ब्याकवर्ड इंडीयन्स आणि त्यांची ब्याकवर्ड अभिरुची

“सगळ्या हिंदी चित्रपटातून गाणी हद्दपार करायला हवीत,” तो म्हणाला. आणि नुसता नाही म्हणाला तर आवेशाने वगैरे म्हणाला. इथे तो प्रातिनिधिक आहे. असे तो किंवा ती आवेशाने वगैरे आपलं मत मांडत असतात. “काय तुम्ही हे हिंदी चित्रपट बघता? त्यापेक्षा कुरोसावा, बर्गमन बघा म्हणजे चित्रपट काय असतो ते कळेल. सिंप्ली सबलाइम, यु नो.” लेकिन हाय रे ये…

“सगळ्या हिंदी चित्रपटातून गाणी हद्दपार करायला हवीत,” तो म्हणाला. आणि नुसता नाही म्हणाला तर आवेशाने वगैरे म्हणाला. इथे तो प्रातिनिधिक आहे. असे तो किंवा ती आवेशाने वगैरे आपलं मत मांडत असतात. “काय तुम्ही हे हिंदी चित्रपट बघता? त्यापेक्षा कुरोसावा, बर्गमन बघा म्हणजे चित्रपट काय असतो ते कळेल. सिंप्ली सबलाइम, यु नो.” लेकिन हाय रे ये फूटी किस्मत! इतकं समजावून सुद्धा आमचे ब्याकवर्ड देशबांधव या हिंदी सिनेमाच्या चक्रव्यूहातून काही बाहेर पडायला तयार नाहीत. एक क्षण कल्पना करून पाहिली, सगळ्या हिंदी चित्रपटातून गाणी काढून टाकली तर काय होईल? प्यासा साहिरच्या गाण्यांशिवाय बघायचा? खामोशीमधून ‘वो शाम कुछ अजीब थी’ ला सुट्टी द्यायची? “सिली सॉंग ऍंड डान्स रूटीन्स, यू नो.” म्हणत किशोर, रफी, आशा, एसडी, आरडी, ओपी, रेहमान सगळ्यांना बाद करून टाकायचं? त्यापेक्षा सरळ गोळ्याच घाला की. ब्याकवर्ड इंडियन्सच्या ब्याकवर्ड अभिरुचीचा स्तर वाढवण्याच्या निष्फळ प्रयत्नाचं लेटेष्ट उदाहरण इथे. लेखाचं पहिलं वाक्य वाचूनच (“As is widely known but rarely articulated, most Indian films are terrible.”) आपण चुकीच्या देशात जन्माला आलो या जाणिवेने आमचं इवलंसं मन कातावलं, खंतावलं, कोमेजलं, खस्तावलं, सुस्तावलं आणि सर्वात शेवटी पस्तावलं.

मागच्या शतकात सिनेमाचा शोध लागल्यानंतर भारतीय सिनेमाचा प्रवास जागतिक सिनेमाच्या बरोबरीनेच झाला, मात्र या प्रवासाची दिशा पूर्णपणे वेगळी होती. भारतीय सिनेमात पहिल्यापासूनच गाणी हा चित्रपटाचा अविभाज्य भाग होती. यासाठीच गीतकार, संगीतकार आणि गायक यांना कलाकारांइतकंच महत्त्व होतं. (हे महत्त्व मिळवून देण्यात लताबाईंचा महत्त्वाचा वाटा होता.) पहिल्यापासूनच हिंदी चित्रपटाचं स्वरूप काहीसं ऑपेरासारखं आहे. मेलोड्रामाला प्राधान्य, प्रत्येक कलाकार गाऊ शकतो. भारतात उर्दू गझल आणि शायरी यांची जुनी परंपरा होती. या परंपरेतील मजरूह, कैफी आझमी, साहिर यासारखे गुणवान कवी चित्रपटांमध्ये गीतलेखनाकडे वळले. संगीतामध्ये या अनेक कलाकारांनी ज्या सुरावटी दिल्या त्याला तोड नाही. एखाद्या कलाप्रकाराला तुम्ही फक्त त्याच्या जॉन्रवरून बाद करत असताल तर प्रॉब्लेम तुमचा आहे, कलाकृतीचा नाही. चांगला सिनेमा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. अमुक प्रकारचा सिनेमा उत्कृष्ट आणि अमुक प्रकारचा भिकार असं गृहीतक आधीच डोक्यात घेऊन चित्रपट बघणं मॅच-फिक्सिंग करण्यासारखं आहे. हिंदी चित्रपटांची स्वतः:ची अशी एक भाषा तयार झाली आहे. तुम्हाला त्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर तिच्याशी परिचय आवश्यक आहे.

आर्थर सी क्लार्कच्या एका कथेत परग्रहवासी पृथ्वीवर आलेले असताना त्यांच्या सन्मानार्थ एक संगीताची मैफल आयोजित करण्यात येते. संगीत ऐकताना त्यांना त्यातील ताल-सुरांचा मेळ बसवताना त्याचे गणितीय नियम चटकन लक्षात येतात, पण याचा लोकांवर जो अभूतपूर्व भावनिक परिणाम होतो त्याचं कारण त्यांच्या लक्षात येत नाही. आपल्यासारखा संगीताचा आस्वाद घेण्यास ते असमर्थ ठरतात. संगीत ही कला अशी आहे की जी सगळी बंधने तोडून थेट हृदयाला भिडते. हिंदी चित्रपट बघावेत की नाही याचा एक सोपा निकष आहे. जर तुम्हाला काही कारण नसताना तासन-तास हिंदी गाणी ऐकणं आवडत नसेल, एखादं गाणं बेहद्द आवडल्यावर आठवडाभर तेच ऐकणं जमत नसेल, आवडतं गाणं ऐकताना तुम्ही त्याच्या सुरांमध्ये चिंब भिजून जात नसाल, पानपट्टीच्या दुकानापासून ते कोपऱ्यावरच्या हाटेलामध्ये चालू असलेली विविधभारतीवरची हिंदी गाणी मनसोक्त ऐकण्यात काय मजा आहे कळत नसेल तर तुम्ही या वाटेला न जाणंच योग्य.

हिंदी सिनेमाचा उद्धार करणारे नेहमी इटालियन, स्वीडिश चित्रपटांची उदाहरणे देतात, अंतोनियोनी, बर्गमन वगैरे. गंमत अशी की तुलना करताना ते सत्यजित रे किंवा बेनेगल यांची तुलना बर्गमनशी करत नाहीत तर रमेश सिप्पी किंवा यश चोप्रा यांची करतात. हा रेडकार्ड दाखवण्याच्या योग्यतेचा फाऊल आहे. आणि फेलिनी, अंतोनियोनी म्हणजे इटालियन सिनेमा असं कुणी सांगितलं? इटलीमध्ये मास्सिमो बोल्दी आणि ख्रिस्चियन दि सिका या जोडगोळीचे अनेक सिनेमे लोकप्रिय आहेत. डेव्हिड धवन आणि गोविंदाला अभिजात म्हणावं अशा करामती या सिनेमात असतात आणि तरीही हे धो-धो चालतात. बर्गमननंतर स्वीडिश सिनेमात त्या तोडीचं कोण आहे? ‘ड्रॅगन टॅटू’वरचे तद्दन धंदेवाईक चित्रपट पहिल्यांदा स्वीडनमध्येच झाले की. कुरोसावा, ओझु जपानी सिनेमातील मोठी नावं, पण कुंगफू वर किती मारधाड जपानी चित्रपट निघाले त्याची मोजदाद कोण करणार? टोपीकराला जसं आपण इथे नेहमी हत्तीवरून फिरतो असं वाटतं तसंच या लोकांना इटालियन प्रेक्षक सदैव फक्त फेलिनी बघतो किंवा स्वीडिश लोक बर्गमन सोडून बाकी काही बघत नाहीत असं वाटत असतं. भिकार चित्रपट सगळ्या भाषांमध्ये, सगळ्या देशात निघतात, हिंदीतही पोत्याने निघतात. पण म्हणून हिंदी चित्रपट भिकार असं सामान्यीकरण करणं म्हणजे ‘थ्रोइंग द बेबी आऊट विथ द बाथवॉटर’ असं करण्यासारखं आहे. कोणताही चित्रपट बघताना त्याच्या चौकटीत राहून तो कितपत यशस्वी होतो आहे हे बघणं महत्त्वाचं. त्याला चौकटच बदलायला सांगणं म्हणजे सिंहगडावर जाऊन बायजाबाईला झुणकाभाकरीऐवजी पिझ्झा बनव असं सांगण्यासारखं आहे.

हा फक्त देशीवाद नाही. एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये ‘इंप्रेशनिझ्म’ची लाट आली होती. तुर्कस्तानातील मोठमोठे कलावंत या लाटेच्या प्रभावाखाली आले आणि आपली परंपरागत चित्रकला सोडून ‘इंप्रेशनिझ्म’कडे वळले. यामुळे तुर्कस्तानात शतकानुशतके चालत आलेली ‘मिनिएचर पेंटिंग’ची कला लयाला गेली. नव्या विचारांशी परिचय व्हावा, त्यांचा आपल्यावर प्रभाव पडावा यात काही गैर नाही. सत्यजित रेंवर सर्वात मोठा प्रभाव फ्रेंच दिग्दर्शक ज्यां रन्वारचा होता, त्यांच्या संगीतावर रवींद्र संगीताबरोबर मोत्झार्ट, शूबर्ट यांचाही प्रभाव होता. पण या प्रभावाखाली येऊन त्यांनी आपला मूळ वारसा सोडला नाही, उलट त्या गोष्टींना सामावून घेत आपली स्वतंत्र अभिव्यक्ती निर्माण केली. हिंदी चित्रपटातून गाणी हद्दपार करून त्याचं स्वरूप जास्तीत जास्त ‘आदर्श’ सिनेमाच्या जवळ जाईल असं करावं (इथे आदर्शाची व्याख्या वेगवेगळी असेल) असं मत व्यक्त करण्यामागची मानसिकता तुर्कस्तानच्या चित्रकारांसारखी आहे. हिंदी चित्रपटातील गाणी भारतच नव्हे तर इतर अनेक देशात लोकप्रिय आहेत. विक्रम सेठ चीन-तिबेट-नेपाळ-दिल्ली असा पायी प्रवास करत असताना ‘आवारा हूं’ या गाण्याने त्याच्या अनेक अडचणी सोडविल्याचं त्याने नमूद केलं आहे. पण जे जे लोकप्रिय ते ते टुकार असा निकष लावला तर बोलणंच खुंटतं. आवारा रशियात लोकप्रिय झाला ना? त्या फाटक्या लोकांना ब्रेड मिळायची मारामार, त्यांना कला म्हणजे काय हे कुठे कळतं? कलेची व्याख्या बोर्दोचे घुटके घेत लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क इथे ठरवली जाते आणि सगळ्या जगाने त्याच आखून दिलेल्या नियमांमध्ये कलानिर्मिती केली तर ठीक, अन्यथा तुमची जागा त्या, तिथे, तिकडे, पलीकडे, गावकुसाबाहेर. उगीच टोलकिनला नोबेल नाकारतात का? अझिमॉव्ह, आर्थर सी क्लार्क यांचा बुकरसाठी नुसता विचार करणंही अशक्य आहे.

माझा एक इटालियन मित्र आहे. त्याला सर्व इटालियन गोष्टींबद्दल कमालीचा तिटकारा आहे. इटालियन लोक मूर्ख असतात, त्यांना काडीचीही अक्कल नसते असं तो नेहमी म्हणायचा. पोस्टडॉकसाठी तो ऑस्ट्रेलियाला गेला आणि त्याला ती संस्कृती इतकी आवडली की त्याने ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व पत्करलं. नंतर एकदा भेटला तर ऑस्ट्रेलियन ऍक्सेंटमध्ये बोलत होता. तिथे तो सुखी आहे. तात्पर्य – भारतीय चित्रपट, भारतीय संस्कृती सर्व भारतीयांना आवडायलाच पाहिजे असा नियम नाही. पण उगीच तथाकथित उच्चभ्रू ‘हाय-हॉर्स’वर बसून कोट्यवधी लोकांच्या आवडीनिवडीवर ताशेरे न झाडले तर बरं असा आपला एक अनाहूत सल्ला. हे म्हणजे श्रेयसमध्ये जाऊन “तुम्ही अजूनही पोळी आणि भाजी खाता? ऍंड दॅट टू विथ युअर हॅंड्स? यक! यु शुड ट्राय पास्ता कॉन ले सार्दे ऍंड मे बी सम ‘इस्किया बियान्को’. मच क्लासियर, यु नो.” असं सांगण्यासारखं आहे. अर्थात तरीही ताशेरे झाडायची मुभा आहेच कारण शेवटी ही लोकशाही आहे.

—-

१. रेख्ता के एक तुम्ही उस्ताद नही हो गालिब
कहते है अगले जमाने में कोई मीर भी था.

२. खरं तर हे सगळं केलं म्हणजे तथाकथित उच्च कलाकृतींचा आनंद घेता येत नाही हा एक मोठा गैरसमज आहे. सकाळी ‘तुम मुझे यूं भुला न पाओगे’ ऐकल्यानंतर संध्याकाळी मोत्झार्टची सिंफनी ऐकू नये आणि दोन्हीचा तितकाच आनंद मिळू नये असं कुणी सांगितलंय? सारखा काफ्काच वाचला पाहिजे असं नाही, मधून मधून अगाथा ख्रिस्तीचा हरक्युल पायरोही मस्त वाटतो. वुडी ऍलनचा उच्चभ्रू विनोद आवडत असला तर गोविंदा-डेव्हीड धवनचे महान पीजे आवडू नयेत असं कुठे आहे? खरं तर कलाकार त्यांना हवी तशी कलानिर्मिती करत असतात, रसिक त्यांना जे हवं त्याचा आस्वाद घेत असतात. पण काठावर बसलेल्या समीक्षकांना आणि कलेच्या तथाकथित रक्षकांना हे बघवत नाही. मग अमुकमुळे अभिरुची खालावते, अमुकमुळे उंचावते असे निरर्थक नियम लागू होतात.

३. साइनफेल्डच्या एका भागात इलेन ‘न्यूयॉर्कर’च्या हापिसात जाऊन तिथल्या संपादककाकडून कबूल करून घेते की त्याचं ‘न्यूयॉर्कर’मध्ये आलेलं व्यंगचित्र विनोदी तर नाहीच, पण त्याला काही अर्थही नाही.