कुठेतरी वाचल्याचं आठवतं, लहानपणी ज्या गोष्टींकडे तुमचा नैसर्गिक ओढा असतो, त्या गोष्टी मोठेपणी तुमच्या ‘ट्रू प्याशन’ असतात. (आता प्याशनला नेमका मराठी शब्द सापडत नाहिये पण थोडक्यात सांगायचं तर ज्या गोष्टी करताना तुम्हाला इतका आनंद होतो की यातून पैसे मिळावेत ही अपेक्षाही नसते.) हे किती लोकांच्या बाबतीत खरं आहे कल्पना नाही पण माझ्या बाबतीत तरी १०० % खरं आहे. लहानपणी पहिल्यांदा टाइपरायटर बघितला तेव्हा लगेच त्यात कागद टाकला आणि टंकायला सुरुवात केली. अर्धा पानभर एका सुमार कथेची सुरूवात होती, एक माणूस अंधाऱया रात्रीत चालत जातो आहे, पाऊस कोसळतो आहे वगैरे वगैरे. कथा सुमार होती यात काही नवल नाही. नवल ह्याचं वाटतं की आपलं नाव टाइप करायचं सोडून हे भलतं-सलतं टाइप करायची बुद्धी कुठून झाली?
हातात कॅमेरा आला तेव्हा फारसा प्रयास न करता हाताळताही येऊ लागला. पुढे जाण्याआधी या शतकात जन्मलेल्या तरुणाईसाठी दोन शब्द. ऐंशीच्या दशकात कॅमेरा म्हणजे एक अभूतपूर्व चीज होती. एकतर तो कमी लोकांकडे असायचा आणि ज्यांच्याकडे असायचा ते त्याला जिवापाड जपायचे. कॅमेरा वापरण्याचे प्रसंगही साधे नसायचे – वाढदिवस, काश्मिर किंवा कन्याकुमारीची ट्रिप वगैरे. लग्नासारखा मोठा प्रसंग असेल तर त्यावेळी व्यावसायिक फोटोग्राफरला बोलावलं जायचं. मग तो भला मोठ्ठा कॅमेरा घेऊन यायचा आणि ढीगभर फोटो काढायचा. ते अल्बममध्ये ठेवून वर्षानुवर्ष बघितले जायचे. काहीवेळा फोटोग्राफरचा नैसर्गिक ओढा, झरा किंवा धबधबा लग्नाला नटून-सजून आलेल्या म्हैलावर्गाकडे जास्त असायचा.
रोजच्या जेवणाचे फोटु काढायचे ही कल्पना “पास्ता-पिझ्झा” इतकीच अतर्क्य होती. (हे वाक्य वाचल्यावर नियती खदाखदा हसली कारण भारतीय डॉमिनोज पिझ्झामध्ये “मोरोक्कन स्पाइस पास्ता पिझ्झा” नावाचा अनाकलनीय प्रकार विकला जातोय आणि लोक प्रेमाने त्याचे फोटूही काढत असणार.) जर तुमच्याकडे जुन्या फोटोंचा अल्बम असेल तर त्यात फक्त खाद्यपदार्थांचे फोटो सापडतात का बघा. कॅमेऱ्यात जो रोल असायचा त्यातून छत्तीसएक फोटो निघायचे. त्यातले एक-दोन वाया जायचे कारण रोल भरताना थोडीशी फिल्म एक्सपोज व्हायची. फोटोग्राफीतील तज्ज्ञ मंडळी हा उद्योग ‘डार्करूम’मध्ये करायची म्हणजे ते दोन फोटोसुद्धा वाया जायचे नाहीत.
तर अशी सगळी मागची ब्याकग्राऊंड असताना फुल्ल लोडेड कॅमेरा हातात आल्यावर माझा आनंद तो काय वर्णावा! तासभर बागेत भटकूनही निर्णय होईना की फोटो कसला काढावा. शेवटी एक फुलपाखरू दिसलं आणि मी आयुष्यातला पहिला फोटो काढला.
कॅमेऱ्याशी ओळख झाल्यावर माझा चित्रपट बघायचा दृष्टिकोनही बदलला. दिग्दर्शक नावाचा कुणीतरी असतो, त्याच्या जोडीला एक सिनेमॅटोग्राफरही असतो याचं ज्ञान झालं आणि मग हे दोघे काय करत आहेत ते लक्षपूर्वक बघायला लागलो. आजही चित्रपट बघताना माझं अर्धं लक्ष क्यामेरा कुठे चाललाय, शॉट कुठे कट होतो आहे याकडे असतं.
माझं कॅमेराप्रेम उत्तरोत्तर वाढतच गेलं आणि पहिल्या जपानफेरीमध्ये हा सुंदर क्यामेरा घ्यायचा योग आला. Canon EOS 7 28-105 mm आणि a 90-300 mm f/4.5-5.6 zoom lens.
मात्र बदलत्या काळाची चाहूल मला थोडी उशिरा लागली. काही वर्षातच डिजिटल कॅमेरे वापरात आले आणि एकदा स्मार्टफोन आल्यावर फिल्म कॅमेरा म्हणजे म्युझियममध्ये ठेवण्यासारखी वस्तू झाली. तरीही या अद्भुत यंत्राच्या माध्यमातून मला अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवता आहे हे ही खरं.
माझ्या मते छायाचित्रे दोन प्रकारची असतात. पहिली म्हणजे जिथे छायाचित्राचा विषय इतका भन्नाट असतो की फोटोग्राफरला करण्यासारखं फारसं काही उरत नाही. आल्प्सची पर्वतराई, अरोरा बोरियालीस किंवा कलोस्सीयम यांचे फोटो सहसा चुकत नाहीत. तसंच सुंदर सूर्यास्तही.
आणि तरीही जर फोटोग्राफर निष्णात असेल तर आपली वेगळी छाप पाडल्यावाचुन राहत नाही. याविषयी विस्ताराने नंतर.
आता यातही एक उपविभाग आहे जिथे विषय रोचक असतो पण तिथे फोटोग्राफरही ताकदीचा लागतो. एक उदाहरण म्हणजे अभिनेते किंवा मॉडेल यांची छायाचित्रे. इथे विषय लाख रोचक असेल पण फोटोग्राफरला नेमका क्षण पकडता यायला हवा ज्यातून त्या अभिनेत्रीची ‘पर्सनॅलिटी’ समोर यायला हवी. दुसरं उदाहरण म्हणजे वन्यजीवांचे फोटो काढणारे फोटोग्राफर. इथे विषय तुमच्या नियंत्रणाखाली नसतो. वाघाला किंवा हत्तीला ‘पोझ’ घ्यायला कसं सांगणार? इथे फोटोग्राफरकडे कौशल्य, चिकाटी, आणि एकाग्रता या तिन्हींची गरज असते. पुरावा हवा असेल तर खेळणाऱ्या भूभू किंवा माऊचा फोटो काढण्याचा प्रयत्न करा.
दुसऱ्या प्रकारची छायाचित्रे म्हणजे जिथे विषय सामान्य असतो. फोटोग्राफर आपल्या कौशल्याने अशी ‘फ्रेम’ जमवतो की त्या सामान्य दृश्यातून असामान्य कलाकृती तयार होते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्ट्रीट फोटोग्राफी.’ प्रसिद्ध चिनी छायाचित्रकार फॅन हो या विषयातील एक तज्ज्ञ आहे. साध्या रस्त्यावरच्या प्रसंगातून त्याने उभ्या केलेल्या कलाकृती असामान्य आहेत.
पूर्वीची फिल्म वापरून केलेली फोटोग्राफी बऱ्यापैकी गुंतागुंतीची होती. तुमचा कॅमेरा फक्त ‘क्लिक’ करण्याऱ्या कॅमेऱ्यापेक्षा आधुनिक असला तर ‘शटर स्पीड’, ‘एक्सपोझर’ वगैरे बऱ्याच भानगडी होत्या आणि यांचा समन्वय साधला तरच फोटो चांगला येण्याची शक्यता होती. आता स्मार्टफोन आणि फिल्टरच्या जमान्यात या सगळ्या गोष्टी आपोआप होत आहेत. मग फोटोग्राफरला करण्यासारखं काय उरलं?
याचं उत्तर आहे ‘कॉम्पोझिशन.’
कॅमेरा कितीही आधुनिक असला तरीही ‘फ्रेम’ कोणती ठेवायची, ‘फ्रेम’मध्ये काय ठेवायचं, काय गाळायचं, फोटोच्या मध्ये काय असेल किंवा १/३ अंतरावर काय असेल हे सगळे निर्णय फोटोग्राफरला करावे लागतात. आणि इथेच उस्ताद मंडळी त्यांचं कौशल्य दाखवतात. गिझा पिरॅमिडच्या माझ्यासारख्या पामरांनी काढलेल्या हजार फोटोंपेक्षा निष्णात फोटोग्राफरने काढलेला एक फोटो छाप पाडून जातो. याचं कारण गिझा पिरॅमिडसारख्या जगप्रसिद्ध विषयातही निष्णात फोटोग्राफर अशी ‘फ्रेम’ शोधून काढतो जी त्या विषयाकडे एका नवीन दृष्टिकोनातून बघायला आपल्याला प्रवृत्त करते.
मेरियम-वेबस्टर डिक्शनरीमध्ये फोटोग्राफर या शब्दाचा अर्थ “one who practices photography” असा दिलेला आहे.
या व्याख्येमध्ये बदल व्हायला हवा हे उघड आहे कारण आज स्मार्टफोन असणारे सर्वजण फोटोग्राफर आहेत. मात्र शब्दाचा कीस काढणं एकवेळ बाजूला ठेवलं तर आजच्या जगाची एक विशेषता समोर येते. तुमच्यामध्ये गायक, नर्तक, लेखक, संगीतकार, अभिनेता किंवा फोटोग्राफर होण्यासाठी आवश्यक गुणवत्ता आहे का याचा पडताळा आज कुणालाही घेता येण्याची संधी आहे. आज कुणीही आपली कलाकृती थेट लोकांपर्यत पोचवू शकतो – मध्ये कुणाचाही अडसर येत नाही.
थोर विचारवंत लॅरी डेव्हिड यांच्या शब्दात सांगायचं तर