Categories
इतर

फुरसत के रात दिन

डेक्कन कॉलेजचं नाव बहुतेक लोकांना पुरातत्वशास्त्र, भाषाशास्त्र किंवा संस्कृत डिक्शनरी प्रोजेक्टच्या संदर्भात माहीत असतं. जे लोक तिथे सकाळी येऊन संध्याकाळी परत जातात त्यांना तिथली फक्त एक बाजू दिसते. आमचं सगळं लहानपण डेक्कन कॉलेजचा ११० एकर परिसर मनसोक्त हुंदडण्यात गेलं.

डेक्कन कॉलेजचं नाव बहुतेक लोकांना पुरातत्वशास्त्र, भाषाशास्त्र किंवा संस्कृत डिक्शनरी प्रोजेक्टच्या संदर्भात माहीत असतं. जे लोक तिथे सकाळी येऊन संध्याकाळी परत जातात त्यांना तिथली फक्त एक बाजू दिसते. आमचं सगळं लहानपण डेक्कन कॉलेजचा ११० एकर परिसर मनसोक्त हुंदडण्यात गेलं. आता तिथे जंगल झालंय, पण पूर्वी तिथे डेक्कन कॉलेजमध्ये काम करणार्‍यांसाठी घरं होती. आम्ही रहायचो तिथून साधारण एक-दीड मैलावर डेक्कन कॉलेजची हद्द संपायची आणि जय जवान नगर सुरू व्हायचं. जय जवान नगरमध्ये सगळ्या प्रकारचे लोक रहायचे, अजूनही राहतात. वाण्यांची दुकानं, दवाखाने – यासाठी डेक्कन कॉलेजमध्ये राहणार्‍यांना दुसरा पर्याय नव्हता. तिथेच पांडू लमाणाची वस्ती होती. त्याचा दारू गाळण्याचा धंदा होता, अजूनही असावा.

आता डेक्कन कॉलेजची सगळी जमीन वन विभागाला लीजवर दिली आहे, त्यांनी वाटेल तिथे, वाटेल तशी झाडं लावली आहेत. त्याआधी घराजवळच्या प्रत्येक झाडाशी डायरेक्ट ओळख होती. बागेतलं मेंदीचं झाड (मुळाशी मुंगळ्यांचं बिळ आहे), घराच्या समोरचं बोराचं झाड (चढायला सोपं, उतरताना उडी मारावी लागते), रस्त्याच्या पलिकडचं अगडबंब चिंचेचं झाड, (चढणं या जन्मी अशक्य!), देवळातलं चाफ्याचं झाड, घरासमोरचं ‘एल’ शेप असलेल झाड (दोन पाय दोन्हीकडे टाकून टेकून बसायला मस्त!), टेकडीवरच्या बंगल्याच्या समोरचं पिवळ्या फुलांचं झाड (चढायला सर्वात सोपं, चढ्ल्यानंतर फांदीला लोंबकळून उतरायचं), रस्त्यावरच्या दोन बाकांच्या जवळचे वड आणि पिंपळ. इथं संध्याकाळी बसलं तर कधी सांकलिया तर कधी मुल्कराज आनंद फिरायला जाताना दिसायचे. नंतर घर बदलल्यानंतर नवीन बागेत आंबा, कढीपत्ता, चिक्कू, जांभूळ, पेरू, फणस आणि एक बांबूचं बेट. पावसाळ्यात बांबूचे कोंब जमीन फोडून बाहेर यायचे आणि दर दिवशी अर्धा फूट वेगानं वाढायचे.

मी गाण्यांचे दोन प्रकार केले आहेत. एक म्हणजे जी आपल्याला आवडतात आणि आपण मुद्दाम ऐकण्यासाठी लावतो ती. दुसर्‍या प्रकारची गाणी म्हणजे जी आपल्याला सहज ऐकू येतात ती. बसमधला रेडीओ, एखाद्या हाटेलात चहाची वाट बघत असताना वाजणारं सिलसिलाचं गाणं, रात्री बाराला किर्रर्र शांतता असताना एखाद्या कारमधून वाहत आलेलं किशोर-लताचं ‘हम और तुम’, इटलीमध्ये त्रिएस्तेच्या बारमध्ये कॉफी पिताना ऐकलेलं ‘समर ऑफ सिक्टीनाईन’. तुम्ही स्वत:हून गाणं लावता तेव्हा तुमच्या अपेक्षा ठरलेल्या असतात, अशी अचानक ऐकलेली गाणी तुम्हाला बेसावध पकडतात. या जय जवान नगरमधल्या लोकांना लाउडस्पीकरवर गाणी वाजवायला फार आवडायचं. लग्न, बारश्यापासून होळी, दिवाळीपर्यंत प्रत्येक वेळी तेव्हाची हिट गाणी ऐकायला मिळायची. अमर अकबर ऍंथनी, याराना, कुर्बानी, डॉन – एकेका गाण्यासोबत आठवणींचं गाठोडं बाधलं आहे. याशिवाय घरी रेडीओ होताच. या आठवणी आणि ही गाणी का जोडली गेली माहीत नाही. पावसाची गाणी आणि पाऊस समजू शकतो, पण ही गाणी ऐकल्यानंतर ते क्षण लख्ख आठवतात हे मात्र खरं.

दुपारी शाळेत जाताना आलेला महाभयंकर कंटाळा – अनहोनी को होनी करदे, होनी को अनहोनी, एप्रिल-मे, सुट्ट्या, दुपारी रस्त्याकडं पाहीलं की उन्हाच्या झळया दिसायच्या – एक अकेला इस शहर में. उन्हाळ्यात ऊन शिगेला पोचलेलं असताना अचानक ढग दाटून यायचे आणि वळवाचा पहिला पाऊस सुरू व्हायचा – रेडिओवर दिल ढूंढता है चाललेलं. पावसाळ्यात डेक्कन कॉलेज हिरवंगार झालेलं असायचं. घराच्या समोरच टेकडी होती, तिथे बरेच खडक होते. प्रत्येक खडकही ओळखीचा. ओली झाडं, पहावं तिकडे गवत पसरलेलं, खडकांमध्ये पाण्याची तळी साचलेली, अजूनही भुरूभुरू पाऊस चालू आहे – न जाने क्यूं, होता है ये जिंदगी के साथ, रिमझिम गिरे सावन. ढग दाटून आलेले, पाऊस येईल की नाही माहीत नाही, बागेत गार वारा सुटलेला, कॉनटिकी वाचणं चालू आहे – जिंदगी के सफर में, गुजर जाते है जो मकाम.

काही चित्रं सायलेंट आहेत. कधीही आठवतात. मेंदूला या प्रतिमाच का महत्वाच्या वाटल्या त्यालाच ठाऊक! मेंदूचं ऑपरेशन करताना विशिष्ट भागांना विद्युतप्रवाह दिला तर पेशंटला असंच काहीही आठवतं म्हणे.

हिवाळ्यात बागेचा मूड बदलायचा, सकाळी धुकं पडायचं, मांजरं अंथरूणं शोधत यायची. थंडी पडलेली, स्वेटर घालून मच्छरदाणीत हिंदीचा गृहपाठ चाललेला. चार-साडेचारचा सुमार, घराचं दार उघडं, एस.वाय.बी.एस्सीचं केमिस्ट्रीचं पुस्तक हातात, दारातून दिसणारा मावळतीचा सूर्य. बॉटनीचा अभ्यास करताना पुस्तकात ठेवलेले गाण्यांचे, गझलांचे, कवितांचे कागद – रेडिओवर ऐकत असताना घाईघाईत लिहून घेतलेले – मीर तकी मीरची ‘दिखाई दिए यूं’, आनंद मधली ‘मौत तू एक कविता है’, मेरी आवाज ही पहचान है गर याद रहे, सीने में जलन, ये जीवन है इस जीवन का, आने वाला पल. रविवार संध्याकाळ, दूरदर्शनवर कुठलातरी चित्रपट चाललेला, बदाबदा पाऊस कोसळतोय, रस्त्यावरच्या पुलाच्या बाकावर कसलीही फिकीर न करता एक माणूस शांतपणे भिजत बसलाय – जाळीच्या खिडकीतून दिसणारं धुकट वातावरण, वडाच्या झाडाखाली त्या ओल्याचिंब माणसाची आकृती. पाऊस थांबल्यावर हवेत गारवा यायचा, एखाद वेळेस सूर्य डोकवायचा, स्वच्छ, ओली पानं उन्हात चमकायची. आणखीन एक भिजलेली रविवार संध्याकाळ, टीव्हीवर मृणाल सेनचा ‘एक दिन अचानक’. परीक्षेचा हंगाम पण त्याच वेळेला दूरदर्शनवर सत्यजित रे महोत्सव सुरू – रात्री जागून बघितलेले प्रतिद्वंदी, जोलसाघर, अरण्येर दिन-रात्री, महानगर, नायक – परीक्षेचा निकाल काय लागला मेंदू सोईस्करपणे विसरून गेलाय. भर दुपारी टळटळीत उन्हात भाषाशास्त्र विभागाच्या गच्चीवर बसून सगळा परिसर न्याहाळायचा. संध्याकाळी टेकडीवरून सूर्यास्त झाल्यावर बुध-गुरू-शुक्र-मंगळ दिसतात का बघायचं. उन्हाळ्यात वीज गेल्यावर रात्री बाहेर येऊन नक्षत्रं बघायची, सप्तर्षींच्या दिशेने टॉर्च मारून तो प्रकाश तिथे कधी पोचेल याचा विचार करायचा.

अमेली चित्रपटात एक हृद्य उपकथानक आहे. अमेलीला तिच्या घरात एक चोरकप्पा सापडतो. त्यात एक खेळण्यांची पेटी असते, त्या घरात पूर्वी रहात असलेल्या दोमिनिक ब्रोतोदोची. जुने फोटो, गोट्या, खेळणी. अमेली शक्कल लढवून (स्त्राताजेम!) ती पेटी त्याला मिळेल अशी व्यवस्था करते. पन्नास वर्षांनंतर ती खेळणी अचानक समोर आल्यावर ब्रोतोदो सैरभैर होतो, कोलमडतो. ती पेटी इतर कुणासाठीही कवडीमोलाची, पण ब्रोतोदोसाठी तो अमूल्य खजिना आहे.

या चित्रांचं असंच काहीसं आहे. इतर कुणासाठी या सगळ्याचा फारसा अर्थ नाही. अशा आठवणी सगळ्यांच्याच असतात – स्मरणरंजन, गेले ते दिवस अशी लेबलं लावून झटकन पुढे जाता येईल. मात्र ज्या मेंदूत अशी चित्रं कोरली गेलेली असतात त्याला असं नाही करता येत. नोस्टाल्जिया ही भावना अशी आहे की जी सुखद किंवा दु:खद अशा काटेकोर वर्गवारीत बसत नाही. हिचं वर्णन करायला गेलं तर अनेक ठिगळं लावलेली गोधडी शिवतोय असं वाटायला लागतं. या लेखात बहुधा तसंच काहीसं झालंय. या भावनेला व्यक्त करणं कवी लोकांनाच चांगलं जमतं.

दीड-एकशे वर्षांपूर्वीची दिल्ली; चार-साडेचारचा सुमार; मे महिना आणि दिल्लीचा उकाडा पण आज मात्र ढग आलेत; वारा सुटलाय, हवेत काहीसा गारवा आहे; बल्लीमाराच्या एका गल्लीतलं एक छोटसं घर; अंगणातल्या खाटेवर मिर्झा; हातात पेला, समोर हुक्का; वार्‍याची एक मंद झुळूक, बरोबर ओल्या जमिनीचा सुगंध येतो; एक टपोरा थेंब मिर्झाजींच्या मनगटावर पडतो; आठवणींमध्ये हरवून गेलेले मिर्झा त्या थेंबाकडे क्षणभर बघतात आणि सहजपणे त्यांच्या तोंडून शब्द निघतात,

जी ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन


” You know, you are born in a place and you grow up there. You get to know the trees and the plants. You will never know any other trees and plants like that. You grow up watching a guava tree, say. You know that browny-green bark peeling like old paint. You try to climb that tree. You know that after you climb it a few times the bark gets smooth-smooth and so slippery you can’t get a grip on it. You get that ticklish feeling in your foot. Nobody has to teach you what the guava is. You go away. You ask, “What is that tree?” Somebody will tell you, “An elm.” You see another tree. Somebody will tell you, “That is an oak.” Good; you know them. But it isn’t the same. Here you wait for the poui to flower one week in the year and you don’t even know you are waiting. All right, you go away. But you will come back. Where you born, man, you born.”

– The Mimic Men by V S Naipaul