Categories
बुके वाचिते

उंबेर्तो एको यांचा चक्रव्यूह – द नेम ऑफ द रोझ

कथा थोडक्यात सांगायची झाली तर एका मठात एका भिक्षुचे प्रेत सापडते. मठात आलेले दोन पाहुणे याचा शोध घेत असतानाच एकामागून एक इतर भिक्षुंची प्रेते संशयास्पद स्थितीमध्ये आढळतात. शेवटी – पाचशेव्या पानावर – रहस्याचा उलगडा होतो. यात नवीन काय? अगाथा ख्रिस्तीच्या जवळपास प्रत्येक कथेमध्ये याहून वेगळं काही नाही. पण पुस्तक वाचायला सुरूवात केल्यावर हळूहळू फरक जाणवायला लागतात आणि शेवट येईपर्यंत ही दरी इतकी वाढते की खून कुणी केले किंवा रहस्य काय होते हे प्रश्न काहीसे बाजूला पडतात. शीर्षकामध्ये आलेल्या चक्रव्यूह या शब्दाचा अर्थ कथानक किंवा रहस्य गोंधळून टाकणारे आहे इतका सरळ नाही – अर्थात रहस्यकथेला आवश्यक असलेल्या क्रमवार नाट्यमय घटना यात आहेतच – पण ही एक सरळसोट रहस्यकथा नसून रहस्यकथा हे एक माध्यम म्हणून वापरले गेले आहे. या माध्यमातून एको यांना काय सांगायचे आहे हा कळीचा मुद्दा आहे. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्याचे विविध अर्थ लावले गेले. नंतर एको यांनी ‘द की टु द नेम ऑफ द रोझ’ हे पुस्तक लिहून त्यांना अभिप्रेत असलेले अन्वयार्थ मांडले. याचे अन्वयार्थ लावणारी इतर लेखकांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. पुस्तकावर आधारलेला शॉन कॉनेरी आणि ख्रिश्चियन स्लेटर अभिनित चित्रपटही येऊन गेला.

एको हे पूर्ण वेळ लेखक नाहीत. बोलोन्या (Bologna) विद्यापीठामध्ये ते मध्ययुगीन कालखंड आणि चिन्ह विज्ञान (semiotics) यावर संशोधन करतात. त्यांनी या विषयांवर अनेक पुस्तके, निबंध लिहीले आहेत. ‘द नेम ऑफ द रोझ’ त्यांची पहिली आणि सर्वात गाजलेली कादंबरी. चौदाव्या शतकातील एका भिक्षुने त्याच्या मठात घडलेल्या काही घटनांचे वर्णन योगायोगाने एको यांच्या हाती पडले. हे वर्णन एका फ्रेंच लेखकाने सतराव्या शतकात लॅटिनमधून अनुवादित केले होते. याचे इतर संदर्भ मिळवून, फ्रेंच अनुवादातील अतिरिक्त भाग टाळून एको यांनी ही कादंबरी लिहीली. थोडक्यात – चौदाव्या शतकात एका जर्मन भिक्षुने उत्तर इटलीमधील एका मठात घडलेल्या काही घटनांचे लॅटीनमध्ये केलेले वर्णन एका फ्रेंच लेखकाने अनुवादित केल्यानंतर एको यांनी ते इटालियन भाषेत आणले. (त्याच्या इंग्रजी अनुवादावर आधारित हा लेख मराठीत लिहीला आहे.)

एको यांची बरीच वैशिष्ट्ये आहेत. त्यातले एक म्हणजे त्यांचा छाती दडपायला लावणारा व्यासंग. मिलानमध्ये त्यांच्या घराच्या बहुचर्चित ग्रंथालयामध्ये ५०,००० पुस्तके आहेत. त्यांचा हा व्यासंग त्यांच्या लिखाणातही दिसतो. त्यांच्या टीकाकारांचे म्हणणे आहे की हा केवळ देखावा आहे. एको मुद्दाम आपल्या वाचकांना न्यूनगंड देण्यासाठी असे करतात असे म्हणायलाही एकाने कमी केले नाही. अर्थातच एको यांना हा आरोप मान्य नाही. जेवढी आवश्यक आहे तेवढी माहिती मी देतो, तिचा उपयोग वाचकांनी हवा तसा करावा असे त्यांचे म्हणणे आहे.

कथा आत्ताच्या उत्तर इटली आणि फ्रान्स यांच्या सीमेवरील एका मठात घडते. मूळ हस्तलिखितामध्ये ठिकाणाचा उल्लेख नाही. मठात येणारे दोन पाहुणे आहेत – बास्करव्हिलचा विल्यम आणि त्याचा शिष्य अद्सो. ही पात्रे सरळसरळ शेरलॉक होम्स आणि वॉटसन यांच्यावर आधारलेली आहेत. कॉनन डॉयलच्या प्रसिद्ध ‘हाउंड ऑफ बास्करव्हिल’ मधले बास्करव्हिल हे विल्यमचे गाव. विल्यमचे वर्णन आणि स्वभाव होम्सशी बराच मिळताजुळता आहे. पुस्तकाच्या सुरूवातीलाच विलियम मठातील घोडा नाहीसा झालेला असताना त्याच्या टापाच्या खुणांवरून तो कुठे असेल याचे भाकित करतो आणि ते खरे ठरते. कथा पुढे गेल्यानंतर मात्र विल्यम आणि होम्समधील फरक जाणवू लागतात. किंबहुना होम्स आणि त्या अनुषंगाने त्या ढंगाच्या रहस्यकथांवर टिप्पणी करायच्या हेतूनेच एको यांनी ही पात्रे निवडली असावीत असे वाटते. कथेचा निवेदक अद्सो आहे मात्र तो ही कथा सांगतो तेव्हा त्याच्या आयुष्याचा शेवट जवळ आला आहे. तरूण असताना घडलेल्या एक अविस्मरणीय अनुभवाची नोंद करावी असे त्याला वाटते.

कथा ज्या काळात घडते त्या वेळेस युरोपात बर्‍याच गुंतागुंतीच्या घडामोडी चालू होत्या. रोममध्ये पोप ख्रिस्ती धर्मावर स्वत:चे वर्चस्व मिळवण्यासाठी झगडत होता. त्याला फ्लोरेन्स किंवा बोलोन्या अशा ठिकाणी संघटीत झालेल्या फ्रान्सिस्कन आणि दोमिनिकन शाखांच्या धर्मोपदेशकांकडून विरोध होत होता. फ़्रान्सिस्कन विचारसरणी स्वीकारणार्‍यांमध्ये रॉजर बेकन आणि ‘ओकॅम वस्तरा’ फेम विल्यम ओकॅम यांचा समावेश होता. येशू ख्रिस्त गरीब होता आणि आयुष्यभर गरिबीतच राहीला. त्यामुळे त्याच्या भक्तांनीही तसेच रहायला हवे असे फ्रान्सिस्कन गटाचे म्हणणे होते. अर्थातच हे पोपला मान्य नव्हते कारण असे झाल्यास कॅथोलिक चर्चची सार्वभौम सत्ता अवैध ठरली असती. यावर तोडगा काढण्यासाठी या गटांमध्ये अनेक बैठका झाल्या. विल्यम आणि अद्सो अशाच एका बैठकीची बोलणी करण्यासाठी मठात आलेले असतात.

कथेचा काळ अत्यंत महत्वाचा आहे. रेनेसान्सचा सुवर्णकाल यायला अवकाश होता, छपाईयंत्राचा शोध लागायचा होता. छापखाना माणसाच्या प्रगतीमध्ये किती महत्वपूर्ण होता याची कल्पना आज करणे कठीण जाते. ज्याप्रमाणे भारतात वैदिक कालापासून ज्ञान मिळवणे ही काही विशिष्ट वर्गांचीच मक्तेदारी होती तसाच प्रकार या काळात युरोपमध्ये होत होता. जी पुस्तके ख्रिस्ती धर्माच्या विरोधी होती त्या पुस्तकांवर बंदी घातलेली होती. कथेतील मठामध्ये एक विशाल ग्रंथालय असते. तिथे ठिकठिकाणाहून नक्कल करून आणलेली अमूल्य पुस्तके असतात. मात्र ही पुस्तके वाचायची परवानगी सर्वांना नसते. एखादे पुस्तक वाचायचे तर मठाच्या मुख्याची परवानगी घ्यावी लागते. मठातील ग्रंथालय ही आजच्यासाखी सोपी, सुटसुटीत इमारत नसून एक प्रकारचा भूलभुलैय्या असते. ग्रंथालयाची रचना ही एका प्रकारे कथानकाच्या गुंतागुंतीचे रूपक आहे. ग्रंथपालाची आज्ञा मोडून रात्री ग्रंथालयात चोरून पुस्तके वाचायला जाणार्‍या भिक्षूंना अंधारात रहस्यमय आकृत्या दिसतात. ज्या भिक्षुंचा खून होतो ते सर्व एक विशिष्ट पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत असतात. हे पुस्तक असते ऍरिस्टॉटलचे विनोदावरचे पुस्तक. आज याची एकही प्रत उरलेली नाही.

वॉटसनप्रमाणेच अद्सो विल्यमला सतत प्रश्न विचारत राहतो. इतर भिक्षु आणि विल्यम यांच्यात बरेच वादविवाद होतात. या सर्वांमधून त्या काळातील नियमांची, परिस्थितीची ओळख होत जाते. चर्चला विनोदाचे इतके वावडे का या प्रश्नाचेही उत्तर शेवटी मिळते. येशू ख्रिस्त हसल्याचा कुठेही उल्लेख नाही. विनोदाचे हत्यार सामान्य लोकांच्या हातात पडले तर चर्च आणि देव यांची त्यांना भीती रहाणार नाही. ते बेबंदपणे वागतील. विनोदाबद्दल समर्थांच्या ‘टवाळा आवडे विनोद’ सारखीच पण तुलनेने कितीतरी कठोर मानसिकता समोर येते.

पुस्तकाला निश्चित असा शेवट नाही. नायक शेरलॉक होम्सवर बेतला असल्याने हा विरोधाभास अधिक प्रखरपणे जाणवतो. होम्स कथेच्या शेवटी सगळ्या अडचणी बिनचूक सोडवतो मात्र विल्यम शेवटी रहस्य उलगडल्यानंतरही अधिकच गोंधळतो. तो म्हणतो, “निश्चित असे रहस्य नव्हतेच, आणि उलगडले ते ही अपघातानेच.” ऍरिस्टॉटलचे पुस्तक विल्यमला शेवटी सापडते पण ते पूर्ण न वाचताच तो या पुस्तकात काय असेल हे सांगतो. पुस्तकांमध्ये नेहेमी इतर पुस्तकांचा संदर्भ असतो. एके ठिकाणी अद्सो म्हणतो, “Until then I had thought each book spoke of the things, human or divine, that lie outside books. Now I realized that not infrequently books speak of books: it is as if they spoke among themselves.”

कथेतील मुख्य पात्रे इतर पुस्तकांमधून घेतलेली आहेत. कथेवर अर्जेंटिनाचे प्रसिद्ध लेखक होर्हे लुई बोर्हेस यांचा कथांचाही बराच प्रभाव आहे. कथेतील एका आंधळ्या ग्रंथपालाचे पात्र खुद्द बोर्हेस यांच्यावर आधारित आहे. आणखी एक महत्वाची प्रेरणा आहे जेम्स जॉइसची युलिसिस. युलिसिसमध्ये जॉइसने जो शब्दांचा चमत्कार केला आहे तसाच काहीसा प्रकार इथेही घडतो फक्त इथे शब्दांऐवजी कल्पना आहेत. पुस्तकाचे नावही पुरेशी संदिग्धता निर्माण करते. रोझ म्हणजे नेमके काय? कालौघात ऍरिस्टॉटलचे हरवलेले पुस्तक? शेवटी ग्रंथालयाला आग लागते त्या आगीत भस्म झालेली अमूल्य पुस्तके? की शेक्सपिअरच्या ‘अ रोझ बाय एनी अदर नेम..” या प्रसिद्ध वाक्याचे विडंबन? एको यांच्या मते कथेमध्ये वाचक हा एक महत्वाचा घटक आहे. दिलेले सर्व संदर्भ वाचकाला कळतील असे ते गृहीत धरून चालतात. अशा वाचकाला ते आदर्श वाचक मानतात. पुस्तकातील प्रथमदर्शनी खुणा फसव्या आहेत. होम्सकथेसारखी सुरूवात होते पण शेवट नाही. वाचकांच्या ठरलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी इथे अपेक्षाभंगच होतो – मात्र परत काळजीपूर्वक वाचन करताना कथेत लपलेल्या खुणा त्याला उमगतील. गंमत म्हणजे ‘काफ्का ऑन द शोर’ या कादंबरीबाबत वाचकांनी प्रश्न विचारले असताना मुराकामीनेही पुस्तक परत वाचण्याचा सल्ला दिला.

‘द नेम ऑफ द रोझ’ बर्‍याच पातळ्यांवर भावते. मात्र हे पुस्तक ‘दा विंची कोड’ सारखी झटपट भूक भागवणारे ‘फास्ट फूड’ नाही. हा सकस आहार आहे आणि तो पचवण्यासाठी कष्ट करावे लागतात. एकोंच्या म्हणण्यानुसार पुस्तकाची पहिली १०० पाने बरीच दुर्बोध आहेत पण जो वाचक यातून तरेल तोच खरा. जणू पूर्वीच्या काळी भिक्षुंची जशी सत्वपरीक्षा घेतली जात असे तसे काहीसे. असे असले तरी या पुस्तकाची लोकप्रियता अबाधित आहे. फिट्झेराल्डच्या ग्रेट गॅट्स्बीला नाकारणार्‍या वाचकांनी या पुस्तकाची भरभरून प्रशंसा केली आहे. तब्बल १७,००० वाचकांनी याला पाच तारे दिले आहेत. एको यांना अभिप्रेत असलेला आदर्श वाचक होणे फार थोड्या लोकांना जमेल तरीही बाकीच्यांनाही या कथेतून बरेच काही मिळते आहे याची ही पावती आहे. रेनेसान्सच्या आधीचे जग, तेव्हाच्या लोकांची विचारसरणी या सर्वांचे विहंगम दर्शन या कथेतून होते. पुस्तके सहजासहजी उपलब्ध होणे ही साधीशी वाटणारी घटना किती क्रांतीकारी ठरली याची कल्पना येते.

Categories
बुके वाचिते

उत्कंठावर्धक रहस्यमालिका : मिलेनियम ट्रिलॉजी

२००४ मध्ये स्टीग लारसन या स्वीडीश पत्रकाराने दोन जाडजूड कादंबर्‍यांची हस्तलिखिते एका प्रकाशकाकडे पाठवली. तिसर्‍या कादंबरीचे काम चालू होते. पहिल्या प्रकाशकाने हस्तलिखिते साभार परत पाठवली. (नंतर आपल्या या निर्णयाबद्दल त्याने कपाळ बडवून घेतले असणार.) दुसर्‍या एका प्रकाशकाने तीन कादंबर्‍यांसाठी स्टीग लारसनला करारबद्ध केले. तिसरी कादंबरी पूर्ण करून पाठवल्यानंतर काही दिवसांनी लिफ्ट बंद होती म्हणून ५० वर्षांचा लारसन काही मजले चढून गेल्यावर ऑफिसातच कोसळला आणि हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. या तीन कादंबर्‍या अनुक्रमे २००५, २००६ आणि २००७ मध्ये प्रकाशित झाल्या. मिलेनियम ट्रिलॉजी या नावाखाली या तीन कादंबर्‍यांनी इतिहास घडवला. २००८ मध्ये सर्वाधिक खप असलेल्या लेखकांच्या यादीत खालिद हुसेनीच्या पाठोपाठ लारसन दुसर्‍या क्रमांकावर होता.

या तीन कादंबर्‍या म्हणजे ‘द गर्ल विथ अ ड्रॅगन टॅटू’, ‘द गर्ल हू प्लेड विथ फायर’ आणि ‘द गर्ल हू किक्ड द हॉर्नेट्स नेस्ट’. कादंबर्‍यांची पृष्ठसंख्या नेहेमीपेक्षा थोडी जास्त आहे (५००-७०० पाने). तिन्ही कादंबर्‍या मिळून जवळजवळ १७०० पाने होतात.

कथेची नायिका लिस्बेथ सलांदर एकलकोंडी आहे. लहानपणी बापाच्या मारहाणीतून आईची सुटका व्हावी म्हणून बापाचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिची रवानगी मनोरूग्णालयात झाली. स्किझोफ्रेनिक, डिलुझनल, हिंसक प्रवृत्ती, सहकार्य न करण्याची वृत्ती अशी अनेक निदाने तिच्या रिपोर्टमध्ये आहेत. रूग्णालयातून सुटका झाल्यानंतरही पालकांकडून लैंगिक शोषण, दारूच्या नशेत असताना दोनदा पोलिसांकडून अटक. तिच्या बाजूने म्हणाव्या अशा फारच थोड्या गोष्टी तिच्याकडे आहेत. एक म्हणजे ती अत्यंत बुद्धीमान आहे आणि दुसरे ती एक अफलातून हॅकर आहे. या दोन गोष्टी आणि कुठल्याही प्रसंगामधून वाट काढण्याची तिची प्रवृत्ती यामुळे एकामागून एक कठीण परिस्थितींवर मात करण्यात ती यशस्वी होते. कथेचा नायक मिकेल ब्लूंकविस्ट बराचसा लारसनवर बेतलेला आहे. मिकेल पत्रकार आणि ‘मिलेनियम’ या वृत्तपत्राचा अर्धा मालक आहे.

प्रत्येक लेखक आपापल्या आवडीनुसार आणि कथेच्या मागणीनुसार निवेदक आणि त्याचा दृष्टीकोन यांची निवड करतो. ‘डेव्हीड कॉपरफिल्ड’मध्ये डिकन्सने प्रथम पुरूष निवेदक वापरला नसता तर ती कादंबरी तितकी प्रभावी ठरली नसती कारण तिचे स्वरूप आत्मचरित्रासारखे आहे. रहस्यकथेमध्ये खून कुणी केला हे शोधायचे असेल तर निवेदक खुनी असून चालणार नाही. (अपवाद : अगाथा ख्रिस्तीच्या एका कथेत निवेदकानेच खून केलेला असतो. कथा कोणती ते सांगत नाही, उगीच रसभंग नको.) साय-फाय, रहस्यकथा यात बहुतेक वेळा निवेदक तृतीय पुरूष असतो. बरेचदा या तृतीय पुरूष निवेदकाचा दृष्टीकोन सर्वज्ञाचा असतो. त्याला सगळीकडे काय चालले आहे त्याची माहिती असते आणि तो पात्रांच्या मनातले विचारही जाणतो. याउलट ‘हॅरी पॉटर’मध्ये निवेदक तृतीय पुरूष आहे मात्र त्याचा दृष्टीकोन सर्वज्ञाचा नाही तर हॅरीचा आहे. हॅरीला ज्या गोष्टी माहीत आहेत त्याच गोष्टी निवेदकाला आणि पर्यायाने वाचकांना माहीत आहेत.

लारसन तृतीय पुरूष सर्वज्ञाचा दृष्टीकोन निवडतो. निवेदक पात्रे आणि घटना यांच्यामधून वेगाने वाट काढत जातो. पात्र बदलले की बहुतेक वेळा नवीन पात्राच्या नावाने नवीन परिच्छेद सुरू होतो. लारसेनची प्रसंगांचे वर्णन करण्याची शैली वेळ न घालवता चटकन मुद्यावर येते. चटपटीत संवादांमुळे कथानकाचा वेग कुठेही कमी झाल्याचे जाणवत नाही.

पहिल्या कादंबरीत मिकेल एका ४० वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाचा शोध लावण्याचे काम करत असताना योगायोगाने त्याची भेट लिस्बेथशी होते. तिच्या मदतीने तो या रहस्याचा छडा लावण्यात यशस्वी होतो. दुसर्‍या कादंबरीत अनेक नाट्यपूर्ण घटनांमध्ये लिस्बेथवर तीन खुनांचा आरोप येतो आणि ती फरार होते. तिसर्‍या कादंबरीत लिस्बेथला अटक आणि तिच्यावरील खटला चालू असताना या सर्व घटनांना एक वेगळीच कलाटणी मिळते. हे सर्व संक्षेपात सांगण्याचा कारण असे की मिकेल आणि लिस्बेथ यांच्याखेरीज यात आणखी बरीच महत्वपूर्ण पात्रे आहेत. दुसर्‍या महायुधादरम्यान स्वीडनमध्ये निर्माण झालेल्या नाझी संघटना, ७०-८०च्या दशकातील स्वीडनमधील राजकीय घडामोडी, स्विडीश सिक्युरिटी सर्व्हिस अर्थात सॅपो ही स्वीडीश सरकारपासूनही गुप्त ठेवलेली संघटना, १९८६मधील स्वीडीश पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या या सर्व घटनांचे संदर्भ कादंबरीत घडणार्‍या घडामोडींना आहेत. यामुळे प्रत्येक कादंबरीचा कॅनव्हास आधीपेक्षा विस्तृत होत जातो. हे सर्व प्रत्यक्ष वाचण्यातच मजा आहे. कादंबरी स्वीडनमध्ये घडत असल्यामुळे सर्व पात्रे अर्थातच स्विडीश आहेत. त्यामुळे बरेचदा Wadensjöö किंवा Svavelsjö सारख्या नावांचा उच्चार कसा करावा ते कळत नाही. परिणामत: वाचनात मधूनमधून व्यत्यय येतो. अर्थात यामुळेच कादंबरीला खरेखुरे स्विडीश वातावरण मिळते हे ही खरेच. अगाथा ख्रिस्ती, एनिड ब्लिटन यांचे उल्लेख किंवा “The strange thing about the dog is that it did not bark, my dear Watson” हे वाक्य वाचल्यानंतर लारसनची साहित्यिक स्फूर्तिस्थाने कोण असावीत याचा अंदाज येतो.

शीत युद्धादरम्यानच्या काळात युरोपियन देशांमधील एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी खेळले गेलेले डावपेच आणि त्यासाठी बळी पडलेली सामान्य जनता यांचे पर्यवसान हिंसा, क्रौर्य, सूड, निर्दयता यासारख्या भावनांमध्ये रंगून निघालेल्या एका dark, bordering on ominous अशा कथेमध्ये होते. वाचताना ‘सिन सिटी’मधील काहीशी सरियल रंगसंगती आठवते. नायिका सलांदर तिने स्वत: निश्चित केलेल्या मूल्यांना निश्चित जपते, पण बहुतेक वेळा ही मूल्ये समाजाने ठरवलेल्या नीतिमत्तेच्या चौकटीत बसत नाहीत. त्या मानाने मिकेल बराच सरळ आहे पण अंतिम ध्येय महत्वाचे की त्यासाठी चोखाळलेली वाट महत्वाची असा प्रश्न आल्यावर त्यालाही कधीकधी तो पाळत असलेल्या पत्रकारितेच्या मूल्यांशी तडजोड करावी लागते.

कट्टर उजव्या विचारसरणीच्या संघटना, स्वीडनमध्ये ८०-९० च्या काळात निघालेल्या निओनाझी संघटना यांचा लारसनने नेहेमीच विरोध केला. याबद्दल त्याला बरेचदा खुनाच्या धमक्याही मिळाल्या होत्या. त्याचा मृत्यू नैसर्गिक नव्हता असे काही लोक मानतात. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढण्यात त्याने बरेच योगदान दिले. याच्या अनुषंगाने त्याने एक्स्पो नावाचे मासिक काढले. कादंबरीतील मिलेनियम हे मासिक एक्सपोशी मिळतेजुळते आहे.

मिलेनियम सिरीज युरोपात लोकप्रिय झालीच पण अमेरिकेतही या कादंबर्‍यांवर वाचकांच्या उड्या पडाव्यात हे विशेष आहे. हॅरी पॉटरचा अपवाद सोडला तर अमेरिकन वाचक अमेरिकन पार्श्वभूमी नसलेल्या कथांकडे फारसे आकर्षित होताना दिसत नाहीत. मिलेनियम सिरीजवर तीन स्वीडीश चित्रपट निघालेच आहेत, याशिवाय इंग्रजी चित्रपटही स्वतंत्रपणे निघणार आहेत. यात डॅनियल क्रेग मिकेलच्या आणि रूनी मारा सलांदरच्या भूमिकेत दिसतील तर दिग्दर्शक आहे सोशल नेटवर्क फेम डेव्हिड फिंचर. कादंबर्‍यांच्या हक्काचे करार बदलण्याचे प्रयत्नही चालू आहेत. तसे झाल्यास जेम्स बॉंडप्रमाणे सलांदर-मिकेल जोडीच्या कथांची मालिका सुरू होऊ शकेल. लारसनच्या संगणकावर चौथ्या पुस्तकाचे हस्तलिखित अपूर्ण स्वरूपात आहे. त्याची पार्टनर एव्हा गॅब्रिएलसन हिचा चौथी कादंबरी पूर्ण करण्याचा मानस आहे.

कोणताही पूर्वानुभव नसताना एकापाठोपाठ एक तीन तूफान लोकप्रिय कादंबर्‍या लिहीणे लारसनला कसे जमले असा प्रश्न पडणे साहजिक आहे. कदाचित सॉमरसेट मॉम म्हणतो तेच खरे. “There are three rules for writing a novel. Unfortunately, no one knows what they are.”

Categories
बुके वाचिते

कोरियन लेखक चो से-हुई यांची प्रभावी कादंबरी : द ड्वार्फ

शाळेच्या वर्षाचा शेवटचा दिवस. गणिताचा तास चालू आहे. शिक्षक आज सिलॅबसबाहेरचं बोलणार आहेत. कट.

एक जण सरपण गोळा करून त्यावर शेंगा भाजतो आहे. सरपणाचे लाकूड समोर नुकत्याच पाडलेल्या घरांचे आहे. घरे बेकायदा होती. बहुधा.

त्याचा मित्र येतो, त्याचेही घर गेले आहे. अंधार पडल्यावर ते रस्त्याच्या कडेला दबा धरून बसतात. एक कार येते. त्यात ज्या माणसाने या सर्वांच्या घराचे कागद विकत घेतले तो आहे. दोघे त्यावर हल्ला करतात. पैसे, कागद ताब्यात घेतात. कार पेटवून देतात. कट.

शिक्षक सांगतो आहे.

Imagine a solid where you can’t divide inner and outer—a Möbius-type solid. The universe—infinite, endless—we can’t seem to tell its inside from its outside. This simple Möbius strip conceals many truths.

चो से-हुई यांच्या ‘द​ ड्वार्फ‘ या कादंबरीची सुरूवात अशी होते. कादंबरी नेहेमीपेक्षा बर्‍याच बाबतीत वेगळी आहे. कादंबरी लिंक्ड नोव्हेल (कोरियनमध्ये याला yŏnjak sosŏl असे म्हणतात.) स्वरूपात आहे. याचा अर्थ कादंबरीतील प्रत्येक प्रकरण एक छोटी गोष्ट आहे. अशा प्रकारची कादंबरी लिहीताना निरनिराळे लेखक एक-एक प्रकरण लिहीतात. मात्र इथे लेखक एकच आहे. या गोष्टी स्वतंत्रपणेही वाचता येतात आणि सगळ्या गोष्टी सलग वाचल्या तर त्याला कादंबरीचे स्वरूप येते. किंबहुना सुरूवातीला चो से-हुई यांनी या गोष्टी विविध कोरियन मासिकांमध्ये प्रकाशित केल्या होत्या. नंतर त्या एकत्रित करून ड्वार्फ तयार झाली.

कादंबरीचा विषय बेसुमार औद्योगीकरण आणि त्यापायी भरडली जाणारे कामगार लोक हा आहे. १९७०च्या दशकात दक्षिण कोरियात पार्क चुंग ही यांची सत्ता होती. पार्क यांचे मूळ सैन्यातील होते. त्यांनी देशही हुकूमशाहीनेच चालवला. द.कोरियाची आज जी भरभराट दिसते आहे, त्यामागे त्या काळातील श्रमजीवी वर्गाचे केलेले शोषण आहे. चो से-हुई यांनी या कथा या काळातच लिहील्या. कथा लिहीताना त्यांच्या डोळ्यासमोर तेव्हाचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचे हे ध्येय होतेच, पण त्याचबरोबर सरकारच्या सेन्सरशिपपासून बचावही तितकाच महत्वाचा होता. त्या काळात कोरियन नागरिकांवर अनेक बंधने होती. अगदी स्त्रियांच्या केसांच आणि स्कर्टची लांबीही ठरलेली असे. या सर्वांना तोंड देत चो से-हुई यांनी त्या काळातील ज्वलंत प्रश्नांना तोंड फोडले आहेच, शिवाय हे करताना कलेच्या दृष्टीकोनातून एक मास्टरपीस तयार करण्यातही ते यशस्वी झाले आहेत. हे सर्व लक्षात घेतले तर कादंबरीचे किमान दोन वाचकवर्ग ठळकपणे समोर येतात. एक म्हणजे त्या काळातील सामन्य कोरियन जनता, जिला ही कादंबरी सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव करून देते. आणि दुसरा म्हणजे यात समोर दिसते आहे त्याच्या पलिकडे अजून काही आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करणारे वाचक.

गोष्टीतील मुख्य पात्र ड्वार्फ़, त्याची बायको आणि तीन मुले. ड्वार्फला जन्मापासून शारिरीक व्यंगामुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि त्यांचा अंत होईल अशी चिन्हे नाहीत. त्याने बरीच कामे करून पाहिली, नळ दुरूस्तीपासून डोबार्‍याबरोबर खेळ करण्यापर्यंत. सगळीकडे हाल-अपेष्टा. कुठेच, कधीच आशेचा किरण दिसला नाही. यावर त्याच्या कल्पनेत एक उपाय आहे आणि तो म्हणजे समाजात सर्वांना सारखी वागणूक, सारखी संपत्ती मिळायला हवी. कुणाकडेही अधिक संपत्ती आली तर सरकारने त्याला गुन्हेगार ठरवून ती संपत्ती सर्वांना सारखी वाटून द्यावी. कथेमध्ये मोबियस स्ट्रीप आणि तिचे त्रिमितीय स्वरूप क्लेन बॉटल यांचा उल्लेख येतो. लेखक या भूमितीय प्रकारांची आयुष्याशी सांगड घालू पहातो. मोबियस स्ट्रिपवर फिरण्याचा अंत नाही त्याचप्रमाणे या लोकांच्या यातनांचाही अंत नाही. याची आवर्तने सुरूच रहाणार. याखेरीज परत-परत तरूणपणी ध्येयवादाची स्वप्ने बघणारी आणि कालांतराने त्यातील फोलपणा कळून निराशेच्या गर्तेत जाणारी पात्रे भेटतात.

कुठल्याही कथेच्या दृष्टीने दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. कथेचा निवेदक कोण आहे आणि कथा कुणाच्या दृष्टीकोनातून सांगितली जात आहे. ड्वार्फमध्ये प्रत्येक प्रकरणात निवेदक बदलतो, इतकेच नाही तर बरेचदा एकाच कथेमध्ये, वेगवेगळे निवेदक आणि स्थलकाल यांची वाचकाला कुठलीही पूर्वसूचना न देता सरमिसळ केलेली आहे. संवादांमध्ये भूतकाळ आणि वर्तमानकाळ दोन्हींचे संवाद एकापाठोपाठ एक येतात. त्यामुळे निवेदनाला ‘स्ट्रीम ऑफ कॉनशसनेस’चे स्वरूप येते. वेगवेगळ्या निवेदकांमध्ये ड्वार्फची तीन मुले आणि शेवटच्या प्रकरणात कारखान्याच्या मालकाचा उद्दाम आणि काहीसा विकृत असा मुलगा हे येतात मात्र कथानायक ड्वार्फ कधीच येत नाही. त्यामुले त्याच्या मनाची अवस्था इतरांच्या वर्णनातूनच कळते. या सर्वांमध्ये बरेचदा काही वाक्ये थेट वाचकाला उद्देशून आहेत असे वाटते आणि हा वाचक त्या काळातील दडपशाहीला सामोरी जाणारी कोरियन जनता आहे हे लक्षात घेतले तर हा समज आणखी दृढ होतो. उदा.

A nation without dissenters is a disaster. Who is bold enough to try
to establish order based on violence?

अनुवाद उत्कृष्ट आहे यात वादच नाही पण जिथे रूपक किंवा प्रतीकांचा प्रश्न येतो तिथे अनुवाद तोकडा पडतो. एक उदाहरण म्हणजे ड्वार्फ़चे नाव. याबाबत त्याचा मुलगा म्हणतो,

The older man didn’t realize the meaning of Father’s name: kumppuri, reflecting the desire of poor parents for a son to become wealthy.

इथे अनुवाद झाला आहे पण एका मर्यादेपलिकडे त्या संस्कृतीची ओळख असल्याखेरीज याचे महत्व कळणे अशक्य आहे.

काही लेखकांचे साहित्य वाचताना आपण ३६० अंशात १६ क्यामेरे लावून घडणारे प्रसंग बघत आहोत असे वाटते. कथेत घडणा‍‍र्‍या प्रत्येक गोष्टीतील प्रत्येक सेकंदाचे चित्रण आपल्यासमोर असते. चो से-हुई याचे दुसरे टोक पकडतात. निवेदन छोट्या वाक्यांमध्ये, पात्राच्या भावनांचा विचार न करता, काहीशा अलिप्तपणे केलेले आढळते. मृत्यूसारख्या प्रसंगालाही ३-४ ओळींच्या वर जागा नाही. बहुतेक प्रसंगाचे वर्णन तुटकच, पण एखादे वाक्य इतके प्रभावी की त्या तुटकपणामुळे जो मोकळा कॅनव्हास तयार होतो त्यात वाचक आपसूक त्याच्या मनातील रंग भरून टाकतो.

आधुनिक कोरियन साहित्याच्या सर्वोच्च कलाकृतींमध्ये या कादंबरीला गणले जाते. कादंबरी वाचल्यानंतर याची सत्यता पटते.

Categories
बुके वाचिते

ऍन ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट ऑन मार्स

ताजमहालाच्या समोर राहणार्‍यांना रोज उठून ताजमहाल बघितल्यानंतर काय वाटत असेल? की समोर काय आहे त्यांच्या लक्षातही येत नसेल? अतिपरिचय असल्यावर अशी अवज्ञा अनेक गोष्टींबाबत होते, किंबहुना गोष्ट जितकी वरकरणी सामान्य तितकी असं व्हायची शक्यता जास्त. आपण ज्या गोष्टींना गृहित धरून चालतो, त्या तशा नाहीत हे बरेचदा कळणे अवघड असते. यामागे ‘कॉमन सेन्स’ वापरून ठरवलेली गृहीतके बरेचदा असतात. मग एखादवेळेस अशा गृहीतकांना मुळापासून हादरा बसतो आणि आतापर्यंत आपण घोड्यासारखी झापडं लावून जगत होतो असं वाटायला लागतं.

ऑलीव्हर सॅक्स प्रख्यात न्यूरोसाएंटिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ. त्यांचं ‘ऍन ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट ऑन मार्स’ हे पुस्तक बर्‍याच दृष्टीकोनातून डोळे उघडायला लावणारं आहे. सॅक्स त्यांच्या विषयात तज्ज्ञ आहेतच, पण ते त्यांच्या रूग्णांकडे केवळ एक रोचक केस म्हणून न बघता त्यांच्यातल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. या पुस्तकात ते सात रूग्णांबद्दल बोलतात आणि याच्या अनुषंगाने ते काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. पुस्तक वाचल्यानंतर दृष्टीहीन किंवा स्वमग्न (autistic) लोकांबद्दल आपल्या समजुतींना परत तपासून बघायची वेळ आली आहे हे प्रकर्षानं जाणवतं.

Book cover of An Anthropologist On Mars

सॅक्स यांचा पहिला रूग्ण जोनाथन आय. एक प्रख्यात चित्रकार आहे. न्यूयॉर्कमध्ये ऍबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिस्ट (abstract expressionist) म्हणून त्यानं बरीच वर्ष काम केलं. १९८६ मध्ये कार मधून जात असताना एका ट्रकने धडक दिल्यामुळे तो बेशुद्ध झाला. नंतर रूग्णालयात तपासणी चालू असताना असं लक्षात आलं की त्याला अक्षरं किंवा रंग ओळखता येत नाहीत. काही दिवसांनी अक्षर ओळखता यायला लागली पण तो पूर्णपणे रंगांधळा झाला. कुठलीही गोष्ट त्याला काळ्या-पांढर्‍या आणि राखाडी रंगांमध्ये दिसायला लागली. तो चित्रकार असल्यामुळे याची भीषणता त्याला अधिक जाणवली. याआधी त्याचं जग रंगांवरच आधारलेलं होतं, सामान्य माणसापेक्षा रंगांशी त्याची अधिक जवळीक होती. प्रत्येक गोष्टीच्या रंगांच्या छटा त्याला तोंडपाठ होत्या. अपघातानंतर त्याला स्वत: काढलेली चित्रही परकी वाटायला लागली.

आपण रंग बघतो तेव्हा नेमकं काय होतं? शाळेत शिकवताना डोळा आणि क्यामेरा यांची जी तुलना केली जाते ती वास्तवापासून इतकी दूर आहे की आता बंद कराला हवी. सफरचंदावरून जे प्रकाशकिरण परावर्तित होतात त्यात बर्‍याच तरंगलांबी असतात आणि प्रकाशझोत कसा आहे यावर कोणते तरंग परावर्तित होणार हे अवलंबून असतं पण आपल्याला सफरचंदाचा रंग बदलताना दिसत नाही. मग रंग कोणता हे कुठ ठरतं, डोळ्यामध्ये की मेंदूमध्ये? मेंदूमध्ये रंगांचं विश्लेषण करण्यासाठी एक खास केंद्र असतं. हे केंद्र मेंदूच्या आठवणी आणि इतर भागांशीही संपर्क ठेवून असतं. आपल्याला एखादा रंग ‘दिसतो’ तेव्हा त्यामागे डोळ्यांनी दिलेली माहिती, आधीच्या आठवणी, आपल्या अपेक्षा या सर्वांचा सहभाग असतो. एखाद्या भाषेत एखाद्या रंगासाठी शब्द नसेल तर ती भाषा बोलणार्‍या लोकांना तो रंग ओळखता येत नाही. अर्थात लाल रंग दिसल्यावर मेंदूत जी संवेदना निर्माण होते ती म्हणजे लाल रंग हे का, कधी, कसे ठरते हा आणखी मूलभूत प्रश्न आहे. याचे उत्तर कदाचित ‘क्वालिया’ (qualia) म्हणजे नेमके काय हे कळल्यावर/कळले तर मिळू शकेल. (हा प्रश्न न्यूरोसायन्सची ‘होली ग्रेल’ म्हणून ओळखला जातो.)

जोनाथनला सुरूवातीला बसलेला धक्का ओसरल्यानंतर तो सावरला. त्यानं काळी-पांढरी चित्रं काढायला सुरूवात केली. रंग नष्ट झाले पण त्याच्या बदल्यात त्याची नजर घारीसारखी तीक्ष्ण झाली. त्यानं रात्री बाहेर पडायला सुरूवात केली. नंतर एकदा एका डॉक्टरांनी यावर नवीन उपचार करून बघायचे का असं विचारलं पण जोनाथननं त्यांना स्पष्ट नकार दिला.

सॅक्स यांचा आणखी एक रूग्ण चित्रकारच आहे. त्याचं नाव फ्रॅंको मन्यानी. फ्रॅंको इटलीमधील पोंतितो (pontito) या चिमुकल्या गावात जन्मला आणि वयाच्या बारा वर्षेपर्यंत तिथे राहीला. दरम्यान दुसर्‍या महायुद्धात नाझी सैनिकांनी पोंतितो उध्वस्त केलं. बरीच भ्रमंती केल्यानंतर फ्रॅंकोनं सॅन फ्रान्सिस्को इथं स्थायिक व्हायचं ठरवलं. याच काळात त्याला एका रहस्यमय आजारानं ग्रासलं. याच्या उपचारासाठी त्यानं काही दिवस इस्पितळात काढले. तापामध्ये बरळत असताना त्याला स्वप्नात पोंतितो दिसायला लागलं, तिथली घरं, चर्च, रस्ते. जागा झाल्यावरही हे थांबलं नाही, इस्पितळाच्या भिंतींवर, गादीवर सगळीकडे त्याला पोंतितोची स्पष्ट चित्रं दिसायला लागली. ही चित्रं त्रिमितीमध्ये होती आणि आपण एखाद्या व्हिडिओ गेममध्ये जसं वेगवेगळ्या बाजूंनी बघू शकतो तसं त्याला पोंतितो कोणत्याही कोनातून बघता येत होतं. मग त्यानं भिंतीवर दिसणारं चित्र पेन्सिलीनं गिरवायला सुरूवात केली. लवकरच हातात कधीही ब्रश न घेतलेल्या फ्रॅंकोनं पोंतितोची उत्कृष्ट चित्रं काढायला सुरूवात केली.

फ्रॅंकोच्या केसमध्ये सगळंच अद्भुत आहे. त्याला कोणता आजार झाला होता? यामुळं त्याच्या मेंदूवर काय परिणाम झाला? कोणतेही प्रशिक्षण नसताना व्यावसायिक पातळीची चित्रे काढणं त्याला कसं काय शक्य झालं? काही फोटोग्राफर पोंतितोला गेले आणि त्यांनी तिथले फोटो घेतले. फोटो आणि फ्रॅंकोची चित्रे यांची तुलना केल्यावर चित्रांमधील तपशील किती अचूक आहे याची खात्री पटली. आतापर्यंत नेणिवेत असलेली लहानपणची पोंतितोची चित्रं इतक्या स्पष्टपणे जाणिवेत कशी आणि का आली? प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. मात्र हजार-एक चित्रं काढल्यानंतर ‘मेमरी आर्टिस्ट’ (memory artist) म्हणून ओळखल्या जाणार्‍या फ्रॅंकोची चित्रं जगभर प्रसिद्ध झाली आहेत. त्याच्या चित्रांची प्रदर्शनं भरत आहेत.

‘तूरेत सिंड्रोम’ (Tourette syndrome) जगातील प्रत्येक देश, प्रत्येक वंशामध्ये आढळतो. याची प्रमुख लक्षणं म्हणजे हालचालींवर नियंत्रण नसणे, विशिष्ट हालचाली (समोरच्या वस्तूंना, माणसांना वारंवार स्पर्श करणे) परतपरत करणे, काही शब्द किंवा शिव्या देण्यावर नियंत्रण नसणे इ. ही लक्षणे पाहिल्यानंतर असा माणूस कोणतेही नाजुक काम करण्यास असमर्थ असेल असं वाटतं. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती फारच वेगळी आहे.

डॉ. कार्ल बेनेट कॅनडामध्ये सर्जन आहेत आणि त्यांना तूरेत सिंड्रोम आहे. सॅक्सला हे कळल्यानंतर त्यांचा यावर विश्वास बसला नाही. ज्याचे स्वत:च्या साध्या हालचालींवर नियंत्रण नाही तो माणूस सर्जनचे काम कसे करू शकतो? बेनेट यांनी सॅक्सना त्यांच्या दवाखान्यात येऊन शस्त्रक्रिया करताना मला स्क्र्ब करा असे आमंत्रण दिले. सॅक्स तिथे गेल्यानंतर त्यांनी जे बघितले ते अविश्वसनीय होते. बेनेट त्यांना विमानतळावर घ्यायला आले. गाडी चालवत असताना बेनेट यांच्या हालचाली चालूच होत्या. दोन्ही गुडघे स्टिअरिंग व्हीलच्या समान अंतरावर ठेवणे, समोरच्या काचेला वारंवार स्पर्श करणे इ. मात्र हे करताना गाडीवरचे नियंत्रण एकदाही सुटले नाही. दवाखान्यात शस्त्रक्रिया चालू होण्याआधी सॅक्स आता काय होणार याच्या प्रचंड दडपणाखाली होते. बेनेट यांनी सुरी हातात घेतल्यानंतर त्यांच्या संपूर्ण व्यक्तीमत्वात बदल झाला. शस्त्रक्रिया करत असताना त्यांनी एकही अनावश्यक हालचाल केली नाही, त्यांचा हात अतिशय स्थिर होता. अडीच तास शस्त्रक्रिया चालू असेपर्यंत बेनेट यांच्यामध्ये तूरेत सिंड्रोमचा मागमूसही नव्हता. शस्त्रक्रिया संपल्यानंतर परत उड्या मारणे, समोरच्याला स्पर्श करणे वगैरे चालू झाले. यशस्वी आणि विश्वासार्ह सर्जन म्हणून बेनेट यांची ख्याती आहे. त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांना तूरेत सिंड्रोमसकट स्वीकारले आहे. नंतर लाउंजमध्ये इतर डॉक्टरांबरोबर गप्पा मारताना बेनेट जमिनीवर लोळत, हवेत लाथा मारत होते. सॅक्स परतताना बेनेट यांनी त्यांच्या विमानातून त्यांना कॅलगरीपर्यंत सोडले. विमान चालवतानाही तूरेत कुठेही आडवा आला नाही.

दृष्टीहीन लोकांबद्दल आपले बरेच गैरसमज आहेत. त्यातील एक महत्वाचा म्हणजे दृष्टीहीनांसाठी सर्वात मूल्यवान भेट म्हणजे दृष्टी. चॅपलिनच्या सिटी लाइट्सपासून (City Lights) ते हिंदी चित्रपटांपर्यंत डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली रे झाली की दुसर्‍या क्षणाला पेशंटला दिसायला लागतं. खरं तर चित्रपट तिथं सुरू व्हायला हवा. जन्मापासून आंधळ्या असलेल्या व्यक्तींना बघता आलं तर त्यांचा सुरूवातीला आपण काय बघतो आहोत हेच त्यांना कळत नाही कारण त्यांचे सगळे जग स्पर्शावर आणि आवाजांवर अवलंबून असतं. एका रूग्णाला आपला कुत्रा कोणता आणि मांजर कोणतं हे स्पर्श केल्याशिवाय ओळखता येत नसे. त्यांच्या आधीच्या जगात माणसे येतात आणि जातात. दिसायला लागल्यावर रूंदी, खोली किंवा वेगवान वस्तू यांचा त्यांना अर्थबोध होत नाही. जन्मापासून किंवा बर्‍याच काळ दृष्टी नसलेल्या लोकांच्या मेंदूमध्ये या प्रकारची गणिते करण्यासाठी आवश्यक ती वाढ झालेली नसते. अचानक दृष्टी मिळाल्यावर मेंदूवर ताण येतो. बरेचदा रूग्ण डिप्रेशनमध्ये जातात आणि काही रूग्णांनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत.

सॅक्स अशाच एका रूग्णाची गोष्ट सांगतात. दृष्टी नसताना आपली सर्व कामे आत्मविश्वासपूर्वक करणारा हा तरूण दृष्टी आल्यानंतर सैरभैर झाला. आपण आपली ओळख गमावली आहे असं त्याला वाटायला लागलं. अखेर ताण सहन न झाल्यानं आणि इतर आजारांमुळे डोळ्यांमध्ये काही दोष नसतानाही त्याला परत अंधत्व आलं. इथे सॅक्स विचारतात, केवळ आपलं जग डोळ्यांवर चालतं म्हणून आपलं आयुष्य आत्मविश्वासानं जगणार्‍या अंध लोकांवर दृष्टी लादणं कितपत बरोबर आहे? अंधत्व जन्मापासून असेल तर मेंदू त्या जगात जगण्यासाठी आवश्यक ती तजवीज करून ठेवतो. त्यांचं जग आपल्यासारखं नसतं पण आपल्याइतकच समृद्ध असतं आणि काही बाबतीत आपल्यापेक्षा जास्त. नेत्रदानाच्या वारेमाप जाहिरातींमध्ये दीर्घकाळ अंध असलेल्या लोकांना दृष्टी मिळाल्यावर ज्या अडचणी येतात त्यांचा विचार केला जातो का?

पुस्तकाच्या शेवटच्या दोन प्रकरणांमध्ये सॅक्स एका महत्वाच्या पण गैरसमजांनी भरलेल्या विषयावर बोलतात – स्वमग्नता किंवा ऑटीझम. स्वमग्नतेबद्दल माहिती देताना चित्रफितींमध्ये नेहेमी लहान मुले दाखवली जातात. पण मोठे झाल्यावर ती कशी बनतात याबद्दल फारशी माहिती सहसा मिळत नाही. लहानपणी साधी कामेही न करता येणारी मुले स्वयंपूर्ण आयुष्य जगू शकतात यावर विश्वास बसणे कठीण आहे. पुस्तकाचे शेवटचे प्रकरण संशोधक टेंपल ग्रॅंडीनबद्दल (Temple Grandin) आहे. टेंपल स्वमग्न आहे तरीही अथक प्रयत्न करून तिने प्राणीशास्त्रामध्ये पी. एच. डी. मिळवली. या क्षेत्रातील तिचे काम उल्लेखनीय आहेच शिवाय स्वमग्नतेवरही तिने स्वत:च्या अनुभवातून बरेच लिखाण केले आहे.

टेंपलला सहा महिन्यांची असताना आईच्या कुशीत स्पर्श झाल्यावर गोठले गेल्याची संवेदना अजूनही आठवते. (स्वमग्न लोकांचे एक वैशिष्ट्य असे की त्यांना अगदी लहानपणीच्या गोष्टीही आठवतात. तुम्ही त्यांच्याशी बोलत असताना ते बोलणे, त्याचा टोन, शब्द जसेच्या तसे त्यांच्या मेंदूत नोंदले जातात.) सहा वर्षांची होईपर्यंत तिला बोलताही येत नव्हते. सुदैवाने या काळात मतिमंद मुलांसाठी असलेल्या शाळेत जाण्याची तिला संधी मिळाली. तिथे एक शिक्षिका आणि स्पीच थेरपिस्ट (speech therapist) यांनी तिला बोलायला शिकवले. बोलता यायला लागल्यावर जणू एक अडथळा पार झाला. इतर मुलांपेक्षा खूप हळू पण निश्चित अशी प्रगती दिसू लागली. संवाद साधता येत होता पण त्यातील भावना आणि परस्परसंबंध हे तिला गोंधळून टाकत असत, आजही टाकतात. रोमिओ आणि ज्युलिएट वाचल्यावर तिला हे असे का वागतात हे लक्षात येत नाही. ती स्वत:ची स्वस्था स्टार ट्रेक मधील यंत्रमानव डेटा सारखी आहे असे मानते. डेटाला माणसांबद्दल खूप उत्सुकता आहे, निरीक्षणातून तो माणसांबद्दल नियम बनवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांचे भावनिक व्यवहार त्याला बुचकळ्यात टाकणारे असतात.

याचा अर्थ टेंपलला भावना म्हणजे काय हे माहित नाही का? असे अजिबात नाही. प्राण्यांशी वागताना तिच्यात आमूलाग्र बदल होतो. तिला नेहेमी गाई, डुकरे यांच्याबरोबर काम करावे लागते. प्राणी दु:खी आहेत की आनंदी, बिथरले असतील तर त्यांना शांत कसे करायचे याची तिला अचूक माहिती आहे. गाईंच्या कत्तलखान्यात चालणार्‍या अमानुष प्रक्रिया बदलण्यात तिचा मोठा वाटा आहे. गाई मारताना शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना त्रास होऊ नये यासाठी तिने अनेक उपाय शोधून काढले. प्राण्यांच्या वेदना तिला सहन होत नाहीत पण माणसांबद्दल हे भावनिक बंध तिला ठेवता येत नाहीत. माणसे आणि त्यांचे व्यवहार तिला गुंतागुंतीचे वाटतात. तिचा प्राण्याच्या देखभालीचा व्यवसाय चालवताना सुरूवातीला तिला अनेक लोकांनी फसवले कारण खोटे बोलणे ही कल्पनाच तिच्या आवाक्याबाहेर होती. मात्र आता अनुभवातून ती सावध झाली आहे.

स्वमग्नतेवर टेंपलने बरेच काम केले आहे. स्वत:च्या अनुभवातून स्वमग्न लोकांना काय अडचणी येतात, स्वमग्न मुलांशी कसे वागावे अशा अनेक गोष्टीमवर ती मार्गदर्शन करत असते. तिच्या मते स्वमग्नता, स्किझोफ्रेनिया किंवा खिन्नता याबद्दल चीड येणे साहजिक आहे. पण याची दुसरी बाजू अशी आहे की असे लोक बरेचदा प्रतिभावंत असतात. तिच्या मते जर हे सर्व आजार मुळापासून दूर केले तर कदाचित जगातील प्रतिभाही नष्ट होईल आणि फक्त अकाऊंटंट लोक शिल्लक राहतील. पुस्तक वाचल्यानंतर त्यात विचारलेले प्रश्न वाचून आणखी प्रश्न पडतात. मानसिक दृष्ट्या निरोगी ही अवस्था खरंच अस्तित्वात आहे किंवा नाही अशी शंका येते कारण इथे रोगी आणि निरोगी अशी डिजिटल अवस्था नसते. दृष्टीहीन, मूकबधिर किंवा स्वमग्न लोक आपल्यासारखे जगत नाहीत म्हणून त्यांना आपल्या निकषांवर जगायला लावणे कितपत बरोबर आहे? याऐवजी त्यांना त्यांच्या जगात जास्तीत जास्त मोकळेपणाने कसे जगता येईल हा विचार करणे अधिक योग्य नाही का?

परत जाताना सॅक्स यांना टेंपल सोडायला आली होती. शेवटी ती थोडीशी भावनाविवश झाली होती. सॅक्स लिहीतात,

Temple, who was driving, suddenly faltered and wept. “I’ve read that libraries are where immortality lies….I don’t want my thoughts to die with me….I want to have done something….I am not interested in power or piles of money. I want to leave something behind. I want to make a positive contribution – know that my life has meaning. Right now, I am talking about things at the very core of my existence.” I was stunned. As I stepped out of the car to say goodbye, I said,”I’m going to hug you. I hope you don’t mind.” I hugged her – and (I think) she hugged me back.