… आणि हॅरी पॉटर मेला.

शेक्सपियर किंवा तुकाराम यांनी भाषेला भरपूर दिले, समृद्ध केले पण हे करताना त्यांचा हेतू भाषा सुधारणे हा नव्हता. त्यांनी भाषा हे संवादाचे एक माध्यम आहे हे जाणले आणि त्यात गरज पडली तसे बदल केले. ते करण्याची प्रतिभा त्यांच्याकडे होती.

पुस्तकांच्या दुकानात हॅरी पॉटरचा मराठी अनुवाद दिसला, उत्सुकतेने चाळायला घेतला आणि “जमीन फटने लगी, आसमान टूट पडा और हमारी आंखों के आगे अंधेरा छाने लगा.” असे व्हायचे कारण म्हणजे पुस्तक चाळताना आम्ही जे पान उघडले त्या पानावर नेमका हॅरी आणि व्होल्डेमॉर्ट यांच्यातील अंतिम सामना होता. व्होल्डेमॉर्ट हॅरीवर नेम धरतो आणि ओरडतो, “मृत्युदंश!”

मृत्युदंश?मृत्युदंश?? हॅरीला त्याच्या आईच्या प्रेमाने संरक्षण दिले होते, पण त्याने जर हा शाप ऐकला असता तर बिचारा जागीच हाय खाऊन आईला भेटायला गेला असता. मृत्युदंश?

अनुवाद करणारा किंवा करणारी यांच्यावरची जबाबदारी फार महत्वाची आणि नाजुक असते. मूळ कथेतील गाभ्याला कोणताही धक्का न लागू देता, त्या कथेतील संवाद आणि वर्णन आपल्या भाषेत आणायचे असते. इथे प्रत्येक तपशिलाचे रूपांतर करायचे किंवा नाही हा निर्णय क्रिकेटमधील नो बॉलप्रमाणे असतो. पाय थोडा पुढे गेला तर चालून जाते पण अर्ध्याहून अधिक पुढे गेला तर चालत नाही. मृत्युदंश हा सरळसरळ नो बॉल आहे.

हॅरी राहतो लंडनमध्ये, बोलतो इंग्रजी आणि शाप देताना मात्र त्याच्या तोंडून संस्कृत शापवाणी बाहेर पडते? हे काय लॉजिक आहे? हॅरी पॉटरमधील मंत्र हे त्या कथानाकाचे अविभाज्य भाग आहेत. ते बदलणार असाल तर मग पुढे जाऊन हॅरी पॉटरचे हरी पाठक करा, त्याला मुंबईत आणा, दादरच्या शाळेत घाला (अभिनव जादूविद्यालय?), व्होल्डेमॉर्टचे विक्राळ विंचू (छकुला..छकुला..छकुला!) करा, त्याला धारावीमध्ये टाका. वाटच लावायची आहे तर सगळीच लावून टाका.

मृत्युदंश हे ज्याचे रूपांतर आहे तो मूळ शाप अव्हादा केदाव्रा (Avada Kedavra) असा आहे. याचे मूळ आरेमैक भाषेत आहे. हॅरी पॉटरमधील मंत्रांची यादी बघितली तर रिड्डीक्युलस हा एकमेव मंत्र इंग्रजीमध्ये आहे. बाकी बहुतेक सर्व मंत्र लॅटीन किंवा इटालियन भाषांमधून घेतलेले आहेत. फिनिते इनकंटाटम, इंपेडिमेंटा, प्रोतेगो, एक्सपेलियार्मस. रोलिंगबाईंनी असे का बरे केले असेल? त्यांना इंग्रजी भाषेत मंत्र तयार करणे अवघड होते का?

रोलिंगबाईंनी असे केले याचे कारण त्यांची विविध भाषांची जाण सखोल आहे.

इंडो-युरोपियन भाषांमध्ये लॅटीनमधून आलेल्या रोमान्स भाषा (इटालियन, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीझ, रोमानियन आणि कातालान या मुख्य भाषा) आणि जर्मेनिक भाषा (इंग्रजी, जर्मन, स्विडीश, डॅनिश) असे दोन प्रमुख गट पडतात. या दोन गटात अनेक फरक आहेत, त्यातील एक महत्वाचा फरक म्हणजे रोमान्स भाषा, विशेषत: इटालियनमध्ये प्रत्येक शब्दात स्वरांची रेलचेल आहे. ‘के सरा सरा’ गाताना स्वर कितीही वेळ लांबवता येतो. ऑपेराचा जन्म इटलीमध्ये झाला हा अपघात नव्हता, त्याला इटालियन भाषेचा मधुर स्वभाव कारणीभूत होता. याउलट जर्मनसारख्या भाषेत व्यंजनांचा सुळसुळाट आणि तीही इंग्रजीत ज्याला ‘हार्ड’ म्हणतात तशी कठीण व्यंजने. यामुळे जर्मन भाषेत स्वर लांबवता येणे शक्यच नाही, ही खटक्यांची भाषा आहे. परिणामत: जेव्हा जर्मन लोकांनी इटालियन ऑपेरा आपल्या मातृभाषेत नेला तेव्हा त्यांना ते करताना मूलभूत बदल करावे लागले. इटालियन ऑपेरा गाणी आणि गायक यांच्यावर विसंबून असतो, जर्मन ऑपेरामध्ये ते शक्य नव्हते म्हणून वाद्यवृंदाला अधिक महत्व प्राप्त झाले. मोझार्ट आणि वॅग्नर यांच्या ऑपेरांमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे त्याचे मूळ या दोन भाषांच्या वेगळ्या स्वभावामध्ये आहे.

जर्मन लोकांनी इटालियन ऑपेराची नक्कल करून त्यांच्या ऑपेरात तसेच गायचे ठरवले असते तर काय झाले असते? त्यांचा मृत्युदंश झाला असता. अव्हादा केदाव्रा या दोन्ही शब्दांचा शेवट आ मध्ये होतो. म्हणून व्होल्डेमॉर्ट ‘अव्हादाsssss केदाव्राsssss’ असे ओरडतो तेव्हा त्याला शेवटचा आ कितीही वेळ लांबवता येतो. ज्याच्यावर कोणताही उपाय नाही असा शाप म्हणायची पद्धतही तितकीच प्रभावी असायला हवी. असे ‘मृत्युदंश’मध्ये करून बघा करता येते का? एकतर या शब्दामध्ये कठीण व्यंजने आहेत, स्वरांचा पत्ता नाही आणि शेवटचा श संपला की पुढे काही नाही. हा शाप न वाटता रेलवे स्टेशनवर ‘दोन दादर’ असे म्हटल्यासारखे वाटते. इतर शापांची काय वाट लावली आहे हे बघण्याचे धैर्य झाले नाही हे इथे नमूद करावेसे वाटते.

नवीन शब्द शोधताना संस्कृतकडे धावणे या अगम्य सवयीची परिणिती मृत्युदंशमध्ये झाली आहे. आपली भाषा म्हणजे २४ क्यारट सोन्यासारखी शुद्ध, त्यात परकीय शब्द म्हणजे भेसळ असे समज जोपर्यंत कायम आहेत तोपर्यंत असेच होत रहाणार. खरे तर संपूर्णपणे लोकशाही पद्धतीने चालणार्‍या ज्या काही थोड्या पद्धती अस्तित्वात आहेत त्यात भाषा येतात. मारून मुटकून भाषेचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे एकही उदाहरण इतिहासात नाही. १९८४ सारखे ‘थॉट पोलिस’ असतील तर गोष्ट वेगळी पण प्रत्यक्षात असेही प्रयत्न टिकत नाहीत हे १९९१ मध्ये दिसलेच.

शेक्सपियर किंवा तुकाराम यांनी भाषेला भरपूर दिले, समृद्ध केले पण हे करताना त्यांचा हेतू भाषा सुधारणे हा नव्हता. त्यांनी भाषा हे संवादाचे एक माध्यम आहे हे जाणले आणि त्यात गरज पडली तसे बदल केले. ते करण्याची प्रतिभा त्यांच्याकडे होती. एका भाषेतील शब्दा-शब्दामागे त्या समाजाचे आर्थिक, सामाजिक, नैतिक संचित उभे असते. लोकांमुळे भाषा घडते, हस्तिदंती मनोर्‍यात बसून तिचे स्वरूप कसे असावे हे ठरवणारे पंडित भाषेचे स्वरूप ठरवत नाहीत, ठरवू शकत नाहीत. म्हणूनच प्रत्येक भाषेच्या व्याकरणाच्या नियमांमध्ये अपवादच जास्त असतात. ‘यू वॉज’ न होता ‘यू वेअर’ होते. लोक जशी भाषा वापरतात तसे व्याकरणाला बदलावे लागते आणि यामुळेच प्रत्येक भाषेला तिचा स्वभाव येतो. नाहीतर कोबोलपासून जावापर्यंत दिले ते काम चोख करणार्‍या भाषा आहेतच की. पण त्या भाषांमध्ये ‘जब कि तुझ बिन कोई नही मौजूद, फिर ये हंगामा ऐ खुदा क्या है?’ लिहीता येईल का? भाषा प्रवाही असते. नायगाराला (किंवा तेवढेही परकीय उदाहरण नको असेल तर गंगा) बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला तर बांध फोडून तो कुठूनही बाहेर पडतो.

हॅरी पॉटर कधी मेला या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘मृत्युदंश ऐकल्यावर.’

—-

तळटीपा

[१] गेल्या हजार वर्षात इंग्रजी भाषेचे स्वरूप किती बदलले याचे उदाहरण रोचक आहे. हजार वर्षात परकीय शब्द, व्याकरण यांचा अर्थ किती संकुचित होतो हे इथे दिसते.

1000 AD:

Wé cildra biddaþ þé, éalá láréow, þæt þú taéce ús sprecan rihte, forþám ungelaérede wé sindon, and gewæmmodlíce we sprecaþ…

2000 AD:

We children beg you, teacher, that you should teach us to speak correctly, because we are ignorant and we speak corruptly…