चांदोबा, चांदोबा भागलास का?

चांदोबामध्येही बरेचदा राक्षसाचं शीर धडावेगळं व्हायचं. इतकंच नव्हे तर पानभर चित्र काढून ते धडावेगळं केलेलं शीर आणि आजूबाजूचा रक्ताचा सडा साग्रसंगीत दाखवलेला असायचा. सुदैवाने याचा आमच्या बालमनावर परिणाम होईल या भीतीने ही मासिकं आमच्या हातातून काढून घेतली गेली नाहीत आणि आम्हालाही हळूहळू पडलेल्या मुंडक्यांची सवय झाली. दर दोन पानावर मरे त्याला कोण रडे?

हल्लीच्या मुलांचं बालपण आणि सत्तर-ऐंशीच्या दशकामध्ये जन्मलेल्या मुलांचं बालपण यातील फरक म्हणजे संजीव कपूरने केलेली बिर्याणी आणि युट्युबवर तो व्हिडो बघून घरी केलेली बिर्याणी यातल्या फरकाइतका आहे. खरं तर प्रत्येक पिढीमध्ये असा फरक येताच असतो पण या शतकाच्या सुरुवातीपासून तंत्रज्ञानाने जी अफाट प्रगती केली आहे त्यामुळे ही दरी रुंदावली आहे. त्या काळी टीव्ही नुकताच आलेला, त्यावर एकमेव च्यानल आपलं दूरदर्शन. ते सुद्धा २४ तास नाही तर फक्त संध्याकाळी. सिनेमातली गाणी फक्त गुरुवारी अर्धा तास आणि आठवड्याला मोजून दोन सिनेमे – शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी. रविवारी सकाळी  ‘स्टार ट्रेक’, ‘शेरलॉक होम्स’, ‘भारत एक खोज’. टीव्हीचं व्यसन वगैरे लागणं शक्य नव्हतं कारण व्यसन लागण्याइतका बिचारा चालू असायचाच नाही.

मग मुलांनी करायचं काय? या प्रश्नाचं आमच्या घरात योग्य उत्तर होतं याबद्दल आकाशातल्या बापाचे अनेक आभार. त्या काळात चांदोबा नावाचं मासिक मुलांसाठी निघायचं आणि आमच्या एका काकांनी १९६० पासूनचे सगळे अंक जमवून आम्हाला भेट दिले होते. त्या अंकांची किती पारायणे झाली त्याची गणती नाही पण वाचनाची आवड तिथे सुरु झाली.

परवा या अंकांचा गठ्ठा परत सापडला – अर्थात छापील अंक नव्हेत तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. अंक चाळताना बऱ्याच नवीन गोष्टी लक्षात आल्या. या अंकांमध्ये छोट्या गोष्टी असायायच्याच, पण काही मोठ्या गोष्टी अनेक भागांमध्ये यायच्या. यातल्या विशेष आवडत्या म्हणजे ‘तिळ्या बहिणी’, ‘तीन मांत्रिक’ आणि ‘भल्लूक मांत्रिक’.

tin mantrik

या गोष्टींमध्ये मांत्रिक, जादूगार, राक्षस वगैरे मंडळींची रेलचेल असायची. जोडीला भस्मे, अंजने वगैरे जादुई साहित्य. जेवढ्या राजकन्या तितकेच राजपुत्र. म्हणजे वर तिळ्या बहिणी आहेत तर त्यांना राक्षसाच्या तावडीतून सोडवायला तिळे राजपुत्र म्हणजे शेवटी भागाकार करताना बाकी शून्य आली म्हणजे झालं. आजच्या काळात मुलांचं संगोपन कसं करावं यावर भरपूर माहिती आहे. त्या काळात पालकांना यावर विचार करायला फारसा वेळ नसायचा. चांदोबामध्येही बरेचदा राक्षसाचं शीर धडावेगळं व्हायचं. इतकंच नव्हे तर पानभर चित्र काढून ते धडावेगळं केलेलं शीर आणि आजूबाजूचा रक्ताचा सडा साग्रसंगीत दाखवलेला असायचा. सुदैवाने याचा आमच्या बालमनावर परिणाम होईल या भीतीने ही मासिकं आमच्या हातातून काढून घेतली गेली नाहीत आणि आम्हालाही हळूहळू पडलेल्या मुंडक्यांची सवय झाली. दर दोन पानावर मरे त्याला कोण रडे?

आज हे अंक चाळताना काही वेगळया गोष्टी जाणवतात. एखाद वेळेस अंकाच्या सुरुवातीला संपादक बालमित्रांशी हितगुज म्हणून दोन शब्द बोलायचे. नोव्हेंबर १९७५ च्या अंकात हे हितगुज आहे.

हे वाचलं आणि अंगावर काटा आला. इन-मिन चार वाक्यांचं प्रकरण.  दिवाळी आहे, मजा करा हे सांगताना संपादकांना “सर्व वस्तू बाजारात मिळू लागल्या आहेत” हे ठळकपणे नमूद करण्याची गरज भासते याचा अर्थ त्या काळात किती भीषण टंचाई असेल! प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांनी हिंदूमध्ये आणि इतरत्र बरीच वर्षे लेख लिहिले. त्यांचे हे लेख अनेक कारणांसाठी वाचनीय आहेत. तांदुळावरचं रेशनिंग संपल्यानंतर नारायण यांचा एक लेख आला होता. लेख नर्मविनोदी असला तरी त्यामागचं भीषण वास्तव जाणवल्यावाचून राहवत नाही. रेशनिंग सुरू होतं तेव्हा कुठेही लग्नसोहळा असेल तर पाहुण्यांना आपापला शिधा बरोबर घेऊन जावा लागत असे. अचानक अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची धाड पडली तर काय करायचं यासाठी हा खटाटोप. अधिकारी आले तर कचऱ्यात पत्रावळी किती यावरून किती धान्य वापरलं याचा हिशेब घेत असत आणि धान्यवापर मर्यादेत आहे किंवा नाही हे ठरवीत असत. कधीकधी समारंभ सुरू असताना यजमान एका रांगेतील लोकांना हळूच नेत्रपल्लवी करून बोलावीत. हे लोक शक्य तितक्या गोपनीयतेने एका अज्ञातस्थळी जात आणि गुपचुप जेवण उरकून येत. त्यांचं झाल्यावर मग पुढची रांग. आज काही टिचक्या मारल्या तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून हवी ती वस्तू दारात हजर होते. पण ब्रिटिश गेल्यावर आपला देश कंगाल झाला होता ही वस्तुस्थिती आहे.

याच अंकात एक दुःखद बातमीही आहे. चांदोबाचे संचालक श्री. चक्रपाणी यांच्या निधनाची बातमी.

श्री. चक्रपाणी आणि श्री. नागिरेड्डी यांनी त्या काळात आम्हा मुलांवर जे अनंत उपकार केले ते विसरणे शक्य नाही.

—-

परदेशांमध्ये आणि इथे काय फरक आहेत याबद्दल बरंच लिहून झालंय – स्वच्छ रस्ते, नियमित वाहतूक वगैरे वगैरे. पण तिथली एक गोष्ट फार विशेष आहे आणि त्याबद्दल फारसं वाचलेलं नाही. आजवर मी जितक्या देशामध्ये राहिलो – इटली, फ्रान्स, जपान – सगळीकडे प्रत्येक मुख्य शहरात किमान एक लायब्री होती. माझ्याकडे जी कागदपत्रे होती त्यांच्या आधारावर मला तत्काळ मेंबरशिप मिळाली आणि त्यासाठी एक पैसाही द्यावा लागला नाही. आठ-दहा पुस्तकं, डीव्हीडी, सीडी – महिनाभर वाचा, बघा, ऐका (पाश्चात्य शास्त्रीय संगीताच्या शिड्या मनसोक्त ऐकल्या). शिवाय त्यांच्याकडे नसेल एखादं पुस्तक तर बिचारे मागवायचे. पहिल्यांदा हा अनुभव घेतला तेव्हा मला हंबरडा फोडावासा वाटला. माझा आधीचा अनुभव पुणे विद्यापीठातील जयकर लायब्रीचा होता. तिथे हवी ती पुस्तके मिळायची मारामार होतीच​, शिवाय तुमचा विषय नसेल तर ते पुस्तक तुम्हाला घेता येणार नाही असा अजब औरंगजेबी नियमही होता. आम्ही सायन्सचे त्यामुळे कथा-कवितांचे दरवाजे आमच्यासाठी कायमचे बंद​. शिवाय आत जाऊन​ पुस्तकं चाळायला पवरानगी नव्हती. पुस्तकाचं नाव त्या बाईंना द्यायचं मग त्या आत जाऊन​ पुस्तक घेऊन येणार​. गोष्टीमधली चेटकीण ज्या तन्मयतेने जादुई पोपटाचं रक्षण करते त्याच तन्मयतेने त्या बाई पुस्तकांचं रक्षण करायच्या. चुकुन एखादा विद्यार्थी आत पुस्तकं चाळताना दिसला तर वस्सकन अंगावर यायच्या. आता परिस्थिती बदलली असेल अशी आशा आहे.

हवी ती पुस्तके मुबलक प्रमाणात सहज उपलब्ध असणे ही खरी सुबत्ता!