२५ जून १९८३. अजूनही दिवस लख्ख आठवतो.
त्या काळात वेस्ट इंडिज म्हणजे सगळ्या संघांचा कर्दनकाळ होता. क्लाइव्ह लॉइडच्या नेतृत्यावाखाली या संघाने आधीचे दोन विश्वचषक जिंकले होते आणि हॅटट्रिकसाठी ते आतुर होते. तेव्हा मॅच बघायचे काहीही साधन नव्हते कारण पहिल्या दोन विश्वचषकांमध्ये भारताची जी ‘रॉयल वाट’ लागली होती ती पाहून भारतात मॅच दाखवणे असा काही प्रकार अस्तित्वात असू शकतो ही शक्यताही दूरदर्शनच्या डोक्यात आली नव्हती. तिसर्या वर्ल्डकपच्या वेळी भारत सेमी-फायनलपर्यंत पोचला आणि मग दूरदर्शन खडबडून जागे झाले. सेलफोन, इंटरनेट नसलेल्या त्या काळात कूठून सूत्रे फिरली माहीत नाही पण इंग्लंडविरुद्धची सेमी-फायनल आणि मग फायनल दोन्ही दूरदर्शनने प्रसारित केल्या. (अजिंक्य देव त्यांचे भले करो!) मग कप जिंकल्यावर दूरदर्शनला आपण साल्वादोर दालीच्या स्वप्नमय जगात तर नाही ना असा प्रश्न पडला म्हणून चिमटा काढण्यासाठी दुसर्या दिवशी ती मॅच सगळी पुन्हा दाखवली. (आजच्या यंग-जन साठी : त्या काळात मॅच रिटेलिकास्ट वॉज अ ह्यूज डील!)
हा लेख नोष्टाल्जिक आहे, स्मरणरंजनाने काठोकाठ भरलेला आहे. असणारच, असायलाच हवा, दुसरा पर्यायच नाही. गाडी बुंगाट डाउन द मेमरी लेनमध्ये पळते आहे, विलाज नाही. दिल थामके बैठो और सफर का मजा लूटो. और जानेका नई रहेंगा तो अबीच उतर जाओ. बादमें लफडा नई मंगता है, क्या?
क्रिकेटचे वेड मात्र तेव्हा जितके होते तितकेच आत्ताही आहे. फक्त आता साधने बदलल्यामुळे अभिव्यक्तींना वेगवेगळ्या वाटा मिळत आहेत. सनीचे ‘आयडॉल्स’ हातात पुस्तक आले तेव्हाचा आनंद तो काय वर्णावा. सनीने त्याच्या कारकीर्दीतील आवडत्या, प्रेरणादायी खेळाडूंवर प्रत्येकी एक प्रकरण लिहीले होते. पण ही बरीच नंतरची गोष्ट. त्याआधी क्रिकेटवर दोन मासिके यायची, ‘स्पोर्ट्सवर्ल्ड’ आणि ‘स्पोर्ट्सस्टार’. महिन्यातून एकच मासिक तेव्हा त्यातील प्रत्येक लेख शंभरदा वाचायचा, प्रत्येक फोटू निरखून बघायचा. वेस्ट इंडिज भारतात येणार असेल की त्यावर स्पेशल फीचर, खेळाडूंचे एकत्र फोटू. त्यात गावसकर आणि माल्कम मार्शल किंवा जोएल गार्नर यांचे एकत्र फोटो पाहिले की आम्हाला धडकी भरे. शाळेत स्पेलींग किंवा समीकरणे यांच्यासमोत कुंठित होणारी आमची मती या बाबतीत फोर-लेन एक्सप्रेस हायवेवर धावत असे. त्यात गावसकर म्हणजे आता सचिन आहे तसा जीव की प्राण. “वेडा आहे का गावसकर? त्या मार्शलबरोबर कशाला कॉफी पितोय?” आणि योगायोगाने गावसकर लवकर बाद झाला की ऍनालिसिस कन्फर्म. “नक्की मार्शलने त्याच्या कॉफीत काहीतरी टाकले असणार, म्हणूनच इतक्या लवकर औट झाला.”
सुनील आणि कपिल म्हटले की मला लतादीदी आणि आशाताई आठवतात. ज्या काळात ओपनिंग फास्ट बोलरच नाहीत म्हणून मातीवर घासून बॉलची चकाकी सुरूवातीलाच घालवायची आणि स्पिनरना आणायचे ही राजरोस पद्धत होती, त्या काळात कपिलने द्रुतगती गोलंदाजीची काट्याकुट्याने भरलेली वाट चोखाळली. इन कटर, आउट स्विंगर अशी सर्व शस्त्रे मेहनतीने आपल्या भात्यात आणली. लतादीदी/सुनील एका प्रांतात सर्वश्रेष्ठ, आशाजी/कपिल ऑलराउंडर.
१९८३ मध्ये मात्र ‘पंजाब दा पुत्तर’ ने आपली करामत दाखवली. झिंबाब्वेविरूद्धच्या सामन्यात पाच बाद १७ (गावसकर, श्रीकांत प्रत्येकी शून्य, अमरनाथ ५ आणि संदीप पाटील १) असे वस्त्रहरण होत असताना कृष्णाच्या रूपाने कपिल देव धावून आला. त्याच्या नावातच देव, त्यामुळे संकटकाळी रक्षण करणे हे त्याच्या ‘इसेन्शियल डूटीज’मध्ये होते. घणाघाती हल्ला चढवत (१६ चौकार आणि ६ षटकार) नाबाद १७५ धावा करून संघाला २६६ अशा सुस्थितीत नेऊन पोचवले. ओव्हर संपल्या म्हणून नाहीतर आणखी २५ करून सचिनने आता केलेला द्विशतकाचा विक्रम कपिलने तेव्हाच केला असता कदाचित. ‘मक्केदी रोटी और सरसोंदा साग’ – ‘तुसी छा गये पाजी.’ दुर्दैवाने ही इनिंग कधीही बघायला मिळाली नाही.
क्लाइव्ह लॉइड हे एक अजब रसायन होते. त्याच्याकडे पाहून अजून उत्क्रांतीचे बरेच काम बाकी आहे असा भास होई. बॅट खांद्यावर, लांब-लांब ढांगा टाकत तो मैदानावर आला की एखादा निऍंडरथाल आला आहे असे वाटे. फायनल म्याचमध्ये भारताचे उणेपुरे १८३ रन लॉइड आणि रिचर्ड्स एका हाताने खेळूनच काढतील असे वाटत होते. लॉइडला बिन्निने परत पाठवले तेव्हा अर्धा जीव परत आला पण रिचर्ड्स अजून बाकी होता. त्याने आपल्या नेहेमीच्या बेगुमान, बेदरकार शैलीत एकेका बॉलरची हजेरीघ्यायला सुरूवात केली आणि “चला, आता काय राहिलय? इथपर्यंत आले तेच खूप झाले हो. कर्मण्येवाधिकारस्ते..” असे म्हणत पुण्या-मुंबईतील सगळे काका लोक शनिवारच्या लांबणीवर टाकलेल्या कामांची यादी आठवू लागले. त्या काळात ‘किलर इन्स्टींक्ट’ सारख्या शब्दांना माकेटीगची जोड नव्हती कारण ‘माकेटिंग’ हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. (‘माकेटिंग’चा उच्चार करताना र म्हणायचा नसतो. ) सुदैवाने शब्द प्रचलित नसला तरी भावना पंजाब दा पुत्तर आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या टीममध्ये ठासून भरली होती.
कपिलने उलटा मागे जात रिचर्ड्सचा कॅच पकडला आणि काका कंपनीने पिशव्या परत खुंटीला टांगल्या. नंतर मार्शल आणि विकेटकीपर दूजॉनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तेही लवकरच परतले. १२६ वर रॉबर्ट्स बाद झाला आणि प्रेक्षक मैदानात घुसले. सिक्युरिटी नावाचा प्रकार तेव्हा नावालाच होता. बाउंडरीच्या बाहेर एक फुटाची छोटीशी तटबंदी की लगेच प्रेक्षक. रॉबर्ट्स बाद होऊन परत जात असतानाचे दृश्य अजूनही लक्षात आहे. अर्ध्या वाटेवर एक वेस्ट इंडियन प्रेक्षक मैदानात आला आणि त्याला काहीतरी सांगत त्याच्याबरोबर जायला लागला. तो काय सांगत होता ते येशूच जाणे पण नंतर बरेच वर्षांनी ‘रंगीला’ बघताना मला हे दृश्य आठवले. गुलशन ग्रोवर शूटींगसाठी प्रोड्युसर बस देत नाहिये म्हणून फ्रस्ट्रेट झालाय आणि शूटींग बघायला आलेल्यातला एक जण त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणतो, “मै आप का दर्द समझ सकता हूं.”
अमरनाथने होल्डींगला बाद केले आणि सगळे खेळाडू जिवाच्या आकांताने ड्रेसिंगरूमकडे धावायला लागले कारण प्रेक्षक परत मैदानात घुसले होते. प्रेक्षकांनी त्यांना गाठायच्या आत ड्रेसिंग रूम गाठणे महत्वाचे, जगलो-वाचलो तर सेलेब्रेट करूच नंतर. नंतर काय काय झाले नीटसे आठवत नाही कारण आम्ही टिव्हीसमोर नाचत होतो. पण गॅलरीत कपिलने उंचावलेला प्रुडेन्शिअल कप अजूनही आठवतो आणि त्याच्या जोडीला सनी, अमरनाथ, संदीप पाटील, बिन्नी, संधू.
लगेच पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारत दौर्यावर आला आणि भारतीय संघाची ५-० अशी कत्तल करून परत गेला. पण बूंद से गई वो हौद से नही आती. पुढच्या कपपर्यंतरी भारतीय संघ विश्वविजेता होता.