Category: इतर

  • छंद फोटोग्राफीचा

    कॅमेरा कितीही आधुनिक असला तरीही ‘फ्रेम’ कोणती ठेवायची, ‘फ्रेम’मध्ये काय ठेवायचं, काय गाळायचं, फोटोच्या मध्ये काय असेल किंवा १/३ अंतरावर काय असेल हे सगळे निर्णय फोटोग्राफरला करावे लागतात. आणि इथेच उस्ताद मंडळी त्यांचं कौशल्य दाखवतात.

    Bologna
    City of Bologna

    What is the secret to the art of photography? It’s experimenting, experimenting, and endless experimenting.

    Fan Ho

    कुठेतरी वाचल्याचं आठवतं, लहानपणी ज्या गोष्टींकडे तुमचा नैसर्गिक ओढा असतो, त्या गोष्टी मोठेपणी तुमच्या ‘ट्रू प्याशन’ असतात​. (आता प्याशनला नेमका मराठी शब्द सापडत नाहिये पण थोडक्यात सांगायचं तर ज्या गोष्टी करताना तुम्हाला इतका आनंद होतो की यातून पैसे मिळावेत ही अपेक्षाही नसते.) हे किती लोकांच्या बाबतीत खरं आहे कल्पना नाही पण माझ्या बाबतीत तरी १०० % खरं आहे. लहानपणी पहिल्यांदा टाइपरायटर बघितला तेव्हा लगेच त्यात कागद टाकला आणि टंकायला सुरुवात केली. अर्धा पानभर एका सुमार कथेची सुरूवात होती, एक माणूस अंधाऱया रात्रीत चालत जातो आहे, पाऊस कोसळतो आहे वगैरे वगैरे. कथा सुमार होती यात काही नवल नाही. नवल ह्याचं वाटतं की आपलं नाव टाइप करायचं सोडून हे भलतं-सलतं टाइप करायची बुद्धी कुठून झाली?

    हातात कॅमेरा आला तेव्हा फारसा प्रयास न करता हाताळताही येऊ लागला. पुढे जाण्याआधी या शतकात जन्मलेल्या तरुणाईसाठी दोन शब्द​. ऐंशीच्या दशकात कॅमेरा म्हणजे एक अभूतपूर्व चीज होती. एकतर तो कमी लोकांकडे असायचा आणि ज्यांच्याकडे असायचा ते त्याला जिवापाड जपायचे. कॅमेरा वापरण्याचे प्रसंगही साधे नसायचे – वाढदिवस​, काश्मिर किंवा कन्याकुमारीची ट्रिप वगैरे. लग्नासारखा मोठा प्रसंग असेल तर त्यावेळी व्यावसायिक फोटोग्राफरला बोलावलं जायचं. मग तो भला मोठ्ठा कॅमेरा घेऊन यायचा आणि ढीगभर फोटो काढायचा. ते अल्बममध्ये ठेवून वर्षानुवर्ष बघितले जायचे. काहीवेळा फोटोग्राफरचा नैसर्गिक ओढा, झरा किंवा धबधबा लग्नाला नटून-सजून आलेल्या म्हैलावर्गाकडे जास्त असायचा.

    रोजच्या जेवणाचे फोटु काढायचे ही कल्पना “पास्ता-पिझ्झा” इतकीच अतर्क्य होती. (हे वाक्य वाचल्यावर नियती खदाखदा हसली कारण भारतीय डॉमिनोज पिझ्झामध्ये “मोरोक्कन स्पाइस पास्ता पिझ्झा” नावाचा अनाकलनीय प्रकार विकला जातोय आणि लोक प्रेमाने त्याचे फोटूही काढत असणार​.) जर तुमच्याकडे जुन्या फोटोंचा अल्बम असेल तर त्यात फक्त खाद्यपदार्थांचे फोटो सापडतात का बघा. कॅमेऱ्यात जो रोल असायचा त्यातून छत्तीसएक फोटो निघायचे. त्यातले एक-दोन वाया जायचे कारण रोल भरताना थोडीशी फिल्म एक्सपोज व्हायची. फोटोग्राफीतील तज्ज्ञ मंडळी हा उद्योग ‘डार्करूम’मध्ये करायची म्हणजे ते दोन फोटोसुद्धा वाया जायचे नाहीत.

    तर अशी सगळी मागची ब्याकग्राऊंड असताना फुल्ल लोडेड कॅमेरा हातात आल्यावर माझा आनंद तो काय वर्णावा! तासभर बागेत भटकूनही निर्णय होईना की फोटो कसला काढावा. शेवटी एक फुलपाखरू दिसलं आणि मी आयुष्यातला पहिला फोटो काढला.

    butterfly

    कॅमेऱ्याशी ओळख झाल्यावर माझा चित्रपट बघायचा दृष्टिकोनही बदलला. दिग्दर्शक नावाचा कुणीतरी असतो, त्याच्या जोडीला एक सिनेमॅटोग्राफरही असतो याचं ज्ञान झालं आणि मग हे दोघे काय करत आहेत ते लक्षपूर्वक बघायला लागलो. आजही चित्रपट बघताना माझं अर्धं लक्ष क्यामेरा कुठे चाललाय, शॉट कुठे कट होतो आहे याकडे असतं.

    माझं कॅमेराप्रेम उत्तरोत्तर वाढतच गेलं आणि पहिल्या जपानफेरीमध्ये हा सुंदर क्यामेरा घ्यायचा योग आला. Canon EOS 7 28-105 mm आणि a 90-300 mm f/4.5-5.6 zoom lens.

    Canon EOS 7 SL

    मात्र बदलत्या काळाची चाहूल मला थोडी उशिरा लागली. काही वर्षातच डिजिटल कॅमेरे वापरात आले आणि एकदा स्मार्टफोन आल्यावर फिल्म कॅमेरा म्हणजे म्युझियममध्ये ठेवण्यासारखी वस्तू झाली. तरीही या अद्भुत यंत्राच्या माध्यमातून मला अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवता आहे हे ही खरं.

    Kid waiting for their Mom
    Kids waiting for their Mom in Seoul, S Korea.
    Sardinia
    Swan in a lake
    Taken with Samsung M30 camera

    माझ्या मते छायाचित्रे दोन प्रकारची असतात. पहिली म्हणजे जिथे छायाचित्राचा विषय इतका भन्नाट असतो की फोटोग्राफरला करण्यासारखं फारसं काही उरत नाही. आल्प्सची पर्वतराई, अरोरा बोरियालीस किंवा कलोस्सीयम यांचे फोटो सहसा चुकत नाहीत. तसंच सुंदर सूर्यास्तही.

    आणि तरीही जर फोटोग्राफर निष्णात असेल तर आपली वेगळी छाप पाडल्यावाचुन राहत नाही. याविषयी विस्ताराने नंतर.

    आता यातही एक उपविभाग आहे जिथे विषय रोचक असतो पण तिथे फोटोग्राफरही ताकदीचा लागतो. एक उदाहरण म्हणजे अभिनेते किंवा मॉडेल यांची छायाचित्रे. इथे विषय लाख रोचक असेल पण फोटोग्राफरला नेमका क्षण पकडता यायला हवा ज्यातून त्या अभिनेत्रीची ‘पर्सनॅलिटी’ समोर यायला हवी. दुसरं उदाहरण म्हणजे वन्यजीवांचे फोटो काढणारे फोटोग्राफर. इथे विषय तुमच्या नियंत्रणाखाली नसतो. वाघाला किंवा हत्तीला ‘पोझ’ घ्यायला कसं सांगणार? इथे फोटोग्राफरकडे कौशल्य, चिकाटी, आणि एकाग्रता या तिन्हींची गरज असते. पुरावा हवा असेल तर खेळणाऱ्या भूभू किंवा माऊचा फोटो काढण्याचा प्रयत्न करा.

    दुसऱ्या प्रकारची छायाचित्रे म्हणजे जिथे विषय सामान्य असतो. फोटोग्राफर आपल्या कौशल्याने अशी ‘फ्रेम’ जमवतो की त्या सामान्य दृश्यातून असामान्य कलाकृती तयार होते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्ट्रीट फोटोग्राफी.’ प्रसिद्ध चिनी छायाचित्रकार फॅन हो या विषयातील एक तज्ज्ञ आहे. साध्या रस्त्यावरच्या प्रसंगातून त्याने उभ्या केलेल्या कलाकृती असामान्य आहेत.

    पूर्वीची फिल्म वापरून केलेली फोटोग्राफी बऱ्यापैकी गुंतागुंतीची होती. तुमचा कॅमेरा फक्त ‘क्लिक’ करण्याऱ्या कॅमेऱ्यापेक्षा आधुनिक असला तर ‘शटर स्पीड’, ‘एक्सपोझर’ वगैरे बऱ्याच भानगडी होत्या आणि यांचा समन्वय साधला तरच फोटो चांगला येण्याची शक्यता होती. आता स्मार्टफोन आणि फिल्टरच्या जमान्यात या सगळ्या गोष्टी आपोआप होत आहेत. मग फोटोग्राफरला करण्यासारखं काय उरलं?

    याचं उत्तर आहे ‘कॉम्पोझिशन.’

    कॅमेरा कितीही आधुनिक असला तरीही ‘फ्रेम’ कोणती ठेवायची, ‘फ्रेम’मध्ये काय ठेवायचं, काय गाळायचं, फोटोच्या मध्ये काय असेल किंवा १/३ अंतरावर काय असेल हे सगळे निर्णय फोटोग्राफरला करावे लागतात. आणि इथेच उस्ताद मंडळी त्यांचं कौशल्य दाखवतात. गिझा पिरॅमिडच्या माझ्यासारख्या पामरांनी काढलेल्या हजार फोटोंपेक्षा निष्णात फोटोग्राफरने काढलेला एक फोटो छाप पाडून जातो. याचं कारण गिझा पिरॅमिडसारख्या जगप्रसिद्ध विषयातही निष्णात फोटोग्राफर अशी ‘फ्रेम’ शोधून काढतो जी त्या विषयाकडे एका नवीन दृष्टिकोनातून बघायला आपल्याला प्रवृत्त करते.


    मेरियम-वेबस्टर डिक्शनरीमध्ये फोटोग्राफर या शब्दाचा अर्थ “one who practices photography” असा दिलेला आहे.

    या व्याख्येमध्ये बदल व्हायला हवा हे उघड आहे कारण आज स्मार्टफोन असणारे सर्वजण फोटोग्राफर आहेत. मात्र शब्दाचा कीस काढणं एकवेळ बाजूला ठेवलं तर आजच्या जगाची एक विशेषता समोर येते. तुमच्यामध्ये गायक, नर्तक, लेखक, संगीतकार, अभिनेता किंवा फोटोग्राफर होण्यासाठी आवश्यक गुणवत्ता आहे का याचा पडताळा आज कुणालाही घेता येण्याची संधी आहे. आज कुणीही आपली कलाकृती थेट लोकांपर्यत पोचवू शकतो – मध्ये कुणाचाही अडसर येत नाही.

    थोर विचारवंत लॅरी डेव्हिड यांच्या शब्दात सांगायचं तर

  • माझे आवडते इटालियन पदार्थ

    इटलीमध्ये प्रत्येक भागात मिळणाऱ्या पिझ्झाची चव वेगळी असते. नेपल्स ही पिझ्झाची जन्मभूमी. तिथला पिझ्झा अवर्णनीय असतो. बहुतेक वेळा इटालियन पिझ्झा कापू देत नाहीत त्यामुळे सुरीने आपल्यालाच कापावा लागतो.

    . पहिला पदार्थ अर्थातच पिझ्झा. इटलीला जाण्याआधी मी डॉमिनोजचा पिझ्झा खाल्ला होता. इटलीला जो पिझ्झा मिळतो त्यात आणि डॉमिनोज पिझ्झामध्ये फारसं साम्य नाही. मला बहुतेक पिझ्झ्यांचं भारतीय रूप आवडत नाहीम्हणजे पनीर किंवा इतर भारतीय मसाले घालून केलेलं. इटालियन पिझ्झा दिसायला ओबडधोबड असतो, त्यात टॉपिंग नावाचा प्रकार नसतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पिझ्झा भट्टीत केलेला असतो त्यामुळे कधीकधी थोडासा जळालेला असतो. समजा म्याकडोनाल्डने झुणका-भाकरीची फ्रॅंचाईझ घेतली आणि निर्जंतुक वातावरणात यंत्राने भाकऱ्या केल्या तर त्यात आणि बायजाबाईने केलेल्या चुलीवरच्या भाकऱ्यांच्या चवीत जो फरक असेल तोच इथेही आहे. इटलीमध्ये प्रत्येक भागात मिळणाऱ्या पिझ्झाची चव वेगळी असते. नेपल्स ही पिझ्झाची जन्मभूमी. तिथला पिझ्झा अवर्णनीय असतो. बहुतेक वेळा इटालियन पिझ्झा कापू देत नाहीत त्यामुळे सुरीने आपल्यालाच कापावा लागतो.

    Neapolitan pizza
    नेपल्सचा पिझ्झा मार्गारिटा

    याखेरीज तिथे दुकानात पिझ्झाचे चतकोर तुकडेही विकतात. वेगवेगळ्या चवीचे दोन-तीन तुकडे घेतले तर मजा येते.

    २. इटलीच्या लिगुरिया भागात​ (पश्चिम इटली) फोकाच्या (Focaccia) नावाचा पदार्थ मिळतो. फोकाच्या हा ब्रेडचाच एक प्रकार आहे. पीठ, ऑलिव्हचं तेल आणि वेगवेगळ्या प्रकारचं मीठ. ताजा खाल्ला तर नरम, वाळलेलाही छान लागतो. हा सँडविचसाठीही वापरता येतो.

    Focaccia
    फोकाच्या

    ३. रिझोत्तो आल फुंगी (Risotto al funghi) म्हणजे मश्रूम आणि भात. इटालियन जेवणाचं एका वैशिष्ट्य म्हणजे मसाले फारसे नसतात त्यामुळे बहुतेक पदार्थ त्यांच्या मूळ चवीनुसार लागतात. इथे मश्रूम आणि कांदा ऑलिव्हच्या तेलात आणि/किंवा लोण्यात परतून घेतात. कधी थोडी व्हाइट वाईनही घालता. मग त्यात चिकन किंवा इतर ब्रॉथ घालून तांदूळ घालतात आणि शिजवतात. नंतर वरून पार्मेजान चीज.

    risotto al funghi
    रिझोत्तो आल फुंगी

    ४. तिरामिसु (Tiramisu). यात कॉफी, अंडी, साखर आणि मस्कारपोने चीज यांचं मिश्रण. मग वरून कोकोची पावडर पेरायची. मला गोड फारसं आवडत नाही पण तिरामिसु आवडतं.

    Tiramisu
    तिरामिसु

    ५. एखाद्या वाईनची चव कशी आहे हे नेमकं सांगण्यासाठी इग्रजीत खास वेगळे शब्द आहेत. मराठीत हे शब्द नसताना वाईनची चव सांगणं अशक्य आहे. मला दोन वाईन आवडतात – कियांती क्लासिको (Chianti Classico) आणि प्रिमितिव्हो (Primitivo). दोन्ही रेड वाईन आहेत.

    Chianti Classico
    कियांती क्लासिको (Chianti Classico)

    सर्व चित्रे विकी/गूगलवरुन साभार.

  • राणाजी म्हारे

    नवा देश, नवा पुरावा (खरा की खोटा माहीत नाही, आधी सगळ्यांना मारू, नंतर विचार करू), लगेच मानवतेचे पाठीराखे तयार. आक्रमण! ओबामा किंवा त्याआधीच्या अध्यक्षांना संस्कृत येत नसावं पण ‘यदा यदा ही धर्मस्य’चा सोईस्कर अर्थ लावून प्रत्येक अध्यक्ष युद्ध करायच्या कारणाची वाट बघत असतो. १९६२ पासून सरासरी दर तीन वर्षांत एक आक्रमण असा रेट आहे, आहात…

    नवा देश, नवा पुरावा (खरा की खोटा माहीत नाही, आधी सगळ्यांना मारू, नंतर विचार करू), लगेच मानवतेचे पाठीराखे तयार. आक्रमण! ओबामा किंवा त्याआधीच्या अध्यक्षांना संस्कृत येत नसावं पण ‘यदा यदा ही धर्मस्य’चा सोईस्कर अर्थ लावून प्रत्येक अध्यक्ष युद्ध करायच्या कारणाची वाट बघत असतो. १९६२ पासून सरासरी दर तीन वर्षांत एक आक्रमण असा रेट आहे, आहात कुठे? सो मेनी ब्याड गाइज, सो लिटल टाइम. जणू हे सोडून इतर कुणाला मानवतेची चाडच नाही. आता काय कारण तर म्हणे सिरीयाच्या सरकारने रासायनिक शस्त्रे वापरली. सिरीयामध्ये गेली दोन वर्षे यादवी युद्ध चालू आहे, लाखो लोक मेले. तोपर्यंत यांना जाग आली नव्हती. बंदुकांनी हवे तेवढे लोक मारा, नो प्रॉब्लेम. रासायनिक शस्त्रे म्हटल्याबरोबर सगळे खडबडून जागे झाले. इराकमध्ये यांच्या सैनिकांनी डिप्लिटेड युरेनियम, नापाम, फॉस्फरस वापरलं त्याचे परिणाम तिथल्या कैक पिढ्या भोगतील. पण तिथली मुलं अपंग जन्माला येत आहेत, कर्करोगाचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे तरी त्याच्याशी युद्धाचा काही संबंध नाही असं म्हणून हात झटकायला हे मोकळे. अहो, अजून व्हिएटनामची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत तर इराक लांबची गोष्ट. मरतील तर मरू देत तिच्यायला, डास, चिलटं मारताना आपण विचार करतो का? भाषणं देताना ‘प्रोटेक्टींग अमेरिकन पीपल’ची टेप सारखी वाजवली की झालं. काळजी करू नका, नो बूट्स ऑन ग्राउंड. सगळे अमेरिकन सुरक्षित राहतील. ड्रोनहल्ले करू, सैनिकांनाही मजा येते एसी रूममध्ये बसून माणसं मारायला. द न्यू ३-डी डिसप्ले इज लाइक, ऑस्सम, ड्यूड​.

    सिरीयामध्ये यादवी युद्ध चालू आहे. अतिरेकी, जनता, सरकारी फौजा सर्वांची सरमिसळ झालेली आहे. सामान्य जनतेचे होणारे हाल सांगून सोय नाही. आता आक्रमण केलं तर कुणावर बॉम्ब टाकणार? त्यामुळे निरपराध लोक मरतील त्याचं काय? आणि हे सर्व केल्यानंतर प्रश्न सुटण्याची अजिबात शक्यता नाही. जरी असादला मारलं तरी सध्या इराकमध्ये जो गदारोळ चालू आहे तोच इथेही होणार. हं, एक गोष्ट मात्र आहे. सिरीयाचा भूगोल तेलाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. सिरीयाविरुद्ध सैनिकी कारवाई करण्याचा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाने फेटाळून लावला. कॅमेरुन यांचा प्रस्ताव इंग्लंडच्या संसदेने फेटाळला. ओबामा यांनी लिबियाविरुद्ध कारवाई करताना कॉंग्रेसची परवानगी नव्हती तरी त्याची पर्वा केली नाही. अमेरिका आणि फ्रान्स हे दोनच देश कारवाई करण्याच्या पक्षात आहेत पण फिकर नॉट. ओबामांच्या आले मना, तेथे कोणाचे चाले ना. एकदा ठरवलं की नियम वगैरे किस झाड की पत्ती. आणि फ्रान्स, इंग्लंड निमूटपणे त्यांच्या मागे जाणार. जर्मनीसारखा स्वतंत्र विचार करण्याची कुवत किंवा इच्छा त्यांच्यामध्ये नाही. सगळे विचारवंत या विषयांवर कसे गप्प बसतात, तसंच.
    —-
    सकाळ झाली. दैदिप्यमान दिनकराने आपल्या सहस्रावधी किरणांच्या साहाय्याने पृथ्वीला नवजीवन द्यायला सुरुवात केली. यातील काही किरणे पांढऱ्या घराच्या दिशेने कूच करती जाहली. घराला स्पर्श करण्याआधी किरणे एक सेकंद थबकली. पांढऱ्या घराला स्पर्श करण्याआधी किरणे नेहमीच थबकत असत. घराच्या एका खिडकीतून किरणे आत गेली. त्या खोलीत निर्बलांचे तारणहार, दुर्जनांचे कर्दनकाळ, पृथ्वीची शेवटची आशा असणारे नोबेल शांतता पारितोषिक विजेते भो ओबामा गाढ निद्रेत होते. ओबामांच्या गालावर पडण्याआधी किरणे एक सेकंद थबकली. भो ओबामांना स्पर्श करण्याआधी किरणे नेहमीच थबकत असत. गालावर पडल्यावर किरणांची ऊर्जा ओबामांच्या त्वचेमध्ये पसरली. ही ऊर्जा त्यांच्या त्वचेच्या खाली असलेल्या ७-हायड्रोकोलेस्टेरॉल या रेणूंच्या दिशेने गेली. ऊर्जेला पाहिल्यावर रेणू काही काळ थबकले. ओबामांच्या त्वचेतील ७-हायड्रोकोलेस्टेरॉल रेणू ऊर्जेला पाहिल्यावर नेहमीच थबकत असत. ऊर्जेला भेटल्यानंतर ७-हायड्रोकोलेस्टेरॉल रेणूंचे प्री-व्हिटामिन डी रेणूत रूपांतर झाले. त्वचा गरम असल्याने या रेणूंचे लगेच व्हिटामिन-डी रेणूंमध्ये रूपांतर झाले – अर्थातच एक सेकंद थबकल्यानंतर. परत एक सेकंद थबकल्यानंतर हे रेणू ओबामांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करते झाले. ही सगळी थबकाथबकी – आदरापोटी होती. अदर दॅन आदर, दुसरं कोणतंही कारण नव्हतं.

    भो ओबामांना जाग आली. त्यांची नजर डावीकडच्या फडताळावर गेली. तिथे नोबेल शांतता पारितोषिक एक सेकंद थबकून पडलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात चमकत होतं. ते पाहिल्यावर भो ओबामांचं मन अपार करुणेनं भरून गेलं. ही करुणा जगातल्या सर्व लोकांसाठी होती. त्यांचं भाग्य थोर म्हणून त्यांना माझ्यासारखा दूरदर्शी, हुरहुन्नरी, धोरणी, गुणी, वाणी नेता मिळाला. नोबेल मिळालं यावरूनच माझी श्रेष्ठता सिद्ध होते. आइनस्टाइन, हेमिंग्वे, आंग सान सू क्यी, किसिंजर… नाही, नाही किसिंजर नाही. डॅम इट, (इथे त्यांनी कोठारे ष्टाइलमध्ये मांडीवर चापट मारली की नाही हे कळायला मार्ग नाही. ती माहिती क्लासिफाइड आहे.) नेमक्या नको त्या वेळेला नको ती नावं आठवतात. परत पहिल्यापासून..आइनस्टाइन, हेमिंग्वे, आंग सान सू क्यी, ओबामा. हं, आता कसं बरोबर वाटतंय. मुद्दा काय की माझ्यात काहीतरी गुण पाहूनच त्यांनी नोबेल दिलं असेल ना? काहीतरी केल्यानंतर नोबेल मिळालं तर त्याचा अर्थ ते काम नोबेलपात्र होतं. पण मला तर आधीच नोबेल मिळालंय. म्हणजे आता मी जे करणार आहे ते सगळं नोबेल पात्रच आहे. QED. मनाचं काठोकाठ समाधान झाल्यानंतर भो ओबामा उठले. आज खूप मोठं काम करायचं होतं. बऱ्याच दिवसांनी एका देशावर आक्रमण करायची संधी आली होती.

    कॅमेरा झूम होत पांढऱ्या घरावर स्थिरावतो. मागच्या ब्याकग्राउंडमध्ये गाणं वाजायला लागतं

    राणाजी म्हारे, गुस्से में आए, ऐसो बलखाए, अगियां बरसाए, घबराए म्हारो चैन
    जैसे दूर देस के टावर घुस जाए रे एरोप्लेन

    राणाजी म्हारे, ऐसो गुर्राए, ऐसो थर्राए, भर आए म्हारे नैन
    जैसे सरे आम इराक में जाके जम गए अंकल सॅम
    जैसे हर एक बात पे डिमोक्रसी में लगने लग गयो बॅन
    जैसे बिना बात अफगाणिस्तां का बज गयो भय्या बॅंड