तापमानवाढीचा भस्मासुर

‘ग्लोबल वॉर्मिंग’ हा शब्द ऐकला की बहुतेक लोकांची प्रतिक्रिया ‘बस्स, आता पुरे’ अशी असते. यात दोष त्यांचा आहे असंही म्हणता येणार नाही. मीडियामध्ये रोज ज्या उलट-सुलट आणि बहुतेक वेळा आक्रस्ताळी स्वरूपाच्या बातम्या येत असतात (याची परमावधी बहुधा तथाकथित ‘क्लायमेटगेट’च्या वेळी झाली असावी.) त्यामुळे नेमका प्रश्न काय आहे, त्यामागचे शास्त्रीय, सामाजिक आणि राजकीय घटक कोणते आहेत…

‘ग्लोबल वॉर्मिंग’ हा शब्द ऐकला की बहुतेक लोकांची प्रतिक्रिया ‘बस्स, आता पुरे’ अशी असते. यात दोष त्यांचा आहे असंही म्हणता येणार नाही. मीडियामध्ये रोज ज्या उलट-सुलट आणि बहुतेक वेळा आक्रस्ताळी स्वरूपाच्या बातम्या येत असतात (याची परमावधी बहुधा तथाकथित ‘क्लायमेटगेट’च्या वेळी झाली असावी.) त्यामुळे नेमका प्रश्न काय आहे, त्यामागचे शास्त्रीय, सामाजिक आणि राजकीय घटक कोणते आहेत आणि उपाययोजना करण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत यासारखे महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहतात. या अनुषंगाने नुकतेच मायकेल मॅन यांचे ‘द हॉकी स्टीक ऍंड द क्लायमेट वॉर्स’ हे पुस्तक वाचनात आले. मॅन हे हवामानशास्त्रातील एक नावाजलेले शास्त्रज्ञ आहेत. नव्वदच्या दशकात त्यांनी केलेल्या संशोधनामुळे हवामानशास्त्रामध्ये क्रांतिकारी बदल झाले. पुस्तकात मॅन या संशोधनाबद्दल बोलतातच, शिवाय या अनुषंगाने गेल्या दशकातील हवामानशास्त्राची वाटचाल आणि आलेले अडथळे यांची विस्तृत माहिती देतात. पुस्तकातील शास्त्रीय भाग तांत्रिक तपशिलांसह दिलेला आहे त्यामुळे वैज्ञानिक संशोधन आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या ‘प्रिंसिपल कॉम्पोनंट ऍनालिसिस’सारख्या संख्याशास्त्रातील पद्धती यांची ओळख नसणाऱ्या वाचकांना हा भाग जड जाऊ शकतो. मात्र उरलेल्या भागातील हवामानशात्रात गेल्या दशकात झालेल्या ‘युद्धांची’ कहाणी निश्चितच रोचक आणि माहितीपूर्ण आहे.

Book cover for The Hockey Stick and The Climate Wars

१९९५ साली आयपीसीसीचा दुसरा अहवाल तयार करण्याचे काम चालू असताना “The balance of evidence suggests that there is appreciable human influence on climate.” या वाक्यावर दोन दिवस वादविवाद आणि चर्चा चालू होत्या. सौदी अरेबियाच्या प्रतिनिधीला ‘appreciable’ या शब्दावर आक्षेप होता आणि शास्त्रज्ञ वाक्य बदलण्यास तयार नव्हते. अखेर त्या जागी ‘discernible’ हा शब्द घालून दोन्ही गटांमध्ये तडजोड करण्यात आली. या वेळी मॅन यांची हवामानशास्त्रामध्ये पीएचडी चालू होती. त्या काळात जागतिक तापमानाचे गेल्या शंभरएक वर्षांची मोजमापे उपलब्ध होती. तसेच हवामानशास्त्रामध्ये ‘मॉडेलिंग’ वापरण्याचे तंत्र नासाचे जेम्स हॅन्सेन यांनी नुकतेच विकसित केले होते. या मॉडेलच्या आधारे केलेली भाकिते आणि प्रत्यक्षातील तापमानवाढ यांची तुलना केल्यावर मॉडेल बरोबर असल्याचे सिद्ध झाले. यात महत्त्वाचा मुद्दा असा की ‘मॉडेलिंग’मध्ये फक्त नैसर्गिक पद्धतीने तापमान वाढवणारे घटक लक्षात घेतले तर उत्तर चुकत होते. मात्र मानवनिर्मित घटक – कार्बनडायऑक्साइडची वाढ आणि औद्योगिक उत्पादनांमधून निर्माण होणारे ‘एरोसोल्स’ – या घटकांचा विचार केला तर उत्तर बरोबर येत होते. या संशोधनाच्या आधारे आयपीसीसीने तापमानवाढ मानवनिर्मित आहे असा निष्कर्ष काढला होता.

औद्योगिक क्रांतीच्या आधी पृथ्वीच्या वातावरणातील कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण २८० पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) होते. २०११ साली हे प्रमाण ३९० पीपीएम झाले.

गेल्या शंभर वर्षांचे तापमान याहून ठोस निष्कर्ष काढण्यास पुरेसे नव्हते. पीएचडीनंतर पुढील संशोधनासाठी मॅन यांनी याआधीचे तापमान कसे होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी झाडांच्या खोडामध्ये सापडणारी वर्तुळे (tree rings), बर्फाचा गाभा (ice core), तळी आणि समुद्र येथे सापडणारे गाळाचे खडक यासारख्या विविध घटकांचा उपयोग केला. या सर्व घटकांवरून प्राचीन काळातील पृथ्वीचे तापमान किती होते याचा अंदाज येतो. प्रत्येक घटकासाठी तापमान मोजण्याची पद्धत वेगळी असते. उदा. बर्फाच्या गाभ्यातील १६O आणि १८O या ऑक्सिजनच्या आयसोटोपचे प्रमाण मोजले तर तो बर्फ तयार होत असतानाचे तापमान कळू शकते. किंवा झाडाच्या खोडातील वर्तुळांच्या जाडीवरून आणि घनतेवरूनही ही माहिती मिळते. हा सर्व डेटा वापरून १९९८ साली मॅन यांनी इ.स. १४०० पासून इ.स. १९९७ पर्यंतचा तापमानाचा आलेख नेचर या मासिकात प्रसिद्ध केला. १९९९ मध्ये या आलेखाचा काळ आणखी चारशे वर्षे मागे नेऊन गेल्या हजार वर्षांच्या तापमानाचा आलेख त्यांनी प्रसिद्ध केला. हा आलेख नंतरच्या काळात ‘हॉकी स्टीक’ या नावाने ओळखला गेला. हॉकी स्टीक आडवी ठेवली तर तिचा टोकापर्यंतचा भाग एका रेषेत असतो आणि शेवटच्या अर्धवर्तुळाकार भागात अचानक चढ येतो. गेल्या काही दशकात तापमानात जी वाढ झाली आहे ती या चढाच्या रूपाने दिसते. या संशोधनाला मिडियामध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळाली. २००१ साली आयपीसीसीने तिसरा अहवाल तयार करताना ‘हॉकी स्टीक’ची विशेष दखल घेतली. बिल क्लिंटन यांनी २००० च्या ‘स्टेट ऑफ युनियन’ ऍड्रेसमध्ये या संशोधनाचा उल्लेख केला.

तापमानवाढ होते आहे आणि त्याची प्रमुख कारणे मानवनिर्मित आहेत हे २००१ पर्यंत सिद्ध झाले होते. यानंतरच्या दशकात याला पुष्टी देणारे वेगवेगळे पुरावे मिळत राहिले. याचे संदर्भ पुस्तकात येत राहतात पण त्याचबरोबर आपण विज्ञानाचे क्षेत्र सोडून राजकीय आणि औद्योगिक हितसंबंधांच्या गढूळ वातावरणात प्रवेश करतो. इथे गेल्या दशकातील अमेरिकेच्या राजकारणात झालेल्या काही घडामोडी जाणून घेणे आवश्यक आहे. २००१ मध्ये बुश प्रशासनाने ‘डेटा क्वालिटी ऍक्ट’ पास केला. सरकारी संस्थांनी औद्योगिक क्षेत्राला माहिती कशी पुरवावी या संदर्भात त्यांच्यावर अनेक बंधने घालण्यात आली. या ऍक्टमुळे औद्योगिक क्षेत्राला शास्त्रीय संस्थांवर वर्चस्व गाजविण्यासाठी आयते हत्यार मिळाले. बुश यांनी ग्रीनहाउस वायूंचे उत्पादन आटोक्यात ठेवणाऱ्या क्योटो प्रोटोकॉलवर सही करण्यास नकार दिला. उपराष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांनी नवीन ऊर्जा धोरण बनवण्यासाठी ‘एनर्जी टास्क फोर्स’ची स्थापना केली. या समितीचे सदस्य कोण आहेत हे गुप्त ठेवण्यात आले होते पण वॉशिंग्टन पोस्टमध्ये ही यादी छापून आल्यावर समितीचे खरे स्वरूप उघड झाले. सदस्यांमध्ये एक्झॉन मोबाइलचे व्हीपी जेम्स राउझ आणि एनरॉनचे प्रमुख केनेथ ले यांचा समावेश होता. (ले यांना नंतर फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.) इतर सदस्यांमध्ये देशातील खाणी, इलेक्ट्रिकल युटिलीटिज, पेट्रोल आणि इतर इंधने या क्षेत्रांमध्ये काम करणारे लोक होते. यापैकी बहुतेक कंपन्यांनी निवडणुका चालू असताना बुश यांना भरघोस निधी दिला होता. बुश यांनी ‘व्हाइट हाउस कंट्रोल फॉर एनव्हायर्नमेंटल क्वालिटी’ साठी फिलिप कूनी यांची चीफ ऑफ स्टाफ म्हणून निवड केली. क्लिंटन प्रशासनाने हवामानबदलाचे धोके आणि उपाययोजना यावर ‘नॅशनल असेसमेंट’ नावाचा अहवाल तयार केला होता. कूनी यांनी डेटा क्वालिटी ऍक्टान्वये हा अहवाल रद्द करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी प्रशासनालाच कोर्टात खेचण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. नंतर कूनी यांनी या अहवालात बरेच अनधिकृत बदल केल्याचे उघडकीला आले, या बदलांमध्ये तापमानवाढीचे धोके तितके तीव्र नाहीत हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. शास्त्रज्ञांच्या संशोधन करून केलेल्या अहवालावर स्वत:चे शेरे मारणे, नको असलेले निष्कर्ष गाळणे असे कूनी यांनी केलेले अनेक बदल न्यूयॉर्क टाईम्सने उघडकीला आणल्यावर अखेर कूनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अर्थात त्यांना लगेच एक्झ्झॉनमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली.

धमक्या, दंडुकेशाही

दरम्यान ‘हॉकी स्टीक’ ग्राफ आणि आयपीसीसी यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले. आयपीसीसीच्या मागे संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘न्यू वर्ल्ड ऑर्डर’ प्रस्थापित करण्याचा गुप्त हेतू आहे यासारख्या अफवा रोचक होत्या पण त्यात काही दम नव्हता. २००१ मध्ये खुद्द बुश यांनी अमेरिकेच्या ‘नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’ (NAS) या प्रतिष्ठित संस्थेला आयपीसीसीचे निष्कर्ष तपासून बघण्याची सूचना केली. नॅसने सर्व निष्कर्ष तपासून बघितल्यानंतर त्यात काहीही चूक नाही असा निर्वाळा दिला. शिवाय इंग्लंडच्या रॉयल अकॅडमीबरोबर जगातील इतर मान्यवर संस्थांनीही याला पाठिंबा व्यक्त केला.

२००३ साली सून आणि बाल्युनास नावाच्या दोन शास्त्रज्ञांनी दोन निबंध प्रसिद्ध केले. एक ‘क्लायमेट रिसर्च’ मध्ये, आणि दुसरा ‘एनर्जी ऍंड एनव्हायर्नमेंट’ मध्ये. दोन्ही निबंध जवळजवळ सारखे होते आणि खरे तर असा प्रकार सहसा होऊ दिला जात नाही. पण हा मुद्दा गौण होता. ‘एनर्जी ऍंड एनव्हायर्नमेंट’ हे नाव जरी भारदस्त असलं तरी हे मासिक ‘इन्स्टीट्यूट फॉर साएंटीफिक इन्फॉर्मेशन’च्या यादीत नव्हते त्यामुळे या मासिकाला संशोधनाच्या वर्तुळात फारशी किंमत नाही कारण इथे निबंध प्रसिद्ध करण्यासाठी नेहमीची ‘रिव्ह्यू प्रोसेस’ वापरली जात नाही. तापमानवाढीचा निष्कर्ष खोटा आहे असा सून यांच्या निबंधाचा दावा होता. यथावकाश या निबंधात इतक्या चुका निघाल्या की हा परीक्षकांनी पास कसा केला असा प्रश्न पडावा.

Climate change is “the single greatest hoax ever perpetrated on the American public,” २००५ मध्ये रिपब्लिकन सिनेटर जेम्स इन्होफे यांनी सिनेटच्या व्यासपीठावर बोलताना या शब्दात तापमानवाढीचे वर्णन केले. कूनी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी इन्होफे आले होते. सून आणि बाल्युनास यांचा निबंध प्रकाशित झाल्यानंतर इन्होफे यांनी हवामानबदलाच्या संपूर्ण शास्त्रावरच शंका घेऊन एका शोधसमितीची स्थापना केली. समितीमध्ये हिलरी क्लिंटन यांचाही समावेश होता. समितीच्या बैठकीमध्ये सून आणि बाल्युनासबरोबर मॅन यांची साक्षही घेण्यात आली. मात्र समितीचे कामकाज चालू असतानाच क्लायमेट रिसर्च मासिकाचे संपादक हॅन्स स्टॉर्च यांनी इतका भिकार निबंध छापल्याच्या निषेधार्थ राजीनामा दिल्याची बातमी आली. या पाठोपाठ मासिकाच्या संपादन मंडळातील सहा सदस्यांनी राजीनामा दिला. समिती काहीही सिद्ध करू शकली नाही.

हे संपतंय तोपर्यंत परत ‘एनर्जी ऍंड एनव्हायर्नमेंट’ मध्ये मॅकिंटायर आणि मॅककिट्रिक यांचा आणखी एक निबंध आला. गंमत म्हणजे मॅककिट्रिक आहे अर्थशास्त्रज्ञ. मॅकिंटायर क्लायमेटऑडीट नावाचा ब्लॉग चालवतो. त्याला हवामानशास्त्राचा काडीचाही अनुभव नाही. निबंधात अर्थातच तेच रडगाणं परत. हॉकी स्टीक ‘आर्टिफॅक्ट’ आहे. यातही त्यांची चूक लगेच सापडली, मॅन यांचा पंधराव्या-सोळाव्या शतकातील जवळजवळ दोन तृतियांश डेटा या महाशयांनी चक्क गाळला होता. पण चूक सापडेपर्यंत मिडियाने याचे भांडवल केले. सिनेटमध्ये हवामानबदलावर एक महत्त्वाचे मतदान येऊ घातले होते त्याच्या आधी विरोधकांनी याचा पुरेपूर फायदा उठवला. ‘यूएसए टूडे’ मध्ये यावर लेखही आला. त्यात मॅन यांनी त्यांचा डेटा उपलब्ध केला नाही असा बिनबुडाचा आरोपही करण्यात आला. (याबद्दल माफी मागितली पण ती दोन आठवडे उलटल्यावर.) मॅकिंटायर आणि मॅककिट्रिक यांनी आपली चूक मान्य केली पण २००५ मध्ये त्यांनी ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ला कॉमेंट पाठवली आणि त्यात हॉकी स्टीक मॅन यांनी वापरलेल्या सांख्यिकी पद्धतीमुळे आलेला आर्टेफॅक्ट आहे असे म्हटले होते. ही कॉमेंट प्रसिद्ध झाली. यावेळीही मॅन आणि सहकाऱ्यांनी मॅकिंटायर आणि मॅककिट्रिक यांची चूक कुठे झाली आहे ते दाखवून दिले. शिवाय जगभरातील इतर शास्त्रज्ञांनीही याला दुजोरा दिला.

एव्हाना हवामानशास्त्रज्ञांच्या एक गोष्ट लक्षात आली होती. हे जे काही चालले होते ते वैज्ञानिक क्षेत्रापलिकडचे होते आणि यात मिडियाचा महत्त्वाचा वाटा होता. तापमानवाढ खोटी आहे असा एखादा निबंध प्रसिद्ध झाला की मिडियामध्ये लगेच त्याला अतोनात प्रसिद्धी मिळत असे. नंतर त्यातील चूक सापडली तर ते मात्र सोईस्करपणे दुर्लक्षित केले जात असे. यामुळे सामान्य लोकांचा तापमानवाढ म्हणजे काहीतरी संशयास्पद आहे असा समज झाला होता. (आणि अजूनही तो बऱ्यापैकी कायम आहे.) मीडियामध्ये जर असे काही प्रसिद्ध झाले तर त्याला लगेच उत्तर देणे गरजेचे आहे हे मॅन आणि सहकाऱ्यांनी ओळखले. यासाठी त्यांनी सोप्या भाषेत लोकांना हे मुद्दे समजावून देता यावेत या उद्देशाने ‘रियल क्लायमेट’ हा ब्लॉग सुरू केला.

२००५ मध्ये मॅन, रे ब्रॅडली, माल्कम ह्युजेस आणि आयपीसीसीचे चेअरमन राजेंद्र पचौरी यांनी सिनेटर जो बार्टन यांनी धमकीवजा पत्र पाठवले. ‘तुमच्या संशोधनाच्या निष्कर्षांबद्दल गंभीर आक्षेप घेतले गेले आहेत. या संदर्भात सिनेट कमिटीला सहकार्य करावे. यासाठी तुम्हाला संशोधनासाठी आतापर्यंत मिळालेल्या सर्व निधींचा तपशील, संशोधनात वापरलेला सर्व डेटा, कॉम्प्युटर प्रोग्राम, त्यांची माहिती. इ. इ. सर्व कमिटीच्या हवाली करावे.’ याखेरीज आयपीसीसीमध्ये तुमचे स्थान, कार्य यासंदर्भात एखाद्या गुन्हेगाराची उलटतपासणी असावी त्याप्रमाणे सर्व तपशील द्यायला सांगितले होते. आणि या सर्वांच्या मुळाशी काय होते तर ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये आलेला एक टीका करणारा लेख! याहूनही कहर म्हणजे अशी मागणी करण्याचा बार्टन यांना कोणताही अधिकार नव्हता. वैज्ञानिक क्षेत्रामध्ये यामुळे खळबळ माजली. नेचर, युरोपियन जिओफिजिकल युनियन, मान्यवर शास्त्रज्ञ, संस्था सर्वांनी यावर कडक टीका केली. वीस शास्त्रज्ञांनी बार्टन यांना पत्र लिहून या प्रकाराचा निषेध केला. यावेळी मिडीयानेही साथ दिली. सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी याचा धिक्कार केला. अखेर बार्टन यांना ‘मी तर फक्त माहितीसाठी साधे पत्र पाठवले होते’ असे गुळमुळीत स्पष्टीकरण देऊन वेळ मारून न्यावी लागली.

अर्थात बार्टन गप्प बसले नाहीत. २००६ मध्ये मॅन यांचे संशोधन पुन्हा एकदा तपासून बघण्यासाठी त्यांनी समिती नेमली. समितीमध्ये संख्याशास्त्राचे संशोधक वेगमन, आणखी एक संख्याशास्त्री डेव्हीड स्कॉट आणि त्याचा विद्यार्थी यास्मिन सेड यांचा समावेश होता. या समितीचे स्वरूप पाहून रिपब्लिकन सिनेटर बोल्हार्ट यांनी त्यांची एक स्वतंत्र समिती नेमली. बोल्हार्ट हे तापमानवाढ आणि पर्यावरण यांच्याविषयी काळजी असणाऱ्या मोजक्या रिपब्लिकन सिनेटरपैकी एक. त्यांच्या समितीमध्ये हवामानशास्त्रज्ञ, पॅलिओक्लाएमेटॉलॉजिस्ट आणि संख्याशास्त्री अशी समतोल रचना होती. समितीचे अध्यक्ष स्टॅटीस्टीकल क्लायमेटॉलॉजीमधील एक नावाजलेले संशोधक होते. या समितीने परत सर्व डेटा तपासून मॅन यांचे संशोधन बरोबर आहे, तापमानवाढ खरी आहे असा निर्वाळा दिला. याउलट बार्टन यांच्या समितीने यावेळी वेगळी ‘मोडस ऑपरेंडी’ वापरली. ‘सोशल नेटवर्क अनालिसिस’ या नावाखाली हवामानशास्त्राच्या संशोधकांमध्ये कंपूबाजी आहे, ते एकमेकांचे निबंध प्रकाशित करायला मदत करतात असा त्यांचा दावा होता. अर्थातच, बार्टन यांनी पुन्हा एकदा सिनेटची शोधसमिती नेमली. याही समितीला काहीही सिद्ध करता आले नाही, उलट वेगमनच्या अहवालात असलेल्या अनेक चुका शास्त्रज्ञांनी दाखवून दिल्या.

२००६ मध्ये अल गोर यांची ‘ऍन इनकन्विनिअंट ट्रूथ’ ही डॉक्युमेंटरी प्रसिद्ध झाली, तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. २००७ चे नोबेल शांतता पारितोषिक गोर आणि आयपीसीसी यांना विभागून देण्यात आले. २००७ मध्येच आयपीसीसीचा चौथा अहवाल प्रकाशित झाला. तापमानवाढ मानवनिर्मित आणि ग्रीनहाउस वायूंमुळे आहे हा निष्कर्ष पुन्हा एकदा, अधिक आत्मविश्वासाने मांडण्यात आला. याचा आधार डझनावारी वेगवेगळ्या संशोधकांनी केलेली मोजमापे होती. सर्व मोजमापांमधून हॉकी स्टिकला दुजोरा मिळत होता. तरीही मीडियामध्ये तापमानवाढ खरी की खोटी अशा प्रकारचे लेख येतच राहिले.

२००९ उजाडेपर्यंत विरोधकांनी गिअर बदलले होते, आता त्यांचे हल्ले अधिक आक्रमक आणि ‘नो होल्ड्स बार्र्ड’ अशा पद्धतीचे होत होते. १७ नोव्हेंबर २००९ रोजी मॅन यांचे संकेतस्थळ ‘रियलक्लायमेट’ हॅक करण्यात आले. मॅन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हजारो इमेल चोरण्यात आल्या आणि यातील ठराविक शब्द किंवा वाक्ये संदर्भांचा विचार न करता मिडियात प्रसिद्ध करण्यात आली. एका इमेलमध्ये ‘माइक्स नेचर ट्रिक’ असा उल्लेख आहे, ‘ट्रिक’ याचा संदर्भ मॅन यांनी नेचरच्या निबंधात ज्या प्रकारे आलेख प्लॉट केला होता तो होता. हे लक्षात न घेता ट्रिक म्हणजे फसवणूक अशी हाकाटी उठवणे असे प्रकार केले गेले. दुर्दैवाने या वेळी गार्डीयनपासून न्यूयॉर्क टाइम्सपर्यंत इतरवेळी समंजसपणे वागणारा मिडियाही या खेळात सामील झाला. फक्त मॅनच नाही तर राजेंद्र पचौरी यांच्यावरही चिखलफेक झाली. लगेच रिपब्लिकन पक्षाने हे सर्व हवामानशास्त्रज्ञ गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर पोलिस कारवाई करावी अशी मागणी केली. मायकेल मॅन यांना मृत्युदंड द्यावा इथपर्यंत विरोधकांची मजल गेली. हवामानशास्त्रज्ञांना अर्वाच्य भाषेतील धमकी देणारी पत्रे, इमेल आल्या. हे चालू असताना वर्तमानपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल सगळीकडे हवामानशास्त्रज्ञांविरुद्ध वाटेल तसे आरोप केले जात होते. हॅकिंग इंग्लंडमध्ये झाले असल्याने यावेळी ब्रिटीश संसदेने मॅन यांचे संशोधन पडताळून बघण्यासाठी समिति नेमली. याही समितीने संशोधन बरोबर आहे आणि संशोधकांनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही असा निर्वाळा दिला. २०१० मध्ये व्हर्जिनियाचे अटर्नी जनरल केन कुचिनेल्ली यांनी व्हर्जिया विद्यापीठाकडे मॅन यांच्या सर्व इमेल, कागदपत्रे आणि इतर माहिती यांची मागणी केली. मॅन यांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागविण्याची ही पहिली वेळ नव्हती. परत एकदा शैक्षणिक, राजकीय क्षेत्र आणि मीडिया यांनी याचा एकमुखाने निषेध केला. याला ‘विच हंट’ असे नाव दिले गेले.

हा सर्व प्रवास पाहिला तर काय दिसते? एक म्हणजे विज्ञानात ज्याप्रमाणे एकमेकांचे मुद्दे समजावून घेऊन, प्रतिवाद करून चर्चा केली जाते तो प्रकार इथे चाललेला नाही. खरे तर तापमानवाढ होत नाही हे सिद्ध करणे सोपे आहे. ज्यांना असे वाटते की तापमानवाढ खोटी आहे त्यांनी नेचर पासून सायन्सपर्यंत कोणत्याही मासिकात आपले तर्क पाठवावेत. ते बरोबर असतील तर ही मासिके ते आनंदाने छापतील. विज्ञानात कोणतेही मत परत परत तपासून बघायला कुणाचीही आडकाठी नसते. पण गेल्या पंधरा वर्षात एकाही निबंधाने मॅन यांचे निष्कर्ष चुकीचे आहेत हे सिद्ध केलेले नाही. इथे जे चालले आहे ते वेगळेच आहे. नेचरच्या एका संपादकीयामध्ये या प्रकाराला ‘स्ट्रीट फाइट’ असे नाव दिले होते. आणि तापमानवाढीचे विरोधक कोण आहेत हे तपासले तर एक रोचक बाब बघायला मिळते. यापैकी बहुतेक विरोधक कोक बंधूंशी संबंधित आहेत. हे कोक म्हणजे सॉफ्ट ड्रिंक नव्हे. कोक ब्रदर्स अमेरिकेतील तेल आणि इतर उद्योगांचे सम्राट आहेत.

“एक दुरुस्ती, साहेब. या शहरावर राज्य तुमचं तर नाहीच, आमचंही नाही.” डिकास्टा

निवडणुकीपासून ते कोणत्याही समारंभापर्यंत प्रत्येक वेळी अमेरिकेचे आजी-माजी नेते रुबाबदार पोशाखांमध्ये, सफाईदार इंग्रजी भाषेत स्वातंत्र्य, लोकांचे हित, याडा, याडा इ. बोलत असतात. एखाद्या परग्रहवासियांनी पाहिलं तर बिचारा म्हणेल असे थोर नेते असताना या ग्रहाला कसली चिंता? प्रत्यक्षात काय होतं? कोणताही महत्त्वाचा विषय आला की त्यावर लोकांची आणि पर्यायाने बहुमत असलेल्या लोकप्रतिनिधींची इच्छा विचारात न घेता उद्योगसमूहांचे आर्थिक हितसंबंध जपणारे निर्णय घेतले जातात. परवाचीच गोष्ट. बोस्टनमध्ये दोन अतिरेक्यांना पकडणे इतके कठीण का गेले? कारण त्यांच्याकडे अमाप शस्त्रास्त्रे होती. चकमक चालू असताना एकदा तर पोलिसांकडचा साठा संपला. याचे मूळ अर्थातच गन कंट्रोलमध्ये आहे. कुणी किती शस्त्रे विकत घ्यावीत यावर मर्यादा घातली तर हे सहज टाळता येईल. शस्त्रे घेणाऱ्यांची साधी चौकशी करता यावी या तरतुदीचे बिल दोन दिवस आधी अमेरिकन सिनेटने नाकारले. याचे कारण गन लॉबीच्या मागे असलेल्या ‘नॅशनल रायफल असोसिएशन’च्या विरोधात जाण्याची हिंमत फार थोड्या लोकांमध्ये आहे. दुर्दैवाने ओबामांना सिनेट राजकारणाचा अनुभव नाही त्यामुळे दर वेळी ते तोंडघशी पडतात. अमेरिकेवर खरी सत्ता आहे ती कोक बंधू, आणि त्यांच्यासारख्या बड्या उद्योगांची. या पार्श्वभूमीवर ओबामा हवामानासाठी काही करतील ही आशा भाबडेपणाची आहे.

अमेरिकेत उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जगभरातील बुद्धिमान शास्त्रज्ञ आहेत, त्यांना संशोधनासाठी निधीही उपलब्ध आहेत. कमी आहे ती राजकीय इच्छाशक्तीची. आणि म्हणूनच हवामानबदलाच्या क्षेत्रामध्ये अमेरिका इतर देशांच्या तुलनेत मागे पडते आहे. फ्रान्समध्ये नुकतेच पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणाऱ्या स्टेडियमचे बांधकाम सुरू झाले, जर्मनीमध्ये अल्गीपासून ऊर्जा मिळवणारी इमारत आहे. सौरऊर्जा निर्मितीमध्ये जर्मनीने नुकताच उच्चांक गाठला पण येत्या वर्षात जपान जर्मनीला मागे टाकेल अशी चिन्हे आहे. फुकुयामा येथील दुर्घटनेनंतर जपानच्या संसदेने ‘क्लीन एनर्जी’ विधेयक पास केले. कोपनहेगन २०२५ पर्यंत ‘कार्बन न्यूट्रल कॅपिटल’ व्हायच्या मार्गावर आहे. राजकीय पाठबळ असेल काय होऊ शकते याची ही काही उदाहरणे.

एकमेका एक्सपर्ट करू, अवघे बनू एक्सपर्ट

हवामानशास्त्र हा अत्यंत क्लिष्ट विषय आहे. बरेचदा यातील प्रक्रिया सरळ – म्हणजे लिनियर नसून नॉन-लिनियर असतात. म्हणूनच याचे सर्वात रोचक उदाहरण ‘बटरफ्लाय इफेक्ट’च्या स्वरूपात देण्यात येते. बेजिंगमध्ये एखाद्या फुलपाखराने पंखांची फडफड केली तर त्यामुळे फ्लोरिडात वादळ येऊ शकते. मथितार्थ हा की साध्या बदलांचा परिणामही अपेक्षेबाहेर वाढून प्रचंड होऊ शकतो. मात्र तापमानवाढीवर चर्चा चालू असताना एक गंमत बघायला मिळते. इथे सगळे जण एक्सपर्ट असतात. तापमानवाढ मोजताना शास्त्रज्ञांनी मोजमापे कशी केली, त्यासाठी संख्याशास्त्राच्या कोणत्या पद्धती वापरल्या, त्यांचे फायदे-तोटे काय याचा गंधही नसताना वॉल स्ट्रीट जर्नलसारख्या वृत्तपत्रात ‘या वर्षी तर किती कडाक्याची थंडी आहे, म्हणजे तापमानवाढ खोटी आहे’ अशा आशयाचा लेख येतो आणि त्याला या संशोधनाइतकीच किंमत दिली जाते. हे म्हणजे डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या करून आजाराचे निदान करावे, कोपऱ्यावरच्या वाण्याने ‘काही काय! काल तर भेटले होते, मस्त मजेत होते. काही झालेलं नाहीये त्यांना’ असा निर्वाळा द्यावा आणि दोघांचेही मत सारखे धरले जावे असा प्रकार झाला. हे हिग्ज बोझॉन किंवा कृष्णविवरांच्या बाबतीत होत नाही. हे संशोधन कितीही अविश्वसनीय असले तरी कोणत्याही वृत्तपत्रात त्यावर शंका घेणारे लेख येत नाहीत. इन्होफे यांनी तर हवामानबदलाच्या एका समितीमध्ये साक्ष देण्यासाठी चक्क लेखक मायकेल क्रायटनला बोलावले होते. क्रायटन उत्तम लेखक आहे पण तो हवामानशास्त्रज्ञ नाही. ‘स्टेट ऑफ फिअर’ या कादंबरीचा गाभा ‘तापमानवाढ बोगस आहे’ असा आहे पण यामध्ये विज्ञान आणि कल्पनाविलास यांची सरमिसळ आहे. कथेसाठी विज्ञानाच्या तथ्यांना वाकवणे हे क्रायटनने आधीही केले आहे. उदा. ‘जुरासिक पार्क’मध्ये डीएनए इतक्या वर्षे सुस्थितीत राहणे शक्य नाही पण तसे झाले तर कादंबरी दहा पानातच संपेल. ज्याप्रमाणे ऐतिहासिक कादंबरीला इतिहास मानणे चूक आहे, तसेच ‘सायन्स फिक्शन’ला विज्ञान मानणेही चूक आहे.

तापमानवाढ होते आहे, तिचे कारण मानवनिर्मित – मुख्यत्वे ग्रीनहाउस वायू – आहे या बाबी निर्विवादपणे, अनेकदा सिद्ध झाल्या आहेत. सीतेला एकच अग्निपरीक्षा द्यावी लागली होती, मॅन यांचे संशोधन डझनावारी अग्निपरीक्षांमधून सिद्ध झाले आहे. मॅन यांच्या बाजूने कोण आहे? शास्त्रज्ञ, नावाजलेल्या वैज्ञानिक संस्था आणि नेचर, सायन्स, साएंटिफिक अमेरिकन यासारखी मासिके. त्यांच्या विरोधात कोण आहे? रिपब्लिकन पक्षाचे बहुतेक सदस्य, तेल आणि कोळसा उद्योग, कोक बंधू. मिडियाचा वापर करण्यात विरोधक नक्कीच अधिक कुशल आहेत आणि यामुळेच बहुतेक लोकांच्या मनात अजूनही तापमानवाढ खरी की खोटी अशी शंका आहे. तापमानवाढीचे परिणाम दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. ध्रुवीय बर्फ वितळून पाण्याची पातळी वाढत आहे. बरेचदा तापमानवाढीच्या विरोधात प्रागैतिहासिक काळात यापेक्षाही अधिक तापमान होते किंवा आतापेक्षाही जास्त कार्बनडाय ऑक्साइड होता असे कारण दिले जाते. गोष्ट खरी आहे पण प्राचीन काळात हे बदल व्हायला कोट्यवधी वर्षे लागली, आता हे बदल दहा-वीस वर्षात होत आहेत. आणि ज्या वेगाने ते होत आहेत तो वेग पाहता ते आपणहून थांबतील किंवा स्थिरावतील असे कोणतेही चिन्ह नाही. ही मुख्य काळजीची गोष्ट आहे.

माणूस निसर्गापेक्षा मोठा आहे का, त्याच्यामध्ये निसर्ग नष्ट करण्याची पात्रता आहे का वगैरे प्रतिवादही केले जातात. १९६२ मध्ये केनेडी बंधूंच्या आततायीपणामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आले होते. अणुयुद्ध झाले तर माणूस आणि पर्यावरण दोघांचीही वासलात लागेल. अणुयुद्धापर्यंत जायची वेळ आली नाही तरी इतर शस्त्रांमुळे काय होऊ शकते हे व्हिएटनाम आणि इराकमध्ये दिसले आहेच. अर्थात “शंभर वर्षात माणूस आणि सगळे पर्यावरण नष्ट झाले तरी काय फरक पडतो? पृथ्वीच्या इतिहासात ‘मास एक्सटिंक्शन’ कितीतरी वेळा झालेच आहे की! परत नवीन जीव तयार होतील” असा उच्च पातळीवरचा निर्विकारवादी युक्तिवाद असेल तर मात्र हा संपूर्ण लेख बाद समजावा आणि तसदी दिल्याबद्दल क्षमा करावी.

—-

१. इन्होफे यांची मते फारच रोचक आहेत. तापमानवाढीचे खंडन त्यांनी अत्यंत स्पष्ट, सोप्या, प्रभावी, ओघवत्या, तेजस्वी, ओजस्वी, मनस्वी, यशस्वी शब्दांमध्ये केले आहे, “पृथ्वी देवाने बनवली आहे त्यामुळे माणसाने केलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे पृथ्वीला धोका पोचू शकत नाही.” हाय काय अन नाय काय. मा. इन्होफेसाहेब यांना तेल आणि कोळसा उद्योगांकडून $१,१८९,०५०, कोक बंधूंकडून $६२,७५० आणि एक्झॉनमोबिलकडून $१६,००० इतका निधी मिळाला आहे. आकाशातला बाप​ मा. इन्होफेसाहेब आणि या सर्व उद्योगांचे भले करो.

२. आयपीसीसी – प्रत्येक अहवाल तयार करताना आयपीसीसीने मागच्या अहवालापासून हवामानक्षेत्रामध्ये काय संशोधन झाले आहे त्याचा आढावा घेतलेला असतो. अहवालाचे प्रत्येक प्रकरण लिहिण्यासाठी त्या-त्या उपविभागामध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे पथक तयार केले जाते. प्रत्येक प्रकरणामध्ये कोणत्या मुद्द्यावर शास्त्रज्ञांचे एकमत आहे, कुठे मतभेद आहेत याचा परामर्श घेतला जातो. प्रत्येक प्रकरण पन्नास ते शंभर पानांचे असते. अहवाल लिहून झाल्यानंतर परीक्षणासाठी पाठवला जातो. आयपीसीसीची परीक्षण पद्धती (review process) वैज्ञानिक क्षेत्रात सर्वात काटेकोर समजली जाते. यात तीन फेऱ्या असतात. पहिल्या फेरीत अहवाल हवामानशास्त्रातील शास्त्रज्ञांकडे पाठवला जातो. दुसऱ्या फेरीत तो शैक्षणिक, सरकारी, बिनसरकारी आणि औद्योगिक क्षेत्रांमधील वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करणाऱ्या हजारो शास्त्रज्ञांकडे पाठवला जातो आणि त्यांनी केलेल्या विस्तृत टिप्पण्या विचारात घेतल्या जातात. या सर्वांच्या सुधारणा लक्षात घेऊन दुरुस्त केलेला अहवाल तिसऱ्या फेरीत सरकारी परीक्षणासाठी जातो. इथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रत्येक देशाच्या प्रतिनिधीकडे अहवाल पाठवून त्यांचे मत विचारले जाते. प्रत्येक देशाच्या आपापल्या पद्धतीप्रमाणे अहवालाचे परीक्षण होते. उदा. अमेरिकेमध्ये ‘फेडरल रजिस्टर’मध्ये अहवालावर टिप्पण्या करण्याविषयी आवाहन केले जाते. याचा अर्थ सामान्य नागरिकही यात भाग घेऊ शकतात. या सर्वातून अहवाल पास झाल्यावर परत वेगवेगळ्या देशातील सरकारांकडे पाठवला जातो आणि त्यांचे मत लक्षात घेतले जाते. हे सर्व झाल्यानंतर येतो महत्त्वाचा भाग आणि तो म्हणजे धोरण आखणाऱ्यांसाठी घेतलेला आढावा (summary for policy makers). इथे प्रत्येक शब्द काटेकोरपणे तपासला जातो आणि त्यावर सर्व जागतिक प्रतिनिधींचे एकमत होणे आवश्यक असते. प्रतिनिधी आक्षेप घेऊ शकतात मात्र अंतिम निर्णय शास्त्रज्ञांच्या हातात असतो. यामुळे वैज्ञानिक पातळीवर कुठेही तडजोड होणार नाही याची खात्री केली जाते. इतके करूनही कधीकधी चुका होतात. २००७च्या कित्येक हजार पानांच्या अहवालात दोन चुका सापडल्यानंतर या चुकांमुळे मुख्य निष्कर्षावर काहीही परिणाम होत नाही हे लक्षात न घेता विरोधकांनी गदारोळ माजविला.

३. मायकेल मॅन यांची मुलाखत.