कलेचा प्रवास आणि मूल्यमापन

नुकताच टाइम मासिकातील एक लेख वाचनात आला. ‘द ग्रेट गॅट्सबी’ ही एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड याची कादंबरी विसाव्या शतकातील एक महत्वाची कलाकृती मानली जाते. मुराकामीसारख्या लेखकाने ‘माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे पुस्तक’ या शब्दात हिचा गौरव केला आहे. अनेक अभ्यासक्रमांना हे पुस्तक लावून विद्यार्थांचे शिव्याशापही घेतले गेले आहेत. पण गुडरीड्स या सायटीवर तब्बल २९,००० लोकांनी या कादंबरीला भिकार, टुकार, कंटाळवाणी अशी शेलकी विशेषणे देऊन आपली नावड व्यक्त केली. एकीने पुस्तक कचर्‍याच्या पेटीत टाकून त्याचा फोटो प्रतिक्रिया म्हणून लावला. तसं बघायला गेलं तर यात फारसं आश्चर्यकारक नाही. कोणत्याही कलाकृतीला श्रेष्ठ म्हणणारे जितके असतात तितकेच तिला नाकारणारेही असतात. मात्र या नेहेमी घडणार्‍या घटनेतून काही रोचक प्रश्न समोर येतात.

कलेचा उगम माणसाच्या नैसर्गिक प्रेरणांमधून झाला असावा. फ्रान्सच्या शोवे इथल्या गुहांच्या भिंतींवरची अंदाजे ३०,००० वर्षे जुनी चित्रे माणसाच्या कलेचा पहिला पुरावा मानली जातात. (नुकतीच स्पेनमध्ये सापडलेल्या निएंडरथाल माणसाने काढलेली चित्रे कदाचित याहूनही जुनी म्हणजे ४२,००० वर्षांपूर्वीची असू शकतील. ) नंतर माणूस जगाच्या निरनिराळ्या भागांमध्ये गेला. भाषा, हवामान, राहणीमान अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे आज आपल्याला दिसणार्‍या नानाविध संस्कृती. गेल्या ३०,००० वर्षांमध्ये बरंच पाणी वाहून गेलंय, पाण्यावरचे पूलही बदललेत.

विसाव्या शतकातील कलाक्षेत्राकडे नजर टाकल्यास संस्कृतीच्या अनधिकृत राजधान्या सहज दिसून येतात. पॅरिस, न्यूयॉर्क, लंडन यासारख्या शहरांमधून जी मासिके निघतात, इथे जी प्रदर्शने भरतात, इथे जे महोत्सव होतात त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली असते. या शहरांमध्ये एक विलक्षण साम्य आहे. ही सर्व शहरे गेल्या काही शतकात ज्या महासत्ता बलाढ्य होत्या त्या देशांमध्ये आहेत. हा योगायोग आहे का? नक्कीच नाही. जेते केवळ संपत्ती, सत्ता हिरावून घेत नाहीत, गुलामांची संस्कृतीही इथे पणाला लागलेली असते. आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंडातील लोक गेल्या काही शतकात स्वत:चे अस्तित्व टिकवण्यात गर्क होते, आज मरू की उद्या अशी परिस्थिती असताना कलेकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला होता?

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना स्वातंत्र्य त्या मानाने लवकर मिळाले. पण इथे एक महत्वाचा फरक असा की ज्यांना स्वातंत्र्य मिळाले ते या खंडाचे मूळ रहिवासी नव्हते. सुरूवातीला आलेल्या युरोपियन वसाहतींचे हे वंशज होते. त्यांनी नंतर आलेल्या आपल्याच बांधवांविरूद्ध युद्ध पुकारून स्वातंत्र्य मिळवले. पण मूळचे अमेरिकन इंडियन जे या खंडावर कित्येक हजार वर्षांपासून रहात होते त्यांच्या परिस्थितीत ‘आजा मेला नातू झाला अन खुंटाला खुंट कायम झाला’ या न्यायाने फारसा फरक पडला नाही. (त्यातही युरोपियन वसाहती झाल्यानंतर कित्येक लाख अमेरिकन इंडियन बाहेरून आलेले नवीन रोग, युद्धे किंवा अमानुष हत्याकांड यांना बळी पडले. ) तीच गत आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांची. जिम क्रोच्या कृपेने यांना खरे स्वातंत्र्य मिळायला विसावे शतक उजाडावे लागले.

अमेरिका आणि युरोपचे नाते लव्ह-हेट रिलेशनशिप आहे. औद्योगिक क्रांतीनंतर सुबत्ता आल्यावर सांस्कृतिक वारसा मिळवण्यासाठी युरोपशिवाय पर्याय नव्हता. युरोपमध्ये उगम पावलेल्या अनेक चळवळी अमेरिकेत लोकप्रिय झाल्या. पण त्याचबरोबर इतर क्षेत्रांमध्ये वर्चस्व मिळत असताना कलेच्या क्षेत्रातही आम्ही मोठे हे दाखवायचे होते. इन-मिन पाच-सहा लेखकांच्या कामाला ‘अमेरिकन रेनेसान्स‘ असे नाव देणे हा या वृत्तीचा एक केविलवाणा परिणाम. हे म्हणजे रितेश देशमुखच्या लग्नाची पार्टी आणि बेजिंग ऑलिंपिक उद्घाटन सोहळा यांची तुलना करण्यासारखे आहे. ( इथे या लेखकांना कमी लेखण्याचा हेतू नाही. मेलव्हिल, थोरो, इमर्सन, एमिली डिकीन्सन प्रतिभावंत होते यात वादच नाही. पण रेनेसान्स या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. ) अमेरिकेत अधिकृत भाषा इंग्रजी असल्याने इतर संस्कृतींच्या अभिव्यक्तींना मुळातच मर्यादा पडतात. ( भारतात प्रत्येक राज्याची स्वत:ची वेगळी सांस्कृतिक ओळख होण्यामध्ये भाषावार प्रांतरचनेचा महत्वाचा वाटा आहे. ) आजही अमेरिकन इंडियन लोकांच्या कलाप्रकारांना दुर्मिळ कला जतन करण्यापलिकडे महत्व नाही.

बाकीच्या खंडांमधील परिस्थिती निराळी होती कारण इथे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य मूळच्या स्थानिक रहिवाश्यांकडे गेले, जेत्यांच्या पिढ्या (सुदैवाने) मागे थांबल्या नाहीत. हळूहळू इथून उगम पावलेले लेखक जागतिक स्तरावर येऊ लागले. अमिताभ घोष एका मुलाखतीत म्हणाले होते, “मी इंग्रजीत लिहायला लागलो तेव्हा इतर पाश्चात्य लेखक आणि समीक्षक यांची मुख्य भावना आश्चर्याची होती. भारतासारख्या देशातला एक लेखक निर्दोष इंग्रजीत लिहीतो आहे हे म्हणजे एखादा कुत्रा गातो आहे असे होते. आता परिस्थिती बरीच सुधारली आहे.” विक्रम सेठ, सलमान रश्दी, नायपॉल यासारख्या लेखकांनी भारतीय कथेला जागतिक स्तरावर नेण्यात यश मिळवले आहे. नायपॉल यांनी इंग्रजी साहित्याची नेहेमीचीच यशस्वी वाट चोखाळण्याचे साफ नाकारले. वसाहतवादाच्या परिपाकामध्ये स्वत:चा शोध घेताना डिकन्सपासून जेन ऑस्टीनपर्यंत सर्व ब्रिटीश लेखक त्यांना परके वाटले. ( ‘द ग्रेट गॅट्सबी’ इतक्या लोकांना आवडले नाही त्यामागे असेच कारण असावे असे वाटते. सध्याच्या जगाशी संबंध लावण्यासारखे त्यांना त्यात काही सापडले नसावे. आणि जर असे असेल तर व्याख्येनुसार ते अभिजात साहित्य ठरू शकत नाही.)

इथे एक महत्वाचा मुद्दा येतो. गेल्या शतकातील जेत्यांच्या देशातील कालमानस (zeitgeist ) आणि बाकीच्या जगातील कालमानस यामध्ये मूलभूत फरक आहेत. संस्कृती, राहणीमान यांच्या अनुषंगाने युरोप आणि अमेरिका येथील कलाप्रकारांचा प्रवास काही विशिष्ट दिशांनी झाला. पण बाकीच्या जगात तसे झाले नाही. बरेचदा राहणीमानाचा दर्जा चांगला नसल्याने कलांकडे दुर्लक्ष झाले. अर्थात पाश्चात्य कलांचे पडसाद उमटलेच नाहीत असे नाही. मग प्रश्न येतो की या राहीलेल्या जगातील कलाकृतींना पाश्चात्य कलाकृतींचे मापदंड लावून त्यांचे मूल्यमापन करणे कितपत योग्य आहे? कला आणि शास्त्र यातील एक मुख्य फरक म्हणजे शास्त्रामध्ये प्रगती एका निश्चित दिशेने होते. रामन इफेक्टचा शोध भारतात लागला तेव्हा भारत गुलामगिरीत होता की स्वतंत्र याने काही फरक पडत नाही. मात्र कलेचा प्रवास कोणत्याही दिशेने होऊ शकतो आणि या प्रवासावर सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा मोठा प्रभाव असतो. यातील कोणतीही दिशा बरोबर किंवा चूक नसते. असे असताना जागतिक साहित्य एका विशिष्ट दिशेनेच चालले आहे (आणि ती दिशा अर्थातच युरोप आणि अमेरिकेतील साहित्यिकांनी ठरवलेली आहे ) आणि आपणही तीच दिशा पकडली पाहिजे असे म्हणण्याला फारसा अर्थ नाही. ( एखाद्या कलाकाराला ती वाट चोखाळावी वाटली तर अर्थातच ते स्वातंत्र्य आहेच. सत्यजित रे यांच्या शैलीवर रन्वारसारख्या फ्रेंच दिग्दर्शकांचा मोठा प्रभाव होता. ) किंबहुना सध्या प्रचलित असलेले मापदंड हेच अंतिम आहेत असे मानायलाही काही आधार नाही. दुर्दैवाने जागतिक स्तरावर पारितोषिके निवडताना बरेचदा याच अलिखित नियमानुसार व्यवहार चालतात हे सत्य आहे. शैक्षणिक भाषेत या प्रकाराला hegemony असे नाव आहे.

युरोपियन सांस्कृतिक वर्चस्वाचे पडसाद काही वेळा जेत्यांचे राज्य नसणार्‍या देशांमध्येही झाले. टर्कीच्या इतिहासात त्या देशावर एकदाही पारतंत्र्याची वेळ आली नाही. तरीही कायम युरोपच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि युरोपियन समाजात आपल्याला स्थान मिळावे अशी महत्वाकांक्षा बाळगणारे टर्कीचे विचारवंत आणि कलाकार मानसिकरीत्या नेहेमीच युरोपच्या गुलामगिरीतच राहीले. (हीच अवस्था दस्तोयेव्ह्स्कीच्या काळात रशियामधील विचारवंतांची होती. ) ओरहान पामुकने याबद्दल बरेच लिहीले आहे. या वृत्तीचे एक उदाहरण म्हणजे सोळाव्या शतकात टर्कीमध्ये बलाढ्य ओटोमान साम्राज्याच्या राजवटीत ‘मिनिएचर पेंटींग’ हा चित्रकलेचा एक अनोखा प्रकार लोकप्रिय होता. नंतर युरोपमध्ये ‘इंप्रेशनिझ्म’चे वारे वाहू लागले आणि त्या लाटेचा परिणाम म्हणून मिनिएचर पेंटींग ही कला लयाला गेली. या कलेचा लोप पामुकच्या गाजलेल्या ‘माय नेम इज रेड’ या पुस्तकाचा गाभा आहे.

या वर्चस्वाचा आणखी एक परिणाम म्हणजे जागतिक स्तरावर बहुतेक करून जेत्या देशांमधील कलाकारांनाच स्थान मिळत राहीले. गालिबसारख्या अलौकिक प्रतिभाशाली कवीला वर्डस्वथ, शेले यांच्या रांगेत स्थान मिळायला हवे, पण आज जागतिक पातळीवर मूठभर संशोधक सोडले तर त्याचे नावही कुणाला माहित नाही. चीनसारख्या पाच हजार वर्षांचा सांस्कृतिक वारसा सांगणार्‍या देशात अनेक प्रतिभावंत कलाकार होऊन गेले. चीनबाहेर त्यांची दखल कोण घेणार? (विक्रम सेठचे चिनी कवितांच्या अनुवादाचे पुस्तक ‘थ्री चायनीज पोएट्स’ वाचनीय आहे.) रेनेसान्सच्या काळात युरोपमध्ये प्रतिभेचा महापूर आला हे खरे पण इतर जगात प्रतिभावंत झालेच नाहीत असेही नाही.

कलेच्या इतिहासाबाबत आढळणारा एक रोचक मुद्दा म्हणजे साधारणपणे ज्या देशाची आर्थिक परिस्थिती चांगली असते तिथली संस्कृती अधिकाधिक लोकप्रिय होताना दिसते. (जय हो!) शीतयुद्ध चालू असताना सीआयएने रशियाविरूद्ध वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने मॉडर्न आर्टला एक शस्त्र म्हणून वापरले. मॉडर्न आर्टला मान्यता मिळण्यात पडद्यामागे सीआयएच्या मदतीचा मोठा वाटा होता. टॉम क्रूझपासून ऑपरापर्यंत हॉलीवूडचे स्टार लोक मुंबईच्या उकाड्यात हसतमुखाने येत आहेत. याला कारण बॉलीवूडची गुणवत्ता अचानक हजारपट वाढली आहे असे आहे का? अजिबात नाही. गुणवत्ता इराणच्या कितीतरी चित्रपटांमध्येही ठासून भरलेली असते, तिथे का बरं कुणी जात नाही? द होल थिंग इज दॅट के भय्या सबसे बडा रूपय्या.

भारतात परिस्थिती बदलते आहे. पण उण्यापुर्‍या पन्नास वर्षांमध्ये क्रांतिकारक बदल होणे अवघड आहे. आपल्या देशाचे दुर्दैव हे की आपला प्रवास पाश्चात्य देशांच्या उलट – सुवर्णकालाकडून अंधारयुगाकडे झाला. अठराव्या शतकामध्ये जागतिक व्यापारात ५० % वाटा भारत आणि चीन यांचा होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही टक्केवारी २ % वर आली होती. एकविसाव्या शतकात कदाचित ज्याला ‘पोएटीक जस्टीस’ म्हणता येईल अशी परिस्थिती येऊ घातली आहे. युरोपची गंगाजळी धोक्यात आहे. अमेरिकेने स्वत:च्या जळत्या घराकडे दुर्लक्ष करून नेहेमीप्रमाणे इतर देशांमध्ये नाक खुपसणे चालू ठेवले, पण या वेळी ते अंगाशी आले आहे. याउलट भारत, चीन, ब्राझील यांची परिस्थिती आधीपेक्षा बरीच सुधारली आहे. अशा परिस्थितीमध्ये कलाक्षेत्रावर याचे पडसाद न उमटणे अशक्य आहे. शिवाय आताचे जग रेनेसान्स किंवा एनलायटनमेंट पेक्षा फारच वेगळे आहे. आंतरजालामुळे सामान्य लोकांच्या मताकडे दुर्लक्ष करणे कठीण होऊ लागले आहे.

एकविसाव्या शतकात हा प्रवास कसा होईल हे बघणे रोचक ठरावे.

—-

तळटीप
१. बरेचदा युरोपातील मान्यवर कलाकारांनी इतर संस्कृतींमधील कल्पना वापरल्या. पिकासोच्या कलाकृतींमध्ये आफ्रिकन कलेचा बराच प्रभाव होता. पण ज्या कलाकारांपासून त्याला ही प्रेरणा मिळाली ते अंधारातच राहिले. हा विरोधाभास दाखवणारी आफ्रिकन चित्रकार शेरी सांबा याची चित्रमालिका बोलकी आहे. पहिल्या चित्रात पिकासो आणि आफ्रिकन चित्रकार दाखवले आहेत. दुसर्‍या चित्रात ते चित्रे घेऊन प्रदर्शनाला जात आहेत. तिसर्‍या चित्रात पिकासो नाही, मात्र आफ्रिकन चित्रकार गर्दीमध्ये हरवला आहे. त्याचे चित्र अजूनही त्याच्याजवळच आहे, त्याला प्रदर्शनात जागा मिळालेली नाही.
चित्रमालिकेचे शीर्षक आहे – Quel avenir pour notre art? – आमच्या कलेचे भविष्य काय?

गेल्या काही दशकांमध्ये आफ्रिका, आशिया येथील चित्रकारांना संधी देण्याचे विशेष प्रयत्न झाले आहेत.