अणूंचा चित्रपट – अ बॉय ऍंड हिज ऍटम

विज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्या लोकांचे संशोधनाबद्दल बरेच गैरसमज असतात. आईन्स्टाईनसारखे केस वाढलेले, विक्षिप्त स्वभाव आणि नेहमी विश्वाचा उगम कसा झाला यासारख्या गूढ आणि रहस्यमय प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतलेले लोक म्हणजे वैज्ञानिक. यात एक गृहीतक दडलेलं आहे ते म्हणजे संशोधनाच्या विषयांबद्दल. कृष्णविवर, विश्वाचा आरंभ, बिग बॅंग, पॅरेलल युनिव्हर्स, स्ट्रिंग थिअरी किंवा नुकताच प्रसिद्धीला आलेला हिग्ज बोझॉन –…

विज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्या लोकांचे संशोधनाबद्दल बरेच गैरसमज असतात. आईन्स्टाईनसारखे केस वाढलेले, विक्षिप्त स्वभाव आणि नेहमी विश्वाचा उगम कसा झाला यासारख्या गूढ आणि रहस्यमय प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतलेले लोक म्हणजे वैज्ञानिक. यात एक गृहीतक दडलेलं आहे ते म्हणजे संशोधनाच्या विषयांबद्दल. कृष्णविवर, विश्वाचा आरंभ, बिग बॅंग, पॅरेलल युनिव्हर्स, स्ट्रिंग थिअरी किंवा नुकताच प्रसिद्धीला आलेला हिग्ज बोझॉन – यासारखे विषय सामान्य जनतेमध्ये बरेच लोकप्रिय असतात. किंबहुना पुणे-मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागातील शास्त्र शाखेतील बऱ्याच मुलांचे स्वप्न खगोलशास्त्रज्ञ व्हायचे असे असते. (यात एकेकाळी लेखकाचाही समावेश होता.) आणि यामागे त्या काळात सकाळच्या पुरवण्यांमध्ये येणाऱ्या लेखांचा बराच प्रभाव आहे असे वाटते. यात अर्थातच गैर काहीच नाही, उलट विज्ञानाची गोडी लागत असेल तर चांगलेच आहे. मुद्दा हा की विज्ञान म्हणजे फक्त हे ‘सायन्स फिक्शन’मध्ये नेहमी येणारे विषय नव्हेत, विज्ञानाच्या छत्रीखाली असंख्य शाखा आणि विषय येतात. त्यातले सर्व ‘कृष्णविवरात पडलं तर काय होईल?’ असे ‘ऑस्सम’ प्रश्न विचारत नसले तरी जाणून घेतलं तर बरेचदा रोचक माहिती मिळू शकते. मागच्या लेखात आलेलं ‘बटरफ्लाय इफेक्ट’चं उदाहरण ‘नॉन-लिनियर डायनॉमिक्स’ या शाखेखाली येतं. या शाखेतील परिणाम बरेचदा इतके विस्मयकारक असतात की शास्त्रज्ञांना या शाखेला विज्ञान म्हणून स्वीकारायला बराच वेळ लागला. किंवा ‘कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स’ या वेगळ्या शाखेमध्ये ‘सुपरकंडक्टिव्हिटी’ किंवा बोस-आईन्स्टाईन कन्डेन्सेट सारखे अनेक रोचक गुणधर्म बघायला मिळतात. याखेरीज काही शाखा अशा आहेत की ज्यांच्या संशोधनावर या शतकाचं भवितव्य अवलंबून आहे, उदा. सौर उर्जा आणि इतर पर्यायी मार्गाने उर्जा मिळवण्यावर चाललेलं संशोधन.

मिडियामध्ये विज्ञानाच्या सगळ्या शाखांना सारखी प्रसिद्धी मिळत नाही हे इतर शाखांमधील वैज्ञानिकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. या दिशेने एक प्रयत्न म्हणून आयबीएमच्या शास्त्रज्ञांनी एक लघुचित्रपट तयार केला. फक्त चित्रपट केला असता तर फारसं काही आश्चर्यकारक नव्हतं. हा चित्रपट बनवण्यासाठी शास्त्रज्ञांनी चक्क अणू वापरले. अणूंच्या साहाय्याने चित्रे काढून त्याचा चित्रपट बनवण्यासाठी स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोपचा (एसटीएम) वापर करण्यात आला. एसटीएमबद्दल आधी एक लेख आला आहे. यात अत्यंत टोकदार अशा सुईमार्फत पृष्ठभागावर असणारे अणू किंवा रेणू हवे तसे नियंत्रित करणे शक्य होते. तांब्याच्या पृष्ठभागावर कार्बन मोनॉक्साइडचे १३० अणू ठेवण्यात आले. या अणूंच्या रचनेमधून एक चित्र तयार झाले. नंतर अणूंची स्थिती बदलून या चित्रात बदल केले गेले आणि त्यांची चित्रे घेऊन त्यापासून चित्रपट तयार करण्यात आला. यासाठी २४२ फ्रेम्स चित्रित करण्यात आल्या. तांब्याच्या पृष्ठभागाचे तपमान -२६८ C इतके होते कारण नेहमीच्या तपमानामध्ये अणू पृष्ठभागावर स्थिर राहणे अशक्य असते.

आयबीएमसाठी पृष्ठभागावरील अणू हवे तसे नियंत्रित करणे नवीन नाही. एसटीएमचा शोध आयबीएममध्येच लागला आणि त्यासाठी १९८४ साली नोबेल पारितोषिकही देण्यात आले. मात्र एखादी कथा सांगणारा चित्रपट – मग भले ती कथा कितीही साधी असो – अणूंच्या मार्फत चित्रित करणे ही गोष्ट विस्मयकारक आहे आणि केवळ मनोरंजन हा यामागचा उद्देश नाही. अणूंवर हवे तसे नियंत्रण मिळवता येणे नवीन प्रकारचे ‘मेमरी डिव्हाइस’ बनविण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. याखेरीज या तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र अशा अनेक शाखांमध्ये वापरले जात आहेत.