दोन आडवाटेवरचे चित्रपट

चित्रपट बघण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, माझी काहीशी तर्‍हेवाईक आहे. काही अपवाद सोडले तर मी सध्या गाजत असलेले चित्रपट बघितलेले नाहीत. ते माझ्या यादीत आहेत पण बघायची वेळ येईस्तोवर वर्ष-सहा महिने उलटून गेलेले असतात. यामागची कारणमीमांसा म्हणजे अमुक वेळी अमुक चित्रपट बघायचा किंवा नाही हे ठरवणे. चित्रपटाची जातकुळी आणि आपला त्यावेळचा मूड हे जुळत नसतील…

चित्रपट बघण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, माझी काहीशी तर्‍हेवाईक आहे. काही अपवाद सोडले तर मी सध्या गाजत असलेले चित्रपट बघितलेले नाहीत. ते माझ्या यादीत आहेत पण बघायची वेळ येईस्तोवर वर्ष-सहा महिने उलटून गेलेले असतात. यामागची कारणमीमांसा म्हणजे अमुक वेळी अमुक चित्रपट बघायचा किंवा नाही हे ठरवणे. चित्रपटाची जातकुळी आणि आपला त्यावेळचा मूड हे जुळत नसतील तर अनुभव फारसा चांगला येत नाही. शिवाय आता हा चित्रपट बघितला नाही तर परत कधीही बघता येणार नाही ही भीती आता आंतरजालामुळे जवळ-जवळ नाहीशी झाली आहे. अपवाद : चित्रपट महोत्सवातील काही चित्रपट ज्यांचं नंतर वितरण चांगल्या प्रकारे होत नाही. पण असे सुटून गेलेले चित्रपट, पुस्तकं यांची यादी करायची ठरवली तर फार मोठी होईल. महत्त्वाचं काय? सर्व चित्रपट बघायलाच हवेत हे की जेव्हा जो चित्रपट बघत आहोत त्याच्याशी पूर्णपणे तादात्म्य पावता येणं हे? काही लोकांना मॅरेथॉन चित्रपट बघूनही असं करता येतं हा त्यांचा विशेष गुण मानावा लागेल. मला तरी हे जमत नाही. या कारणांमुळे बहुतेक लोक ‘शिप ऑफ थेसियस’ बघत असतात तेव्हा मी ओझु वगैरे बघत असतो. मी ‘शिप ऑफ थेसियस’वर पोचेपर्यंत त्याच्याबद्दल काय-काय लिहून आलं हे बहुतेक वेळा विसरून गेलेलो असतो त्यामुळे फायदा असा होतो की चित्रपट बघताना पाटी कोरी असते.

नुकतेच आंतरजालावर दोन चित्रपट सापडले – दोन्ही प्रत्येकी एका तासांचे आहेत त्यामुळे त्यांना चित्रपट म्हणायचं की लघुपट माहीत नाही. या चित्रपटांचं वैशिष्ट्य असं की हे चित्रपट पारंपरिक चित्रपट व्यवस्थेमध्ये फारसे बसत नाहीत. साहजिकच नेहमीच्या वितरण व्यवस्थेमध्ये हे चित्रपट बघायला मिळणार नाहीत. यांचे सुरुवातीचे खेळ झाल्यावर निर्मात्यांनी हे आंतरजालावर खुले केले.

पहिला चित्रपट आहे होर्हे चॅमचा ‘पीएचडीमूव्ही‘. होर्हेनं कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली, नंतर रिसर्चमध्ये रस वाटला नाही म्हणून त्याने त्याचा छंद (किंवा पॅशन म्हणणं अधिक योग्य) – रेखाचित्रे काढणे – जोपासायला सुरुवात केली. यातून ‘पीएचडीकॉमिक्स’ ही कार्टून स्ट्रिप जन्माला आली. विषय अर्थातच पीएचडी त्यामुळे याचा प्रेक्षकवर्ग मर्यादित असणार. यातील मुख्य पात्रे पीएचडीचे विद्यार्थी, पोस्टडॉक आणि त्यांचे प्राध्यापक. पीचडी करताना पावलोपावली काय अडचणी येतात हाच मुख्य विषय. तरीही ‘पीएचडीकॉमिक्स’ला अफाट लोकप्रियता मिळाली. यामुळे प्रोत्साहित होऊन होर्हेनं यावर चित्रपट काढायचं ठरवलं. कार्टून स्ट्रिपमध्ये जी मुख्य पात्रे आहेत – तीन पीएचडी विद्यार्थी आणि प्राध्यापक – तीच पात्रे चित्रपटातही आहेत. विनोद हे मुख्य अंग असल्याने चित्रपट गंभीर मुद्द्यांनाही हसत-खेळत हाताळतो. एका मास्टर्स विद्यार्थ्याला प्राध्यापक स्मिथ यांच्या प्रयोगशाळेत पीएचडीचा विद्यार्थी म्हणून प्रवेश हवा असतो तर सिसिलियाची पीएचडी चालू असते आणि पुढे काय याचा प्रश्न असतो. इतर पात्रांमध्ये सीनियर विद्यार्थी, पोस्टडॉक आहेत. संशोधन क्षेत्रात रोज येणार्‍या अडचणी इथे पावलोपावली दिसतात. कथा जरी एमआयटीसदृश विद्यापीठात घडत असली तरी काही फरक सोडले तर भारतातही हीच परिस्थिती आहे असं जाणवतं. चित्रपटातील प्रसंगामध्ये बरेचदा कॉमिकस्ट्रिपमध्ये येणारे प्रसंग घातले आहेत. सिसिलियाचे प्राध्यापक वर्गात सुरुवात करताना म्हणतात, “Computer Science – how did we get away with calling it science?” किंवा नवीन विद्यार्थ्याचं स्वागत करताना माइक हा सीनियर त्याला सांगतो, “विद्यार्थ्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे – फ्री फूड.” टीए म्हणून काम करताना अंडरग्रॅड विद्यार्थ्याने टंगळमंगळ करणे, प्रयोगशाळेत काम करताना मशीन मनासारखं न चालणे, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कस्पटासारखं वागवणे इ. नेहमी येणारे अनुभव चित्रपटात जागोजागी दिसतात. ग्रूप मीटिंगमध्ये प्रा. स्मिथ सांगतात – “चांगली बातमी – हवाईमध्ये परिषद आहे. वाईट बातमी – मी एकटाच जाणार आहे.” उत्तरार्धात चित्रपट थोडा गंभीर होतो. नवीन विद्यार्थी माईकला विचारतो, “हे सगळं कशासाठी करायचं? संशोधनाला पैसे मिळवायचे, त्यातून पेपर छापायचे, त्यामुळे अजून पैसे मिळणार, मग अजून पेपर. या दुष्टचक्राला अंत आहे का?” संशोधनक्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकाला कधी ना कधी हा प्रश्न पडतोच.

संशोधनक्षेत्राला जागोजागी कोपरखळ्या मारलेल्या असल्या तरी चित्रपट संशोधनाच्या विरोधात अजिबात नाही. सुरुवातीलाच रिचर्ड फाइनमन बॉंगो वाजवताना दिसतात. शेवटी तेजल सिसिलियाला म्हणते, “गुरुत्वाकर्षणापासून सापेक्षतेपर्यंत बहुतेक सगळे शोध न ठरवता अपघाताने लागले होते, शास्त्रज्ञ जेव्हा त्यांच्या आवडीचं काम करत होते तेव्हा.” चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सगळे कलाकार पीएचडीचे विद्यार्थी, पोस्टडॉक किंवा संशोधनक्षेत्राशी संबंधित आहेत. एका अर्थाने चित्रपटाचे शेवट ‘फिल गुड’ म्हणता येईल पण चित्रपटाचा उद्देश लक्षात घेतला तर यावर फारसा आक्षेप येऊ नये. हॉलिवूड चित्रपटांमध्ये संशोधनाच्या नावाखाली जे काही दाखवतात त्या पार्श्वभूमीवर संशोधनक्षेत्राचं यापूर्वी कधीही न झालेलं दर्शन या चित्रपटात होतं.

दुसरा चित्रपट याच्या अगदी उलट आहे. मागच्या लेखात लोकप्रिय चित्रपट आणि गंभीर, विचार करायला लावणारे चित्रपट यांचा संदर्भ आला होता. ‘द पेंटर’ हा चित्रपट दुसर्‍या प्रकारात मोडतो. डी व्हांग हा द. कोरियाचा शिल्पकार आणि चित्रकार. त्याने २०१२ मध्ये हा चित्रपट बनवला. चित्रपटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आयएमडीबी किंवा इतर कुठेही याची नोंद नाही. व्हांगच्या विकी पानावर याचा उल्लेख आहे आणि यूट्यूबवर चित्रपट उपलब्ध आहे. तिथेही फारशी माहिती नसल्याने उपलब्धता अधिकृत आहे किंवा कसं हे ही कळायला मार्ग नाही पण इतकी कमी प्रसिद्धी बघता कदाचित व्हांगनेच उपलब्ध करून दिला असावा असं मानायला जागा आहे.

चहा करण्याची जशी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तसंच प्रत्येकजण चित्रपट बघताना वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो. यातील कोणतीही पद्धत बरोबर किंवा चूक नसते. मला फोटोग्राफीची आवड असल्याने माझं लक्ष सर्वात आधी अभिनेत्यांपेक्षा कॅमेर्‍याची फ्रेम कशी आहे, रंग कोणते आहेत, किती प्रकाश किंवा अंधार आहे, चित्रपटाचा फिल/टोन कसा आहे (‘सिन सिटी’ की ‘मॅट्रिक्स’ की ‘गॉडफादर’), चित्रपटाची लय संथ आहे की जलद, कॅमेरा कुठून कुठे फिरतो आहे अशा गोष्टींकडे जातं. हे सगळं ठरवून होतं असं नाही, आपोआप होतं आणि मग एखादी गोष्ट चांगल्या किंवा वाईट दृष्टीने उठून दिसली की लगेच लक्षात येते. उदा. ‘द पेंटर’ हा चित्रपट चित्रकार आणि चित्रे या विषयावर आहे आणि तरीही काळ्या-पांढर्‍या रंगात आहे. ‘असं का?’ हा प्रश्न लगेच पडला आणि चित्रपटाच्या शेवटी-शेवटी याचं उत्तर मिळालं. उत्तर खरं तर साधंच आहे, विशेषतः पिकासोच्या ‘ब्लू पिरियड’वगैरेंशी परिचय असला तर लगेच लक्षात यावं. काळ-पांढरं जग नायकाची मन:स्थिती आहे. चित्र काढण्याची प्रेरणा येते तेव्हा तेवढ्या काळापुरते रंग प्रगट होतात आणि नंतर परत पहिल्यासारखं.

नायक प्रथितयश चित्रकार आहे, त्याची शैली अनेकांनी उचलली आहे. पण हल्ली त्याने लोकप्रिय प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्वतःची अभिव्यक्ती अधिक स्वतंत्रपणे प्रकट करायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम म्हणजे त्याचं येऊ घातलेलं प्रदर्शन रद्द होतं कारण लोकांना जास्त विचार करायला लावणारी कलाकृती नको आहे. त्याची मैत्रीण त्याला थोडं कॉम्प्रोमाईझ करायला सांगते पण तो नकार देतो. चित्रपटाची कथा फारशी नाही, संवादही कमी आहेत. कॅमेरा संथ लयीत किंवा कधी कधी स्लोमोशनमध्ये सगळं टिपत राहतो. कॅमेरा बरेचदा नायकाच्या मन:स्थितीप्रमाणे लय बदलतो – संथ, जलद किंवा तर्र असताना झोकांड्या जाणं. प्रदर्शन रद्द झाल्यानंतरचे एक-दोन दिवस हाच चित्रपटाचा काळ आहे. शेवटही फारसा अनपेक्षित नाही. मग या चित्रपटात काय बघायचं? एक म्हणजे द. कोरियाच्या सध्याच्या कलाक्षेत्राचं एक दर्शन इथे घडतं. नायक तर्र असताना बरळतो, “फाईन-आर्टला काय अर्थ आहे? आर्टच्या आधी फाईन हे विशेषण कशासाठी?” ‘कलाकाराने कलेसाठी तडजोड करावी की नाही, लोकानुनय करावा की नाही की मध्यममार्ग पत्करावा?’ हे प्रश्न चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत. खरं तर चित्रपटात कोरियाचे आणि तिथल्या कलाक्षेत्राचे अनेक संदर्भ आहेत पण संस्कृतीशी परिचय नसेल तर यांची ओळख पटणे अशक्य आहे. शेवटी एका प्रसंगात चित्रकाराला चित्र कसं ‘सुचतं’ हे दाखवलं आहे.

चित्रपट बराचसा व्हांगच्या अनुभवांवर बेतलेला असावा असं वाटतं. नेहमीच्या वाटेपेक्षा वेगळी वाट चोखाळणारा चित्रपट आवडत असेल तर बघायला हरकत नाही.