क्लॅप्टन इज गॉड

एरिक क्लॅप्टनचा जन्म इंग्लंडमधल्या रिपली नावाच्या एका लहानशा खेड्यात झाला. लहानपणीच त्याला आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे जाणवलं. तो खोलीत आला की सगळे लोक क्षणभर स्तब्ध व्हायचे. त्याच्याबद्दल नातेवाइकांमध्ये कुजबूज चालू असायची. शेवटी त्याला कळलं की ज्यांना तो आई आणि बाबा म्हणतो ते त्याचे आजी-आजोबा आहेत. त्याची सख्खी आई त्यांची मुलगी. युद्धादरम्यान एका सैनिकाबरोबर झालेल्या प्रेमप्रकरणातून एरिकचा जन्म झाला. त्या काळी इंग्लंडमध्ये अनौरस संतती निषिद्ध मानली जात असे म्हणून त्याच्या आईने त्याला गुपचूप आजी-आजोबांकडे सोपवलं आणि ती निघून गेली. या धक्क्यातून एरिक कधीच सावरला नाही. याचा अर्थ त्याचं बालपण डिकन्सच्या कादंबरीसारखं खडतरच होतं असा नाही. आजी-आजोबांनी त्याच्यावर भरपूर प्रेम केलं. लहानपणीच त्याला संगीताची गोडी लागली. आधी रेडिओ आणि नंतर ग्रामोफोन. मग आजी-आजोबांच्या मागे लागून त्याने एक गिटार विकत घेतली. आवडलेलं गाणं अनेकदा ऐकायचं, मग ते गिटारवर वाजवण्याचा प्रयत्न करायचा. मनासारखं झालं की छोट्याश्या टेपवर ते रेकॉर्ड करायचं आणि मूळ गाणं आणि त्याचं गाणं यांची तुलना करायची. गाणं मनासारखं वाजवता येईपर्यंत एरिकची तपश्चर्या चालू राहायची. एकदा गिटारची एक तार तुटली, नवी घ्यायला पैसे नव्हते मग त्याने पाच तारा वापरून सराव चालू ठेवला. एकलव्याने द्रोणाचार्यांना गुरू मानून साधना केली होती, त्या काळातील जॅझ आणि ब्लूज संगीतकार यांना एरिकने गुरू मानलं. एरिकने कोणत्याही शिक्षकाडून संगीताचे धडे घेतल्याची नोंद नाही. असं दुसरं चटकन आठवणारं उदाहरण किशोरकुमारचं. रोलिंग स्टोन्स मासिकाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या सर्वोत्कृष्ट गिटार वादकांच्या यादीत एरिकचा क्रमांक दुसरा किंवा तिसरा असतो. (पहिला अर्थातच जिमी हेंड्रिक्स.)

अभ्यासाकडे एरिकचं फारसं लक्ष नसायचं, अपवाद इंग्रजी भाषा आणि साहित्य. हे दोन्ही विषय त्याला आवडायचे. ब्रिटिश लोकांच्या छापील शब्दावरच्या प्रेमाशी हे सुसंगतच आहे. याखेरीज सिनेमाचीही त्याला आवड आहे. याचा परिणाम म्हणून एरिकच्या बोलण्यात डिकन्सपासून जपानी सिनेमा आणि ‘ब्लेड रनर’सारखे उल्लेख सहजपणे येतात. जवळच्या पबमध्ये गाणाऱ्या संगीतकारांना ऐकत-ऐकत स्वत: स्टेजवर जाऊन त्यांना साथ करणं त्याने सुरू केलं. हळूहळू लंडनच्या पबमध्ये कार्यक्रमांची आमंत्रणे यायला लागली. आधी ‘यार्डब्रेकर्स’ आणि नंतर ‘क्रीम’ या दोन ग्रूपमुळे ६० च्या दशकात एरिकला बरीच लोकप्रियता मिळाली. त्या दिवसात बीटल्सना जगाने डोक्यावर घेतलं होतं. ब्लूज संगीताशी नाळ असलेल्या एरिकला बीटल्सचं पॉप संगीत उथळ वाटायचं, आणि तरुणवर्गाने त्यांच्याप्रमाणे कपडे घालणं त्याला वेडपट वाटत असे. यथावकाश बीट्ल्सशी त्याचा बराच संबंध आला, त्यातही जॉर्ज हॅरिसनशी त्याची गाढ मैत्री झाली आणि ती शेवटपर्यंत टिकली. एकदा एका ग्रूपबरोबर असताना एक निग्रो खोलीत आला. मित्राने त्याची एरिकशी ओळख करून दिली. त्याचं नाव होतं जिमी हेंड्रिक्स. नंतर स्टेजवर जिमीला गिटार वाजवताना पाहून एरिकला आयुष्यात पहिल्यांदाच असुरक्षिततेची जाणीव झाली. याआधी त्याने असं काही पाहिलं नव्हतं. नंतर हेंड्रिक्स आणि त्याची चांगली मैत्री झाली. हे दोघे कोणत्याही क्लबमध्ये जाऊन प्रेक्षकात बसायचे. थोडा वेळ तिथलं संगीत ऐकल्यावर हे दोघे गिटार घेऊन स्टेजवर यायचे. क्लॅप्टन आणि जिमी हेंड्रिक्स एकत्र असल्यावर त्यांच्यासमोर वाजवू शकतील असे वादक अस्तित्वात नसावेत. त्या दुर्दैवी बॅंडचा कत्ल-ए-आम केल्यानंतर पुढचा क्लब.

बहुतेक कलाकार कोणत्या न कोणत्या व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात. रोज दहा मैल धावून कादंबरी लिहिणारा मुराकामी एखादाच. आत्मचरित्र वाचत असताना आपण एरिकचा कबुलीजबाब ऐकत आहोत असं वाटायला लागतं. आपल्या चुका समोर ठेवताना तो कुठेही स्पष्टीकरण देत नाही. त्या काळच्या संगीतकारांमध्ये व्यसनाधीन असणं ही मामुली गोष्ट होती. अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे अनेक उत्तमोत्तम संगीतकार अकाली काळाच्या पडद्याआड गेले – एल्व्हिस प्रिसली, जिम मॉरिसन, जिमी हेंड्रिक्स. पुढची पंचवीस-तीस वर्षे एरिक वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेला होता. अनेकदा त्याला स्टेजवर आपण काय करत आहोत याचंही भान नसे. एकदा उभं राहणं शक्य नव्हतं म्हणून त्याने सगळा कार्यक्रम स्टेजवर पडून केला. बहुधा प्रेक्षकही त्याच्याइतकेच ‘टाइट’ असावेत कारण यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. दोनदा व्यसनमुक्ती केंद्रात गेल्यानंतर अखेर एरिक पूर्णपणे बरा झाला. आज त्याने उघडलेल्या संस्थेमुळे अनेक रुग्णांना फायदा होतो आहे.

१९९१ साली मॅनहॅटनमध्ये एका बिल्डिंगमध्ये एरिकचा चार वर्षांचा मुलगा कॉनर लपंडाव खेळत होता. एका खोलीतील खिडकी साफसफाई चालू असल्याने उघडी होती. खिडकी छतापासून जमिनीपर्यंत होती आणि तिला कठडा नव्हता. कॉनर धावत धावत आला आणि सरळ खिडकीमधून ४९ मजले खाली पडला. यानंतर काही महिने एरिक बधिर झाला होता. त्याच्या निकटवर्तियांना तो परत व्यसनाच्या आहारी जातो की काय अशी भिती वाटत होती. सुदैवाने तसं झालं नाही. एरिकने संगीतामध्ये कॅथार्सिस शोधला. रोज तो गिटार घेऊन बसायचा आणि गाणी लिहायचा. ही गाणी लोकांसाठी नव्हती. नंतर एका चित्रपटाच्या निर्मातीने ‘टीअर्स इन हेवन’ गाणं ऐकलं आणि ते चित्रपटात घातलं. हे गाणं एरिकचं सर्वाधिक लोकप्रिय गाणं ठरलं आणि यासाठी त्याला तीन ग्रॅमी पारितोषिकं मिळाली.

एरिकने कधीही व्यावसायिक गणितं मांडून कलेशी प्रतारणा केली नाही. ज्या ब्लूज संगीताने त्याला प्रेरणा दिली त्याच्याशी तो नेहमी प्रामाणिक राहिला. बी. बी. किंगसारख्या संगीतकारांबरोबर काम करून त्याने आपल्या परीने हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. आजच्या संगीताविषयी तो म्हणतो, “The music scene as I look at it today is little different from when I was growing up. The percentages are roughly the same—95 percent rubbish, 5 percent pure.”

सुरुवातीच्या चित्राविषयी. १९६५ च्या सुमारास इंग्लंडमध्ये एरिकची लोकप्रियता शिखरावर असताना इज्लिंग्टनमध्ये ‘Clapton is God’ असं लिहिलेली ग्राफिटी दिसू लागली. त्या काळात घेतलेलं हे चित्र आयकॉनिक ठरलं. तंगडी वर करणारा कुत्रा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरतो. एक अर्थ एमिली डिकिन्सन म्हणते तसा ‘Fame is a fickle food.’ एरिकच्या व्यसनाधीन होण्यामागे अचानक मिळालेली प्रसिद्धी हाताळता न येणं हे ही एक कारण होतं. “My fear of loss of identity was phenomenal. This could have been born out of the “Clapton is God” thing, which had put so much of my self-worth onto my musical career.” ही ग्राफिटी त्याच्या अध:पाताला कारणीभूत ठरली असं मानलं तर तो कुत्रा दैव किंवा नियतीचं प्रतीक आहे असं मानता येतं. याखेरीज ६० च्या दशकातील सर्व बंधने आणि प्रस्थापित कल्पनांना धक्का देणाऱ्या हिप्पी विचारसरणीची ही एक प्रकारे नांदी होती असंही म्हणता येतं.