सनी डेज

गावसकर खेळत होता तेव्हा वेस्ट इंडीजकडे रॉबर्ट्स, मार्शल, गार्नर इ. आणि ऑस्ट्रेलियाकडे लिली आणि थॉमसन असा तोफखाना होता. असं असूनही यांना तोंड देताना गावसकरने कधीही हेल्मेट घातलं नाही. असं का? हे या बोलरना उद्देशून एक ‘पर्सनल स्टेटमेंट’ होतं.

 सुनील गावसकर यांचं ‘आयडॉल्स’ पुस्तक शोधत होतो, कोणत्याही दुकानात दिसलं नाही. शेवटी रस्त्यावर एक जुनी प्रत मिळाली. कुणीतरी कुणाला तरी भेट दिली होती. देणार्‍याचं माहीत नाही पण घेणार्‍याचा टेस्ट क्रिकेटमधला इंटरेस्ट बहुधा संपला असावा. पुस्तकात गावसकर यांनी त्यांच्या आयुष्यावर ज्यांनी प्रभाव पाडला त्या क्रिकेटपटूंची ओळख करून दिली आहे. बेदी, चंद्रा, इम्रान खान, कपिल, रिचर्ड्स अशी अनेक नावं यात येतात. महत्त्वाचं म्हणजे त्याकाळचं क्रिकेट कसं होतं याचं एक सुरेख चित्र या वर्णनात दिसतं. पण मग साहजिकच सध्याच्या क्रिकेटशी तुलना होते आणि वाईट वाटतं. त्या काळात क्रिकेटपटूंना फारसे पैसे मिळायचे नाहीत म्हणून बरेच खेळाडू आधी नोकरी पक्की करायचे आणि मग फावल्या वेळात खेळायचे. गावसकर ‘निरलॉन’मध्ये नोकरीला होते, वेंगसरकर बहुधा बँकेत (चूभूद्याघ्या). इरापल्ली प्रसन्ना १९६२ मध्ये वेस्ट इंडीजमध्ये टेस्टसिरीजसाठी गेले पण त्यानंतर ते चार वर्षांनी परत संघात आले कारण त्यांच्या वडिलांची अट होती की आधी इंजिनियरींगची डिग्री मिळव. प्रसन्नावरच्या प्रकरणात गावसकर लिहितात​, “In those days playing cricket was not as much of a monetary advantage as it is now…Thus, Prasanna’s father was correct in asking young Prasanna to continue with his studies so that his engineering degree would stand him in good stead along with his cricketing ability to get a good job.” पुस्तक १९८३ मध्ये लिहिला आहे, त्यावेळेपर्यंत परिस्थिती बरीच सुधारली होती. पण त्या काळात क्रिकेटमध्ये पैसा नसण्याचा फायदाही होता. पालक मुलगा पाळण्यात असतानाच सचिन किंवा सुनील व्हायची स्वप्नं बघत नव्हते.

सध्याच्या पिढीबद्दल कौतुक करण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आहेत. दोन वर्षाची मुलंही आयप्याड सहज वापरतात वगैरे. पण काही बाबतीत मात्र त्यांच्याबद्दल मनापासून वाईट वाटतं. गावसकर विरुद्ध माल्कम मार्शल हा तोडीस तोड सामना प्रत्यक्ष बघण्याचं सुख त्यांच्या नशिबात नाही. किंवा नंतरची पिढी सचिन विरुद्ध मॅग्रालाही मुकलेली आहे.

पूर्वी टेस्ट क्रिकेट म्हणजे नुसतं मैदानावर जाऊन धावा कुटणे नव्हतं. पाच दिवस चालणार्‍या या सामन्यात दोन कप्तान अनेक स्ट्रॅटेजी लढवीत असत. याशिवाय संघाच्या मुख्य खेळाडूंचं वैयक्तिक पातळीवर चाललेलं युद्ध वेगळंच. गावसकर खेळत होते तेव्हा वेस्ट इंडीजकडे रॉबर्ट्स, मार्शल, गार्नर इ. आणि ऑस्ट्रेलियाकडे लिली आणि थॉमसन असा तोफखाना होता. असं असूनही यांना तोंड देताना गावसकर यांनी कधीही हेल्मेट घातलं नाही. असं का? हे या बोलरना उद्देशून एक ‘पर्सनल स्टेटमेंट’ होतं. मी तुझ्या वेगाला घाबरत नाही असं सांगण्याचा याहून चांगला उपाय कोणता? शिवाय स्वतःच्या तंत्रावर असलेला जबरदस्त आत्मविश्वासही यातून दिसतो. आणि हे सगळं केव्हा तर बाउंसरचे नियम शिथिल असताना. त्या काळात क्रिकेटमध्ये पैसे नव्हते, मॉडेलिंग अस्तित्वात नव्हतं. क्रिकेटला ग्लॅमर होतं पण फक्त ग्लॅमरसाठी क्रिकेटकडे वळणार्‍यांची गर्दी होत नव्हती. ज्याला यात मनापासून रस आहे आणि कशाचीही अपेक्षा न ठेवता मेहनत करण्याची ज्याची तयारी आहे असेच लोक क्रिकेटकडे वळायचे.