गॅरी कास्पारोव्ह आणि बर्लिनची भिंत

क्रामनिकने ३…घो एफ ६ ही खेळी केल्याबरोबर कास्पारोव्हने चमकून क्रामनिककडे बघितलं, किंचित हसला आणि मान हालवली. ही खेळी रॉय लोपेझ या प्रकारातील बर्लिन बचाव या उपप्रकारात येते. बर्लिन बचाव १९ व्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला खेळला जात असे.

बुद्धिबळ विश्वविजेतेपद स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू स्पर्धेआधी आणि नंतर ढीगभर मुलाखती देतात पण यामध्ये बहुतेक वेळा महत्त्वाचे तपशील उघड केले जात नाहीत. यामागे बरीच कारणे आहेत. एक तर बहुतेक वेळा मुलाखत घेणारे पत्रकार ‘आता कसं वाटतंय?’ यापलीकडे जातच नाहीत. जे थोडे बहुत जातात त्यांना उत्तरे देतानाही दोन्ही खेळाडू सावध असतात. उदा. मागची स्पर्धा जिंकल्यानंतरही कार्लसनने त्याचे सेकंड्स कोण आहेत हे जाहीर केलं नाही कारण या वर्षी त्याला परत स्पर्धा खेळायची आहे. यामुळे होतं काय की बुद्धिबळाची विश्वविजेतेपद स्पर्धा म्हणजे दोन खेळाडू खेळणार आणि त्यातला एक विजयी होणार यापलीकडे याबद्दल फारशी माहिती बाहेर येत नाही. आणि याबाबतीत हिमनग ९/१० पाण्याखाली असण्याची उपमा अगदी सार्थ आहे.

नेहमी होणाऱ्या स्पर्धा आणि विश्वविजेतेपद स्पर्धा यात अनेक महत्त्वाचे फरक आहेत. विश्वविजेतेपद स्पर्धा एकाच खेळाडूबरोबर असते त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सखोल अभ्यास करता येतो. इथे काही बाबतीत पोकर या खेळाशी साम्य जाणवतं. दोन्ही खेळाडू बुद्धिबळाच्या सर्व ‘ओपनिंग्ज’ कोळून प्यायलेले असतात. मग प्रतिस्पर्ध्याला चकित कसं करणार? प्रतिस्पर्ध्याच्या आवडत्या ओपनिंग्ज कोणत्या आहेत हे लक्षात घेतलं जातं. पण प्रतिस्पर्ध्यानं तुम्ही हे लक्षात घेणार हे लक्षात घेतलेलं असतं. त्यामुळे कदाचित तो पूर्वी कधीही न खेळलेली ओपनिंग खेळू शकतो. किंवा त्याहीपुढे जाऊन तुम्ही तो त्याच्या आवडत्या ओपनिंग्ज खेळणार नाही हे गृहीत धरणार असं गृहीत धरून त्याच्या आवडत्या ओपनिंग्ज खेळूनच तुम्हाला चकित करायचा प्रयत्न करतो. इंग्रजीत ‘कॉलिंग युअर ब्लफ’ नावाचा वाक्प्रचार आहे तो इथे चपखल बसतो. अर्थातच हे फार ढोबळ आणि प्राथमिक अंदाज आहेत. स्पर्धेची तयारी नेमकी कशी होते हे कधीही बाहेर येत नाही. खुद्द खेळाडू किंवा त्यांचे सेकंड्स यांनी याबद्दल लिहिलं तरच हे शक्य होतं आणि हे फारच क्वचित घडतं.

९० च्या दशकामध्ये बुद्धिबळ विश्वविजेतेपदाची स्पर्धा पूर्णपणे फिडेच्या नियंत्रणाखाली नव्हती. १९९३ साली कास्पारोव्ह आणि शॉर्ट यांनी फिडेशी काडीमोड घेऊन आपली वेगळी चूल मांडली. त्यावेळी कास्पारोव्ह विश्वविजेता होता. यानंतर फिडे आणि कास्पारोव्ह यांनी स्वतंत्र स्पर्धा घेतल्या त्यामुळे काही काळासाठी बुद्धिबळाच्या जगात एक सोडून दोन विश्वविजेते होते. १९९९ मध्ये कास्पारोव्हने विश्वविजेतेपद स्पर्धेसाठी आनंदशी बोलणी केली. आनंदने १९९५ सालच्या स्पर्धेचा कटू अनुभव लक्षात घेऊन ‘बक्षिसासाठी प्रायोजकांचे पैसे बॅकेत जमा झालेले दाखव’ अशी मागणी केली. नंतर ही बोलणी फिसटकली. २००० साली कास्पारोव्ह आणि क्रामनिक अशी स्पर्धा निश्चित झाली.

Book cover for From London to Elista

त्या काळात क्रामनिकचा सेकंड बारीव्ह आणि जवळचा मित्र लेव्हिटॉव्ह यांनी नंतर ‘फ्रॉम लंडन टू एलिस्ता’ हे पुस्तक लिहिलं. पुस्तकात पडद्यामागची तयारी उलगडून दाखवताना बारीव्ह आणि लेव्हिटॉव्ह यांच्या गप्पा दिलेल्या आहेत. शिवाय आवश्यक तिथे क्रामनिक, कास्पारोव्ह आणि इतरांची मतंही मांडलेली आहेत. पुस्तकात प्रत्येक डावाचं अत्यंत खोलात जाऊन विश्लेषण केलं आहे त्यामुळे बुद्धिबळात ज्यांना इतका रस नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक नाही. रस असेल तर स्पर्धेची तयारी किती खोलात जाऊन केली जाते हे बघायला मिळतं. क्रामनिक रोज डाव खेळून आल्यानंतर आज रात्री काय करायचं हे सेकंड्सना सांगत असे. उदा. १४ व्या चालीत राजा सी८ ऐवजी ई८ वर नेला तर काय होईल? सकाळी क्रामनिक उठल्यावर रात्रभर काय काम झालं बघत असे. आधी म्हटल्याप्रमाणे प्रतिस्पर्ध्याला चकित करण्यावर सगळं अवलंबून असतं. सातव्या डावात क्रमनिकच्या ४…ए६ या खेळीमुळे कास्पारोव्ह इतका चक्रावून गेला की त्याने पटकन ११ खेळ्यांतच बरोबरीचा प्रस्ताव मांडला. कास्पारोव्हशी जिंकल्यानंतर क्रामनिकचा पुढचा सामना पीटर लेकोशी झाला. पुस्तकाचा दुसरा भाग यावर आहे. तिसऱ्या भागात २००६ साली झालेल्या टोपोलॉव्हबरोबरच्या सामन्याचं वर्णन आहे.

विश्वविजेतेपद स्पर्धेची तयारी ज्या पातळीवर केली जाते त्याची कल्पना करणंही अशक्य आहे. जगातील सर्व एलीट ग्रॅडमास्टर्स या स्पर्धेकडे डोळ्यात तेल घालून बघत असतात. याचं मुख्य कारण असं की दोन्ही खेळाडू स्पर्धेसाठी जी तयारी करतात आणि त्यातून ज्या नवीन चाली उघड होतात त्यातून इतर खेळाडूंना बरंच शिकायला मिळतं. हे एक प्रकारे बुद्धिबळाच्या क्षेत्रात नवीन संशोधन प्रकाशित करण्यासारखं असतं. बरेचदा विश्वचषक स्पर्धेत वापरल्या गेलेल्या नवीन चाली नंतर काही काळ प्रामुख्याने वापरल्या जातात. स्पर्धेची तयारी चालू असताना क्रामनिकचा दिनक्रम काहीसा असा होता. सकाळी ९ ला उठायचं, १० ला नाश्ता, ११ ते १ सराव, १ ते २ समुद्रावर फिरायला जाणं, २.३० जेवण, ३ ते ४ वामकुक्षी, ४ ते ८ सराव, ८ ते ९ जेवण, ९ ते पहाटे ३ सराव.

पहिल्या डावात कास्पारोव्हकडे पांढरे मोहरे होते. त्याने १. ई४ ही त्याची आवडती खेळी केली. यातून त्याची प्रतिस्पर्ध्यावर सुरुवातीलाच वर्चस्व गाजवण्याची मनीषा स्पष्ट झाली. डावातील पुढील खेळ्या अशा होत्या. १. ई४ ई५ २. घो एफ ३ घो सी ६ ३. उं बी ५ घो एफ ६ क्रामनिकने ३…घो एफ ६ ही खेळी केल्याबरोबर कास्पारोव्हने चमकून क्रामनिककडे बघितलं, किंचित हसला आणि मान हालवली. ही खेळी रॉय लोपेझ या प्रकारातील बर्लिन बचाव या उपप्रकारात येते. बर्लिन बचाव १९ व्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला खेळला जात असे. नंतर उच्च दर्जाच्या स्पर्धांमध्ये हा जवळजवळ दिसेनासाच झाला. क्रामनिकने ही खेळी केल्यावर त्याने कसून तयारी केली आहे हे कास्पारोव्हच्या लक्षात आलं. त्या काळात बर्लिन बचाव काहीसा खालच्या दर्जाचा मानला जात असे. हा खेळल्यावर काळ्याला बचाव करायला फारसा वाव नाही असं बहुतेकांचं मत होतं. नंतर कास्पारोव्हने उघड केलं की त्याच्या टीमने पेट्रॉव्ह बचावाची तयारी केली होती, त्यांना बर्लिन बचावाची अजिबात अपेक्षा नव्हती. हा डाव बरोबरीत सुटला पण पुढच्या डावात मात्र काळ्याकडून खेळताना कास्पारोव्हने चूक केली आणि डाव गमावला. नंतर काळ्या बाजूने खेळताना क्रामनिकने बर्लिन बचावाचा पुरेपूर उपयोग केला. शेवटापर्यंत कास्पारोव्हला ही बर्लिनची भिंत भेदता आली नाही. तिसऱ्या डावानंतर कास्पारोव्ह आणि टीमच्या लक्षात आलं की बर्लिन बचाव क्रामनिकचं मुख्य अस्त्र आणि मग त्यांनी यावर तयारी सुरू केली, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. आता क्रामनिक एका गुणाने आघाडीवर होता. बाकीचे सर्व डाव बरोबरीत सुटले असते तर त्याला विजेतेपद मिळालं असतं.

पाचव्या डावाआधी क्रामनिकच्या हेरांनी बातमी आणली की आज कास्पारोव्ह टॉयलेटबद्दल खुसपट काढून तमाशा करणार आहे आणि तसंच घडलं. कास्पारोव्हने मागणी केली की क्रामनिक टॉयलेटला जाताना एक गार्ड बरोबर हवा आणि त्याने दार संपूर्ण लवता कामा नये. क्रामनिकने मागणी मान्य केली पण कास्पारोव्हलाही हे लागू होणार असेल तरच. या सर्वामुळे फारसा फरक पडला नाही. मानसिक दबाव टाकण्याचा कास्पारोव्हचा प्रयत्न फुकट गेला. दहाव्या डावात कास्पारोव्ह परत एकदा हरला. क्रामनिकची आघाडी दोन गुणांची झाली. तेराव्या डावानंतर क्रामनिक परत जात असताना पाच दारुड्यांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. क्रामनिकने जीव वाचवून पळ काढला. नंतर एका सिक्युरिटी गार्डची सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली. स्पर्धेत अनेकदा संधी मिळूनही कास्पारोव्ह तिचं विजयात रूपांतर करू शकला नाही. मागच्या वर्षी आनंदची जी अवस्था झाली होती तशी अवस्था त्याचीही होती.

या स्पर्धेनंतर बर्लिन बचावाला पुनरुज्जीवन मिळालं. मागच्या विश्वचषक स्पर्धेतही याचा वापर करण्यात आला. पांढऱ्याच्या ई ४ ला भक्कम बचाव म्हणून आज बर्लिन बचाव लोकप्रिय आहे.