दिन अभी पानी में हो

चित्रपट हे सर्वात आधी ‘व्हिज्युअल मीडियम’ आहे याची प्रचिती अनेकदा येते. सर्वात पहिले डोळे, मग कान आणि शेवटी मेंदू. नवीन दिग्दर्शकाचा चित्रपट बघताना या चौकटीत काय आहे आणि काय नाही, कोणते रंग आहेत, किती प्रकाश किंवा अंधार आहे यावरून बरंच काही कळतं. फोटोग्राफीची आवड हे ही यामागचं एक कारण आहे. काही दिग्दर्शक आणि त्यांचे छायाचित्रणकार…

चित्रपट हे सर्वात आधी ‘व्हिज्युअल मीडियम’ आहे याची प्रचिती अनेकदा येते. सर्वात पहिले डोळे, मग कान आणि शेवटी मेंदू. नवीन दिग्दर्शकाचा चित्रपट बघताना या चौकटीत काय आहे आणि काय नाही, कोणते रंग आहेत, किती प्रकाश किंवा अंधार आहे यावरून बरंच काही कळतं. फोटोग्राफीची आवड हे ही यामागचं एक कारण आहे. काही दिग्दर्शक आणि त्यांचे छायाचित्रणकार (सिनेमॅटोग्राफर) अशा फ्रेम्स लावतात की प्रसंग सुरू होण्याआधी फक्त त्या चौकटीसाठी दाद द्यावीशी वाटते. बरेचदा उलट प्रवासही होतो. नॅशनल जिओग्राफिकचा एखादा फोटो पाहून वाटतं – हे तर ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ मधलं मॉर्डॉर.

लेखाचा विषय एव्हाना लक्षात आला असेल. सुंदर छायाचित्र म्हणून सहज खपून जाव्यात अशा चित्रपटांमधल्या फ्रेम्स. यात बहुतांशी निसर्ग हा महत्त्वाचा घटक आहे. निसर्गामुळे भारावून जाणं प्रचलित अभिव्यक्तींच्या चौकटींमध्ये कितपत बसतं कल्पना नाही. कदाचित हे डॅफोडिल्स पाहून उल्हसित होणाऱ्या वर्ड्सवर्थ आणि ‘रोमॅंटिसिझम’च्या जवळ जाणारं असू शकेल. इथे काही नेहमीचेच यशस्वी मुद्दामहून टाळले आहेत आणि त्यासाठी आधीच क्षमायाचना करणं योग्य. पाथेर पांचालीचा ट्रेन सिक्वेन्स किंवा गॉडफादरचे काही प्रसंग याबद्दल इतकं लिहिला गेलं आहे की आता लिहिण्यासारखं फारसं काही राहिलं नसावं.

स्पिलबर्गच्या चित्रपटांमध्ये डोळ्यांना मेजवानी असते, विशेषत: जर त्याची शैली आवडत असेल तर. स्पिलबर्गचं वैशिष्ट्य म्हणजे तो काही काही फ्रेम्स परत परत वापरतो आणि त्यांच्यात उत्तरोत्तर सुधारणा झाल्याचं जाणवतं. पाठलागाचा थीम म्हणून वापर त्याच्या ‘ड्युअल’ या पहिल्या चित्रपटातच दिसला. पाठलाग होत असताना वाहनाच्या रिव्ह्यू मिररमध्ये सहसा न आढळणारी गोष्ट दिसणे हे बरेचदा बघायला मिळतं. ‘इंडियाना जोन्स’मध्ये या आरशात हेलिकॉप्टर दिसतं, याची सुधारित आवृत्ती ‘ज्युरासिक पार्क’मध्ये रिव्ह्यू मिररमध्ये महाकाय टी-रेक्सच्या रूपात दिसते. ‘रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क’मध्ये सुरुवातीला एक प्रसंग आहे. हॅरिसन फोर्ड पळत जाऊन नदीत तराफ्यावर असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये शिरतो. पुढच्या शॉटमध्ये पाठलाग करणारे रानटी लोक कॅमेऱ्याकडे पळत येताना दिसतात, पण ते सरळ मैदानावरून पळत येत नाहीत. प्रसंग सुरू होतो तेव्हा मोकळं मैदान दिसतं, मैदानावर छोटासा खोलगट उतार आहे. हा उतार आधी जाणवत नाही, त्यावरून आदिवासींची डोकी हळूहळू वर येताना दिसतात. नेमकी हीच चौकट परत ‘ज्युरासिक पार्क’मध्ये डायनॉसॉरच्या पाठलागात वापरली आहे. स्पिलबर्गच्या लक्षात राहण्याऱ्या फ्रेमपैकी एक म्हणजे सूर्यास्त होत असताना क्षितिजावर मोठं सूर्यबिंब आणि त्याच्या पार्श्वभूमीवर माणसांच्या काळ्या आकृत्या. ‘ड्युएल’चा शेवट सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवरच होतो. ‘रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क’मध्ये हॅरिसन फोर्ड आणि सहकारी उत्खनन करत असताना ही फ्रेम वापरली आहे, तेव्हा यात फारशी सफाई जाणवत नाही. याच फ्रेमची एक आवृत्ती इटीमध्ये सूर्यबिंबाच्या पार्श्वभूमीवर इटी आणि मुलं सायकलवरून उडत जाताना दिसतात. ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’मध्ये सूर्यबिंबाच्या पार्श्वभूमीवर आपल्या एका सहकाऱ्यासाठी कबर खोदणाऱ्या सैनिकांच्या काळ्या आकृत्या विशेष परिणामकारक वाटतात.

ऍंग लीच्या ‘क्राउचिंग टायगर हिडन ड्रॅगन’मध्ये अनेक सुरेख फ्रेम आहेत. पण मला सर्वात जास्त आवडलेली फ्रेम ली मोबाय आणि यु शु लियेन जंगलात चहा घ्यायला थांबतात तेव्हाची आहे. ते थांबतात ती खोली निव्वळ अफलातून आहे. बांबूच्या बेटांमध्ये वेढलेल्या या खोलीला दारं किंवा खिडक्या नाहीत. खिडक्यांच्या जागी नुसती एखादं चित्र असावं त्या आकाराची मोकळी चौकट आहे. आतून पाहिल्यावर या चौकटीमध्ये बाहेरचे हिरवेगार बांबू वाऱ्यावर सळसळताना दिसतात. राखाडी रंगाच्या भिंतीच्या पार्श्वभूमीवर चौकटीतील हिरवेगार बांबू जणू काही एखादं जिवंत चित्र असावं असे भासतात. हा सगळा प्रकार ऍंग ली ची कल्पकता आहे की चीनमध्ये हे नेहमीचं आहे कल्पना नाही पण यामागे ज्या कुणाचं डोकं आहे त्याला सलाम!

Still from Crouching Tiger Hidden Dragon

शेवटच्या ज्या दोन फ्रेम आहेत त्या वेगळ्या आहेत. ते अशासाठी की या पाहून जे मला जाणवलं तेच सर्वांना जाणवेल याची अजिबात खात्री नाही. किंबहुना ‘त्यात काय विशेष?’ असं वाटण्याची शक्यता जास्त. पाश्चात्त्य देशांमध्ये बर्फ पडण्याच्या आधी किंवा पडून गेल्यानंतर – हवेचा पोत बदलतो, त्यात जडपणा आल्यासारखा वाटतो. त्यातही हवा कोरडी असेल तर हे प्रकर्षाने जाणवतं. आपल्याकडच्या मान्सूनच्या ढगाळ वातावरणात हे कधीच जाणवत नाही. इथे तापमान २०-३० डिग्री असल्याने हवेत उकाडा असतो, कदाचित हिमाचल भागात वेगळा अनुभव येत असावा.

या वेळचा हा विशिष्ट मूड पकडणाऱ्या फ्रेम दोन चित्रपटात सापडल्या. पहिला – ऑल द प्रेसिडेंट्स मेन. याचा सिनेमॅटोग्राफर गॉडफादर आणि मॅनहॅटन चित्रित करणारा गॉर्डन विलिस. हे नाव यादीत असेल तर चित्रपट किमान एकदा फक्त चौकट, प्रकाश, अंधार, रंगसंगती यासाठी बघावाच लागतो – कथा, अभिनय, दिग्दर्शनासाठी वायला बघायचा. यात एक प्रसंग आहे. वुडवर्ड ‘डीप थ्रोट’ला भेटून परत जायला निघतो. आपला कुणी पाठलाग करतंय असा संशय आल्यावर पहिल्यांदाच त्याला भीतीची जाणीव होते. या प्रसंगांमध्ये प्रकाशाचा हवा तो परिणाम साधण्यासाठी विलिसने मुद्दाम रस्त्यांवर पाणी टाकून रस्ते ओले केले होते. लक्षात राहणारी फ्रेम यानंतर येते. पहाट होत असावी. शहराच्या एका भागाचा पॅनोरामिक व्ह्यू, सगळीकडे बर्फ पडल्याने रस्ते पांढरे झालेले, आकाशही पांढरं. त्या विस्तीर्ण पटांगणात चिटपाखरूही नाही, वुडवर्डची एकटी आकृती जाताना दिसते, पार्श्वभूमीला मंद संगीत. दहा सेकंदांची ही चौकट अप्रतिम परिणाम साधून जाते.

दुसरी फ्रेम अगदी अनपेक्षित ठिकाणी सापडली. ‘द बोर्न सुप्रिमसी’ हा तद्दन मारधाडीचा चित्रपट. शेवटी जेसन बॉर्न मॉस्कोला जाऊन त्याने ज्या रशियन दांपत्याची हत्या केली त्यांच्या मुलीला भेटतो. तुझ्या आईने वडिलांना मारलं नसून मी मारलं अशी तिला कबुली देतो. परत जाताना बॉर्न एका पटांगणातून पुढे असलेल्या अनेक मजली भव्य अपार्टमेंट कॉम्ल्पेक्सच्या दिशेने जातो आहे. कॅमेरा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीवरून हळूच पॅन होत समोरच्या इमारतीवर स्थिरावतो. इमारतीतले बहुतेक दिवे लागलेले आहेत, रस्त्यावर तुरळक वाहतूक, बर्फाने आच्छादलेली जमीन, पांढरं आकाश, जेसन बॉर्न लंगडत पाठमोरा जाताना दिसतो.

Two frames

या दोन्ही फ्रेममधला प्रकाश आणि त्यामुळे तयार होणारं वातावरण लक्षवेधी आहे. बघताना कथा, प्रसंग, चित्रपट वगैरे क्षणभर बाजूला राहून त्या बर्फाळलेल्या हवेतील जडपणा अंगावर जाणवतो. अशा वेळेचं वर्णन करणं हे आमच्या आवाक्याबाहेरचं काम आहे, तिथे हाडाचा कवीच हवा.

दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन

खरं तर इथे लेख संपायला हवा आणि संपलाही असता, पण काहीतरी राहून गेलं आहे असं वाटत होतं. यथावकाश उत्तर सापडलं. दोन्ही चौकटींमध्ये एकट्या माणसाची आकृती चालत जाताना दिसते आहे. त्यांना पाहून मुराकामीचा नायक आठवला . काही अपवाद सोडले तर त्याच्या बहुतेक कादंबऱ्यांमध्ये हा नायक असाच प्रश्नांची उत्तरं शोधत भटकत असतो. कधी कधी उत्तरं मिळतात पण त्याबरोबर आणखी प्रश्न सापडतात. ‘वाइंड-अप बर्ड क्रॉनिकल’मध्ये ६०० पानं उलटून गेल्यानंतर गूढता थोडी विरळ झाल्यासारखी वाटते आणि त्या बिंदूला मुराकामी थांबतो. थांबताना कादंबरीचा शेवट असा करतो की वाचक त्या गूढतेमध्ये गुरफटून जातात. शेवटचे ते शब्द या दोन चौकटींना आणि त्यांच्या नायकांनाही लागू पडतील असं वाटतं.

“I closed my eyes and tried to sleep. But it was not until much later that I was able to get any real sleep. In a place far away from anyone or anywhere, I drifted off for a moment.”


तळटीपा

१. विशेष हे की बहुतेक चित्रपटांमध्ये स्पिलबर्गची शैली ठळकपणे दिसत असली तरी ‘शिंडलर्स लिस्ट’सारख्या चित्रपटात तो हे सर्व बाजूला ठेवून विषयाला पुरेपूर न्याय देतो, त्या चित्रपटात स्पिलबर्ग नावालाही दिसत नाही. काही विषय असे असतात की तिथे कलाकाराची व्यक्तिगत ओळख गौण असते. निकोल विल्यमसनने केलेल्या ‘हॅम्लेट’ चित्रपटात सुरुवातीला शेक्सपिअर्स हॅम्लेट अशी पाटी आल्यानंतर कोणतेही नाव येत नाही. शेवटी चित्रपटातील सर्व कलाकारांची नावं तोंडी सांगितली जातात. शेक्सपिअरच्या बरोबरीनं आपलं नावही येण्याची आपली योग्यता नाही ही कलाकारांची नम्र जाणीव क्षणभर स्तब्ध करून जाते.

२. मै स्विट्झर्लंड अक्सर जाते रहता हूं, मुझे वहां की शाम बहोत पसंद है.