Category: बुके वाचिते

  • पहिल्या महायुद्धाचे भीषण, विदारक चित्रण : रीजनरेशन त्रिधारा

    १९१७ सालच्या जुलै महिन्यात सिगफ्राइड ससून या ब्रिटीश सैन्यदलातील अधिकार्‍याने आपल्या उच्च अधिकार्‍यांना उद्देशून एक निवेदन केले. हे निवेदन म्हणजे या एकांड्या शिलेदाराची बंडखोरी होती.

    १९१७ सालच्या जुलै महिन्यात सिगफ्राइड ससून या ब्रिटीश सैन्यदलातील अधिकार्‍याने आपल्या वरिष्ठ​ अधिकार्‍यांना उद्देशून एक निवेदन केले. हे निवेदन म्हणजे या एकांड्या शिलेदाराची बंडखोरी होती.

    Siegfried Sassoon
    सिगफ्राइड ससून

    “मी या स्वेच्छेने केलेल्या निवेदनाद्वारे सैन्यदलाच्या अधिकाराचा विरोध करत आहे, कारण युद्ध थांबवण्याची ज्यांची क्षमता आहे त्यांच्याकडूनच युद्ध लांबवले जाते आहे असे मला वाटते.  युद्धातील सैनिकांचे होणारे हाल मला बघवत नाहीत आणि म्हणूनच ही परिस्थिती चालू ठेवण्यामध्ये मला सहभागी व्हायचे नाही. युद्ध ज्या कारणांसाठी सुरू आहे ती कारणे आता अमानुष आणि अनैतिक बनली आहेत. या सर्वांच्या मुळाशी राजकीय पातळीवरील घेतले गेलेले चुकीचे आणि खोटारडे निर्णय आहेत. याचा परिणाम म्हणून यातना भोगणार्‍या सर्वांच्या वतीने मी या फसवणुकीचा निषेध करत आहे. याचबरोबर मायदेशात असलेल्या बहुसंख्य सामान्य जनतेचा युद्धामुळे सैनिकांना होणार्‍या यातनांकडे बघण्याचा उथळ दृष्टीकोन बदलण्यात मला यश येईल अशी मी आशा करतो. या यातना सामान्यांना भोगाव्या लागत नाहीत आणि त्या भोगणार्‍यांचे हाल समजण्याइतकी कल्पनाशक्तीही त्यांच्याकडे नाही.”

    साधारण असा या पत्राचा आशय होता. हे पत्र लिहीण्यास ससूनला विचारवंत बर्ट्रांड रसेल आणि लेखक जॉन मरी यांनी मदत केली. या पत्राच्या प्रती वृत्तपत्रांना पाठवण्यात आल्या, तसेच इंग्लंडच्या संसदेतही हे पत्र वाचले गेले. सेकंद लेफ्टनंट ससूनने फ्रान्समध्ये तिसर्‍या बटालियनकडून लढताना दीड तास जर्मन फौजांचा मारा चुकवित सर्व जखमी सैनिकांना सुरक्षित स्थळी आणण्याची महत्वाची कामगिरी बजावली होती. यासाठी त्याचा मिलिटरी क्रॉस देऊन सन्मान करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ससूनचे कोर्ट मार्शल न करता मानसिक संतुलन बिघडल्याचा शेरा देऊन त्याची क्रेगलॉकहार्ट येथील मनोरूग्णालयात रवानगी करण्यात आली.  क्रेगलॉकहार्ट रूग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रिव्हर्स यांनी त्याचा ताबा घेतला.

    इतिहासात या आणि अशा त्रोटक, कोरड्या नोंदी आहेत. जुलै १९१७ ते युद्ध संपेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर १९१८ या काळात रिव्हर्स, ससून आणि काही इतर संबंधित व्यक्तींच्या आयुष्यात काय घडले याचे काल्पनिक पण तथ्यांपासून फारकत न घेता केले चित्रण  ‘रीजनरेशन ट्रिलॉजी’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या तीन कादंबर्‍यांमध्ये ब्रिटीश लेखिका पॅट बार्कर यांनी केले आहे. ‘रीजनरेशन’, ‘द आय इन द डोअर’ आणि ‘द घोस्ट रोड’ या त्या तीन कादंबर्‍या. तिसर्‍या कादंबरीबद्दल त्यांना १९९५ मध्ये बुकर पारितोषिकाने गौरवण्यात आले.

    Regeneration by Pat Barker

    पहिल्या कादंबरीची सुरूवातच या पत्राने होते. नंतर ससून रिव्हर्सकडे आल्यावर तो चहा, दूध कपात ओतत असताना रिव्हर्स त्याचे बारकाईने निरिक्षण करीत असतो. त्याचे हात थरथरत आहेत का, त्याच्या हालचालींमध्ये झटके आहेत का, बॉंबच्या सतत आवाजाचा परिणाम म्हणून तो दचकतो आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी मिळतात. ससूनमध्ये मानसिक संतुलन बिघडल्याचे कुठलेही चिन्ह नसते. उलट तो एक विवेकी, हुषार, देशभक्त तरूण आणि शिवाय एक संवेदनशील कवीही असतो. त्याच्या कविता प्रसिद्ध झालेल्या असतात. अपेक्षेच्या विरूद्ध असा त्याचा स्वभाव पाहून रिव्हर्स काहीसा संभ्रमात पडतो. ससूनच्या मानसिक आंदोलनांच्या मुळाशी जाताना रिव्हर्सला ज्यांची उत्तरे व्यवस्थेमध्ये राहून देणे शक्य नाही असे काही प्रश्न पडतात.

    कादंबरीत बिली प्रायर हे सैनिकाचे काल्पनिक पात्र आहे. प्रायर रिव्हर्सला विचारतो, “तुम्ही आम्हाला भावना दाबून ठेवू नका असे सांगता. रणांगणावर आम्ही आमच्या भावनांना मोकळी वाट करून दिली तर तिथे आमचा एक दिवसही पाडाव लागणार नाही.” रणांगणावर मानसिक परिणाम न होता लढू शकणारा सैनिक फक्त तो असतो ज्याच्या सर्व संवेदना बोथट झाल्या आहेत. अशा सैनिकाचे वर्णन करताना ‘अपोकॅलिप्स नाऊ’ मध्ये मार्लन ब्रॅंडो म्हणतो,

    “You have to have men who are moral… and at the same time who are able to utilize their primordial instincts to kill without feeling… without passion… without judgment… without judgment. Because it’s judgment that defeats us.”

    पण असा अमानुष सैनिक मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून निरोगी म्हणता येईल का? मानसोपचार तज्ञाचे पहिले काम म्हणजे रूग्णाला सुरक्षित आयुष्य जगता यावे यासाठी तयार करणे. पण इथे रिव्हर्स नेमके उलटे करत होता. युद्धामधील अमानुष अनुभवांना सामोरे गेल्यानंतर सैनिकांना अनेक प्रकारचे मानसिक आजार होत होते. वाचा बसणे, धक्क्यामुळे अर्धांगवायू होणे, बोलण्यात तोतरेपणा येणे, रात्री असह्य दु:स्वप्ने. माणसाला सहन करणे अशक्य व्हावे अशा परिस्थितीमध्ये सतत राहील्यावर असे आजार होणे हा त्या सैनिकांच्या मेंदूने केलेला एक प्रकारचा बचाव होता. पण असे झाल्यानंतर ते रूग्णालयात आले की रिव्हर्स त्यांना पूर्वपदावर आणत होता ते कशासाठी? परत मृत्युच्या खाईत लोटायला? मानसोपचार आणि सैन्यदल यांची उद्दिष्टे परस्परविरोधी असली (जशी ती इथे होती) तर सैन्यदलात काम करणार्‍या मानसोपचार तज्ञाने हा नैतिक पेच कसा सोडवावा?

    अशा परिस्थितीत ससूनने हे युद्ध आणि त्यामुळे होणारी जिवितहानी व्यर्थ आहे असा निष्कर्ष काढला तर त्यात काय चूक आहे? पण असे केल्यावर त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे असे ठरवून त्याला मनोरूग्णालयात पाठवण्यात आले होते. जोसेफ हेलरने ‘कॅच-२२‘ या कादंबरीत डार्क ह्युमरचा आधार घेऊन मांडलेला मध्यवर्ती मुद्दा हाच आहे.

    ससून जरी संतुलित असला तरी आपल्या मनावर युद्धाचे काही ओरखडे उठण्यापासून तो ही स्वत:ला वाचवू शकत नाही. दु:स्वप्ने किंवा मृत सैनिक जवळ उभे आहेत असे भास होणे या त्याच्या लक्षणांच्या मुळाशी जाताना रिव्हर्सला जाणवते की ससून दोन व्यक्तीमत्वांमध्ये वावरतो आहे. रणांगणावर लढतानाही त्याने कविता रचणे थांबवले नव्हते. गंमत अशी की या कविता युद्धाच्या विरोधात, शांततेसाठी होत्या. अतुलनिय शौर्य दाखवून शत्रूपक्षातील सैनिकांना मारणे आणि तिथून परत आल्यावर त्याच्या विरोधात कविता लिहीणे ही दोन्ही कामे तो एकाच वेळी करत होता आणि विशेष म्हणजे युद्धाच्या विरोधात कविता लिहीण्यासाठी त्याला कच्चा माल आपल्याच रणांगणावरील वर्तणुकीतून मिळत होता. हा विरोधाभास दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचे लक्षण होते, मात्र इथे ससूनला त्याचा त्रास न होता उलट मदत होत होती. एकीकडे कर्तव्यदक्षतेची चाड आणि दुसरीकडे त्या कर्तव्याच्या उद्दीष्टांमधील फोलपणा अशा कात्रीमध्ये सापडल्यावर दोन वेगवेगळ्या आणि परस्परविरोधी भूमिकांमध्ये जगणे हे ससूनच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक होते.

    अशा कात्रीमध्ये सापडलेला कवी या भूमिकेत ससून एकटा नव्हता. त्याचा सहकारी विल्फ्रेड ओवेन हा ही अशाच परिस्थितीमध्ये कविता करण्याकडे वळला. क्रेगलॉकहार्टमध्ये ससूनबरोबर असताना त्याला या बाबतीत ससूनचे मार्गदर्शनही लाभले. या दोघांबरोबरच एडवर्ड थॉमस हा पहिल्या महायुद्धादरम्यानचा कवी/सैनिक म्हणून ओळखला जातो. थॉमसला त्याच्या कवितांमधून रणांगणावरील मानसिक तणावांना मोकळी वाट करून देता आली. ‘द घोस्ट रोड’ ही कादंबरी त्याच्या ‘रोड्स’ या कवितेमधील काही ओळींनी सुरु होते. या कादंबरीच्या नावामागेही या ओळींची प्रेरणा आहे असे वाटते.

    Now all roads lead to France

    And heavy is the tread

    Of the living; but the dead

    Returning lightly dance

    या तीन कादंबर्‍यांमध्ये पॅट बार्कर युद्ध या विषयाकडे वेगवेगळ्या आणि बहुतकरून अपरिचित अशा दृष्टीकोनांमधून बघतात. रिव्हर्स एक सिव्हिलियन आणि मानसोपचार तज्ज्ञ आहे. त्याने युद्ध प्रत्यक्षात अनुभवलेले नाही, मात्र युद्धामुळे सैनिकांच्या मनावर जे परिणाम होतात ते त्याला चांगलेच ठाउक आहेत. ससून, ओवेन आणि प्रायर (काल्पनिक पात्र) हे तिघेही सैनिक आहेत. त्यांचे अनुभव, त्यांची दु:स्वप्ने आणि त्या स्वप्नांचे विश्लेषण यामधून रणांगणावर जे घडते आहे त्याची झलक मिळते. युद्धाबाबत सर्वात अनपेक्षित प्रतिक्रिया लिझीची आहे. तिचा नवरा युद्धावर गेल्यावर त्याच्यापासून सुटका झाली याचा तिला अत्यानंद झाला आहे. म्हणूनच ती म्हणते, “On August 4, 1914, peace broke out.” युद्ध सुरू झाल्यावर त्या काळातील स्त्रियांवरील बरीचशी बंधने शिथील झाली. त्यांच्या दृष्टीने हा काळ एक प्रकारचे स्वातंत्र्यच होते.

    त्या काळात घडलेल्या इतर काही महत्वपूर्ण घटना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कादंबर्‍यांमध्ये येतात. युद्धाच्या विरोधात असलेल्या शांततावादी गटांना त्या काळात सरकारकडून तुरूंगवास, एकांतवास असे अत्याचार सहन करावे लागले. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे ऍलीस व्हील्डन हिला कोणताही सबळ पुरावा नसताना तत्कालीन पंतप्रधान लॉइड जॉर्ज यांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. ‘द आय इन द डोअर’ ही कादंबरी तिची बाजू मांडते.

    रिव्हर्स हा एक मानवशास्त्रज्ञही (Anthropologist) होता.  १८९८ मध्ये त्याने ‘टोरेस स्ट्रेट्स’ येथील बेटांवर जाऊन तिथे राहणार्‍या काही प्राचीन जमातींचा अभ्यास केला. ‘द घोस्ट रोड’ या तिसर्‍या कादंबरीत त्याचे तिथले अनुभव आणि प्रायरचे रणांगणावरील अनुभव एकामागून एक दाखवून बार्कर यांनी त्यातील साम्ये आणि विरोधाभास समोर आणला आहे. रिव्हर्सच्या या बेटांवरील वास्तव्यामध्ये एक प्रसंग उल्लेखनीय आहे. किमान संभाषण करण्याइतकी तेथील स्थानिकांची भाषा आत्मसात केल्यानंतर रिव्हर्सला एका बोटीवरील प्रवासात स्थानिकांचा एक गट भेटतो. रिव्हर्स त्यांना विचारतो, “तुमच्याकडे एक गिनी असेल तर ती तुम्ही कुणाबरोबर वाटून घ्याल?” या प्रश्नाची निरनिराळी उत्तरे मिळाल्यावर त्या लोकांच्या नातेसंबंधांची नावे आणि त्यांचे महत्व याचा उलगडा होत असे आणि त्यानंतर त्या अनुषंगाने त्यांना बरेच इतर प्रश्न विचारता येत असत. त्यांच्याकडून हवी ती माहिती मिळाल्यावर रिव्हर्स जायला निघतो तेव्हा त्यांच्यातील एक बाई त्याला थांबवते आणि तिच्या मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये म्हणते, “Your turn.” रिव्हर्सला भाऊ, बहीणी असतात तरीही तो कुणाबरोबरही गिनी वाटून घेणार नाही असे उत्तर देतो. ते लोक आश्चर्यचकित होतात आणि जसजशी रिव्हर्सच्या आयुष्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळत जाते तसतसे ते आयुष्य, त्या चालीरीती त्यांना अधिकाधिक असंबद्ध वाटू लागतात. ही असंबद्धता त्यांना विनोदी वाटते. त्यांची ती अनपेक्षित प्रतिक्रिया पाहून रिव्हर्सला साक्षात्कार होतो – त्याची नैतिक मूल्ये आणि त्या स्थानिकांची नैतिक मूल्ये सारख्याच पातळीवर आहेत. ज्या मूल्यांना त्याने आयुष्यभर जिवापाड जपले ती मूल्ये संदर्भांची चौकट बदलली तर हास्यास्पद ठरतात. ही प्रतिक्रिया किपलिंगच्या ‘व्हाइट मॅन्स बर्डन’च्या अगदी उलट आहे. नंतरही या अनुषंगाने आपण जी मूल्ये, ज्या रीती स्थानिकांवर लादत आहोत त्यांच्याबद्दल रिव्हर्सला अपराधीपणा वाटतो. बेटांना भेट देणारे ख्रिश्चन मिशनरी आपल्याबरोबर अनेक रोग घेऊन येतात आणि स्थानिक लोकांकडे त्या रोगांविरूद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती नसल्याने ते त्या रोगांना बळी पडतात. मिशनर्‍यांची शिकवण आणि त्यांच्या वर्तनामुळे होणार्‍या परिणामांकडे त्यांचे दुर्लक्ष यातील विरोधाभास त्याला बेचैन करतो.

    लेखकांनी वेगवेगळे अनुभव घेतल्याशिवाय त्यांचे लेखन कसदार होणार नाही असा समज आहे आणि तो बहुतांशी खरा आहे. फरक इतकाच की अनुभव घेण्यासाठी लेखकाला त्या परिस्थितीतूनच जायला हवे अशी अट नाही. त्याची कल्पनाशक्ती सशक्त असेल तर असे घडू शकते. पॅट बार्कर यांच्या पहिल्या काही कादंबर्‍या स्त्रियांच्या प्रश्नांवर आधारित होत्या. त्या प्रसिद्ध झाल्यानंतर मिडीयाने त्यांना फेमिनिस्ट, मध्यमवर्गीय स्त्रियांवर  लिहीणारी लेखिका असे लेबल देऊन टाकले. याचा उबग येऊन त्यांनी वेगळ्या विषयावर लिहायचे ठरवले. रीजनरेशन त्रिधारा यातून जन्माला आली. बार्कर यांची शैली भीडभाड न ठेवता रोखठोक वर्णन करण्याची आहे. युद्धकाळातील अमानुष आणि अमानवी प्रसंगांचे चित्रण करताना किंवा त्यावर टिप्पणी करताना त्या कोणताही मुलाहिजा बाळगत नाहीत.

    She’d never learnt to read the casualty lists over breakfast and then go off and have a perfectly pleasant day as the vast majority of civilians did.

    A society that devours it’s own young deserves no automatic or unquestioning allegiance.

    सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक कादंबर्‍या किंवा चित्रपटांमधील युद्धाचे चित्रण बेगडी असते. युद्ध म्हणजे लाखो आयुष्ये उध्वस्त करणारी किती विदारक घटना आहे याची जाणीव रीजनरेशन त्रिधारा वाचल्यावर होते. बार्कर यांच्या म्हणण्यानुसार ठराविक आवाज, गंध, प्रकाश, चवी यांच्या सहाय्याने रणांगणावरील वातावरण उभे करता येऊ शकते. एका डोळ्यामधे गोळी लागून ती कानावाटे बाहेर गेल्यावर मेंदूचा काही भाग गमावूनही आठवडाभर जिवंत राहणार सैनिक किंवा विमानातून पॅराशूटने उडी घेतल्यानंतर जमिनीवरील मृत जर्मन सैनिकाच्या पोटात डोके घुसल्यामुळे त्याचे रक्त-मांस यांनी चेहेरा बरबटवून घेणारा सैनिक अशी अंगावर काटा आणणारी वर्णने वाचल्यानंतर बार्कर यांच्या वातावरणनिर्मितीचा खरेपणा जाणवतो. तरीही बहुधा या रणकंदनाला चितारण्यामध्ये शब्द थिटे पडत आहेत याची जाणीव कुठेतरी त्यांना असावी. ‘द घोस्ट रोड’मध्ये प्रायर आपल्या डायरीत म्हणतो,

    I honestly think that if the war went on for a hundred years another language would evolve, one that was capable of describing the sound of bombardment or the buzzing of flies on a hot August day on the Somme. There are no words. There are no words for what I felt when I saw the setting Sun rise.

    तीनही कादंबर्‍यांमध्ये कथानक सलगपणे पुढे जाते. यामुळे दुसरी किंवा तिसरी कादंबरी पहिल्यांदा वाचली तर तितकाच प्रभाव पडेल का अशी शंका वाटते.

    न्युरॉलॉजीमध्ये संशोधन करताना डॉ. रिव्हर्स यांनी त्यांचे सहकारी डॉ. हेन्री हेड यांच्याबरोबर बरेच प्रयोग केले होते. एका प्रयोगात डॉ. हेड यांच्या उजव्या हातामधील चेतातंतू (Nerves) कापून परत शिवण्यात आले. यानंतर चेतातंतूंची वाढ होऊन ते परत पूर्वस्थितीमध्ये येण्याच्या प्रक्रियेला ‘रीजनरेशन’ असे नाव दिले गेले होते. चेतातंतू जुळून येत असताना डॉ. हेड यांच्या हाताची संवेदनशीलता कमालीची वाढली होती. नेहेमी किरकोळ वाटेल अशा स्पर्शानेही त्यांना प्रचंड वेदना होत असत. रीजनरेशन ही एक हळू आणि यातनादायी प्रक्रिया होती.

    युद्धातून परत आलेल्या सैनिकांची दुभंगलेली शरीरे आणि मने जुळवण्याचे काम हे ही असेच होते. एका प्रकारचे रीजनरेशन.

    —-
    १. ‘व्हाइट मॅन्स बर्डन’ उपरोधिक आहे किंवा कसे याबद्दल वाद आहेत. इथे मार्क ट्वेन आणि हेन्री जेम्स यांना प्रमाण मानून कविता गंभीर आहे असे गृहीत धरले आहे.

  • यासुनारी कावाबाटाचं तरल भावविश्व

    याखेरीज कावाबाटाचं वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग. हिवाळा, उन्हाळा किंवा शरदाचं आगमन यासारखे बदल, बागेतल्या चेरीचा बदलणारा रंग, दर वर्षी मे महिन्यात छतावर येणारी घार, वसंताच्या आगमनाबरोबर डोंगरावरच्या बुद्धाच्या देवळात वाजणारी घंटा, आणि अर्थातच साकुरा किंवा चेरी ब्लॉसम यासारखे असंख्य बदल कावाबाटा अचूकपणे टिपतो.

    मुराकामी वाचून झपाटून गेल्यानंतर जपानी साहित्याबद्दलच्या उत्सुकतेपोटी इतर जपानी लेखकांचा शोध घेणं सुरू झालं. काझुओ इशिगुरो सापडला पण इशिगुरोचा जन्म पूर्वेकडचा असला तरी त्याचं सर्व आयुष्य इंग्लंडमध्ये गेलं, शिवाय तो लिहितो इंग्रजी भाषेत आणि बरेचदा त्याच्या लिखाणाचे विषय ब्रिटिश असतात. अर्थात ‘ऍन आर्टिस्ट इन अ फ्लोटिंग वर्ल्ड’ सारखे युद्धानंतरच्या जपानी समाजाच्या नैतिकतेचा धांडोळा घेणारे अपवाद आहेतच. मग हाती लागला यासुनारी कावाबाटा आणि त्याची अप्रतिम कादंबरी ‘द साउंड ऑफ द माउंटन.’

    Book cover of The Sound of the Mountain by Yasunari Kawabata

    कावाबाटाबद्दल काहीही माहिती नसलं तरी कादंबरीचं नाव वाचताक्षणीच एक सेकंद थबकायला होतं. समुद्राला आवाज असतो – वादळी हवेत रोरावणारा किंवा नुसत्या भरतीचा. नदी, झरे, धबधबा इतकंच कशाला झाडांचाही आवाज येतो कारण या सर्व ठिकाणी हालचाल होत असते. पण पर्वताचा आवाज म्हणजे काय? पर्वताला आवाज असतो का? की लेखकाला पर्वतावरून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज अभिप्रेत आहे? प्रश्न बाजूला ठेवून वाचायला सुरुवात केली. गोष्ट आहे शिंगो आणि त्याच्या कुटुंबाची. शिंगोनं नुकतीच साठी पार केली आहे. शिंगो, त्याची बायको यासुको, मुलगा सुईची आणि सून किकुको हे सगळे एकत्र राहत आहेत. शिंगोच्या कंपनीमध्येच आता मुलगाही काम करतो. त्याच्या मुलीचं – फुसाकोचं – लग्न झालंय आणि ती तिच्या नवऱ्याबरोबर स्वतंत्र राहते आहे.

    काही लेखक पुस्तकात पात्राचा परिचय झाल्याबरोबर ‘आपण यांना पाहिलंत का?’ ची सूचना असल्याप्रमाणे रंग, उंची, बांधा, पेहराव, विशेष खूण असं सगळं वर्णन देतात. विशेषतः लोकप्रिय थ्रिलर किंवा तत्सम प्रकारच्या कादंबऱ्यांमध्ये हे बरेचदा दिसून येतं पण हे फक्त तिथेच होतं असं नाही. ही सवय डिकन्ससारख्या थोर लेखकालाही असते. (किंबहुना डिकन्सच्या प्रभावाखाली आल्यामुळे इतर लोकप्रिय लेखकांनी असं केल्याची शक्यताही नाकारता येत नाही.) याउलट विक्रम सेठसारखे लेखक उलटा मार्ग पत्करतात. कथेच्या ओघात वर्णन आलं तर ठीक पण मुद्दाम कोणतंही पात्र कसं दिसतं हे सांगण्याच्या फंदात ते अजिबात पडत नाहीत. कावाबाटाही याच गटात मोडतो. त्याला जे सांगायचं आहे त्याहून एक शब्दही अधिक तो सांगत नाही. त्यामुळे शिंगो कसला बिझनेस करतो, त्याचा जन्म कुठे झाला, शिक्षण किती, वडील काय करत होते असले सगळे तपशील गाळलेले आहेत. फुसाकोचं तिच्या नवऱ्याशी पटत नाही म्हणून ती दोन मुलांना घेऊन माहेरी येते आणि सुईचीचं एका बाईबरोबर प्रेमप्रकरण चालू असतं. या दोन मध्यवर्ती घटनांच्या अनुषंगाने कथा शिंगोच्या दृष्टिकोनातून सांगितली आहे. याखेरीज इतर संदर्भही येत राहतात. सुईची युद्धावरून परत आला आहे हे त्याच्या बोलण्यातून कळतं. शिंगोचे वर्गमित्र एक-एक करून मरतात आणि त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी जाताना त्याला आपलं काय होणार हा विचार पोखरत असतो. सुईची आणि शिंगो दोघांवरही युद्धाचा वेगवेगळ्या प्रकारे परिणाम झाला आहे आणि याचे कधी स्पष्ट तर कधी पुसट असे परिणाम जाणवत राहतात.

    याखेरीज कावाबाटाचं वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग. हिवाळा, उन्हाळा किंवा शरदाचं आगमन यासारखे बदल, बागेतल्या चेरीचा बदलणारा रंग, दर वर्षी मे महिन्यात छतावर येणारी घार, वसंताच्या आगमनाबरोबर डोंगरावरच्या बुद्धाच्या देवळात वाजणारी घंटा, आणि अर्थातच साकुरा किंवा चेरी ब्लॉसम यासारखे असंख्य बदल कावाबाटा अचूकपणे टिपतो. पण यातही तो पानच्या पानं वर्णन करत बसत नाही तर एक-दोन ओळीत तो बदल असा काही नजाकतीने अलगद पकडतो की त्याची तुलना फक्त हायकूबरोबरच होऊ शकते. आणि कावाबाटाच्या लिखाणावर हायकूचा प्रभाव नक्कीच असावा कारण त्याचे संदर्भही येत राहतात. मिनिमलिस्टीक म्हणता यावं अशा या लिखाणाचं एक अप्रतिम उदाहरण. शिंगो सकाळी कंपनीत जायला निघतो तेव्हा त्याची नात त्याच्या मागे मागे येते. शिंगो तिचा हात धरून तिला परत घराकडे नेतो आणि ती पळत पळत घरात जाते. एखाद्या सामान्य लेखकानं हे सांगायला गेलाबाजार पंचवीस-तीस वाक्य नक्कीच खाल्ली असती. कावाबाटा फक्त चार वाक्यांमध्ये याचं वर्णन करतो. ‘Grandfather.’ She followed after him. He led her by the hand to the corner of the main street. There was summer in the figure running back toward home. हायकूचे पाच-सात-पाच चे जे काही नियम असतील ते असोत, ही चार वाक्य मूर्तिमंत हायकू आहेत. पहिली दोन वाक्य सरळ आहेत, लहान मुलं नेहमी मोठ्यांच्या मागे मागे येतच असतात. त्यातही बाहेर जाताना असं होणं अगदी नेहमीची गोष्ट. तिसऱ्या वाक्यातून आपल्याला कळतं की आजोबांनी तिचा हात धरला आहे. पण ते तिला बरोबर घेऊन जात आहेत की परत घरी नेत आहेत हे संदिग्ध आहे. याचं उत्तर चवथ्या वाक्यात मिळतं पण ते ही किती काव्यमय पद्धतीने! There was summer in the figure running back toward home. पानंच्या-पानं वर्णन करून जे सांगता आलं नसतं ते या एका वाक्यातून कावाबाटा सांगून जातो. ती नुसती जात नाहीये, तिच्या जाण्यामध्ये ‘समर’ आहे. या जागी एखादं नेहमीचं विशेषण वापरलं असतं तर हा प्रसंग तितका प्रभावशाली ठरला नसता. ‘समर’ म्हटल्याबरोबर कोवळ्या उन्हात, दुडक्या चालीने, घराकडे पळत जाणारी छोटुकली डोळ्यासमोर लख्ख उभी राहते, अन्तोनियो विवाल्दीचा ‘समर’ आठवतो.

    शिंगोला पडणाऱ्या स्वप्नांचे उल्लेख येत राहतात. घडणाऱ्या घटना आणि ही स्वप्नं यांचा जवळचा संबंध आहे असं आपल्या लक्षात यायला लागतं. बरेचदा कावाबाटा काही गोष्टी उघडपणे न मांडता अशा स्वप्नांच्या माध्यमातून सूचित करतो. वर्तमानपत्रात शाळकरी मुलींनी गर्भपात केल्याची बातमी येते, त्या रात्री शिंगोलाही त्याबद्दल स्वप्न पडतं, दुसऱ्या दिवशी किकुकोला तिच्या मैत्रिणीचं पत्र येतं. तिनेही गर्भपात केलेला असतो. या सगळ्या योगायोगांमुळे शिंगो संभ्रमित होतो आणि त्याला वेगळीच शंका यायला लागते. ‘But, as he gazed at her, unable to speak, he felt in himself a flicker of something youthful, and was startled as another thought flashed across his mind, that Kikuko was pregnant and was thinking of an abortion.’ हा त्याचा अंदाज पुढे खरा ठरतो मात्र कावाबाटा यावर कोणतंही भाष्य करत नाही. यात गूढता असल्याचा भास झाला तरीही कथेचा बाज कुठेही या बाजूला झुकत नाही. मुराकामी आणि कावाबाटामध्ये हा एक महत्त्वाचा फरक जाणवतो. ज्या गूढतेच्या मर्यादेला हलकासा स्पर्श करून कावाबाटा परत येतो तिथे मुराकामीची कथा सुरू होते.

    १९६८ चं नोबेल पारितोषिक कावाबाटाला देण्यात आलं. नोबेल पारितोषिकाच्या भाषणात कावाबाटाने इक्क्यु या धर्मगुरुचं वाक्य उद्धृत केलं होतं, “Among those who give thoughts to things, is there one who does not think of suicide?” यानंतर चार वर्षांनी १६ एप्रिल १९७२ रोजी कावाबाटाचा मृतदेह टोक्योमध्ये त्याच्या राहत्या घरी सापडला. त्याने कोणतीही चिठ्ठी लिहिली नसल्याने ही आत्महत्या होती की अपघात याबद्दल वेगवेगळी मते आहेत.

  • रोमांचकारी कायगो हिगाशिनो

    तो परत आलाय. खरं तर तो याआधीही अनेकदा येऊन गेलाय. वेगळा देश, वेगळा वेष, वागणूकही बदलली आहे. मात्र डिडक्शनला एक शास्त्र मानणारा, तर्काला सर्वोच्च स्थान देणारा डीएनए – जो २२१ बी, बेकर स्ट्रीटच्या ‘पेइंग गेस्ट’मध्ये होता – तो याच्यातही आहे. पण कथा पुढे सरकते तसा आणखी एक, तितकाच तल्लख मेंदू समोर येतो. हा ही तितकाच…

    तो परत आलाय. खरं तर तो याआधीही अनेकदा येऊन गेलाय. वेगळा देश, वेगळा वेष, वागणूकही बदलली आहे. मात्र डिडक्शनला एक शास्त्र मानणारा, तर्काला सर्वोच्च स्थान देणारा डीएनए – जो २२१ बी, बेकर स्ट्रीटच्या ‘पेइंग गेस्ट’मध्ये होता – तो याच्यातही आहे. पण कथा पुढे सरकते तसा आणखी एक, तितकाच तल्लख मेंदू समोर येतो. हा ही तितकाच हुशार, त्याच मार्गावर चालणारा. हळू हळू आकृत्या किंचित स्पष्ट होतात. पहिली आकृती मॉरियार्टीच्या जवळ जाणारी आणि दुसरी शेरलॉकच्या. अर्थात इथे दोघे शत्रू नाहीत तर उलट मित्र आहेत. आणि वॉटसनची उगीच लुडबुडही नाही, पण लस्ट्रेड मात्र आहे.

    Devotion of Suspect X book cover

    जपानी लेखक आणि दिग्दर्शकांच्या शोधात असताना सापडलेली आणखी एक नोंदवून ठेवावी अशी भर – लेखक कायगो हिगाशिनो. त्याचं ‘डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ हे पुस्तक बरंच गाजलं आणि वाचल्यावर का ते लगेच लक्षात येतं. इशिगामी गणिताचा शिक्षक, रोज सकाळी तो घराजवळच्या शाळेत शिकवायला जातो. जाताना रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येकाचं अचूक निरीक्षण आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष – अगदी बेकर स्ट्रीटवरून आल्यासारखे. शाळेजवळ असलेल्या रेस्तरॉंमध्ये यासुको काम करते. यासुको इशिगामीच्या समोरच्या फ्लॅटमध्ये आपली मुलगी – मिसातोबरोबर राहते. इशिगामीचं तिच्यावर एकतर्फी प्रेम आहे. यासुकोचा घटस्फोट झाला आहे पण तरीही तिचा नवरा सारखा तिला त्रास देतो आणि पैशांची मागणी करतो. त्या दिवशी तो घरी येतो, त्यांच्यात वादावादी होते आणि दोघींबरोबरच्या झटापटीत तो मरतो. मर्डर मिस्ट्रीच्या २० व्या पानातच खून झाला. कुणी केला, कसा झाला ते ही दिसलं, मग पुढे काय राहिलं? इशिगामी आवाज ऐकून सगळं ठीक आहे ना हे बघायला येतो. यासुको त्याला खोटंच ‘सगळं ठीक आहे’ असं सांगते पण त्याच्या तीक्ष्ण नजरेला फसवणं अशक्य असतं. इशिगामी तिला मदत करायचं ठरवतो. कोणत्याही सामान्य लेखकाने यासुकोचा नवरा मेलेला दाखवला असता पण कुणी मारला हे सांगितलं नसतं. ते शेवटच्या पानात उघड केलं असतं. हिगाशिनो हा क्रम उलटा करतो. (अर्थात खुनी पहिल्यांदाच उघड करणं ही चाकोरीबाहेरची गोष्ट असली तरी तितकी दुर्मिळही नाही. याचं एक उत्तम उदाहरण – हिचकॉकचा ‘फ्रेंझी‘.)

    इशिगामी गणितज्ञ आहे. गणिताचे प्रश्न सोडवताना त्याची तहानभूक विसरते. गणितातला रिमान हायपोथेसिस (P = NP) प्रसिद्ध आहे. साध्या शब्दात सांगायचं तर – काय अधिक सोपं आहे? एखादा प्रश्न तुम्ही मुळापासून सोडवणं की दुसऱ्या कुणीतरी सोडवलेलं प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासणं? इशिगामी हा खून लपवण्यासाठी जे काही करतो ते पोलिसांना घातलेलं एक कोडं असतं. तो हा खून कसा लपवतो हे शेवटपर्यंत उघड केलं जात नाही. दोन दिवसात नदीकाठी एक प्रेत सापडतं. इन्स्पेक्टर कुसानागी तपासाचं काम हाती घेतो. मृतदेह यासुकोच्या नवऱ्याचा असल्याचे पुरावे मिळतात. विद्यापीठातील पदार्थविज्ञानाचा प्राध्यापक युकावा हा कुसानागीचा मित्र आहे. कुसानागीला याआधीही अनेक गुन्हे सोडवण्यात युकावाने मदत केली आहे. कुसानागीने त्याला ‘डिटेक्टिव्ह गॅलिलिओ’ असं टोपणनाव दिलं आहे. याही वेळी कुसानागी त्याची मदत घेतो. योगायोगाने युकावा विद्यापीठात शिकत असताना त्याची गणित शिकत असलेल्या इशिगामीशी मैत्री झालेली असते. आता उंदीर-मांजराचा खेळ सुरू होतो. युकावा गुन्ह्याची उकल करण्याचा प्रयत्न करतो आणि इशिगामी पोलीस आणि युकावा यांचं पुढचं पाऊल काय असेल याचा अंदाज घेत त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. याहून अधिक कथा उघड करणं हा वाचकांवर अन्याय ठरेल. होम्सच्या एका प्रसिद्ध कथेची बीजं या कथेत सापडतात. इशिगामीला विद्यार्थ्यांना भुलभुलैयात टाकणारे प्रश्न द्यायला आवडतं. प्रश्न वरून भूमितीचा वाटतो पण खरं तर तो बीजगणिताचा असतो. ज्यानं समजून न घेता नुसती घोकंपट्टी केली आहे तो हमखास फसणार. गुन्हा लपवतानाही इशिगामी हीच पद्धत वापरतो. पोलीस त्यांच्या सहज प्रवृत्तीनुसार जसे वागतील ते गृहीत धरून त्याने सर्व डाव रचला आहे. यातून मार्ग काढू शकतो तर तो फक्त युकावा. इशिगामी रोज संध्याकाळी यासुकोला फोन करून पुढे काय करायचं, पोलिसांना काय उत्तरं द्यायची याच्या सूचना देतो.

    शेवटी काही क्षण कादंबरी एका वेगळ्याच – अस्तित्ववादाच्या पातळीवर जाते. तुरुंगवासाचा हेतू कैद्याला शिक्षा देण्याचा असतो. पण जर तुरुंगातच कैद्याला अंतिम उत्तर, सत्याची दिशा सापडली तर? इथे कम्यूच्या ‘द स्ट्रेंजर’मधला मेर्सो आठवतो. पण हे एक-दोन पानंच – नंतर परत कथा आपल्या नेहमीच्या पातळीवर येते. एक ढोबळ चूक सापडली. आधी म्हणतात इशिगामीकडे सेलफोन नाही, नंतर इशिगामी सेलफोनवर बोलतो पण ही कदाचित अनुवादाचीही गफलत असू शकते.

    सहसा स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत निरीक्षणशक्ती अधिक असते मात्र रहस्यकथांमध्ये एखादी ‘मिस मार्पल’ सोडली तर याचा फारसा वापर झालेला दिसत नाही. आर्थर कॉनन डॉयलने एक-दोनदा याचा वापर केला आहे. ‘द सेकंड स्टेन’मध्ये लेडी हिल्डा होम्सला भेटायला येते तेव्हा याची एक चुणूक दिसते. मात्र ‘स्कॅंडल इन बोहेमिया’मधली आयरिन ऍडलर या संदर्भात एक उत्तम उदाहरण ठरावे. होम्सला जश्यांस तसे उत्तर देणाऱ्या मोजक्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आयरिनचा समावेश होतो. हिगाशिनोची दुसरी कादंबरी – ‘सॅल्व्हेशन ऑफ अ सेंट’ मध्ये त्याने या कथाबीजाचा वापर केला आहे. याची पावती म्हणून या कादंबरीच्या नायिकेचे नावही आयाने असे आहे.

    Book cover for Salvation of a Saint

    आयाने आणि तिचा नवरा योशिताका – लग्न होऊन एक वर्ष झालं आहे. त्यांच्या एका वादावादीने कादंबरीची सुरुवात होते. भांडण संपल्यावर आयाने माहेरी जाते. दुसऱ्या दिवशी योशिताका मृतावस्थेत आढळतो. त्याला कॉफीमधून आर्सेनिक दिलेलं असतं. कॉफी त्याने स्वत:च केलेली असते. परत इन्स्पेक्टर कुसानागी आणि त्याचा भौतिकशास्त्रज्ञ मित्र युकावा रहस्यभेद करण्याच्या मागे लागतात. यावेळी कुसानागीच्या बरोबर एक नवीन उमेदवार स्त्री-पोलिस अधिकारी – उत्सुमी – आहे. तपास चालू असताना उत्सुमी अनेकदा कुसानागीच्या लक्षातही येणार नाहीत अशा गोष्टी उघडकीला आणते. आयाने आणि उत्सुमी या दोन पात्रांमागे आयरिन ऍडलरची प्रेरणा स्पष्ट दिसते. काहीही पुरावा नसतानाही उत्सुमीची अंत:प्रेरणा आयाने दोषी असल्याचं सांगत असते. सर्वात मोठा प्रश्न – कुणीही घरी नसताना योशिताकावर विषप्रयोग कसा झाला? यामागे कोणतं वैज्ञानिक तत्त्व वापरलं गेलं आणि हे नेमकं कसं झालं याची उकल शेवटी प्राध्यापक युकावा करतो. अर्थातच शेवटी जी कलाटणी मिळते ती आपल्या सर्व अंदाजांच्या पलीकडे जाणारी असते. याहून अधिक तपशील सांगण्यात अर्थ नाही. हा रोमांचकारी प्रवास करायचा असल्यास ज्याचा त्याने केलेला बरा. शेवटच्या पानापर्यंत हिगाशिनो उत्कंठा ताणून धरण्यात यशस्वी ठरतो.