दो काफी

मला चहाचे व्यसन आहे. चेटकिणीचा जीव जसा दूर ठेवलेल्या पोपट किंवा तत्सम पक्ष्यात असायचा तसा माझा जीव चहाच्या एका कपात आहे. दिल्लीला जाताना रात्री दोन वाजता, मध्यप्रदेशात कुठेतरी नकाशावर अस्तित्व नसलेल्या एका गावातल्या टपरीवर, अर्धवट झोपेत असलेल्या भैयाच्या हातचा चहा पिताना जे वाटलं त्यालाच ज्ञानी लोक ब्रम्ह वगैरे म्हणत असावेत. अशी ‘मागची बॅकग्राउंड’ असताना, इटलीत…

मला चहाचे व्यसन आहे. चेटकिणीचा जीव जसा दूर ठेवलेल्या पोपट किंवा तत्सम पक्ष्यात असायचा तसा माझा जीव चहाच्या एका कपात आहे. दिल्लीला जाताना रात्री दोन वाजता, मध्यप्रदेशात कुठेतरी नकाशावर अस्तित्व नसलेल्या एका गावातल्या टपरीवर, अर्धवट झोपेत असलेल्या भैयाच्या हातचा चहा पिताना जे वाटलं त्यालाच ज्ञानी लोक ब्रम्ह वगैरे म्हणत असावेत. अशी ‘मागची बॅकग्राउंड’ असताना, इटलीत आल्यावर पंचाईत झाली. इटालियन लोकांना ज्या गोष्टींचा अभिमान आहे त्यातल्या काही म्हणजे वाईन, कुझीन, सॉकर, अरमानी आणि कफ्फे. मला आपली वर्षा-सहा महिन्यातून एकदा कधीतरी हाटेलात ‘दो काफी’ चा ओरडा झाल्यावर मिळते, त्या गोड, सौम्य ‘काफी’ची सवय. पण इटालियन कफ्फेची गोष्टच निराळी.

कफ्फेचे एकूण प्रकार मी अजूनही मोजतो आहे. सर्वात पहिला कफ्फे नोर्माले : बोटभर उंचीच्या कपात जेमतेम अर्धा कप कडू कॉफी. नोर्मालेलाच एसप्रेस्सोही म्हणतात. यात किंचित वाफाळलेले दूध घातले तर माकियातो पण दुधावरचा फेस घातला तर माकियातो कॉन स्क्यूमो. याउलट आधी दूध घेऊन त्यात एक विशीष्ट रंग येईपर्यंत कॉफी टाकून तयार होते लात्ते मकियातो. यालाच कफ्फे लात्तेही म्हणतात. नोर्मालेमध्ये फेसाळलेले दूध घालून मोठया कपात सर्व्ह केले बनते कापुचो. कापुचो नेहेमी ब्रेकफ़ास्टसाठी घेतात, पण लंच किंवा डिनरनंतर कधीच नाही. फेसाळलेले, पण छोट्या कपभर दूध घालून, वर कोकोची फोडणी दिली तर होते स्पेचाले किंवा मोरोक्कीनो. याउलट कफ्फेमध्ये विविध प्रकारची लिकर्स घालून बनते ‘कोरेत्तो’. आणि कमी पाणी घालून केलेली अजून तीव्र नोर्माले म्हणजे स्त्रेत्तो.

बार्लीपासून बनवलेल्या कॉफीला म्हणतात कफ्फे द्’ओर्झो. ह्याची चव म्हणजे, थंडी, ताप, खोकला आणि शिवाय पोटही बिघडले आहे, असे ऐकल्यावर पाटणकर वैद्य जो काढा देतील त्याच्याशी मिळतीजुळती असते. हे झाले बेसिक प्रकार. याशिवाय इंडियन करी जशी प्रांतानुसार बदलते, तशाच इटलीमध्ये प्रांतानुसार कॉफी बीन्स आणि बनवण्याच्या पद्धती बदलतात.

मी पहिल्यांदा दिवसाला २ कफ्फे घेत असे. सकाळी कापुचिनो, दुपारी कफ्फे नोर्माले. पण रात्री घुबडाप्रमाणे टक्क जागे रहायची वेळ आल्यावर लक्षात आले की धिस इज नॉट माय कप ऑफ कफ्फे. पण कापुचिनोची चव आवडायची. मग एका मित्राने उपाय सांगितला…डीकॅफ. तेव्हापासून मी ‘कापुचो देका’ घ्यायला लागलो आणि झोप परत आली.

याउलट अनुभव आला तो अमेरिकन स्टारबक्समध्ये. अमेरिकन लोकांनी ज्या गोष्टींची वाट लावली आहे, त्याला कॉफी अपवाद नाही. तिथे कॉफी मागितल्यावर त्याने सढळ हाताने बनवलेल्या कॉफीचा सुपरमग हातात दिला. एक कप कॉफीएवजी, पहेलवानाला देतात तसा पावशेर दुधाचा खुराक पाहून मी सर्द झालो. मग पुढचा पाऊण तास मी मोजलेल्या युरोंशी प्रामाणिक रहात, त्या क्षीरसागराशी झटापट करीत होतो. शेवटी सदुसष्ट बॉल खर्ची घालून अकरा धावा काढल्यावर, सेकंड स्लिपला प्रॅक्टीस कॅच देऊन, फलंदाज जसा मान खाली घालून परततो, तसा तिथून बाहेर पडलो.

कुणाला कुठल्या गोष्टीतून समाधान मिळेल हे सांगणे महाकठीण. उत्तर इटलीकडच्या द्राक्षांपासून बनवलेल्या ‘ब्लड रेड’ कियांती क्लासिकोचा पेला, बरोबर ब्रेडचे तुकडे, जोडीला पूर्ण न शिजवलेला, टोमॅटो सॉस आणि मोझ्झारेल्ला चीज घातलेला पास्ता, ऑलीव्हच्या तेलात तळलेले मीटचे तुकडे (शाकाहारी असाल तर बटाट्याचे काप) आणि शेवटी चविष्ट असे तिरामिसू, अशी जंक्शान मेजवानी झाल्यानंतर एक कप कफ्फे घेतली की इटालियन माणूस देह ठेवायला मोकळा होतो.