आजच्या धावपळीच्या जगात लक्ष कमी झाल्यामुळे वाचन कसे कमी झाले आहे, अशा तक्रारी आपण अनेकदा ऐकतो. याउलट आपल्यातील आशावाद्यांना पुराव्याची गरज असेल तर ती १४ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान पुण्यात झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवाने दिली.
महोत्सवाची व्याप्ती लक्षात यावी यासाठी काही आकडे. हे महोत्सवाचे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षीच्या तुलनेत पुस्तकविक्रीत चौपटीने वाढ झाली आहे.
आठवडाभरात विक्रमी दहा लाख पुस्तकप्रेमींनी महोत्सवाला भेट दिली. २.५ दशलक्षाहून अधिक पुस्तके विकली गेली आणि ४०० दशलक्ष रुपये (४.६ दशलक्ष डॉलर्स)ची गडगंज उलाढाल झाली. १०० हून अधिक नवीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आणि सुमारे १००० लेखकांनी या महोत्सवात भाग घेतला. ९७,०२० पुस्तकांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या भारतीय राज्यघटनेच्या शिल्पासह चार जागतिक विक्रम या कार्यक्रमात करण्यात आले.
या व्याप्तीचा महोत्सव आयोजित करण्यासाठी सखोल नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांचे उत्स्फूर्त सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. महोत्सव यशस्वी करण्यामागे मुख्य आयोजक मा. श्री. राजेश पांडे जी, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री मा. श्री. चंद्रकांत पाटील जी, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ जी, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे जी, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक मा. श्री. युवराज मलिक जी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी जी यांचे अथक प्रयत्न होतेच त्याचबरोबर इतर अनेक व्यक्तींचा यात सहभाग होता, सर्वांची नावे जागेअभावी देणे शक्य नाही. विशेषकरुन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत तत्पर असलेले तरुण विद्यार्थी स्वयंसेवक.
पुणे पुस्तक महोत्सवात लेखकांशी चर्चा, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालचित्रपट महोत्सव असे अनेक समांतर उपक्रम आयोजित केले. मुलांशी संवाद साधण्यासाठी दुपारी शाळांकडून विशेष भेटीची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय स्वतंत्र खाना खजाना विभागही होता. शेकडो पुस्तके चाळून शिणलेल्या मेंदूला उर्जा देण्यासाठी विविध भारतीय पदार्थांची चव चाखता येत होती.
पुणे पुस्तक महोत्सवाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुणे लिट फेस्ट’चे यंदाचे पहिले वर्ष होते. सगळ्या संत्रांना जायची इच्छा होती पण जमले नाही. मात्र भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मा. श्री. मुरलीकांत पेटकर जी यांचे प्रेरणादायक आणि प्रेरक सत्र ऐकू शकलो याचा आनंद आहे. पहिला ‘पुणे लिट फेस्ट’ तीन दिवसांचा होता आणि त्याला मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता भविष्यात त्याचा कालावधी वाढणार यात शंका नाही.
माझी एकच खंत आहे की अनेक मनोरंजक पुस्तके चाळायची राहून गेली असणार. पुस्तकांची प्रचंड संख्या बघता असे होणे साहजिकच होते. त्याचवेळी आपले आवडते लेखक आणि विषय आणि शैली शोधण्यासाठी तासनतास घालवणारे वाचक पाहून मनापासून आनंद झाला.
मला जेवढा खजिना वाहून नेता येईल तेवढा खजिना घेऊन मी रोज परत आलो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ही सर्व पुस्तके वाचण्यासाठी वेळ काढायचा हा यक्षप्रश्न आहे. 🙂
आणि तरीही, महोत्सवातील सर्वात मौल्यवान वस्तू पुस्तके नव्हती; मात्र त्यांचा संबंध इतिहासाशी होता. पहिली वस्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री. मोरया गोसावी संस्थानला दिलेली १३ गावांमधील इनामाची सनद.
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ||श्री समर्थ रामदास स्वामी
भारत इतिहास संशोधन मंडळाच्या स्टॉलमध्ये ही सनद मिळाली. त्याबरोबर आणखीही अनेक कागदपत्रांच्या प्रती होत्या, उदा. महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना लिहिलेले पत्र, अनेक पेशवेकलीन छायाचित्रे आणि पत्रे. या पत्रांचा मराठी अनुवाद भारत इतिहास संशोधन मंडळातर्फे पुढल्या वर्षी प्रकाशित होणार आहे असे तिथल्या संचालकांकडून कळाले.
दुसरा मौल्यवान ठेवा म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची प्रतिमा. महोत्सवात राज्यघटनेचा एक स्वतंत्र स्टॉल होता जिथे भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत ठेवण्यात आली होती. विद्वानांच्या मसुदा समितीने १६५ दिवसांच्या कालावधीत तयार केलेला भारतीय राज्यघटना हा एक अनोखा कायदेशीर दस्तऐवज आहे. सुमारे १४५,००० शब्दांची ही राज्यघटना जगातील अलाबामाच्या घटनेनंतरचे दुसरी सर्वात दीर्घ सक्रिय राज्यघटना आहे. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य पंडितांना लोकशाही म्हणून भारताच्या अस्तित्वाविषयी साशंकता होती.
सर्व अडथळे झुगारून भारत सर्वात मोठी लोकशाही म्हणून उदयास आला आहे आणि त्याच्या मुळाशी हे संविधान आहे, जे आता ७५ वर्षे जुने आहे. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांनी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केल्याच्या स्मरणार्थ २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली. पंतप्रधान मोदी जी यांनी नुकतेच संसदेत म्हटले होते की, “७५ वर्षांची कामगिरी सामान्य नाही, तर विलक्षण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतासाठी व्यक्त करण्यात आलेल्या शक्यतांना पराभूत करून भारतीय राज्यघटनेने आपल्याला इथं आणलं आहे.”
पुणे ही महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे, शिवाय गेल्या शतकभरापासून विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. आगामी काळात पुणे पुस्तक महोत्सव आणि ‘पुणे लिट फेस्ट’ हे शहर आणि जनतेसाठी एक स्वतंत्र ओळख म्हणून उदयास येतील यात शंका नाही. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व आयोजकांनी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
भारतीय महिला क्रिकेटची विजयी वाटचाल
भारताने नुकतीच वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाविरूद्ध टी-२० मालिका २-१ अशी जिंकली.
स्मृती मंधानाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ९१ (१०२) धावा केल्या आणि एका वर्षात १००० पेक्षा जास्त धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. त्याआधी तिने टी-२० सामन्यांमध्ये ७६३ धावा केल्या आणि टी-२० फॉरमॅटमध्ये एकाच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा केल्या. तिसऱ्या टी-२० सामन्यात रिचा घोषने १८ चेंडूत ५० धावांची खेळी करत भारतीय संघाचे सर्वात जलद आणि संयुक्तपणे सर्वात वेगवान टी-२० अर्धशतक झळकावले. आणि स्टंपच्या मागेही ती चांगली कामगिरी करत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात रेणुकासिंग ठाकूरने उत्कृष्ट गोलंदाजी करत १० षटकांत २९ धावांत ५ गडी बाद केले. भारताने हा सामना विक्रमी २११ धावांनी जिंकला!
जेमिमा रौड्रिग्ज, राधा यादव, प्रिया मिश्रा यांच्यासह भारतीय महिला क्रिकेट संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरचा अप्रतिम एकहाती ब्लाइंडर हे एक उत्तम उदाहरण.
२०२५ मध्ये होणाऱ्या महिला वनडे विश्वचषकासाठी हा संघ तयार आहे असं दिसतंय.