Categories
बुके वाचिते

एक निष्काम कर्मयोगी : डॉ. हिम्मतराव बावस्कर

नुकतेच डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे ‘बॅरिस्टरचं कार्टं’ हे पुस्तक वाचण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर प्रयत्न आणि जिद्द यांच्या सहाय्याने मात केल्याची ही कथा आत्मचरित्रपर आहे. डॉ. बावस्कर यांचा जन्म देहेडचा. जालना जिल्ह्यात पाचशे लोकवस्ती असलेले हे गाव. आईवडील अशिक्षित. गावात कसलीही व्यवस्था नव्हती. अशा परिस्थितीत जन्मलेल्या मुलाचे भवितव्य काय असा प्रश्न कुणी विचारला असता तर त्याचे फारसे समाधानकारक उत्तर मिळाले नसते.

cover of Marathi book Baristarcha Karta

संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर हिम्मतराव लाकडाच्या टाळावर लाकडे फोडायला जात असत. वीस किलो लाकडे फोडल्यावर चार आणे मिळत असत. याखेरीज शेतामध्ये मजुरी आणि इतर कामे होतीच. आठवी ते दहावी सीताराम मंदिराच्या पुजार्‍यांना सांगून देवळात रहाण्याची व्यवस्था केली. रोज देऊळ झाडून काढणे आणि पुजार्‍यांच्या पुस्तकांच्या दुकानात मदत करणे याच्या बदल्यात देवळाच्या पुजार्‍यांनी शिक्षण आणि जेवणखाण यांचा खर्च करण्याची तयारी दर्शवली.

दहावीनंतर इंटर सायन्स आणि मेडिकल असा प्रवास बर्‍याच अडचणींना तोंड देत देत झाला. फायनल एमबीबीएसमध्ये मेडीसिन विषयात दुसरा क्रमांक आला. मात्र याच वेळी डिप्रेशनमुळे प्रकृती बिघडली. जवळजवळ एक वर्ष गेल्यानंतर हळूहळू प्रकृती सुधारू लागली. एमबीबीएस झाल्यावर बर्‍याच प्रयत्नांनंतर आणि आरोग्यमंत्र्यांपर्यंत ओळखी काढल्यावर निजामपूर, ता. माणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीची ऑर्डर हाती पडली.

खरे तर कुठल्याही कथेत किंवा सिनेमात इथे शेवट व्हायला हरकत नसावी. अंडरडॉगची कथा वेगवेगळ्या प्रकारातून आणि माध्यमांमधून बरेचदा समोर आली आहे. त्यानुसार नायकाला एका विशिष्ट ध्येयाची प्राप्ती झाली की कथा संपते. डॉ. बावस्कर यांची इथपर्यंतची कथा उल्लेखनीय आहेच, पण पुढची कथा याहूनही रोचक आहे.

बिरवाडीमध्ये विंचूदंशाचे प्रमाण भरपूर आहे. त्याकाळात यावर कोणताही उपचार उपलब्ध नसल्याने रुग्ण काही तासात मरण पावत असत. डॉ. बावस्कर यांनी या सर्व केसेसच्या लक्षणे, औषधांचा परिणाम इ. रीतसर नोंदी ठेवायला सुरूवात केली. विंचूदंशामुळे मृत्यू होऊ शकतो यावरच मुंबई-पुणे येथील डॉक्टरांचा विश्वास बसत नसे. नंतर पुणे येथे एम.डी, करत असताना त्यांनी यावरचे संशोधन चालूच ठेवले. पण पुण्यात विंचूदंशाचे रूग्ण फारच कमी म्हणून यासाठी ते शनिवार-रविवार स्कूटरवरून महाड येथे रूग्ण तपासणी करण्यासाठी जात असत. उरलेल्या वेळात जागतिक स्तरावर यावर काय नवीन उपचार दिले जात आहेत याचा लायब्ररीमध्ये बसून सतत पाठपुरावा चालू असे.

अथक प्रयत्नांनंतर अखेर एक दुवा सापडला. सर्व रूग्णांचा मृत्यू रिफ़्रॅक्टरी हार्ट फेल्युअरमुळे होतो आहे असे त्यांच्या लक्षात आले. यावर त्यांनी
सोडीयम नायट्रोप्रुसाइड हे औषध वापरण्याचे ठरवले. हे औषध अतिदक्षता विभागातच लावले जाते. याचे प्रमाण चुकल्यास रक्तदाब अचानक कमी होऊन रूग्ण दगावण्याची शक्यता असते. आठ वर्षाच्या एका मुलाला विंचूदंशामुळे रूग्णालयात आणल्यावर त्याची प्रकृती ढासळू लागली. दुसरा कोणताही उपाय नाही असे दिसल्यावर डॉ. बावस्कर यांनी त्याच्या वडीलांकडे एक नवीन औषध वापरू का असे विचारून परवानगी मागितली. ती मिळाल्यावर पोलादपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणतीही सुविधा नसताना नायट्रोप्रुसाइड वापरण्याचा धाडसी निर्णय डॉ. बावस्कर यांनी घेतला. आयव्हीमधून नायट्रोप्रुसाइड सुरू केल्यावर तीन तासातच मुलाची प्रकृती सुधारू लागली. हृदयाचे ठोके नियमित झाले, रक्तदाब नियमित झाला आणि तो गाढ झोपी गेला.

नंतरच्या काळात नायट्रोप्रुसाइड वापरून डॉ. बावस्कर यांनी दीडशे रूग्ण बरे केले. नंतर नायट्रोप्रुसाइडऐवजी प्राझोसिन हे तोंडाने घेण्याचे औषध याच प्रकारे काम करते असे त्यांना आढळले. विंचूदंशांवर प्राझोसिन रामबाण उपाय आहे हे डॉ. बावस्कर यांच संशोधन ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले. हा अनुभव वाचल्यानंतर हा प्रयोग ब्राझील, स्पेन, जर्मनी, इस्त्रायल इ. देशांमधील डॉक्टरांनी यशस्वीपणे केला. महाराष्ट्र आणि इतर विभागांमध्ये विंचूदंशामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्यांवरून १ टक्क्यावर आले. नंतर सिबा फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय परिषदेचे निमंत्रण आल्यावर डॉ. बावस्कर यांनी लंडन येथे यावर भाषण दिले.

डॉ. बावस्कर यांचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. रूग्णाकडे पैसे नसले तर त्याला उपचारांबरोबर पदरचे पैसेही देणारा हा धन्वंतरी विरळाच. मात्र त्यांच्या लिखाणात कुठेही गर्वाची छटाही आढळत नाही. जे जे घडले ते वाचकांच्या समोर ठेवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आपल्याला बालपणी चांगले संस्कार मिळाले नाहीत. परिणामत: स्वभावात एक कठोरपण आला आणि त्याचे परिणाम भोगावे लागले अशी कबुलीही ते प्रांजळपणे देतात.

कथेमध्ये मूल्याधिष्ठीत आयुष्याचा विजय ही कदाचित साहित्यिक दृष्टीकोनातून जमेची बाब नसावी. डिकन्ससारख्या लेखकांबाबत हा आक्षेप बरेचदा घेतला जातो. पण साहित्य आयुष्याचे प्रतिबिंब मानले तर डॉ. बावस्कर यांच्यासारख्या कर्मयोग्यांच्या आयुष्याचे चित्रण इतर कोणत्याही रीतीने करणे कसे शक्य आहे? आणि केले तर ते वास्तवतेला धरून असेल का?

२०२२ : डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन​.