Categories
इनोद

मी दुडदुडले, ऑमनॉमनॉमनॉमनॉम – मिस चिनी आणि माऊभाषा चळवळ

मागे आम्ही विश्वसुंदरी मिस चिनी यांची मुलाखत घेतली होती. मुलाखतीनंतर आमच्या कार्यालयात पत्रे, इमेल, एसएमएस आणि फोन यांची सुनामी आली. यापैकी बहुतेक फोन भारत आणि भारताबाहेरील बोक्यांकडून होते असं आमच्या लक्षात आलं कारण फोनवर बरेचदा नुसतं घर्र. . .घर्रर्र. . ऐकू येत असे. (याउलट फोन मांजरीचा असेल तर ‘हिस्स्स’.) तेव्हा या लोकाग्रहाला आणि बोकाग्रहाला मान देऊन आम्ही चिनी यांची आणखी एक भेट घ्यायचं ठरवलं.

‘माझिया बोक्याला आणि मलाही काहीच कळेना’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर चिनी यांची भेट झाली.

“मिस चिनी, तुमची मागची मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर जगभरातील बोक्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे.”

“न मिळायला काय झालं? बोके सगळे इथून-तिथून सारखेच. हुंगेगिरीशिवाय दुसरा उद्योग असतो का मेल्यांना?” चिनी नाक उडवत म्हणाली.

“तुमच्या मालिकेला अमाप लोकप्रियता मिळाली आहे. आता शूटिंग चालू आहे त्या प्रसंगाबद्दल काही सांगाल का?”

“आमची स्क्रिप्ट टॉमीने पळवल्यापासून गेले सातशे एपिसोड आम्हाला सतत कथानक इंप्रोवाइज करायला लागतय.”

“म्हणजे नेमकं काय करता?”

“प्रत्येक एपिसोडची सुरुवात एका कलाकाराच्या अंग चाटण्याच्या दृश्याने होते. हे स्लो-मोशनमध्ये, तीन ऍंगलमधून तीन-तीन वेळा दाखवायचं. आता जे शूटिंग चाललं आहे त्याचा सिक्वेन्स असा आहे. मी बसले. मी पेंगले. मी उठले. मी पेंगले. मी उजवा पंजा चाटला. मी पेंगले. मी डावा पंजा चाटला. मी पेंगले. मी आळसले. मी झाडावरच्या पक्ष्यांकडं बघितलं. .घर्र. . .घर्रर्र. . चिमण्यांचं वजन वाढलेलं दिस्तै..घर्र. . .घर्रर्र. . न वाढायला काय झालं? फुकटचे दाणे हादडायचे दिवसभर . .घर्र. . .घर्रर्र. . मागच्या वर्षी एक मिळाली होती त्यानंतर सगळा उपासच उपास. .दूध पिऊन दिवस काढावे लागतैत कसेबसे. . घर्र. . .घर्रर्र. . काय तिची तंगडी होती, अहाहा. . घर्र. . .घर्रर्रघर्र. . .घर्रर्र”

“मिस चिनी?”

“घर्र. . .घर्रर्र. . चिमणी..तंगडी….आपलं काय म्हणत होते मी?”

“दृश्याचा सिक्वेन्स.”

“हं तर असं करत करत वीस-एक मिनिटं जातात.”

“याबद्दल तुमच्या प्रेक्षकांची तक्रार येत नाही का?”

“बहुतेक प्रेक्षकही पेंगतच असतात. आणि एपिसोडच्या शेवटी आम्ही एक मिनिट लेझर शो दाखवतो. तेव्हा सगळे प्रेक्षक पडद्यावर उड्या घेतात. मग कथानकाची कुणाला आठवणच राहात नाही.”

“याव्यतिरिक्त तुम्ही एक नवीन भाषा निर्माण करत आहात, त्याबद्दल काही सांगाल का?”

“जगभरात इंग्रजी म्यावांची एक वेगळी भाषा आहे – लोलक्याट्स. ही भाषा वापरून परदेशी म्यावां अभिव्यक्तीची नवनवी दालनं पंजाक्रांत करत आहेत. आता तर चक्क बायबलचा या भाषेत अनुवाद झालाय. आणि इथे मात्र मराठी म्यावां अजूनही माणसांचीच भाषा वापरतायत. हे बदललं पाहिजे. यासाठी आम्ही माऊभाषा चळवळ सुरू करत आहोत.”

“माऊभाषेचं स्वरूप कसं असेल सांगता येईल का?”

“हे आत्ताच सांगणं अवघडै. भाषा यडचाप टॉमीसारखी आज्ञाधारक नस्ते कै. तिला म्यावांसारखं चौफेर, मनमुराद हुंदडायला आवडतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्यावांच्या आयुष्यातील विविध क्रियांसाठी आम्हाला नवीन क्रियापदांची गरजे. आमच्या कितीतरी नेहमीच्या क्रियांना शब्दच नैयेत. या दिशेने,” चिनीने उजवा पंजा वर करून एक दिशा दाखवली, “एक प्रयत्न म्हणून मी एक कविता केलीय.”

“गवतात काहीतरी हललं, मी सावधले
टॉमीची चाहूल लागे, मी दुडदुडले
अंगावर पाणी पडलं, मी सुरकुतले
दुधावर साय आली, ऑमनॉमनॉमनॉमनॉम, मी चकितले
पक्सी उडून गेले, ऑमनॉमनॉमनॉमनॉम, मी हताशले”

“हे पक्षीऐवजी पक्सी काय म्हणून?”

“ही रचना माऊविक्रिडीत वृत्तामध्ये आहे. वृत्त सांभाळण्यासाठी असा बदल करावा लागला.”

“अरे वा, हे नवीनच वृत्त दिसतंय. याचे नियम काय आहेत?”

“नियम अजून ठरायचेत.”

“रचना आधी आणि नियम नंतर? हे कसं काय ब्वॉ?”

“त्यात काय मोठं? तुमच्यात नाही का, आधी आक्रमण करुन देशाची वाट लावायची आणि नंतर डब्ल्युएमडी शोधायचे, असं करत?”

“हो, ते ही खरंच म्हणा. आणि हे ऑमनॉम काय? हे पण वृत्तच का?”

“माऊविक्रिडीत वृत्तामध्ये हा खास बफर टाकलाय. हा आम्ही परदेशी म्यावांकडून उसना घेतलाय. खाण्याचा उल्लेख आला की आमचं आपलं आपॉप घर्र. . .घर्रर्र. . सुरू होतं. मागे एका कविसंमेलनात अध्यक्ष बोका ‘घर थकलेले संन्यासी’चं वाचन करत होता पण कविता पूर्ण झालीच नै. ‘पक्षांची घरटी होती’ (ऑमनॉमनॉमनॉमनॉम) असा उल्लेख आल्यावर कवी आणि श्रोते अर्धा तास घर्र. . .घर्रर्र. . करत होते. शेवटी शेजारच्या बिल्डींगमधले कुत्रे उठले तेव्हा सुटका झाली. हे टाळण्यासाठी हा बफरे. अर्थात पुढच्या ओळी आल्या आणि घरटी असलेलं झाडं कुणीतरी तोडलं हे कळलं तसे श्रोते बिथरले. मग संमेलन रद्द करावं लागलं.”

“बरं, मला एक सांगा मिस चिनी, परवा रात्री तुम्ही आणि ‘बी’ बिल्डींगमधला पिंगट बोका आमच्या खिडकीखाली भांडत होता ते कशाबद्दल?”

“ओह, तुम्ही ऐकलं वाटतं?”

“दोघेही काळी सात वर होता, त्यामुळे इच्छा नव्हती तरीही ऐकावं लागलं. आम्हीच नाही सगळ्या बिल्डींगनी ऐकलं.”

“माऊभाषेचा उत्कर्ष कसा करायचा याबद्दल आमचे जरा तीव्र मतभेद झाले, त्यावरून वादावादी झाली.”

“पण नंतर मी टॉर्च मारला तर तुमच्या तोंडात उंदीर होता.”

“नॉन्सेन्स, इट्स नॉट द माऊस, इट्स द प्रिन्सिपल.”

“अरेच्चा, हा वाक्प्रचार तर आमच्याकडेही वापरतात आणि बहुतेक वेळा परिस्थितीही अशीच असते. फक्त माऊस च्या जागी मनी असते- मनी म्हणजे पैसा या अर्थी, तुम्ही नाही बरं का.”

तेवढ्यात शॉट रेडी झाला. माऊभाषेच्या उत्कर्षाबद्दल आशा व्यक्त करुन मिस चिनी यांनी काढता पंजा घेतला.

मिस चिनी माऊभाषेच्या भवितव्याबद्दल चिंतन करताना
Categories
इनोद

देख के दुनिया की दिवाली..

(हा लेख जवळपास दहा वर्षांपूर्वी लिहिला होता. सध्या परिस्थिती खूपच सुधारली आहे.)

नाही, म्हणजे यांचा लाइफमध्ये प्रॉब्लेम काय आहे? पैसे नाहीत, वेळ नाही का काम करायचं नाहीये? ही दोन वाक्ये लिहीपर्यंत दोनदा वीज गेली होती हे सांगितल्यावर ‘ते’ म्हणजे कोण याचा प्रकाश तुमच्या डोक्यात पडला असेलच. तर आज आपण वीज जाण्याचे आणि घालवण्याचे विविध प्रकार कोणते आहेत त्याची ओळख करून घेणार आहोत.

प्रकार एक : (विकट हास्य) लोड शेडींग 

आपल्या दुर्दैवी देशाचं लोड इतकं आहे की कितीही शेड केलं तरी ते शेडच होत नाही, यू नो? दर वेळी याची कारणे वेगळी असतात. टाटाला द्यायला पैसे नाहीत, आंध्रामध्ये कोळसा भिजला इ. इ. सध्या म्हणे एमएसइबीला पुणे विभागाचे लोड शेडींग कसं करायचं याचं वेळापत्रक करायलाच वेळ नाहीये, आता बोला! बहुधा डूटीवर असणारे अधिकारी ‘अकडम तिकडम तडतड बाजा’ करून कोणत्या विभागाचं बटण दाबायचं हे ठरवत असावेत. कारण सध्या दिवसातून कोणत्याही वेळेला वीज जाते, कधी एक तास, कधी दीड तास. एक तास किंवा दीड तास वीज गेली तर ते लोड शेडींग नाहीतर इतर काहीतरी (पुढे बघावे). अर्थात ‘इतर काहीतरी’मुळे गेलेली वीज नेमकी एक तास किंवा दीड तास जाऊ शकते पण तसेही तुम्हाला काय फरक पडतो? तुम्ही (शब्दश: आणि वाक्प्रचार, दोन्ही अर्थाने) अंधारात आहात आणि अंधारातच रहाणार.

प्रकार दोन : गरजत बरसत सावन आयो रे..

चांदोबातल्या गोष्टींमध्ये राक्षसाचा एक अवयव नाजुक असतो तिथे बाण मारला तर तो मरतो. तसं आपल्या देशाचा सगळ्यात नाजुक अवयव म्हणजे वीज. सावन कशाला, नुसता गार वारा जरी सुटला तरी वीज जायला ते पुरेसं असतं. कधीकधी हे एमएसइबीवाले ‘प्रिएम्प्टीव्ह’ वीज घालवतात असं वाटतं. म्हणजे वारा सुटलाय, वादळ येतय, वीज जाणार ही काळ्या दगडावरची रेघ. मग आधीच घालवून टाकूयात. कधीकधी पाऊस आला-वीज गेली, पाऊस थांबला-वीज आली, पाऊस आला-वीज गेली असं दुष्टचक्र सुरु असतं.

सावनवरून आठवलं, या वर्षी पावसाला झालंय काय? दिवाळी आली तरी बदाबदा कोसळतोच आहे? वर जो कोणी शिफ्टला होता तो ट्याप सुरू करून रजेवर गेला बहुतेक. या वर्षी म्हणे हवामान विभागाने वीस वर्षात पहिल्यांदाच अंदाज चुकला अशी कबुली दिली आहे. (‘वीस वर्षात पहिल्यांदा अंदाज चुकला’ ही कबुली नाही, कबुली ‘वीस वर्षात पहिल्यांदाच दिली आहे’. आई बात समझमें?)

हॅहॅहॅ. हे म्हणजे दाउदने “नाही, म्हणजे माझ्याकडून काही वेळा कायद्याचं उल्लंघन झालं असण्याची शक्यता आहे, नाही असं नाही,” म्हणण्यासारखं आहे. आणि इतका पाउस कोसळूनही पुढच्या उन्हाळ्यात काय होणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे. मार्च सुरू झाला नाही झाला की लगेच – धरणात १०% साठा शिल्लक! पुणेकरांवर ‘हे’ संकट ओढवणार​? – इति धृतराष्ट्र टाइम्स​. यांना ‘हे’, ‘ही’, ‘हा’ मथळ्यात टाकायला फार आवडतं. ‘ह्या’ अभिनेत्रीवर ओढवले ‘हे’ नाजुक संकट​!!

प्रकार तीन : कहीं दीप जले कहीं दिल
१. लाइट जातात.
२. तुम्ही टॉर्च, मेणबत्ती, काड्यापेटी शोधून, एकदाची मेणबत्ती लावता. ती घेऊन ‘कहीं दीप जले कहीं दिल’ करत दुसर्‍या खोलीत जाता.
३. मेणबत्ती टेबलावर ठेवून वळलात की लाइट येतात. तुम्ही हुश्श म्हणून मेणबत्ती विझवता, जिथून आणली तिथे ठेवता आणि परत आपल्या जागेवर येऊन बसता.
४. लाइट जातात. (विकट हास्य). परत ‘कहीं दीप जले कहीं दिल’. (बहुतेकवेळा दिलच.)

हे असं कितीही वेळा होऊ शकतं. असं झालं की मला ‘अंदाज अपना अपना’ मधला परेश रावल आठवतो.
“ये है असली हिरे.”
“शाबाश.”
“अरे नही, असली तो लाल वाली में थे.”
“रवीना की मां, मै आ रहा हूं.”

प्रकार चार : एक फेज जाणे
म्हणजे लाइट जातात, तुम्ही खिडकीतून बाहेर नजर टाकता तर समोरची बिल्डींग बेजिंग ऑलिंपिकच्या तोंडात मारेल अशी झगमगत असते. तुमच्या पोटात खड्डा पडतो. तुम्ही ‘हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले’च्या चालीवर​ आकांत करत शेजार्‍या-पाजार्‍यांना विचारता. फक्त तुमची बिल्डींग किंवा तुमची, पलिकडची आणि शेजारची अशा काहीतरी विचित्र कॉम्बिनेशनमध्ये लाइट गेलेले असतात. यावर एकच उत्तर, “एक फेज गेली असेल.” ही एक फेज कुठे असते? ती नेमकी आपलीच कशी जाते? ‘त्यांची’ एक फेज कुठे असते? ती कधी जात का नाही? एक फेज वगैरे बोलायच्या गोष्टी आहेत, खरी गोम अशी आहे की तुम्हारा बॅड लकीच खराब हय​.

आणखीही काही उपप्रकार आहेत, जसे की – एकच क्षण वीज गेल्यासारखे होणे. प्रकार दोनच्या आधी बरेचदा पूर्वसूचना म्हणूनही हिचा उपयोग केला जातो. किंवा कधी कधी एमएसइबीने उदार अंत:करणाने लोड शेडींगचे वेळापत्रक दिलेले असते. त्या दिवशी प्रकार दोनमुळे आधीच वीज जाते, पाऊस थांबतो, वीज येते आणि मग लोड शेडींगच्या वेळेला परत जाते. (विकट हास्य).

उपप्रकारांवर अजून तितकी माहिती उपलब्ध नाही पण येत्या काही वर्षात ती उपलब्ध होईल असा आम्हाला विश्वास वाटतो.

Categories
इनोद

आटपाट नगर होतं

आटपाट एक नगर होते. तिथे एक कार्यालय होते. त्या कार्यालयातील मराठी अस्मिता रोज आठ कप कॉफी प्यायल्याप्रमाणे टक्क जागी असे. (ही अस्मिता म्हणजे मुलगी नव्हे, ही अस्मिता म्हणजे भावना. ही भावना म्हणजे जी मनात येते ती. अर्थात भावना मुलगी असली तरी मनात येऊ शकतेच पण ही ती नव्हे. ही भावना म्हणजे जिच्या आहारी जातात ती. अर्थात भावना मुलगी असली तरी तिच्याही आहारी जाऊ शकतातच पण ही ती नव्हे. ही भावना म्हणजे ‘भाव तिथे देव’ मधल्या भावाची चुलतबहीण. हा देव म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील देव कुटुंब किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार नव्हे. हा देव म्हणजे परमेश्वर. इथे परमेश्वर म्हणजे शीतकपाटे यांचे निर्माते गोदरेज यांच्या कुटुंबातील नेहमी उच्चभ्रू मेजवान्या देणाऱ्या परमेश्वर गोदरेज नव्हेत. परमेश्वर म्हणजे देव ज्याच्या कृपेने अखेर हा कंस पूर्ण होत आहे – कंस म्हणजे अर्थातच राक्षस नव्हे.) आणि अस्मिता नावाची मुलगीही या कार्यालयात होती पण ती नेहमी पेंगुळलेली असे. तर या (मुलगी नसलेल्या) अस्मितेच्या प्रभावामुळे कार्यालयातील सर्व लोक १०० % शुद्ध मराठीचा वापर असत.

विदा यथावकाश विद्याच्या मेजावर आला. विद्याने विद्याची धारिका उघडली. विद्याचे लांबलचक रकाने पाहून विद्याला कंटाळा आला, तरीही आळस झटकून ती कामाला लागली. तासाभरात विद्याचे विश्लेषण पूर्ण झाले. विद्याने विद्याची धारिका तिच्या वरिष्ठांकडे पाठविली. वरिष्ठ क्रमांक एकना विद्याचे काम आवडले. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना ती धारिका पाठविली. वरिष्ठ क्रमांक दोननी धारिका पाहिल्यावर वरिष्ठ क्रमांक एकना त्यांच्या कार्यालयात बोलाविले.

“बसा, बसा. मी तुम्ही पाठविलेली धारिका बघत होतो.”
“विद्याची धारिका?”
“हो, विद्याचे विश्लेषण छान आहे.”
“हो, प्रगतीशील आहे.”
“विदा?”
“विद्या.”
“ओह.. बरोबर आहे. आणि आता विद्याचे काम वाढणार आहे.”
“विद्याचे?”
“विद्याचे.”
“ओह.. हो. आपली सर्वेक्षणे वाढत आहेत त्यामुळे ते होणारच.”

—-

अल्टर्नेट युनिव्हर्स : वरच्या लेखाचा आणि याचा संबंध असेलच असं नाही. किंवा नसेलच असंही नाही.

१. विदा म्हणजे काय हे ठाउक नसेल तर तुम्ही मराठी आंतरजालावर न फिरकणाऱ्या भाग्यवंतांपैकी आहात. विदा म्हणजे माहिती. (कमिंग सासू : तुमने बंटी की दोस्ती देखी हय, अब दुश्मनी देखो.)

२. ही कथा, स्फुट किंवा जे काय आहे ते तुमच्या सुदैवाने पारंपारिक आहे. अन्यथा असं काहीतरी वाचावं लागलं असतं – आटपाट एक नगर होते. आट की पाट? पहिल्याच प्रश्नाचं उत्तर न देता आल्यानं माझ्या जांभळ्या, नपुंसक जाणिवा उलतात, विस्कटतात, करवादतात. पुढे राजा असो वा नसो, मुंगीच्या मेंदूतल्या न्युरॉनचं चक्र त्यानं थांबणार का? सीएटलच्या क्युबिकलमध्ये ‘क्लाउड बेस्ड मेमरी ऍप’चा कोड डीबग करताना रंग बदलणारा कर्सर टेबलावरच्या गणपतीच्या चित्राकडे पाहून डोळे मिचकावतो. (ग्लोबल व्हिलेजच्या जाणिवांचं हिंदकळणं एका वाक्यात काय अलगद पकडलय नै? आणि त्यातही ब्लिंकिंग कर्सरचं डोळे मिचकावणं – काय प्रत्ययदर्शी प्रतिमा आहे! जिओ!) थांबू म्हणताय? वाचा की अजून थोडसं? चकटफूच वाचताय नं? किरमिजी पेलिकनच्या पंखावरची – की पेलिकनच्या किरमिजी पंखावरची – की पेलिकनच्या पंखावरची किरमिजी – माशी कुणाला साद घालते आहे? ‘अस्ति कश्चित वाग्विशेषः?’ हा प्रश्न विचारण्याआधीच सुरू झालेला अलवार अभिव्यक्तीचा प्रवास ‘ओपन गंगनम स्टाइल’पाशी आल्यावर थबकतो, गोंधळतो, मागे वळून बघतो, ऍंंड्रॉइडवर गूगल मॅप्स बघतो, जवळच्या स्टारबक्समध्ये ‘टॉल टू पंप पेपरमिंट, टू पंप मोका ब्लेंडेड क्रीम फ्राप्पुचिनो’ ऑर्डर करतो आणि ‘यो! हॅंगिंग आउट ऍट स्टारबक्स, ड्यूड्स. हॅपी दसरा टू यॉल!’ असं फेसबुक स्टेटस टाकतो. ब्रिटनी स्पिअर्सच्या डाव्या करंगळीला मुंग्या येतात. आजच्यासाठी इतकं पुरे. जा आता वर. (अन ते काय मोका-खोका ऑर्डर केलंय ते इथं विसरू नका. बंटीला मोकळा सोडलाय आज, त्याला काही म्हणजे काही खायची सवय आहे. नंतर आम्हाला निस्तरावं लागतं, लिटर-ली! बंटी म्हणजे आमचा अल्सेशियन हो. प्युअर ब्रीड, बरं का! असं काय करता – मागच्या वेळी तुमची नडगी फोडली होती नं त्यानं. एवढ्यात विसरलात का? नंतर आठवडाभर चावायला त्रास होत होता त्याला. ब्रेडसुद्धा बारीक करून द्यावा लागायचा. पुअर बंटी!)

३. आम्हाला ज्या जखमा झाल्या त्यांना कोणती माती लावणार?’ असा रोखठोक सवाल टाकून एखादी पणती क्षणभर उजळून विझावी तसा तो मटकन खाली बसला.

पण ती पणती होण्याआधी,
आजी माजी होती
गोडगोड खाऊ द्यायला
नेहेमीच राजी होती

त्या गेल्या दिवसांकडे
मी पुन्हा पुन्हा वळून बघतो
त्या मखमली क्षणांची आठवण
अजूनही ताजी होती

– कवी बदामराव बेदाणे यांच्या भावनांच्या पाकात ओथंबलेल्या ‘पणती’ या चारोळीसंग्रहाला तरूणाईची पसंती, फेसबुकावर दोन हजार लोकांनी लाइकले. ~ धृतराष्ट्र टाइम्स.

४. “काही म्हणा, हिटलर एक महान नेता होता” असं म्हणून त्याची आडून स्तुती करणार्‍यांना त्याच्यासमोर उभं केलं तर? असं म्हणणार्‍या एकाचेही डोळे निळे नसणार. (कपूर लोकांना मराठी येत नाही त्यामुळे ते कटाप.) एखाद्याचे असलेच निळे तरी केस सोनेरी नसणार. गार्निएचं उसनं सोनेरीपण चालणार नाय बरं का! ऍडॉल्फच्या मेंदूने त्यांच्या डोळ्यांच्या, केसांच्या रंंगांची नोंद घेऊ देत. मग आम्ही आमचे (काळे) डोळे फाडून ती नेतृत्वाची महानता वगैरे बघू आणि जाता-जाता शाडनफ्रॉईडचा लुत्फही लुटू. (डोंट वरी हं. बंटी एकदा फोडलेल्या नडगीला परत तोंड लावत नाही. ही इज व्हेSSरी पर्टीकुलर अबाउट दॅट, यू नो. हो की नै रे बंटी? आणि तुमच्या तर दोन्ही नडग्या फोडून झाल्या आहेत. नाऊ की नै यू आर अगदी सेफ. लुक बंटी, हूज हिअर? हू इज अ गुड डॉग? बंटी, बंटी!! नो बंटी. ब्याड डॉग!)

५. खाण्यावरून आठवलं. श्रेया घोषाल आंबा खाताना कोणतं गाणं म्हणेल? ती गाणं कशाला म्हणेल, ती आंबा खाईल. (बंटीला ना रूट कॅनाल करायला नेलय. त्याची डावी दाढ हलत होती, लास्ट वीक अलोन त्याने सात नडग्या फोडल्या, यू नो. येईलच इतक्यात. अहो, पळताय काय असे? थांबा ना. चहा तरी.. का त्यादिवशीचं मोका-खोका मागवू?)

Categories
इनोद

पालुस जुनियर, अमिग्डला आणि उत्क्रांती

समाजमनाची विविध आंदोलने तात्कालिक आवर्तनांमधून जात असताना त्यांना निरखून पाहिले असता त्यांचे प्रकटन तेव्हा बोलल्या जाणार्‍या भाषेमधूनही होते असे जाणकारांच्या अनुभवास आले आहे. जाणकार म्हणजे अर्थातच आम्ही, ह्यॅ ह्यॅ ह्यॅ. थोडक्यात सांगायचे तर, कमिंग स्ट्रेट टु द बिंदू (रेखा,हेलन) विदाउट बिटींग (रंजीत,डॅनी) अराउंड द झुडूप आय टेल यू, दुबईस्थित व्यावसायिक पक्या डेंजर यांनी म्हटल्याप्रमाणे जो [१] पब्लिक के दिल मे र्‍हैता हय, वोईच उसकी जुबान पे आता हय. हा साक्षात्कार आम्हाला होण्याचे कारण म्हणजे सध्या आंतरजालावर बर्‍याच ठिकाणी दिसणारा Awwwwww! हा उद्गार-कम-आश्चर्य-कम-इमोसनल-अत्याचार वाचक शब्द. बहुतेक वेळा मांजरांच्या चित्राखाली हा आढळतो आणि याच्या उद्गारकर्त्या म्हैला अंदाजे सव्वा महिना ते ९७ वर्षे या वयोगटातील असतात. हा शब्द जितका लांब तितकी उद्गारकर्तीणीची भावणा अधिक तीव्र असा अंगठ्याचा नियम [२] लावता येतो. या शब्दाची इतर रूपेही आहेत. शो श्वीट किंवा शो क्यूट हे त्याचेच प्रकार.

क्यूट नक्की कशाला म्हणायचे? सवयीनुसार क्यूटची व्याख्या बदलू शकते का? माझ्या बेडरूमच्या खिडक्यांना जाळ्या आहेत. एक दिवस संध्याकाळी जाळीच्या बाहेरच्या बाजूला एक पालोबा दिसले. पालोबाईही असतील कदाचित. जाळीवरून हळूहळू फिरणारे त्यांचे पाय पाहून मला जुरासिक पार्कमधील टी-रेक्स आठवला. (लाइफ, फाइंड्स अ वे.) हळूहळू त्यांची सवय झाली, त्यांचे डेली रूटीनही लक्षात आले. दिवसभर बाहेर उन असल्याने जाळीत ताणून द्यायची आणि रात्री शब्दश: माशा मारायला निघायचे, हाय काय अन नाय काय. बिलं भरणे, डेंटिस्टकडे जाणे असली फालतू कामे करायला ते काय उत्क्रांत झाले होते का? मग एके दिवशी दुसर्‍या खिडकीच्या जाळीत एक पालपिल्लू दिसले. त्याची फिरण्याची इष्टाइल पाहून त्याचे नाव ठेवले – पालुस. मग शिणियर पालोबा आठवले, त्यांच्यावर अन्याय का? मग दोघांची नावे ठेवली – पालुस जुनियर आणि पालुस सिनियर. (नाहीतरी हल्ली पितापुत्रांना सिनियर-जुनियर म्हणायची फ्याशन आहेच्चे.) पालुस जुनियर मांजराच्या पिल्लाइतका क्यूट नसला तरी पिल्लू क्याटेगरीत असल्याने चालून जातो. पालुस सिनियर अचानक दिसले तर दोन क्षण पोटुसमध्ये खड्डुस पडतो, पण ती अमिग्डलाची करामत.

आमचे पूर्वज याच अमिग्डलाच्या भरवशावर शिकारी करायला निघायचे. अमिग्डला म्हणजे ‘क्रांतीवीर’ सिनेमात ज्याला नाना पाटेकर ‘छोटा दिमाग’ म्हणतो ती. एखाद्या झुडुपातून खसफस ऐकू आली की थांबून लढायचे की धूम [३] ठोकायची याचा निर्णय क्षणार्धात करावा लागायचा. अर्थात कधीकधी निर्णय चुकायचा. म्हणजे वाघ समजून धूम ठोकावी आणि कोल्ह्याचे पिल्लू निघावे असाही प्रकार व्हायचा. मग रात्री गुहेत शेकोटीच्या आसपास गप्पांचा फड रंगल्यावर त्या कोल्ह्याच्या पिलाचे रूपांतर सिंहात व्हायचे आणि कथेला रंग चढायचा. आज कोल्ह्याच्या जागी क्लायंट असतो आणि आपण त्याला कसे गंडवून कॉन्ट्रॅक्ट दुपटीच्या दरात मिळवले याची सुरस कथा ग्लासातील बर्फाच्या किणकिणणार्‍या पार्श्वसंगीतावर सांगितली जाते. इतपत उत्क्रांती [४] व्हायला गेलाबाजार ३०,००० वर्षे लागली, आहात कुठे? [५] उत्क्रांती या शब्दाची शोकांतिका ही की यात क्रांती हा शब्द दडलेला आहे. क्रांती म्हटले की मनोजकुमारने भारतीय सिनेरसिकांवर केलेला अत्याचार आठवतो. त च्या जागी ट करून हिंदी बोलणारे टॉम अल्टर, बॉब क्रिस्टो आठवतात. आपण उत्क्रांत झालो आहोत यावरचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो.

तळटीपा :

[१] अमरू उपराष्ट्राध्यक्ष नव्हेत. पीजे : जो बायडेन पाळण्यात असताना त्यांची आई कोणते गाणे म्हणायची? उत्तर : बाळा जो जो रे.

[२] अंगठ्याचा नियम अर्थात रूल ऑफ थंब. जेव्हा आपल्याकडे लोक अंगठा वापरत होते किंवा कापून घेत होते तेव्हा हा अंगठ्याचा नियम वापरून पाश्चात्य संशोधकांनी अनेक शोध लावले, प्रगती केली आणि आपल्याला अंगठा दाखवला. त्यांची प्रगती झाली म्हणून आपली पॅसेंजर झाली. तेव्हा ते तसे झाले म्हणून तर आत्ता हे असे झाले. असो.

[३] चित्रपट नव्हे. ‘नवरंग’मध्ये संध्याला पाहून जी ठोकावीशी वाटते ती धूम.

[४] उत्क्रांतीवरून आठवलं. शाळेत आम्हाला उत्क्रांतीचा धडा सरमळकर बाईंनी शिकवला. मी, सावड्या, लेल्या आणि शिर्क्या मागच्या बेंचांवर भंकस करत बसायचो. लेल्याची आई रोज डब्यात थालपीटं, कोथिंबीरीच्या वड्या द्यायची. लेल्याच्या वाट्याला एखादा तुकडा यायचा, बाकी आम्हीच संपवायचो. प्रिलिमच्या आधी लेल्यानं बातमी आणली, “उत्क्रांतीचा प्रश्न पंधरा मार्काला येणार आहे, गॅरंटेड.” तसा सावड्या मला विचारतो, “इचिभना, उत्क्रांती म्हणजे काय रे सुर्व्या?” मी म्हणालो, “मला तरी कुठे माहितेय? डेक्कनक्वीनने कधी शिकवलं कुणाला माहीत?” असो. गेले ते दिवस.

[५] आहात कुठे ही नक्की काय भानगड आहे? या प्रश्नाला काही अर्थ आहे का? काही लोकांचा हा आवडता प्रश्न आहे. अंबानीने ढमके अब्ज देऊन घर [अ] बांधले, आहात कुठे?

तळतळटीपा :

[अ] अंबानीने जे बांधले त्याला घर म्हणणे म्हणजे मार्लन ब्रॅंडोला ‘आग ही आग’ मध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका देण्यासारखे आहे. पण आमच्या मध्यमवर्गीय शब्दकोषात याला साजेसा शब्दच नाही त्याला आम्ही काय करणार? फार तर बंगला. आमच्या पालुसची धाव घर, १-२ बीएचके यापलिकडे जात नाही. थिट्या मध्यमवर्गीय जाणिवांच्या घुसमटीचे प्रकटन करण्यासाठी आविष्काराची निकड भासणे, त्या निकडीचे रूपांतर रक्ताळलेल्या बोथट जखमांच्या खपल्यांमध्ये होणे, त्या खपल्यांवर चढलेला खुंटलेल्या संवेदनांचा पिवळसर-जांभळा रंग, कधी त्रिज्येमधून तर कधी परिघाबाहेरून भाग न जाणारे अपरिमेय गणित, भागाकारात हच्चा घेतला तरी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढींच्या उसवलेल्या झग्यातून कुरकूरणारी बोथट मनांची आक्रंदने, चेंगीझ खानपासून राखी सावंतपर्यंत हेलपटलेल्या झगझगीत रूपेरी वाफांच्या मनस्वी झिलया, नेणीवेच्या शुभ्र कॅनव्हासवर रंगांचे अजीर्ण होऊन सकाळी सकाळी ज्याक ड्यानियल्सची आंबट-करपट ओकारी व्हावी तत्सम रेखाटलेला आदिम जाणिवांचा कलाविष्कार, हीच आजच्या भगभगीत, ओशट, तडकलेल्या बूर्झ्वा भावनिक आंदोलनांची शोकांतिका आहे.