१५ जुलै २०१२ रोजी कोरियन पॉप गायक सायने त्याच्या नव्या अल्बममधलं एक गाणं – ओपन गंगनम स्टाइल – युट्युबवर चढवलं. आंतरजालावर लोकांनी एकमेकांना पाठवल्यामुळे – वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी – एखादी गोष्ट लोकप्रिय झाली तर ‘इट हॅज गॉन व्हायरल’ असं म्हणतात. याचा अर्थ युट्युबर लाख-दोन लाख हिट्स मिळणं असा असतो. काही महिन्यांपूर्वी आलेलं ‘कोलावेरी-डी’ गाणं एक उदाहरण. गंगनम स्टाइलच्या बाबतीत जे झालं ते या सगळ्याच्या पलीकडचं होतं. पहिल्याच दिवशी युट्युबवर या गाण्याला पाच लाख हिट्स मिळाल्या आणि मिळत राहिल्या. महिन्याभरात जगभरातल्या मीडियाचं लक्ष या गाण्याकडे गेलं. वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल सारख्या वृत्तपत्रांनी याची दखल घेतली. सायला इलेन डीजनरेस आणि सॅटरडे नाइट लाइव्ह सारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये बोलावण्यात आलं. ब्रिटनी स्पिअर्स, टॉम क्रूझ, रॉबी विलियम्स, केट पेरीसारख्या सेलेब्रिटीजनी ट्विटरवर गाण्याची शिफारस केली. आता परिस्थिती हाताबाहेर गेली होती. हे लिहीत असताना या गाण्याला युट्युबवर ४४ कोटी हिट्स मिळाल्या आहेत आणि सर्वात जास्त लाइक्स मिळालेला व्हिडिओ (सध्या ३९ लाख) म्हणून गिनिस बुकमध्ये याची नोंद झाली आहे.
हे सगळं वाचल्यावर या गाण्यात इतकं लोकप्रिय होण्यासारखं काय आहे याबद्दल उत्सुकता वाटते. गाणं पहिल्यांदा बघितल्यावर बरेच धक्के बसतात. साय कोणत्याही ऍंगलने पॉपस्टार वाटत नाही. सिक्स प्याक वगैरे लांबची गोष्ट, सायची शरीरयष्टी ज्याला जाड म्हणता येईल आणि ज्याला बघितल्यावर ऋजुता दिवेकर काळजीत पडू शकतील अशी आहे. गाण्याची चाल आणि बीट्स लक्षात राहण्यासारखे आहेत आणि एक-दोनदा ऐकलं तर परत परत ऐकावंसं वाटतं. गंगनम हा सेउलमधील एक ‘पॉश एरिया’ आहे. तिथे उच्चभ्रू, श्रीमंत लोक राहतात. गाण्यात या लोकांची खिल्ली उडवली आहे. गाण्यातलं नृत्य ‘सिली’ या प्रकारात मोडतं आणि ते प्रयत्नपूर्वक तसं केलेलं आहे. गाणं तयार करताना सायने ‘क्राउडसोर्सिंग’ केलं. गाण्यामधील नृत्य कोणत्या प्रकारचं असावं यासाठी त्याने कोरियातील ‘डान्स कम्युनिटी’कडून सूचना मागवल्या. (नृत्यामध्ये बॉलीवूडचा प्रभावही दिसतो. ) पण ही सगळी लक्षणं आहेत, यावरून गाणं इतकं लोकप्रिय का झालं हा पेच हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूसारख्या वृत्तपत्रांनाही सुटलेला नाही.
माल्कम ग्लॅडवेलनं ‘टिपिंग पॉइंट’ या पुस्तकात एखादी गोष्ट, एखादी फॅशन लोकप्रिय कशी होते, त्यामागे कोणते घटक असतात याचा शोध घेतला आहे. यासाठी एखादी बुटांची फॅशन किंवा एखाद्या रूम फ्रेशनरची लोकप्रियता अशी उदाहरणं घेतली आहेतच, शिवाय अमेरिकन क्रांतीच्या सुरूवातीला पॉल रिव्हियरने ब्रिटिश फौजांच्या आक्रमणाचा इशारा देण्यासाठी जी घोडदौड केली तिचीही मीमांसा केली आहे. या सगळ्या उदाहरणांमधून ग्लॅडवेल एखाद्या गोष्टीला अमाप लोकप्रियता कशी मिळते याबद्दल काही निष्कर्ष मांडतो. एक आहे ‘स्टीकीनेस फॅक्टर. ‘ एखादी गोष्ट एकदा पाहिल्यावर लोकांच्या लक्षात राहते की ते लगेच विसरतात? जाहिरात करणाऱ्या कंपन्यांना हे पक्कं माहीत असतं. म्हणूनच जाहिरातीत सचिन दिसला, तिचं जिंगल लक्षात राहण्यासारखं असलं की ती जाहिरात लोक सहजासहजी विसरू शकत नाहीत. दुसरा निष्कर्ष आहे तो म्हणजे या गोष्टीची शिफारस कोण करतं आहे. समजा मला एखादं हाटेल आवडलं आणि ते मी संपर्कातल्या सगळ्यांना सांगितलं तर त्यामुळे हाटेलची लोकप्रियता वाढेल का? नाही. असं होण्यासाठी शिफारस करणारी व्यक्ती ‘कनेक्टर’ असावी लागते. कनेक्टर म्हणजे ज्या व्यक्तीचा जनसंपर्क अफाट आहे अशी व्यक्ती. साहजिकच चित्रपट अभिनेते, गायक अशा व्यक्ती नैसर्गिकरीत्या कनेक्टर असतात. गंगनम स्टाइल या दोन्ही परीक्षा पास होतं. गाण्याचा स्टीकीनेस फॅक्टर प्रचंड आहे आणि गाण्याला ज्या सेलेब्रिटीजनी ट्विट केलं आहे त्या सगळ्या ‘सुपरकनेक्टर’ आहेत.
ही कारणं अर्थातच सर्वसमावेशक नाहीत. यामुळे गाणं लोकप्रिय व्हायला हातभार लागला हे नक्की पण यामागे इतरही कारणं आहेत. एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे गाणं सायने प्रताधिकारमुक्त केलं आहे. याचा अर्थ कायद्याच्या बडग्याची भीती न बाळगता कुणीही गाण्याचं विडंबन करून युट्युबवर चढवू शकतो. इतर लोकप्रिय पॉप स्टार गाण्याचं विडंबन झालं तर कायदेशीर कारवाई करतात, मात्र सायने ही गोष्ट आपल्या फायद्यासाठी वापरली आहे. गाण्याची अनेक विडंबनं (पॅरडीज) झाली आणि त्यामुळे गाण्याची लोकप्रियता आणखी वाढत गेली. कारण विडंबन म्हणजे मूळ कलाकृतीची जाहीरातच नाही का? सायला जस्टीन बायबरच्या एजंटने करारबद्ध केलं आहे. कोरियन पॉप गायकाला या प्रतीची जागतिक लोकप्रियता मिळणं हे पहिल्यांदाच होतं आहे. तुमच्याकडे काहीतरी वेगळं असेल, जुन्या प्रताधिकाराच्या कल्पनांमध्ये अडकून न राहता बदलणाऱ्या नियमांना आपल्या फायद्यासाठी वापरण्याची कल्पकता असेल तर लोकप्रियतेसाठी महागडी जाहिरातबाजी करावी लागत नाही हे सायने दाखवून दिलं आहे. एक्सकेसीडीसारख्या व्यंगचित्रकारांनी हे ओळखलं आहे.
ट्विटर आणि फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर वाढतच राहणार आहे आणि यामुळे गेल्या शतकात आंतरजाल येण्याआधी रूढ झालेल्या चालीरीती, नियम आणि कायदे बदलावे लागणार असं स्पष्ट दिसतं आहे. हे अर्थातच सर्वांना मान्य नाही आणि यातूनच सोपा-पिपासारखे बथ्थड कायदे जन्माला येतात. एखाद्या कलाकृतीची प्रत केली तर प्रताधिकार भंग होतो का यासारखे प्रश्न आता नील गेमनसारखे प्रतिष्ठित लेखकही विचारत आहेत. नील गेमन आणि कोएल्लोसारख्या लेखकांनी नवीन पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याची प्रत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली होती. यामुळे पुस्तकाचा खप कमी न होता वाढला असं त्यांच्या लक्षात आलं.
सोशल मीडियामुळे अनेक प्रकारचे संदेश पसरणं सोपं झालं आहे. यातील बहुतेक संदेश महत्त्वाचे नसतात, काही उपद्रवकारकही असतात पण काही समाजाच्या भल्यासाठीही असतात. याचं एक ताजं उदाहरण नुकताच इस्राइलमध्ये बघायला मिळालं. इराण आणि इस्राइल देशांमधलं वातावरण सध्या तापलेलं आहे. दोन्ही देशातील राजकारणी एकमेकांविरुद्ध वाट्टेल तसे आरोप करत आहेत, युद्धाच्या धमक्या रोज दिल्या जात आहेत. रॉनी इस्राइलमध्ये राहणारा एक ग्राफिक डिझायनर. हे सगळं पाहून त्याला वीट आला आणि त्यानं फेसबुकवर एक पोस्टर तयार केलं. हे इराणच्या लोकांना उद्देशून होतं. संदेश साधा होता, ‘इरानियन्स, वी लव्ह यू. वी विल नेव्हर बॉम्ब यू. ‘ दुसऱ्या दिवशी त्याला इराणच्या लोकांकडून भरभरून प्रतिसाद आले. मिडीयानेही याची दखल घेतली.
यातून काही साध्य होईल का? सांगणं कठीण आहे. मात्र ही बातमी वाचल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहॉवर यांचं एक वाक्य आठवलं. “Indeed, I think that people want peace so much that one of these days governments had better get out of their way and let them have it.”