅज्युअल व्हेकन्सीतून मिळते. पुस्तक रोलिंगबाईंनी लिहिलं नसतं तर मी कदाचित वाचलंही नसतं. एकदा लोकप्रिय झालेला साचा तोडून नवीन कलाकृती निर्माण करण्याचं धारिष्ट्य भल्याभल्यांना जमत नाही. आणि ते वेळीच केलं नाही तर नंतरच्या कलाकृतींची जी केविलवाणी परिस्थिती होते त्याची अनेक उदाहरणं दिसतात. रोलिंग यांनी हे जाणीवपूर्वक टाळलं. पैसा, प्रसिद्धी नको असं मुलाखतींमध्ये म्हणणं सोपं असतं, तशी कृती करणं अवघड. पण रोलिंग यांचं वागणं – तीन वर्षात १५ ट्वीट किंवा फोर्ब्ज मासिकाच्या यादीत नाव खाली जाण्याइतकी संपत्ती दान करणं – या वृत्तीशी सुसंगत आहे. रोलिंगबाई अल्बस डंबलडोर यांच्या सल्ल्यानुसार त्यांचे निर्णय घेतात असं वाटतं, “It is our choices, Harry, that show what we truly are, far more than our abilities.”