हिग्ज वि. बोस

हिग्ज बोसॉन सापडल्याची बातमी आल्यावर भारतीय मिडीयाने वेगळाच सूर लावला. आधी ट्याब्लॉइड ऑफ इंडियात ही बातमी वाचली पण त्याचा आणि आमचा संबंध फक्त कधीतरी भेळ खाताना येत असल्यामुळे ते फारसे गंभीरपणे घेतले नाही. पण हिंदूसारख्या बर्‍यापैकी समतोल वृत्तपत्राने यावर चक्क संपादकीय काढावे म्हणजे फार झाले. मुद्दा काय तर हिग्ज बोसॉनचे श्रेय सत्येंद्रनाथ बोस यांना मिळाले नाही. प्रसंग काय, आपण बोलतोय काय? कुणाचं काय तर कुणाचं काय!

१९२४ मध्ये सत्येंद्रनाथ बोस यांनी आइनस्टाइला पत्र पाठवून आपल्या नव्या सांख्यिकीबद्दल कळवले. जगात दोन प्रकारचे मूलभूत कण असतात. पैकी इलेक्ट्रॉनसारखे कण एका प्रकारे वागतात तर फोटॉनसारखे कण दुसर्‍या प्रकारे. इलेक्ट्रॉन कसे वागतील हे इटालियन शास्त्रज्ञ एनरिको फर्मी याने शोधून काढले. या सांख्यिकीला फर्मी स्टॅटीटिक्स असे म्हणतात आणि या सांख्यिकीप्रमाणे वागणार्‍या कणांना फर्मियॉन म्हणतात. बोस यांनी मांडलेली सांख्यिकी फोटॉनसारख्या कणांना लागू पडते. या सांख्यिकीला बोस-आइनस्टाइन स्टॅटीटिक्स असे म्हणतात आणि या कणांना बोसॉन. बोसॉन हा एक कण नसून ते कणांच्या वर्गीकरणाचे नाव आहे.

विश्वामध्ये फक्त प्रोटॉन, इलेक्ट्रॉन असते तर आयुष्य फार सोपं झालं असतं. पण यांच्या व्यतिरिक्त क्वार्क, न्यूट्रिनो, म्युऑन्स असे अनेक कण अस्तित्वात आहेत असं लक्षात आलं. जसजसे नवीन कण सापडायला लागले तसतसे प्रश्न वाढत गेले. इलेक्ट्रॉनला आकार नसतो तरीही वस्तुमान असतं, फोटॉनला वस्तुमानच नसतं. या सगळ्या कणांचं अस्तित्व, त्यांचे गुणधर्म मांडता येतील अशा एका थिअरीची गरज होती. (थिअरी म्हणजे सिद्धांत की उपपत्ती?) १९६७ मध्ये ग्लाशॉ, सलाम आणि वाइनबर्ग यांनी स्टॅंडर्ड मॉडेलच्या रूपात ही थिअरी मांडली. या थिअरीचा एक महत्वाचा भाग होता ब्रिटीश शास्त्रज्ञ पीटर हिग्ज आणि सहकार्‍यांनी मांडलेले हिग्ज मेकॅनिझ्म. या सगळ्या कणांचे वस्तुमान वेगवेगळे का असते याचे उत्तर हिग्ज यांनी दिले.

ज्याप्रमाणे आपल्या अवतीभोवती हवा आहे पण ती आपल्याला दिसत नाही तसेच आपल्याभोवती एक फिल्ड आहे – हिग्ज फिल्ड. हे दिसत नाहीच, शिवाय जाणवतही नाही. पण या अतिसूक्ष्म कणांना मात्र हे फिल्ड जाणवतं. काही कण यातून बुंगाट वेगाने जातात तर काही बैलगाडीच्या वेगाने. जे वेगाने जातात त्यांच वस्तुमान कमी किंवा शून्य असतं, हे हळू जातात त्यांचं वस्तुमान अधिक. सुरूवातीला हा फक्त सिद्धांत होता. पण वस्तुस्थिती अशीच आहे हे कसं ठरवायचं? या थिअरीनं असाही सिद्धांत मांडला की जर हिग्ज फिल्ड खरोखरच अस्तित्वात असेल तर त्याला अनुरूप असा हिग्ज बोसॉनही अस्तित्वात असायला हवा. ठीकै, पण हा शोधायचा कसा? इथे एक मोठ्ठी अडचण आली जी सोडवायला पंचवीस-तीस वर्षे लागली. हिग्ज बोसॉन कोणत्या उर्जेला सापडू शकेल हे ही थिअरीनं सांगितलं होत पण ही उर्जा इतकी प्रचंड होती की त्यावेळच्या प्रयोगशाळेत असे प्रयोग करणं शक्य नव्हतं. यासाठी अवाढव्य LHC ची निर्मिती करण्यात आली. जगभरातील शास्त्रज्ञांचा यात सहभाग होता. अथक परिश्रमांनंतर एका विशिष्ट उर्जेला हिग्ज बोसॉनसदृश कण सापडला. (बाय द वे, हा रिझल्ट ‘रॉक सॉलीड’ आहे. एक तर दोन वेगवेगळे ग्रूप एकाच निष्कर्षाला पोचले आहेत आणि यातील कॉन्फिडन्स लेव्हल पाच सिग्मा म्हणजे ९९.९९९ % आहे.)

हिग्ज बोसॉन सापडला याचं मुख्य श्रेय पीटर हिग्ज आणि प्रयोग करणारे सर्व शास्त्रज्ञ यांचं आहे. सत्येंद्रनाथ बोस यांनी केलेलं काम मूलभूत होतं याविषयी शंका नाही पण बोसांचं काम आणि हिग्ज बोसॉन सापडणं यामध्ये इतका प्रवास झाला आहे की याचा संबंध सरळ बोस यांच्याशी जोडणं बालिश वाटतं. उदा. विमानाचा शोध राइट बंधूंनी लावला. मानवी इतिहासातील ही एक ऐतिहासिक घटना होती. पण आज कुणी नवीन सुपरसॉनिक जेट विमान तयार केलं तर यात राइट बंधूंचा सहभाग किती असेल?

ब्याक टू हिंदू. हे संपादकीय म्हणजे सगळा विनोदच आहे. एक तर लेखक अमित चौधरी ‘कंटेंपररी लिटरेचर’ – तुलनात्मक साहित्य या विषयाचे प्राध्यापक आहेत. ‘पोस्ट-कलोनियल क्रिटीसिझ्म’ हा त्यांच्या आवडीचा विषय असावा असा अंदाज आहे कारण या गोष्टीकडे ते याच चष्म्यातून बघत आहेत. साहित्याला जी फूटपट्टी लागू पडते ती विज्ञानाला लागू पडेलच असे नाही. त्यांच एक वाक्य आहे, ‘रामन हे नोबेल मिळालेले शेवटचे भारतीय शास्त्रज्ञ होते.’ यात चूक कुणाची? नोबेल कमिटिची की भारतिय शास्त्रज्ञांची?’ नोबेल मिळावं असं काम रामन यांच्यानंतर किती शास्त्रज्ञांनी केलं आहे?

सर्वात महत्वाचे बोस यांच्यावर अन्याय झालेला नाही. तसे असते तर या कणांना बोसॉन असे नाव दिलेच नसते. बोस-आइनस्टाइन सांख्यिकीमुळे पदार्थाची एक नवीन अवस्था सापडली. तिला देखील ‘बोस-आइनस्टाइन कंडेन्सेट’ असे नाव देण्यात आले. हा शोध पीटर हिग्ज, त्यांचे सहकारी आणि जगभरातील असंख्य शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांच्या अथक परिश्रमाचे श्रेय आहे. हिंदूच नव्हे तर जवळजवळ सर्व वृत्तपत्रांमध्ये बातमीबरोबर बोस यांचे चित्र आणि त्यांचे योगदान होते. याची बातमी देताना तिथे बोस यांचे चित्र देऊन या सर्वांवर आपण अन्याय करत आहोत त्याचे काय?

ही मनोवृत्ती वाटते तितकी सोपी नाही. कोणतीही महत्वाची घटना घडली की त्या घटनेमध्ये भारतीय कनेक्शन शोधायचे हा आपल्या वृत्तपत्रांचा आवडता छंद आहे. सुनीता विलियम्स आकाशात गेली – भारतीयांना अभिमान वाटला, नायपॉलना नोबेल मिळाले – परत अभिमान. हे लोक भारतीय नागरिक नाहीत, त्यांचा आणि भारताचा संबंध तितका घनिष्ट नाही अशा क्षुल्लक बाबी इथे लक्षात घ्यायच्या नसतात. आपण न केलेल्या कामाशी संबंध जोडून त्याचे श्रेय मिळवणे ही मनोवृत्ती चीप आहे. तुम्हाला भारतीयांच्या प्रगतीचा खरंच अभिमान वाटतो ना? मग आनंद-गेलफांड स्पर्धेला मुख्य पानावर प्रसिद्धी का देत नाही? आनंद जिंकल्यावरही त्याच्या घेतलेल्या मुलाखती म्हणजे हाइट होती. सागरिकाने त्याला विचारलं, ‘तुला भारतरत्न मिळायला हवं असं वाटतं का?’ हा प्रश्न म्हणजे ‘तू बायकोला मारणं थांबवलं का?’ अशा प्रकारचा आहे. हो म्हटलं तरी पंचाईत आणि नाही म्हटलं तरी पंचाईत. पुढचा प्रश्न, ‘सचिनला तुझ्यापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळते आहे असं वाटतं का?’ तो बिचारा अथक परिश्रम करून जिंकला आहे, निदान त्याला तरी तुमच्या नेहेमीच्या गॉसिपच्या बातम्याम्मधून सवलत द्यावी.

असा बादरायण संबंध जोडून श्रेय मिळवण्यापेक्षा रहमान​सारखं खणखणीत श्रेय मिळवा की! इथे पीटर हिग्ज यांचं उदाहरण घेण्यासारखं आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांना बोलायची विनंती केल्यावर त्यांनी ‘ही माझ्या बोलण्याची वेळ नाही’ असं सांगून ‘लाइमलाइट’मध्ये येण्यास नम्र नकार दिला.

—-

१. याचे इंग्रजीतील स्पेलिंग Boson असे आहे मात्र याचा उच्चार स आणि झ याच्या मध्ये कुठेतरी होतो. मग मराठीत पंचाईत होते. बोसॉन लिहायचे की बोझॉन? आधीच्या भागात बोझॉन लिहीले होते, आता बोसॉन.