Category: इतर

  • ब्लॉगलेखन – काही विस्कळीत विचार

    ब्लॉग या माध्यमाला माझी आजही पसंती आहे आणि त्याची काही कारणे आहेत. ब्लॉगमुळे तुमची स्वत:ची अशी ओळख निर्माण होते. हल्ली ‘स्क्रोल’सारखी बरीच संकेतस्थळे उपलब्ध आहेत जिथे लेख प्रकशित होऊ शकतो. त्यामुळे तुमची तेवढ्यापुरती प्रसिद्धी होते. पण एक-दोन दिवसात संकेतस्थळावर येणाऱ्या जात-आरक्षण-एनआरआय-हिंदू धर्म-अंधश्रद्धा यावरच्या चर्चा-कविता-गझल-केळाच्या सालाच्या धिरड्याची पाककृती-कविता-चित्रपटांची परीक्षणं-कविता-आधी आलेल्या सर्व कविता आणि गझलांची विडंबनं-आम्हीही विनोदी…

    ब्लॉग या माध्यमाला माझी आजही पसंती आहे आणि त्याची काही कारणे आहेत. ब्लॉगमुळे तुमची स्वत:ची अशी ओळख निर्माण होते. हल्ली ‘स्क्रोल’सारखी बरीच संकेतस्थळे उपलब्ध आहेत जिथे लेख प्रकशित होऊ शकतो. त्यामुळे तुमची तेवढ्यापुरती प्रसिद्धी होते. पण एक-दोन दिवसात संकेतस्थळावर येणाऱ्या जात-आरक्षण-एनआरआय-हिंदू धर्म-अंधश्रद्धा यावरच्या चर्चा-कविता-गझल-केळाच्या सालाच्या धिरड्याची पाककृती-कविता-चित्रपटांची परीक्षणं-कविता-आधी आलेल्या सर्व कविता आणि गझलांची विडंबनं-आम्हीही विनोदी लिहितो असं दाखविणारे पण एकदाही हसू न येणारे भिजलेल्या माऊच्या पिलापेक्षा जास्त केविलवाणे लेख-इतर वाचनीय लेख या सर्वांच्या भाऊगर्दीत तुमचा अभ्यासपूर्ण लेख कुठे जातो तुम्हालाही पत्ता लागत नाही. एखादा नवीन माणूस संकेतस्थळावर आला तर त्याला तुमचा लेख सापडेल याची शक्यता किती? सापडला तरी दोन मिनिटात त्याचं लक्ष दुसरीकडे जातं.

    याउलट ब्लॉग म्हणजे निगुतीने तयार केलेली बाग असते. अर्थात अशी बाग एका आठवड्यात तयार होत नाही, तिच्या मशागतीसाठी वेळ द्यावा लागतो. जेव्हा नवीन कुणी ब्लॉगवर येतो तेव्हा त्याला प्रत्येक कोपऱ्यात तुमच्या बागकामाची साक्ष देणारं काहीतरी सापडतं. तुमचा एक लेख आवडला तर वाचक याने अजून काय लिहिलंय बघूयात असं म्हणून अनेक लेख वाचतो. फारच आवडला तर मित्र-मैत्रिणींनाही सांगतो. पाच वर्षांपूर्वी लिहिलेला लेखही इथे चुटकीसरशी सापडू शकतो. वर्गीकरण केल्यामुळे वाचकाच्या आवडीप्रमाणे हवं ते – संगीतावरचं लेखन किंवा पुस्तकांवरचे लेख – चटकन सापडतं. मुख्य म्हणजे इकडे-तिकडे लक्ष जाईल असं इथे काहीही नसतं. नवीन आलेल्या माणसाला ब्लॉगवर जे विविध लेख उपलब्ध असतात त्यावरून एका भेटीतच ब्लॉग लेखकाचा अंदाज येतो. तुम्ही विनोदी लिहिता की गंभीर, कोणत्या विषयांवर लिहिता हे सगळं पाहून तो ब्लॉगवर परत यायचं का नाही हे ठरवतो.

    मराठीत ब्लॉगलेखन म्हणावं तसं रुजलं नाही याचं वाईट वाटतं. मराठीत ब्लॉगलेखनाचा एकुणात प्रवास बघता याचा फार उत्कर्ष होईल असं सध्या तरी वाटत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे हौशी ब्लॉगर वगळता (त्यांचाही सुरुवातीचा उत्साह असेपर्यंत) वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर लोक इकडे फिरकलेलेही दिसत नाहीत. (काही अपवाद आहेत पण ते बोटावर मोजण्याइतके.) अमिताभ घोषसारख्या प्रथितयश लेखकाला ब्लॉग लिहिण्यासाठी वेळ मिळतो तर बाकीच्यांना का मिळू नये? कारण काही असो, मराठीतील नट, दिग्दर्शक, गायक, संगीतकार, शास्त्रज्ञ, शासकीय अधिकारी, वकील, व्यावसायिक यापैकी फारच थोडे लोक ब्लॉगकडे वळले आहेत. याचा आणखी एक परिणाम म्हणजे काही तुरळक अपवाद वगळता विशिष्ट विषयाला वाहिलेले ब्लॉग (niche) अस्तित्वातच नाहीत. जोपर्यंत हे बदलत नाही, तोपर्यंत ब्लॉगविश्व मर्यादित राहील असं वाटतं.

    आपल्याकडे एकुणातच कशाचीही पर्वा न करता हवं ते करणारी माणसं कमी होत चालली आहेत असं वाटतं. या बाबतीत पाश्चात्त्यांचं आणि विशेषकरून अमरूंचं उदाहरण घेण्यासारखं आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्य हे मूल्य सर्वात वर असल्यामुळे बरेचसे लोक चाकोरीची, समाजाची पर्वा न करता त्यांच्या आतल्या आवाजाला साथ देऊन जे हवं ते करत असतात. याची कित्येक उदाहरणे इंग्रजी ब्लॉगविश्वात सापडतात. कोणतेही मूल्य द्यावे न लागता रोज उत्तमोत्तम कॉमिक स्ट्रिप देणाऱ्या ‘पीएचडी कॉमिक्स’पासून ‘एक्सकेसीडी‘पर्यंतच्या नव्या दमाच्या कलाकारांची फौजच तयार झाली आहे.

    मराठी आणि इंग्रजी ब्लॉगविश्वातील दरी कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे असं वाटत राहतं. इंग्रजीत हे ब्लॉगर्स ज्या सातत्याने लेखन करत आहेत त्याला कुर्निसात. त्यांच्या सन्मानार्थ वन ऍंंड ओन्ली रजनी .

    —-

    १. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे नागरिक.

    २. गाणं सुरू होतानाचा कोरसनंतरचा स्वर खुद्द रहमानचा, नंतरच्या ओळी रहमानच्या मुलीच्या – खातिजाच्या आवाजात आहेत. नंतर येतो एसपी – यंदिरा, यंदिरा. पहिल्या कडव्याच्या सुरुवातीला एसपीची एक ओळ उच्च स्वरात, दुसरी खालच्या स्वरात असं चालू राहतं. यानंतर एसपी एक सुरेल लकेर घेतो (३:०३). ही सुरावट संपल्यानंतर दोन ओळी वेगळ्या स्वरात (३:२८), शेवटी हे हे अशी लकेर. मग कोरस ‘पुधिया मानिधा, भूमिक्कवा’. पहिल्या कडव्याचा हा क्रम लक्षात ठेवा. आता दुसऱ्या कडव्यात परत एसपी वरच्या आणि खालच्या स्वरात सुरुवातीच्या ओळी म्हणतो पण नंतर आधीची लकेर येण्याऐवजी पहिल्या कडव्यात शेवटी आल्या होत्या त्याच्या जवळ जाणाऱ्या दोन ओळी येतात (४:५३) आणि मग पहिल्या कडव्याची शेवटची लकेर – मधली अख्खी सुरावट गायब. हे कडवं पूर्णपणे वेगळ्या दिशेने जातं. दोन कडव्यात पूर्वार्ध सारखा, पण उत्तरार्ध पूर्ण वेगळा. इस्कू बोलते एआर.

  • शब्दांच्या पलिकडले

    दोन दिवसांपूर्वी शुक्र ग्रहाचं सूर्यावर ‘अधिक्रमण’ होत असल्याच्या बातम्या, फोटू सगळीकडे झळकले. ही घटना आपल्या आयुष्यात परत घडणार नाही कारण परत असा योग २११७ मध्ये येणार आहे. वर्तमानपत्र, फेसबुक, ट्विटर सगळीकडे बातम्यांची लयलूट चालू होती. आणि च्यानेलवाले तर काय पाट बांधून तयारच असतात. सर्वसाधारणपणे अशा घटना किंवा ग्रहणं निर्विवादपणे लोकप्रिय असतात. ग्रहण पहिल्यांदा बघण्याचा अनुभव…

    दोन दिवसांपूर्वी शुक्र ग्रहाचं सूर्यावर ‘अधिक्रमण’ होत असल्याच्या बातम्या, फोटू सगळीकडे झळकले. ही घटना आपल्या आयुष्यात परत घडणार नाही कारण परत असा योग २११७ मध्ये येणार आहे. वर्तमानपत्र, फेसबुक, ट्विटर सगळीकडे बातम्यांची लयलूट चालू होती. आणि च्यानेलवाले तर काय पाट बांधून तयारच असतात. सर्वसाधारणपणे अशा घटना किंवा ग्रहणं निर्विवादपणे लोकप्रिय असतात.

    ग्रहण पहिल्यांदा बघण्याचा अनुभव निश्चितच रोमांचकारी असतो. लहानपणी खग्रास सूर्यग्रहण पहिल्यांदा पाहिलं होतं ते अजूनही लक्षात आहे. भर दुपारी काही काळ चांदण्या रात्रीचा अनुभव अविस्मरणीय होता. नंतर बरीच ग्रहणं पाहीली (आकाशातली आणि जमिनीवरचीही), तेव्हापासून ग्रहणांचं आकर्षण कमी झालं. आता तर कोणतेही प्रयत्न न करता ग्रहण दिसणार असेल तरच बघतो, त्यासाठी वाट वाकडी करून कुठे जाणं म्हणजे वेळेचा अपव्यय वाटतो. त्यातही सूर्यग्रहण खग्रास असेल तर ते होत असताना मला सूर्यापेक्षा जमिनीवरचा प्रकाशाचा खेळ बघायला अधिक आवडतो. ( हे म्हणजे पी. सी. सरकार स्टेजवर एका माणसाचे दोन तुकडे करण्यात तल्लीन झालेले आहेत, लोक आ वासून बघत आहेत आणि आपलं सगळं लक्ष मात्र त्यांच्या आशिष्टनकडे – असा प्रकार झाला.) ग्रहणांमध्ये खंडग्रास असेल तर सूर्याचा चतकोर तुकडा तोडलेला बघायला फारशी मजा येत नाही. मात्र कंकणाकृती सूर्यग्रहण असेल तर सूर्याची शेवटी जी अंगठी होते (माय प्रेशस!) ती बघायला छान वाटते.

    अशा पार्श्वभूमीवर शुक्र सूर्यावरून जाण्याचं फारसं काही वाटलं नाही. लोकांना याचं खूप अप्रूप आहे हे ही दिसलं आणि ही तफावत का याचा शोध घ्यावासा वाटला. काही चित्रं पाहिली, व्हिडो बघितले. तरीबी काय फरक नाय पडला! अधिक्रमणाची जितकी चित्रं पाहिली त्यात मला सूर्य आणि त्याच्या प्रकाशाचे खेळच जास्त भावले. त्यात शुक्र नसता तरी ते तितकेच आवडले असते.

    ग्रहणात निदान सूर्य झाकला जातो, इथे आपल्याला जे दिसतं आहे ते म्हणजे सूर्यावरून एक ठिपका जातो आहे. यात नेमकं रोमांचकारी असं काय आहे? हा प्रश्न उत्सुकतेच्या दृष्टिकोनातून विचारला आहे हे लक्षात घ्यावे. म्हणजे कोट्यावधी माणसांना जे भावतं त्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही म्हणजे आपलाच काही ‘केमिकल लोच्या’ तर नाही ना अशी काळजीच्या झालरीने ओथंबलेली, डबडबलेली जिज्ञासा त्यामागे आहे. एक तर हा सगळा प्रकार पूर्णपणे पृथ्वीच्या दृष्टीकोनातून आहे (हाय कोपर्निकस!). तुम्ही आकाशात गेलात आणि अंतराळयान हवं तिथे न्यायची सोय असेल तर वाट्टेल तितक्या वेळा हवी ती ग्रहणं बघू शकाल. का ही घटना आयुष्यात एकदाच बघायला मिळेल असं कळलं तर तिच्याबद्दलचं आकर्षण वाढतं?

    या दिशेने विचार करायला लागलं तर आणखी प्रश्न पडतात. कदाचित गोम इथेच आहे, एखाद्या गोष्टीचा प्रमाणाबाहेर विचार केला की असं काहीतरी होत असावं. पहिल्यांदा मोनालिसा बघितली तेव्हाही असंच झालं. जिच्याबद्दल जन्मभर ऐकलं होतं अशी कलाकृती साक्षात समोर पाहिली. अर्थात याआधीच ती इतक्या वेळा, इतक्या ठिकाणी पाहिली होती की तिच्याबद्दल अजिबात नाविन्य राहिलं नव्हतं. बरं, पाहिली ती पण लूव्ह्रच्या संरक्षक साखळीबाहेरून, आठ-दहा फूटांवरून. म्हणजे जवळून तिचे रंग कसे दिसतात हे ही बघता आलं नाही. आणि यात भर म्हणजे आजूबाजूला पर्यटक जमातीच्या लोकांची झुंबड लागलेली (त्यात अर्थात मी ही होतोच). या सगळ्या अनुभवांची बेरीज-वजाबाकी केली तर मोनालिसा बघण्याच्या अनूभूतीमध्ये शिल्लक काय राहिलं? अर्थात याचा अर्थ कुठेच न जाता सगळीकडचे फोटूच बघायचे असा नाही. प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक अनुभवाचा ‘अनुभव’ वेगळा असतो. व्हॅटिकन पहिल्यांदा बघताना त्याची भव्यता जशी अंगावर येते तो अनुभव कोणत्याही फोटोमध्ये येणं अशक्य आहे.

    म्हणजे हे काही अनुभवांच्या बाबतीतच होतं असं म्हणायला जागा आहे. मोनालिसापेक्षा एक नेहेमीचं उदाहरण घेऊ. कोणताही उन्हाळा आला की हापूस झाल्ल्याशिवाय तो संपत नाही. उन्हाळ्यातला पहिला हापूस खातानाचा अनुभव विशेष असतो. ‘मधुर’ हे विशेषण फक्त आंबा या फळासाठी राखून ठेवावं असं बिल वगैरे पास करायला हरकत नाही. पण रोज सकाळ-संध्याकाळ हापूस खाल्ला तर किती दिवसात त्याचा कंटाळा येईल? बरं, हापूस खायला आपल्याला आवडतं म्हणजे त्यातला नेमका कोणता भाग आवडतो? इथे गाडी चिखलात जाते (काय भौ, निस्ते आंबे खाऊन र्‍हैले? हात धुवा ‘न गाडी ढकलायला या पटकन.) आमरसाचा पहिला घास घेतला की जीभ आणि मेंदू यांचा आर्केष्ट्रा सुरू होतो. खरं तर खायच्या आधीच आपण हापूस खाणार या कल्पनेनेच मेंदू तंबोरा वगैरे लावून तयारीत असतो. खाल्ल्यानंतर थोडा वेळ साखरेच्या हायवेवर आपली गाडी बुंगाट वेगाने जात असते. या सर्वांचा परिणाम म्हणजे खाल्यानंतर काही काळ तृप्ततेची भावना येते. हा सगळा विचार केला तर हा मुख्यत्वे मेंदूचा खेळ आहे हे लक्षात येतं. समजा हापूसऐवजी पायरीचा रस खाल्ला तर? काही लोकांना पायरीही खूप आवडते पण आवडत नसेल तर तो अनुभव येणार नाही. का? कारण मेंदू पूर्वीच्या अनुभवांशी याची तुलना करतो आणि त्यावरून हा अनुभव किती चांगला हे ठरवतो. अर्थात यात वैयक्तिक किंवा समूहाच्या आवडीनिवडींचाही मोठा भाग असतो. काही लोकांना आमरसाबरोबर भात खाल्ल्याशिवाय तृप्त वाटत नाही. इटालियन लोक पूर्ण शिजलेला पास्ता कधीच बनवत नाहीत. त्यांच्या मते खरा पास्ता म्हणजे जो खाताना दातांना किंचित चरचरीत (Al dente) लागतो तो. आणि वाईनच्या बाबतीत तर इतके नियम आहेत की वाईनच्या चवीचं वर्णन करणारे वेगळे शब्दकोष आहेत.

    तृप्त करणार्‍या अनुभवाचं सार कशात आहे हा प्रश्न उरलाच. कदाचित याला एकच उत्तर नसावं, प्रत्येकानं आपापली उत्तरं शोधायची. गुरूदेव रवींद्रनाथ टागोर रोज सूर्य उगवताना त्याच्या स्वागताला हजर असायचे. दर दिवशी त्यांना वेगळी पहाट आणि वेगळा सूर्योदय भेटायचा. थोरो आज एका झाडाशी भेट ठरली आहे असं म्हणून मैलोनमैल बर्फ तुडवित जायचा. तसंच कदाचित शुक्राला पाहूनही लोकांना काहीतरी शब्दांच्या पलिकडलं मिळत असावं.

    काय मिळतं हे शब्दात सांगणं बहुतेक वेळा शक्य नसतं. शब्दांच्या इतक्या चिंध्या केल्यावरही जे व्यक्त करता आलं नाही ते जपानी कवी मात्सुओ बाशोसारखे काही प्रतिभावंत मोजक्या शब्दांमध्ये सांगून जातात.

    Along this road
    Goes no one;
    This autumn evening.

  • आषाढस्य प्रथम दिवसे

    आषाढस्य प्रथम दिवसे

    कालिदासाला सोळाशे वर्षांपूर्वी आजूबाजूला जे दिसलं असेल त्यातलं आज फार थोडं शिल्लक असावं, पण त्याला जे आकाश दिसलं असेल तेच आपल्यालाही दिसतं आहे.

    आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं।
    वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।

    आषाढाच्या पहिल्या दिवशीं बघतो शिखरीं मेघ वांकला,
    टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणूं ठाकला!

    (अनुवाद : शान्ता शेळके)

    आशिया खंडातील मान्सून गेल्या ५० ते ८० लाख वर्षांपासून अस्तित्वात आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. चार महिन्यांच्या कडक उन्हाळ्यामध्ये जमिनीवरची हवा तापून वर जाते. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि या जागेत समुद्रावरची थंड आणि ओली हवा येते. भारताच्या तापलेल्या जमिनीवर हे थंड वारे वाहू लागतात. जसजसे हे वारे वर-वर जातात, तसतसं त्यांचं तपमान कमी होतं, वाफेचं पाणी आणि कधीकधी बर्फ होतो आणि पाऊस येतो, गाराही पडतात. महाराष्ट्रात सह्याद्री आणि उत्तरेकडे हिमालय या वार्‍यांना अडवण्यासाठी भिंतीचं काम करतात. इथे पोचण्यासाठी पावसाच्या प्रत्येक थेंबानं हजारो मैलांचा प्रवास केलेला असतो. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र यांच्यामधलं हजारो टन पाणी वाफेच्या रूपानं हा प्रवास करतं. महाराष्ट्रात हे वारे अरबी समुद्रावरून पश्चिमेच्या दिशेने येतात तर उत्तर भारतात बंगालच्या खाडीवरून पूर्व दिशेने येतात. ‘चुपके चुपके चल री पुरवैय्या’ मधली पुरवैय्या म्हणजे हे पूर्व दिशेने येणारे वारे. पुरवैय्या म्हणजे उन्हाळ्यापासून सुटका देणारी शीतलता.

    भारतीय शेतकर्‍यासाठी मान्सून एक वरदान आहे. सिंधू संस्कृतीचा उत्कर्ष होत असताना पर्जन्याला देवतेचं स्थान मिळालं ते याच कारणासाठी. आजही भारतीय कृषीव्यवस्था मान्सूनवर अवलंबून आहे. पण मान्सून नेमका कधी येईल ते सांगणं हवामानशास्त्रज्ञांनाही अवघड जातं. याचं कारण मान्सून राजस्थानमधलं तपमान किंवा सिंगापूरमध्ये १० किमी उंचीवर वार्‍याची गती अशा दूरवर पसरलेल्या घटकांवर अवलंबून असतो आणि या सर्व घटकांचं एकमेकांशी असलेलं नातं गुंतागुंतीचं असतं. मान्सून १ जूनला केरळमध्ये येणार असं ढोबळमानाने म्हणता येतं पण कधीकधी तो मे महिन्यातच दाखल झाल्याची उदाहरणं आहेत तर कधी या वर्षी येतो आहे तसा उशिराही येतो. मध्येच एखादं चक्रीवादळ वगैरे आलं तर हे सगळं वेळापत्रक कोलमडूही शकतं. पण तो येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच आपल्या हवामानखात्याचं ब्रीदवाक्य आहे – आदित्यात् जायते वृष्टी: – जोपर्यंत सूर्य आकाशात आहे तोपर्यंत मान्सून येणारच. हे ब्रीदवाक्य काय किंवा ‘नेमेचि येतो पावसाळा’ सारखी म्हण काय – एखादी नैसर्गिक घटना त्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग कसा बनते हेच यातून दिसतं.

    युरोपात पहिल्यांदा गेल्यावर ज्या अनेक गोष्टींशी जुळवून घ्यावं लागलं त्यातली एक होती, ‘पाऊस कधीही येऊ शकतो’ हा नियम. खरं सांगायचं तर हे काही झेपलं नाही पण सांगता कुणाला? रोज बीबीसी नाहीतर कुठल्यातरी अशाच सायटीवर हवामानाचा अंदाज बघायचा, स्क्रीन ओला दिसला तर छत्री घ्यायची. पण याहीपेक्षा अवघड म्हणजे त्यांची आणि आपली चांगल्या हवेची कल्पना यात जमीन-अस्मानचा फरक आहे. दहा-बारा महिने कडाक्याची थंडी, मध्येच वादळ, पाऊस, बोचणारे गार वारे हे सगळं सहन केल्यावर निरभ्र आकाश आणि सूर्याची उब हवीशी वाटली नाही तरच नवल. हे शरीराला चांगलं वाटतं, पण मनाला मात्र पटत नाही. लहानपणापासून वर्षातले दहा महीने तीस-चाळीस डिग्रीमध्ये काढणार्‍या भारतीयांना सूर्याचं काय कौतुक असणार? आपली चांगल्या हवेची कल्पना म्हणजे चार महिने ‘तेजोनिधी लोहगोलाने’ खरपूस भाजून काढल्यानंतर येणारा मान्सून.

    हा जो कल्पनांमधला फरक आहे त्याचं प्रतिबिंब बर्‍याच ठिकाणी दिसतं. पाश्चात्य साहित्यामध्ये किंवा चित्रपटांमध्ये औदासिन्यापासून दु:खापर्यंत कोणतीही नकारात्मक भावना दाखवायची असेल तर काळे ढग, वादळ, पाऊस यांचा वापर हमखास केला जातो. म्हणूनच हॅरी पॉटरच्या शेवटच्या दोन चित्रपटांमधलं राखाडी आकाश आणि पाऊस – पुढे येणार्‍या ‘grim’ घटनांची पूर्वसूचना देतात. याउलट हिरो, हिरविण आणि कंपनीचा ईजय झाला की ढग निवळतात आणि सूर्य डोकावतो. ‘यू आर माय सनशाइन’ टाइपची गाणी तिकडे किलोंनी सापडतील. हा न्याय आपल्याकडे लावायचा म्हटला तर आपण सदासर्वदा सुखीच असयला हवं. याउलट इथे पाऊस म्हणजे दिलासा, सुटका, आशा. आपल्याकडच्या चित्रपटांमध्ये सूर्य आशेचं प्रतीक म्हणून फारच मोजक्या ठिकाणी वापरला गेला आहे. चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे सत्यजित रेंचा ‘कांचनजंघा.’ यात शेवटी ढग जाऊन सूर्याची किरणे कांचनगंगा शिखरावर पडतात. अर्थात कथा दार्जिलिंगमध्ये घडत असल्याने हा शेवट कथानकाला साजेसाच आहे. हिंदी चित्रपटांमध्ये सावन किंवा बरखा हे प्रतीक किती वेळा वापरलं गेलं आहे त्याची गणतीच नाही. इथे एक मजेदार कल्पना सुचली. समजा बाकी सगळ्या गोष्टी समान ठेवून युरोप आणि आशिया खंडातील फक्त हवामानाची अदलाबदल झाली असती तर आज काय चित्र दिसलं असतं? गन्स ऍंड रोझेस नी ‘नोव्हेंबर रेन’ ऐवजी काय गायलं असतं? अंतोनियो विवाल्दीने ‘फोर सीझन्स’मध्ये मान्सूनसाठी कोणतं संगीत दिलं असतं? आपल्या अनामिक पूर्वजांनी मल्हार रागाऐवजी बर्फाळ हिवाळ्यासाठी कोणता राग निर्माण केला असता?

    आज महाकवी कालिदास दिन. सुमारे सोळाशे वर्षांपूर्वी लिहीलेल्या मेघदूताच्या सुरूवातीलाच आषाढाच्या पहिल्या दिवसाचा उल्लेख आहे. रामगिरीमध्ये असलेल्या यक्षाला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशाकडे बघताला एक काळा ढग दिसतो. कालिदासाची जन्मतिथी उपलब्ध नसल्यामुळे या श्लोकाचा आधार घेऊन आषाढाचा पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदासाचा यक्ष ज्या रामगिरीवर होता ते ठिकाण आजच्या नागपूरमधल्या रामटेक गावाजवळ असावे असे मानले जाते. गंमत आहे, कालिदासाला सोळाशे वर्षांपूर्वी आजूबाजूला जे दिसलं असेल त्यातलं आज फार थोडं शिल्लक असावं, पण त्याला जे आकाश दिसलं असेल तेच आपल्यालाही दिसतं आहे.