Categories
इतिहास​ बुके वाचिते

आर्यांच्या शोधात

नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्रजो नो व्योमपरो यत्
किमावरीवः कुहकस्यशर्मन्नंभः किमासीद्गहनं गभीरं 

ऋग्वेद, मंडल १०, सूक्त १२९

दूरदर्शन वयात येत असतानाची गोष्ट, जेव्हा मालिका या शब्दाआधी दर्जेदार हे विशेषण नि:संकोचपणे वापरता येऊ शके. त्या काळात दर रविवारी रात्री नऊ वाजता ऋग्वेदातील नासदीय सूक्ताचे हे श्लोक आणि नंतर पं. वसंत देव यांनी केलेला हिंदीतील अनुवाद कानावर पडत असे. ‘भारत एक खोज’ बघताना पहिल्यांदाच शाळेत शिकवला जातो त्यापेक्षा पूर्वीचा आपला इतिहास कसा होता याविषयी उत्सुकता निर्माण झाली. नुकतेच प्रा. मधुकर केशव ढवळीकर यांचे ‘आर्यांच्या शोधात’ हे पुस्तक वाचले आणि हा विषय किती गहन, जटील आणि तरीही रोचक आहे याची जाणीव झाली. प्रा. ढवळीकर यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, नागपूर विद्यापीठ आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्वशास्त्र विषयात अनेक वर्षे संशोधन केले. यातील काही काळ डेक्कन कॉलेजचे संचालक आणि उपसंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नुकताच त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.

Book Cover for Aryanchya Shodhat by M K Dhavalikar

भारतात आर्यांचे आगमन कधी, कुठून झाले याबद्दल निरनिराळ्या विद्वानांनी मांडलेली मते, त्यातील त्रुटी, उपलब्ध पुरावे आणि त्यावरून आर्यांचे मूळ उत्तर हिंदू संस्कृतीत असले पाहिजे हा निघणारा निष्कर्ष या सर्वांचा उहापोह ‘आर्यांच्या शोधात’ या पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाच्या सुरूवातीलाच प्रा. ढवळीकर या संदर्भात लोकमान्य टिळक, हार्वड विद्यापीठाचे मायकेल विट्झेल, केंब्रिज विद्यापीठाचे कोलीन रेनफ्र्यु यांच्यासह २० विद्वानांच्या वेगवेगळ्या मतांचा आढावा घेतात. लो. टिळक वेदांमधील खगोलशास्त्रीय पुराव्यांच्या आधारावर वेदांचा काळ इ. पू. ६००० असा ठरवतात. आर्य उत्तर ध्रुवावरून आले असावेत असे त्यांचे मत आहे तर रेनफ्र्यु यांच्या मते आर्यांचे उगमस्थान तुर्कस्तानात होते. विट्झेल आर्य भारतात दोनदा आले असे मानतात. पण तलगेरींना हे अजिबात मान्य नाही. आर्य भारतातीलच आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. या मतांमधील प्रचंड वैविध्य पाहिल्यावर ‘ही मानवी इतिहासातील एक कूट समस्या आहे’ या पुस्तकाच्या पहिल्याच वाक्याची सत्यता पटते.

यासारख्या प्रचंड व्याप्तीच्या विषयावर सुलभ पुस्तक लिहीताना त्यातील पुरातत्वशास्त्र, तौलनिक भाषाशास्त्र यासारख्या शाखांमध्ये संशोधन कसे केले जाते याच्या तपशिलात जाणे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्याऐवजी ओघाने येतील तसे विषय आणि ते समजण्यासाठी लागणारी पुरेशी पार्श्वभूमी यांचा समन्वय पुस्तकात साधलेला दिसून येतो. इतिहासामध्ये संशोधन करताना विविध प्रकारच्या पुराव्यांचा आधार घेतला जातो. भाषाशास्त्रीय पुरावे – विविध भाषांमधील समान शब्दांचा अभ्यास करून त्यांच्या मूळ भाषेविषयी आणि त्यावरून ती भाषा बोलणार्‍या लोकांविषयी अंदाज बांधता येतात. त्या काळच्या वाङमयाचा अभ्यास करून तेव्हाची भौगोलिक परिस्थिती, तेव्हा घडलेल्या महत्वाच्या घटना याविषयी मौलिक माहिती मिळू शकते. मायकेल विट्झेल यांच्या मते ऋग्वेदाचे सातवे मंडल म्हणजे निखळ इतिहास आहे. याखेरीज सर्वात महत्वाचे पुरावे म्हणजे उत्खनन केल्यावर मिळणारे प्राचीन संस्कृतींचे अवशेष. भारतीय इतिहासातील एक चमत्कृतीजन्य विशेष म्हणजे आर्यांच्या संस्कृतीचे वाङमयीन पुरावे भरपूर आहेत मात्र त्यांचे पुरातत्वीय अवशेष अजिबात सापडत नाहीत. याउलट सिंधू संस्कृतीचे अवशेष भरपूर आहेत पण त्याबद्दलचा लिखित पुरावा अद्याप उपलब्ध नाही कारण सिंधू लिपी अजून वाचली गेलेली नाही.

‘ऋग्वेदातील संस्कृती’ या प्रकरणात त्या काळातील आर्यांच्या राहणीमानाबद्दल रोचक माहिती दिली आहे. ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाणे आर्यांची वस्ती सप्तसिंधूच्या प्रदेशात होती. सप्तसिंधू म्हणजे पश्चिमेकडे सिंधू आणि पूर्वेकडे सरस्वती यांच्यामधला भूभाग. ऋग्वेदामध्ये सर्वाधिक वर्णन केले आहे अशी प्राचीन सरस्वती नदी म्हणजे आताची कोणती याबद्दल पुन्हा वाद आहेत. तरीही सध्याच्या भारतातील घग्गर आणि पाकीस्तानातील हाक्रा ही सरस्वती आहे असे मानायला पुरावे आहेत. ऋग्वेदकालीन आर्य शेती करत असले तरी त्यांच्या उपजीवीकेचे मुख्य साधन पशुपालन होते. दगडी हत्यारे, मौल्यवान दगडांचे तसेच सोन्याचे मणी, लाकडाची आणि मातीची भांडी यांचा वापर ते करीत असत.

आर्यांच्या वापरातील एका गोष्टीवरून विद्वानांमध्ये परत रण माजले आहे, ती गोष्ट म्हणजे घोडा. यावर सर मॉर्टिमर व्हीलर म्हणतात, “No horse, No Aryans.” ऋग्वेदामध्ये आर्यांचा सर्वात आवडता प्राणी म्हणजे घोडा, मात्र तिथे अश्व याचा अर्थ गाढव असाही होतो. सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये काही हाडे सापडली ती घोड्याची की गाढवाची यावर बरीच वर्षे खल चालू होता. यावर भारत सरकारने हंगेरीमधील ‘घोडा’ या विषयावरील जगन्मान्य तज्ज्ञ सांडोर बोकोनी यांना पाचारण केले. त्यांनी सर्व हाडे तपासून ती घोड्याची असल्याचा निर्वाळा दिला. पण हार्वर्ड विद्यापीठातील तज्ज्ञ रिचर्ड मिडो यांनी ती हाडे गाढवाची असल्याचे जाहीर केले. घोडा भारतात पहिल्यांदा इ. पू. २००० मध्ये आल्याचे विश्वसनीय पुरावे आहेत.

‘आर्यांचे पुरातत्वीय अवशेष’ या प्रकरणात उपलब्ध पुरातत्वीय पुरावे आणि त्यातून काढता येणारे निष्कर्ष दिले आहेत. भारतात लोखंडाचा वापर इ. पू. १५०० पासून सुरू झाला. ऋग्वेदामध्ये मात्र लोखंडाचा उल्लेख नाही. तिथे येणार्‍या अयस या शब्दाचा अर्थ तांबे असा होतो. हा पुरावा आणि घोड्याचा पुरावा या दोन गोष्टींवरून वेदांचा काळ इ. पू. २०००-१५०० असा निश्चित करता येतो. एकदा काल निश्चित झाला की त्यांच्या वसाहती कुठे होत्या याबद्दल अनुमान बांधता येते. सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये ज्या वसाहती समोर आल्या आहेत, त्यामध्ये पूर्व सिंधू (इ. पू. ३२५०-२६५०), नागरी सिंधू (इ. पू. २६००-२२००) आणि उत्तर सिंधू (इ. पू. २०००-१४००) या प्रमुख वसाहती आहेत. प्रा. ढवळीकर आर्यांची वस्ती म्हणजे उत्तर सिंधू संस्कृती असे समीकरण मांडतात. याच्या पुष्ट्यर्थ तेव्हाच्या नद्या, पर्यावरण यांची वर्णने तसेच घरे, शेती, स्थापत्य, अवजारे, भांडी, नाणी असे उत्खननात सापडलेले अनेक पुरावे त्यांनी दिले आहेत. ही उत्खनने सिंधू खोरे, मोहेंजोदारो, हरप्पा, कालीबंगन, भगवानपुरा इ. ठिकाणी केली आहेत. हे मत बहुतेक पाश्चात्य विद्वानांना मान्य नाही. सबळ पुरावा असूनही आर्य बाहेरूनच आले याच मताला ते चिकटून आहेत. मात्र यातही अपवाद आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सुप्रसिद्ध मानववंधशास्त्रज्ञ प्रा. केनेथ केनेडी यांनी भारतीय उपखंडात सापडलेया जवळजवळ सर्व मानवी सांगाड्यांचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या मते गेल्या पाच हजार वर्षांमध्ये भारतीय उपखंडात कोणतेही नवे लोक आले नाहीत.

उत्तर सिंधुकालीन लोक वैदिक आर्य होते असे मानले तर ते कुठून आले या प्रश्नाच्या मुळाशी जाता येते. ‘वैदिक आर्यांचे पूर्वज’ या प्रकरणात याची सखोल चर्चा केली आहे. मेहेरगढ येथील उत्खननावरून असे दिसून येते की ९००० वर्षांपासून ते सुमारे ७००० वर्षांपर्यंत तेथे एकाच प्रकारचे लोक राहत होते. इ. पू. ४५०० च्या सुमारास नव्या लोकांचे आगमन भारतीय उपखंडात झाले. इथून पुढे टोगाओ संस्कृती (इ. पू. ४५००-३८००) सुरू झाली. तेच लोक इ. पू. १७५० म्हणजे उत्तर सिंधू संस्कृतीचा र्‍हास होईपर्यंत राहत होते. या नव्या लोकांची दातांची ठेवण आधीच्या नवाश्मयुगीन लोकांपेक्षा वेगळी होती. त्यांची विशिष्ट प्रकारची दाढेची ठेवण युरोपियन आणि दक्षिण आशियातील काही लोकांमध्ये आढळते. या नवीन लोकांनी बर्‍याच नवीन गोष्टी आपल्याबरोबर आणल्या. या लोकांची भाषा इंडो-आर्यन (संस्कृतसारखी) असावी. यातील काही लोकांनी पूर्वेकडे स्थलांतर केले, त्यातून हाक्रा संस्कृती (इ. पू. ३८००-३२००) उदयास आली. त्यामधून पूर्व, नागरी आणि उत्तर सिंधू अशी वाटचाल झाली. या सांस्कृतिक विकासाचे चित्र आपल्याला आज ऋग्वेदात दिसते.

नागरी सिंधू संस्कृतीच्या काळात राजस्थानमध्ये हवामान अनुकूल होते, १८ इंच पावसामुळे सरस्वती दुथडी भरून वहात होती. परिणामत: नागरी सिंधू संस्कृती बहरली. परंतू इ. पू. २२००-२००० च्या दरम्यान झालेल्या भूकंपांमुळे पर्यावरणात बदल होऊन हवामान दुष्काळी झाले. सिंधू खोरे राहण्यास प्रतिकूल झाल्यावर आर्यांची बर्‍याच प्रमाणात स्थलांतरे झाली. याची चर्चा ‘आर्यांची स्थलांतरे’ या प्रकरणात केली आहे. इ. पू. १८००-१६०० दरम्यान आर्य इराणमध्ये गेले. तेथील नद्यांना त्यांनी आपल्याकडची नावे दिली. हरैवती-सरस्वती, हरोयु-शरोयु. सप्तसिंधूमधून इराणमध्ये जाताना ज्या क्रमाने नद्या लागतात बरोबर त्याच क्रमाने त्यांचे वर्णन अवेस्तामध्ये आहे. आर्य इराणमध्ये गेल्यानंतर त्यातील काही त्याहून पुढे म्हणजे तुर्कस्तान, इजिप्त, इथियोपिया आणि ग्रीसपर्यंत पोचल्याचे पुरावे आहेत.

आर्यांची भारतातही स्थलांतरे झाली. राजस्थानातून सिंधु संस्कृती मध्य प्रदेशात कायथा संस्कृती (इ. पू. २४५०-२०००) या नावाने पसरली. कायथा (जि. उज्जैन) येथे तिचे पहिले अवशेष सापडले म्हणून तिला कायथा संस्कृती हे नाव दिले गेले. याचा विस्तार पुढे महाराष्ट्रात माळवा संस्कृतीच्या (इ. पू. १७००-१४००) रूपाने झाला. ती इ. पू. १४०० मध्ये लयास गेली पण तत्पूर्वी तिच्यामधून निर्माण झालेली जोर्वे संस्कृती (इ. पू. १५००-९००) कोकण किनारपट्टी सोडल्यास सबंध महाराष्ट्रात पसरली होती. इनामगाव (जि. पुणे), दायमाबाद, नेवासे (जि. अहमदनगर) आणि प्रकाश (जि. नंदूरबार) ही या संस्कृतीची महत्वाची ठिकाणे होती. याखेरीज सौराष्ट्र, कच्छ तसेच पूर्वेकडे बिहारमध्ये आर्यांनी स्थलांतरे केल्याची उदाहरणे आहेत. गंगेच्या खोर्‍यातही आर्यांच्या वस्तीच्या खुणा सापडतात.

सुमारे १०,००० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या इतिहासाचे वाङमयीन उल्लेख आणि पुरातत्वीय पुरावे यांच्या आधारावर जे चित्र उभे राहते त्याचा सारांश उपसंहार या शेवटच्या प्रकरणात आहे.

आर्यांच्या उगमासारख्या कूट समस्येवर सर्व थरातील लोकांपर्यंत पोचेल असे पुस्तक लिहीणे निश्चितच कठीण काम आहे. ‘आर्यांच्या शोधात’ पुस्तकामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तेवढा पुस्तकाचा व्यापही नाही. मात्र या प्रश्नाबद्दल उत्सुकता निर्मांण करण्यात पुस्तक नक्कीच यशस्वी ठरते. सुरूवातीच्या प्रकरणांमध्ये काही गोष्टींची पुनरावृत्ती होते. तसेच काही ठिकाणी तारखांचा थोडा गोंधळ होतो. उदा. वर दिलेले प्रा. केनेडी यांचे मत – ‘गेल्या पाच हजार वर्षांमध्ये भारतीय उपखंडात कोणतेही नवीन लोक आले नाहीत’ – इथे इ. पू. ५००० की इ. पू. ३००० हे स्पष्ट होत नाही. या किरकोळ दुरूस्त्या पुढच्या आवृत्त्यांमध्ये करता येऊ शकतील असे वाटते. पुस्तकाच्या शेवटी दिलेली अद्ययावत संदर्भसूची या विषयात खोलात जाऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी नक्कीच उपयोगी ठरावी.

पुस्तक वाचण्याचा अनुभव कसा असेल हे बरेचसे पुस्तक कोणत्या प्रकारचे आहे यावर अवलंबून असते. ललित साहित्य किंवा कविता यांचा आस्वाद घेताना येणारी अनुभूती वेगळी असते. खगोलशास्त्रज्ञ कार्ल सगानच्या ‘कॉसमॉस’ या पुस्तकात व्हॉयेजर अंतराळयानातून घेतलेले पृथ्वीचे चित्र दिले आहे. सूर्यमालेच्या बाहेरून घेतलेल्या या चित्रात सूर्यप्रकाशाच्या झोतात मध्यभागी एक छोटासा निळा बिंदू दिसतो, तीच पृथ्वी. याला इंग्रजीत एक चपखल वाक्प्रचार आहे, ‘लुकिंग ऍट द बिग पिक्चर.’ संस्कृती हा शब्द सामाजिक, नैतिक आणि राजकीय संदर्भांमध्ये ज्या बेधडकपणे वापरला जातो त्याचा परिणाम म्हणून संस्कृतीचा अर्थ एखादी कोणत्याही धक्क्याने सहज तुटणारी नाजूक वस्तू इतकाच होऊन बसला आहे. बहुतेक धार्मिक चालीरीतींचे व्यावसायिकीकरण झाले आहे. वेद, पुराणे यांचा उल्लेख आल्यावर त्यावर भक्तीभावाने विश्वास ठेवणारे धार्मिक किंवा त्यांना कोणतीही किंमत न देणारे विज्ञानवादी अशी दोन परस्परविरोधी टोके प्रामुख्याने दिसतात. पण यातच आपल्या इतिहासाच्या खुणा लपलेल्या आहेत याची जाणीव क्वचितच दिसते. ‘आर्यांच्या शोधात’ सारखे आपल्या पूर्वजांचा मागोवा घेणारे पुस्तक वाचल्यावर समाज आणि संस्कृती यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. आपण कळत आणि नकळत ‘मोठ्या चित्राचा’ विचार करायला लागतो. संस्कृतीच्या नावाखाली आपण आज ज्या चालीरीती क्षणाचाही विचार न करता वापरतो, त्यांचा उगम आणि प्रसार कुठे, कधी, कसा झाला हे जाणून घेणे हा एक रोमांचकारी अनुभव ठरतो.