Categories
बुके वाचिते विज्ञान

प्रतिभेच्या आविष्काराचे वेगळे रूप

आपण मेंदू वापरला की चेतापेशींची नवीन जाळी तयार होतात. जो भाग आपण वापरतो त्याचा आकार वाढतो. उदा. संगीतकारांमध्ये मेंदूच्या विशिष्ट भागांचा आकार नेहेमीपेक्षा मोठा असल्याचे आढळले आहे. प्रत्येक नवीन कल्पना, नवीन पद्धत, नवीन तंत्र शिकल्यानंतर आपला मेंदू थोडासा बदलतो आणि हे आपल्या आयुष्यभर अव्याहतपणे चालत असते.

मेंदू नक्की काय चीज आहे ते मेंदूलाच अजून माहीत नाही. संगणकाच्या भाषेत हा प्रश्न म्हणजे ‘एखाद्या भाषेत लिहीलेला कंपायलर पहिल्यांदा कसा कंपाईल करणार?’ यासारखा आहे. अर्थात इथे  ‘बूटस्ट्रॅपिंग‘ हे उत्तर आहे पण मेंदूच्या बाबतीत मात्र अजून तरी ठाम उत्तर नाही. तरीही उत्तराच्या दिशेने प्रवास चालू आहे हे निश्चित. मेंदूची तुलना नेहेमी संगणकाबरोबर केली जाते पण मेंदू बर्‍याच बाबतीत वरचढ आहे. मेंदू आणि संगणकात अनेक फरक आहेत त्यातील एक महत्वाचा फरक म्हणजे मेंदू प्रतिभावंत आहे. या प्रतिभेचं प्रकटीकरण मेंदूमध्ये कसं होतं हा प्रश्न रोचक आहे. गेल्या काही वर्षात एमआरआय किंवा कॅटस्कॅन सारख्या सुविधा उपलब्ध झाल्याने मेंदूची चिरफाड न करता आत काय होतं आहे हे बघणे शक्य झालं आहे.

Book cover of Creating Brainया संदर्भात नॅन्सी आंद्रेआसन यांचं ‘क्रिएटींग ब्रेन’ (Creating Braib) हे पुस्तक वाचनात आलं.  आंद्रेआसन बाईंची कारकीर्द अचंबित करायला लावणारी आहे. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये पीएचडी केलं आणि तीन वर्ष कॉलेजात रेनेसान्स साहित्य शिकवलं. नंतर वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊन मानसशास्त्रामध्ये डॉक्टरची पदवी घेतली. विविध मानसिक आजारांच्या संशोधनामध्ये नवीन इमेंजिंग पद्धतींचा वापर करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. यासाठी इ. स. २००० मध्ये राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्या हस्ते ‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स’ या पारितोषिकाने त्यांचा गौरव करण्यात आला. या पुस्तकात मात्र त्या एका वेगळ्या विषयाबद्दल बोलतात. साहित्याचा अभ्यास करताना त्यातील प्रतिभेचे आविष्कार पाहून त्या अवाक होत असत. नंतर मेंदूचे संशोधन करताना ही प्रतिभा मेंदून कुठे असते, तिला कशी वाट मिळते असे प्रश्न त्यांना पडायचे. पण मेंदूच्या संशोधनामध्ये हा विषय फारसा लोकप्रिय नाही आणि आजारांचे संशोधन अधिक महत्वाचे मानले जाते त्यामुले याला निधी मिळण्याची शक्यताही कमी. अखेर एका खाजगी देणगीदाराकडून निधी मिळाल्यावर त्यांना या दिशेने वाटचाल करता आली.

या पुस्तकात ‘रेनेसान्स साहित्य आणि कलाप्रकार’ यांचा व्यासंग आणि मेंदूचे सखोल ज्ञान यांचा सुरेख मिलाफ झाला आहे. चर्चा करताना लेखक नील सायमन, संगीतकार मोझार्ट, चायकोव्स्की, गणितज्ञ प्वंकारे यांचे अनुभव दिले आहेत. बेंझीन रेणूचा आकार केकूलेला स्वप्नात दिसला हे सर्वश्रुत आहे. मात्र इतर अनेक प्रतिभावंतांचे आविष्कार अशाच पद्धतीने झाले हे पाहील्यावर प्रतिभेचे एक वेगळे रूप समोर येते. मेंदूचे निरनिराळे भाग एकमेकांशी संवाद साधण्यासाठी चेतापेशींचा (neuron) वापर करतात. आपल्या मेंदूमध्ये १००,००० कोटी चेतापेशी असतात आणि त्या एकमेकांसोबत सतत संदेशांची देवाणघेवाण करत असतात. यावरून मेंदूचे कार्य किती गुंतागुंतीचे असेल याची कल्पना यावी. एखाद्या समस्येवर जाणीवेमध्ये मेंदूची झटापट चालू असते, तेव्हा हातात काहीच येत नाही. नंतर कलाकार किंवा संशोधक दुसर्‍या कामात लक्ष घालतात पण त्याच काळात त्यांच्या नेणिवेमध्ये (sub-conscious mind) यावर काम चालू असते. मेंदूचे निरनिराळे भाग कलाकाराच्या नकळत एकमेकांशी ‘बोलत’ असतात. सुरूवातीला हे ‘बोलणं’ तर्कशुद्ध किंवा स्पष्ट नसतं. उत्तर – मग ती कविता असेल, रेणूचा आकार असेल, नवीन सिंफनी असेल किंवा गणिताचे सूत्र असेल – मेंदूमध्ये तयार होत असताना त्याचा जाणिवेला पत्ता नसतो. फक्त काही धूसर अशा कल्पना पृष्ठभागावर असतात. आणि मग एके दिवशी अचानक हवे ते भाग जोडले जातात आणि उत्तर जाणिवेत प्रकट होतं, याला आपण प्रतिभेचा आविष्कार म्हणतो. म्हणूनच लेखिका याचं वर्णन करताना म्हणतात, “In general, creativity is not a rational, logical process.”

हे उत्तर जाणिवेत (conscious mind) आल्यावर कलाकारांना ते कुठून आलं याचा पत्ता नसतो. मग यालाच म्यूझ किंवा इन्स्पिरेशन असं नाव दिलं जातं. मोझार्टला आख्खी सिंम्फनी मन:चक्षूंवर दिसत असे, आणि सिंफनीचे सर्व भाग एकाच वेळी ‘ऐकू’ येत असत. हे मनासारखं झालं की तो फक्त सिंफनी कागदावर उतरवण्याचे काम करत असे. प्वंकारे जेव्हा जाणीवपूर्वक गणित सोडवण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा उत्तर मिळायचे नाही. मग पडद्यामागचे काम संपले की अचानक त्याला हायपरजॉमेट्रिक सीरीजची सूत्रे डोळ्यापुढे दिसत असत.

प्रतिभावंत मेंदूसाठी कोणते घटक आवश्यक आहेत याचे उत्तर देताना लेखिका काही सुचवण्या करतात. यात काही सुचवण्या सर्वांसाठी आहेत तर काही विशेषत: लहान मुलांसाठी.

१. प्रतिभेचा संपर्क: इतिहासात विशिष्ट वेळी प्रतिभेच्या आविष्कारांचे स्फोट झाल्याचे बरेच पुरावे आहेत, चौथ्या-पाचव्या शतकातील ग्रीस किंवा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील पॅरीस. इटलीमधील इ. स. १४०० – १७०० हा रेनेसान्स काळ एक ठळक उदाहरण. आजूबाजूला प्रतिभा असेल तर मेंदूला आपोआप चालना मिळते, नवीन विचारांची देवाणघेवाण होते. हवे ते करण्याचे स्वातंत्र्य, वेगळ्या वाटा चोखाळण्याची निकड, आर्थिक सुबत्ता यासारख्या गोष्टी प्रतिभेला निश्चितच मदत करणार्‍या ठरतात.

२. यूज इट ऑर लूझ इट : जिममध्ये तासनतास घाम गाळून बरेच लोक सिक्स प्याक कमावण्यावर भर देतात. मात्र शरीरातील सर्वात महत्वपूर्ण भागाला व्यायाम कसा मिळेल याचा जाणीवपूर्वक विचार क्वचितच होताना दिसतो. आपण मेंदू वापरला की चेतापेशींची नवीन जाळी तयार होतात. जो भाग आपण वापरतो त्याचा आकार वाढतो. उदा. संगीतकारांमध्ये मेंदूच्या विशिष्ट भागांचा आकार नेहेमीपेक्षा मोठा असल्याचे आढळले आहे. प्रत्येक नवीन कल्पना, नवीन पद्धत, नवीन तंत्र शिकल्यानंतर आपला मेंदू थोडासा बदलतो आणि हे आपल्या आयुष्यभर अव्याहतपणे चालत असते. मेंदू लवचिक करायचा असेल तर तुमच्या नेहेमीच्या क्षेत्रापेक्षा एखादे नवीन क्षेत्र निवडा आणि त्याचा जाणीवपूर्वक अभ्यास करा. तुम्ही आयटीमध्ये असाल तर इतिहासाचा अभ्यास करा. एखादी नवीन भाषा शिका, एखादे वाद्य वाजवायला शिका. मेंदूला चालना मिळेल असे काहीतरी करत रहा. या प्रकारच्या व्यायामाला वयाचे बंधन नाही. मेंदू लवचिक असेल तर अल्झायमरसारख्या रोगांपासून बचाव होण्यासही मदत होते.

३. ध्यान (meditation) – ध्यानासंबंधी बोलताना लेखिका म्हणतात,
If you think that meditation is a silly practice that is performed primarily by warmed-over hippies, think again. The study of the effects of meditation on the brain has become a serious area of research in neuroscience, and it indicates that practicing meditation has measurable beneficial effects on brain function.

बुद्ध भिक्षूंच्या मेंदूचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये ध्यान करताना लक्षणीय बदल आढळून आले आहेत. हे बदल ध्यान संपल्यानंतरही बराच काळ राहतात.

४. टीव्ही बंद करा : विशेषत: लहान मुलांसाठी. टिव्हीवर नेहेमी दाखवल्या जाणार्‍या प्रतिमांचा एक परिणाम म्हणजे मुलांच्य जाणिवा बोथट होतात. त्याऐवजी लेखिका मुलांना वाचनाची सवय लावा असे सांगतात. मुलांना पुस्तके वाचून दाखवणे मूल पाच-सहा महिन्यांचे असतानाच सुरु करायला हवे. ‘वाचाल तर वाचाल’ हा क्लिशे आहे पण सत्य आहे.

तळटीप :

योगायोगाने पुस्तक वाचल्यावर आंतरजालावर मेंदूला व्यायाम देणारे अंकी (Anki)  हे सॉफ्टवेअर सापडले. समजा तुम्ही एखादी भाषा शिकत असाल तर अंकी तुम्हाला रोज त्या भाषेतील काही शब्दांचा अर्थ विचारते. रोज नवीन शब्द देणार्‍या बर्‍याच सायटी आहेत पण त्या शब्दाची उजळणी झाली नाही तर तो विस्मृतीत जाण्याची शक्यता अधिक. याचा मुख्य उपयोग नवीन भाषा, तिचे शब्द, व्याकरण लक्षात ठेवण्यासाठी आहे. याची उत्तरे देणे सोपे गेले की कठीण याची नोंद तुम्ही केल्यानंतर अंकी परत तो प्रश्न किती दिवसांनी विचारायचा हे ठरवते. विविध उपलब्ध प्रकारांमधून तुम्हाला हवी ती प्रश्नावली उतरवून घेता येते. तयार प्रकारांमध्ये बहुतेक भाषेवर आहेत पण जीआरई, अमिनो ऍसिड पासून पायथॉन किंवा जावा अशा गोष्टींवरही प्रश्नावली दिसल्या. तुम्ही पाहिजे त्या विषयावर तुमची प्रश्नावलीही तयार करू शकता. याखेरीज विद्यार्थ्यांना गणिताची सूत्रे, देश-राजधान्या, रसायनशास्त्रातील समीकरणे वगैरे गोष्टी लक्षात ठेवायलाही याची मदत होईल. रोजच्या उजळणीला काही मिनिटे पुरतात.