जपानी दिग्दर्शक यासुजिरो ओझुच्या चित्रपटात काय आहे हे सांगण्यापेक्षा ‘नेति नेति’ प्रमाणे काय नाही हे सांगणं जास्त सयुक्तिक ठरावं. १९४९ साली बनविलेला ‘लेट स्प्रिंग’ हा मी पाहिलेला ओझुचा पहिला चित्रपट. बघताना पंधरा-वीस मिनिटं गेल्यावर काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलं. कॅमेरामन शॉट सुरू करून सारखा ‘चाय-बिडी’साठी जातो आहे की काय? असं वाटण्याचं कारण म्हणजे ओझुच्या चित्रपटांमध्ये…
जपानी दिग्दर्शक यासुजिरो ओझुच्या चित्रपटात काय आहे हे सांगण्यापेक्षा ‘नेति नेति’ प्रमाणे काय नाही हे सांगणं जास्त सयुक्तिक ठरावं. १९४९ साली बनविलेला ‘लेट स्प्रिंग’ हा मी पाहिलेला ओझुचा पहिला चित्रपट. बघताना पंधरा-वीस मिनिटं गेल्यावर काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलं. कॅमेरामन शॉट सुरू करून सारखा ‘चाय-बिडी’साठी जातो आहे की काय? असं वाटण्याचं कारण म्हणजे ओझुच्या चित्रपटांमध्ये कॅमेरा जागचा हलत नाही. ट्रॅक, पॅन, पात्र चालत जात असताना त्यांच्या मागे-मागे फिरणं, क्लोज-अप, उंचावरून घेतलेले शॉट, खुर्चीच्या किंवा माणसांच्या पायातून कॅमेरा रोखणं – यापैकी काहीही ओझुच्या चित्रपटांमध्ये सापडणार नाही. दामे दामे (ダメダメ). शिवाय कॅमेरा जिथे ठेवला आहे त्याच जागी परत परत ठेवलेला आढळतो. एखाद्या घरात ओझुच्या चार किंवा पाच ठरलेल्या जागा असतात, तिथूनच तो सगळा चित्रपट चित्रित करतो. बरं, कॅमेरा एका जागी आहे हे ठीक पण त्याची उंचीही आपण मांडी घालून बसलो तर ज्या आपलं डोकं ज्या पातळीला येईल तिथे. ओझुच्या बहुतेक सर्व चित्रपटांमध्ये घरात लोक टेबल खुर्च्या न वापरता मांडी घालून बसलेले दिसतात. ओझु बहुतेक सर्व शॉटमध्ये याच पातळीला कॅमेरा ठेवतो. शिवाय जोडीला मंद असं पार्श्वसंगीत सतत चाललेलं. चित्रपटामध्ये प्रसंग चित्रित करण्याचे काही लिखित किंवा अलिखित नियम असतात, ओझु हे सर्व नियम धुडकावून लावतो.
ओझुने सुरुवात मूकपटांपासून केली आणि नंतर बोलपट काढले. त्याचे शेवटचे काही चित्रपट रंगीत आहेत. त्याच्या चित्रपटांमध्ये पात्रांवर कधीही अशक्य कोटीतील प्रसंग गुदरत नाहीत. अडचणी असतात पण त्या अशक्यप्राय नसतात. रोज दिसणारी माणसं, त्यांचे रोजचेच प्रसंग. हल्लीचे चित्रपट दिग्दर्शक बहुतेक वेळा कथेवरील पकड ढिली वगैरे होत नाही ना अशा विवंचनेत असतात. मग त्यांच्या पात्रांच्या आयुष्यात अनाकलनीय घटना घडतात, कथेला अनपेक्षित वळणे मिळतात. ओझु हे सगळं एखाद्या सिगारेटवरची राख झटकावी तसं उडवून लावतो. त्याच्या बहुतेक कथा एका परिच्छेदात बसतील अशा असतात. कथांमध्ये बहुतेक वेळा ठराविक थीम परत परत वापरलेली असते, इतकंच नव्हे तर मुख्य कलाकारही तेच असतात. कलाकारांच्या वेषभूषेत किंवा मेकअपमध्येही फारसा फरक नसतो. बहुतेक कथासूत्रे साधी. ओहायो – गुड मॉर्निंग – मध्ये दोन मुलं टीव्हीचा हट्ट धरतात आणि तो पूर्ण होईपर्यंत मौनव्रत पत्करतात. बस्स, हीच कथा. पण ओझु अशा नजाकतीने ही पडद्यावर मांडतो की ज्याचं नाव ते. ‘टोक्यो स्टोरी’ गंभीर आहे – क्योटोमधून आई-वडील टोक्योमधल्या आपल्या मुलांना भेटायला येतात. शहरी धावपळीशी जमवून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना आलेल्या अडचणी यावर कथा आधारलेली आहे. या चित्रपटात एक विशेष म्हणजे ओझु चक्क एक ट्रॅकिंग शॉट घेऊन कॅमेरा हालवतो!
चेखॉव्ह म्हणायचा, “पहिल्या अंकात स्टेजवर पिस्तूल दिसलं तर तिसऱ्या अंकात कुणीतरी गोळी झाडायला हवी.” ओझुला हे मंजूर नाही. ‘ऍन ऑटम आफ्टरनून’मध्ये एका बारमधली वेट्रेस नायकाच्या मृत पत्नीसारखी दिसते. हे तो घरी आल्यावर मुलांनाही सांगतो. पण याचं पुढे ती तिची जुळी बहीण असणं असलं काही होत नाही. याचा कथानकाशी संबंध असलाच तर तो शेवटी असावा पण तो ही इतका अस्पष्ट आहे की नक्की काहीच सांगता येत नाही. ओझुचे चित्रपट वरून साधे दिसत असले तरी कधीकधी खोलात गेल्यावर तळ बराच खाली आहे हे जाणवतं.
बरं, कथेत एखादा नाट्यमय प्रसंग असला तरी ओझु त्याला टाळून पुढे जातो. ‘लेट स्प्रिंग’ आणि त्याच कथेवर थोडे फेरफार करून बनविलेला ‘ऍन ऑटम आफ्टरनून’ दोन्हीमध्ये मुलीचं लग्न हा कथेतील सर्वात महत्त्वाचा प्रसंग आहे. असं असेल तर बहुतेक दिग्दर्शकांना आता काय दाखवू आणि काय नको असं होतं. पण दोन्हीकडे लोक तयार होऊन लग्नाला जातात आणि पुढच्याच प्रसंगात लग्नाहून परत आलेले लोक गप्पा मारताना दिसतात. त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला कळतं की लग्न उरकलं. नवऱ्यामुलाचा चेहराही बघायला मिळत नाही. ओझुने महाभारतातील युद्ध फक्त धृतराष्ट्र आणि संजय यांच्या संवादावरून एका खोलीत चित्रित केलं असतं. बरेचदा कलाकार अगदी साध्या गोष्टी करत असतात आणि कॅमेरा कोपऱ्यात उभं राहून हे टिपत असतो. प्रत्येक कलाकार बोलताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव दिसायलाच हवेत असंही नाही, बरेचदा त्याची पाठ दिसते. दोन पात्रांचा संवाद चित्रित करताना एकाच्या खांद्यावरून दुसऱ्याकडे बघणं असे प्रकार तो कधीच करत नाही.
अभिनयाचं काय? ओझुच्या चित्रपटांमध्ये कलाकार इतक्या साधेपणाने वावरतात की बराच वेळ ते कसलेले कलाकार आहेत आणि साधा अभिनय करत आहेत की मुळातच बेतास बात कलाकार आहेत हेच कळत नाही. कलाकाराने ‘मेथड ऍक्टींग’ वगैरे वापरून बैल मुसंडी मारतो तसं भूमिकेत घुसणं (आणि मग दिग्दर्शकाने त्यांच्या नाकपुडीतील केस मोजता येतील इतक्या जवळ जाऊन प्रसंग चित्रित करणं) असला प्रकार अजिबात दिसत नाही. फक्त दारू पिऊन झिंगल्याच्या एखाद्या प्रसंगात बारकाईनं पाहिलं तर मात्र छोट्या-छोट्या हालचालींवरून त्यांचा अभिनय सुरेख आहे याची खात्री पटते. हे सगळं वाचून प्रश्न पडावा की ही टीका आहे की स्तुती? दोन्ही नाही, जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न आहे. खरं तर इतकं सगळं नसल्यावर चित्रपटात काय राहिलं असा प्रश्न पडावा. पण होतं उलटंच. ओझुचा कोणताही चित्रपट, कितीही वेळा बघितला तरी अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. आणि मग प्रश्न पडतो की असं का? चांगला चित्रपट कशामुळे बनतो याच्या व्याख्या तपासून बघाव्याश्या वाटतात. ओझु सगळे नियम बाजूला ठेवून त्याला जे दाखवायचं आहे ते शांतपणे दाखवत राहतो. बरेचदा कलाकार फ्रेममधून गेल्यावर काही सेकंद कॅमेरा मोकळी फ्रेम दाखवतो. दोन प्रसंगांच्या मध्ये नेहमी रिकामी खोली, रिकामा जिना, दोन बिल्डिंगच्या मध्ये असलेला दिवा, फॅक्टरीच्या चिमण्यांमधून येणारा धूर – ही ठरलेली चित्रे काही सेकंद येऊन जातात. रस्त्यावरून कलाकार जात असेल तर तो ही बरेचदा दोन घरांच्या फटीतून जाताना दिसतो.
हे सगळं वर्णन करण्याचा उद्देश हा की आजच्या काळात किती लोकांना हे बघायला आवडेल याची खात्री नाही. ३६० कोनातून कॅमेरा फिरवून, आकाश, पाताळ सगळीकडे ३-डी मधला मुक्त संचार असूनही प्रेक्षक कंटाळतात. अशा परिस्थितीत न हालणारा कॅमेरा बघायला आवडेल की नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं. ओझु बघायचा तर नेहमीच्या अपेक्षा बाजूला ठेवायला हव्यात. ओझु जेव्हा एखाद्या गावाची गोष्ट सांगतो तेव्हा ती सांगताना गाव कसं आहे, तिथल्या विशिष्ट जागांवरून काय दिसतं, आगगाडी येताना कशी दिसते, रात्री कुणी नसताना रस्ता कसा दिसतो हे सगळंही सांगत असतो. फक्त कथेत पुढे काय झालं इतकाच हेतू असेल तर ओझु बघून निराशा होणं साहजिक आहे. जपानी चित्रपट म्हणजे कुरोसावा आणि त्याचे ‘इंटेन्स’ सामुराई हे समीकरण (नको इतकं) पक्कं झालं आहे. याच्या अगदी उलट संवेदनशीलता बाळगणारा ओझु बघताना वेगळाच अनुभव मिळतो.
मी हल्ली चित्रपटांवरचे लेख वाचणं सोडून दिलं आहे – अर्थात काही अपवाद वगळता. आणि सगळे लेख नव्हे, तर जे उत्कृष्ट म्हणता येतील असे लेख वाचणं सोडून दिलं आहे. लेखाच्या सुरुवातीलाच धक्कादायक वाक्य टाकलं (इथे “स्टंटबाजी करणं हा माझा प्रकृतीधर्म नाही हे आपण जाणताच” असं म्हणणारे विश्वासराव दाभाडे आठवले, असो.) तर वाचक शेवटपर्यंत टिकण्याची शक्यता वाढते…
मी हल्ली चित्रपटांवरचे लेख वाचणं सोडून दिलं आहे – अर्थात काही अपवाद वगळता. आणि सगळे लेख नव्हे, तर जे उत्कृष्ट म्हणता येतील असे लेख वाचणं सोडून दिलं आहे. लेखाच्या सुरुवातीलाच धक्कादायक वाक्य टाकलं (इथे “स्टंटबाजी करणं हा माझा प्रकृतीधर्म नाही हे आपण जाणताच” असं म्हणणारे विश्वासराव दाभाडे आठवले, असो.) तर वाचक शेवटपर्यंत टिकण्याची शक्यता वाढते असं नुकतंच मिनेसोटा, हेलसिंकी आणि इस्लामाबाद विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या एकत्रित संशोधनात सिद्ध झालं आहे. तर यामागचं कारण काय? इथे खरं तर लेखात पाणी घालायला चांगली संधी आहे – माहिती-तंत्रज्ञानाचा विस्फोट, सोशल मीडिया याडा-याडा. लेख कशावरही असो, त्यातली धकाधकीच्या जीवनावरची चिंता वाचून वीट आला आहे. त्यात एक प्यारा (किंवा प्यारी – समानता) यात घातला की उरले दोन प्यारे (किंवा प्याऱ्या). शेवटी किती लाइक्स मिळतात ते महत्त्वाचं. वाचकांचा धृष्टद्द्युम्न हेच आमचे ध्येय! (संतोष रजेवर आहे.)
कोणत्याही गोष्टीवर आपण आपलं मत कसं बनवतो? इतरांची मतं वाचून किंवा ऐकून. उदा. सरकार संविधानात बदल करणार अशी बातमी आहे. मी यावर एक-दोन लेख, मुलाखती, संपादकीय वाचतो, माझं मत बनवतो आणि एखादं वेळेस लेख लिहितो. मग ज्या वाचकांनी हे इतर लेख वाचलेले नसतात त्यांना लेख लय भारी वाटतो, ज्यांनी वाचलेले असतात त्यांना सो-सो वाटतो. किंवा ‘ग्लोबल वोर्मिंग’वर पुस्तक वाचलं, त्याची माहिती देणारा लेख लिहिला. हे करताना माझा वाटा फक्त माहितीचं संकलन आणि ती पुस्तक न वाचताही कुणालाही कळावी अश्या भाषेत मांडणं हा असतो. तरीही लोक वाचतात कारण सगळं पुस्तक वाचण्याइतका वेळ/इंटरेस्ट बहुतेक लोकांना नसतो. कोणत्याही गोष्टीवरचं आपलं मत हे सतत आपण जे वाचतो, बघतो, ऐकतो आणि अनुभवतो त्यानुसार बदलत असतं. राजकारणापासून ‘ग्लोबल वोर्मिंग’पर्यंत कोणत्याही विषयावर मत बनवायचं असेल तर इतर मते वाचल्याशिवाय पर्याय नाही. थोडक्यात, कोणत्याही विषयावरचं माझं मत हे त्या-त्या विषयात जे तज्ञ लोक आहेत त्यांच्या मतांचं रिसायकलिंग असतं. फार-फार तर एखाद्या लेखात मतं एकत्रित करून त्यावर भाष्य केलेलं असतं किंवा लेखकाने या सर्व मतांचा आढावा घेतलेला असतो. बरेचदा लेखक ही तसदीही घेत नाहीत. काफ्कावर दोन जाहिरातींमध्ये दाटीवाटीने बसविलेल्या इन-मीन तीन प्यारांचा लेख. पहिल्या प्याऱ्यात इथे जन्मला, इथे बागडला, खूप खस्ता खाल्ल्या, मॅजिकल रिअलिझ्मचा जनक इ. इ. (इथे मॅजिकल रिअलिझ्म म्हणजे काय हे सांगण्याची तसदी घ्यायची गरज नाही, माहिती कोंबणं महत्त्वाचं)
इथे मुद्दा येतो की असा एखादातरी विषय आहे का की ज्यावर मी इतरांचं न ऐकता माझं मत बनवू शकतो आणि ते मत ग्राह्य मानलं जाऊ शकतं? माझ्या मर्यादित वकुबानुसार असे दोन विषय दिसतात – पुस्तके आणि चित्रपट. या विषयांवर कोणतंही मत असलं तरी ते चूक किंवा बरोबर नसतं, उलट आवडनिवड सापेक्ष असते असं म्हणून वेळ मारून नेता येते. दुसरं असं की हल्ली चित्रपट बघण्याआधी त्यावरचा लेख वाचला तर चित्रपट बघण्याचा अनुभव कमअस्सल झाल्यासारखा वाटतो. समीक्षकाचं चित्रपटावरचं लेखन म्हणजे एका प्रकारची रोरशाक टेस्टच बनली आहे – त्यावरून चित्रपट कसा आहे यापेक्षा समीक्षकाच्या आवडीनिवडीच अधिक लक्षात येतात. कुणाला हॉलिवूड अजिबात आवडत नाही, कुणाला बॉलीवूड. कुणाच्या मते निओरिअलिझ्म आणि सत्यजित रे म्हणजे सिनेमाचा सर्वोच्च बिंदू, तर कुणाच्या मते क्युब्रिक आणि स्कोरसेझी सर्वोत्कृष्ट. यात काही गैर आहे असं अजिबात नाही, आवडीनिवडी प्रत्येकाच्या असतातच. फरक हा की समीक्षा करताना त्यावर शक्यतो निष्पक्षपणे लिहिणं अपेक्षित असतं ते होत नाही. समीक्षकाच्या जागी जर मी मला ठेवलं तर हे किती अवघड आहे याची कल्पना येते. कधीकधी एकाच माणसाला ‘डॉन’, ‘गॉडफादर’, ‘राशोमोन’ आणि ‘अंदाज अपना अपना’ हे सगळं आवडू शकतं हेच मान्य नसतं कारण प्रेक्षकांची आणि चित्रपटांची विभागणी काटेकोर असते. रे म्हणजे ‘पाथेर पांचाली’, ‘चारुलता’ फारतर ‘महानगर’. दि सिका म्हणजे ‘बायसिकल थीव्ह्ज’. हे समज पूर्णपणे खोटे आहेत असं नाही पण ही या दिग्दर्शकांची अपुरी ओळख आहे. दि सिकाचं नाव घेतलं की त्याने सामान्य माणसांकडून ‘बायसिकल थीव्ज’ सारखा गंभीर चित्रपट कसा करवून घेतला यावर अनेक प्यारे वाचायला मिळतात. पण याच दि सिकाचा ‘यस्टरडे, टुडे ऍड टुमारो’ फारसा चर्चेत येत नाही – ऑस्कर मिळून सुद्धा! इथे त्याने नवखे कलाकार न घेता मार्चेल्लो मास्त्रोय्यानी आणि सोफिया लोरेन सारखे कसलेले कलाकार घेतले. (निओरिअलिझ्म म्हणजे अंतिम सत्य या मताच्या विरोधात हा पुरावा पुरेसा ठरावा.) शिवाय हाताळणीही हलकीफुलकी, काहीशी विनोदी ठेवली. मार्चेल्लोला नेहमी गंभीर भूमिकांमध्ये बघायची सवय असेल तर तो विनोदी भूमिकाही किती समर्थपणे हाताळू शकतो याचं हा चित्रपट उत्तम उदाहरण आहे.
समजा, तुम्हाला यासुजिरो ओझुचं नावही माहीत नाही. (मलाही काही महिन्यांपूर्वी माहीत नव्हतं.) त्याचा चित्रपट बघण्याचा योग आला तर त्याआधी तुम्ही त्यावर एक दोन लेख वाचता. मूळ लेख जर उत्कृष्ट असेल तर (उत्कृष्ट नसला तरीही बहुतेक वेळा तो उत्कृष्ट लेखांवर आधारित असतो त्यामुळे त्यात रिसायकल्ड मतं सापडण्याची शक्यता अधिक.) तर अर्ध्या-एक तासात तुम्हाला ओझुची सगळी वैशिष्ट्ये रेडीमेड मिळून जातात – कॅमेऱ्याची हालचाल अगदी कमी, चित्रीकरणाचे नेहमीचे नियम तोडलेले, पात्रं बरेचदा पाठमोरी दाखवलेली इ. इ. तासाभरात तुम्ही ओझुवर एक लेखही लिहून टाकू शकता – हाय काय आन नाय काय! नंतर चित्रपट बघताना तुम्ही काय करता? जे वाचलं त्याचा पडताळा घेता कारण चित्रपट सुरू व्हायच्या आतच तुमचं ओझुविषयी एक मत बनलेलं असतं. एकदा एक मत बनलं की आपण त्याच चश्म्यातून सगळीकडे बघतो. म्हणूनच होम्स सगळी तथ्ये समोर आल्याशिवाय कोणतंही मत बनवीत नसे. दुसरा पर्याय म्हणजे ओझुविषयी कोणतीही माहिती न मिळवता कोऱ्या मनाने चित्रपट बघणे. सध्या मी हा पर्याय स्वीकारलेला आहे.
हे पुस्तकांच्या बाबतीतही खरं असायला हवं पण तसं अजून तरी आढळलेलं नाही – काही अपवाद वगळता. मी मुराकामीच्या पुस्तकांचे ‘अर्थ’ लावणारे लेख वाचणं सोडून दिलं आहे. तरीही पुस्तक वाचणे आणि चित्रपट बघणे यामध्ये काही मूलभूत फरक आहेत. पुस्तक वाचताना मेहनत करावी लागते, पात्रे प्रसंग, घटना डोळ्यासमोर आणाव्या लागतात. चित्रपटात हे सगळं तयार असतं. उगीच का बहुतेक लोक वाचायचा कंटाळा करतात? दहा जिने चढून जाणे आणि लिफ्टचं बटण दाबणे यात जो फरक आहे तोच पुस्तक वाचणे आणि त्यावरचा चित्रपट बघणे यात आहे. ही चित्रपटांवर किंवा चित्रपट बघणाऱ्यावर टीका नाही उलट चित्रपट या माध्यमाची जबरदस्त ताकद दाखविण्याचा प्रयत्न आहे. पुस्तक वाचताना काही तास ते कित्येक महिने जाऊ शकतात, अनुभव खंडित असतो. चित्रपट दोन-तीन तासात एकाग्रपणे बघण्याचा दृक-श्राव्य अनुभव आहे. म्हणूनच मला एकाच दिवशी सात-आठ चित्रपट बघणाऱ्याविषयी (किंवा दिवसाला एका पुस्तकाचा फडशा पाडणाऱ्या बुकरच्या जजांविषयी) आदरयुक्त कुतूहलमिश्रित हेवा वाटतो. म्याट्रिक्समध्ये निओ जसं सगळं मेंदूत डाउनलोड करतो तसा काहीसा प्रकार. कोरी पाटी घेऊन चित्रपट बघण्याचा अनुभव वेगळा असतो. इथे अर्थातच ज्यांच्यावर विचार करावा लागतो असे चित्रपट अपेक्षित आहेत.
लेख टीकात्मक नाही. जे लोक लेख वाचून चित्रपट बघतात ते चूक असंही म्हणणं नाही. उदाहरण द्यायचं झालं तर काही लोकांना नवीन शहर बघताना टुरिष्ट गाइड आणि गायडेड टूर आवडते. इथे फायदा असा की शहराची मुख्य आकर्षणे कमीत कमी वेळात बघून होतात. काही लोकांना शहराची जुजबी माहिती घेऊन मग मनाला वाटेल तसं फिरायला आवडतं. या प्रकारे चित्रपट बघितला तर तो अनुभव अविस्मरणीय असतो हे मात्र नक्की. मग ‘पास्तिश’ म्हणजे काय हे ठाऊक नसलं तरी चालतं पण ‘किल बिल १’ मध्ये शेवटचा बर्फातील मारामारीचा प्रसंग ‘sheer visual poetry’ या प्रकारात मोडतो हे सांगण्यासाठी समीक्षकाची मदत लागत नाही.
पोलिन केल महान समीक्षका (की समीक्षक?) आहेत पण तोटा असा की त्यांचा लेख वाचल्यावर चित्रपटाविषयी न बघताच इतकी सखोल आणि आशयपूर्ण माहिती मिळते की नंतर चित्रपट बघताना त्याची छाप पुसणे केवळ अशक्य असतं. याचा अर्थ चित्रपटांविषयी वाचन सोडून दिलं आहे असा नाही. चित्रपटाच्या इतर गोष्टी उलगडून दाखविणारे लेख नेहमीच रोचक असतात. निओरिअलिझ्म म्हणजे काय याविषयी माहिती असेल तर ते चित्रपट बघताना अनुभव नक्कीच समृद्ध होतो. कुरोसावाचं आत्मचरित्र वाचल्यावर त्याच्या चित्रपटांकडे बघण्याची दृष्टी अधिक व्यापक होते. थोडक्यात सांगायचं तर (टू लेट) कुरोसावा किंवा अंतोनियोनी या लोकांनी जिवापाड मेहनत घेऊन चित्रपट केले आहेत आणि त्याद्वारे ते मला काहीतरी सांगू इच्छित आहेत. इथे मला समीक्षकाच्या मध्यस्थाची गरज नाही. चित्रपट बघितल्यानंतर वाटलंच तर लेख जरूर वाचेन पण चित्रपटाचा पहिला अनुभव घेताना शक्यतो पाटी कोरी असावी असा प्रयत्न आहे. म्हणून हल्ली लेख वाचताना हे जरूर बघा, इथे दिग्दर्शकाने अमुकसाठी अमुक प्रतीक वापरलं आहे, इथे त्याला असं म्हणायचं आहे अशी वाक्ये आली की मी लेख वाचणं सोडून देतो. निदान एखाद्या क्षेत्रात तरी मला रिसायकल्ड मत असण्यापेक्षा स्वतः:चं मत असणं अधिक आवडेल.
लहानपणापासून फारसा विचार न करता समोर येईल तो चित्रपट बघितल्यानंतर हल्ली चित्रपट बघण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाल्याचं जाणवतं. अमुक वेळी अमुक चित्रपट बघायचा की नाही याचे निकष बरेच बदलले आहेत आणि त्यात विक्षिप्तपणा आला आहे. चित्रपटांचं जे अनेक प्रकारे वर्गीकरण केलं जातं ते बहुधा दोन ढोबळ प्रकारांमध्ये बसवता येईल. ज्यावर विचार करावा लागत नाही असे आणि…
लहानपणापासून फारसा विचार न करता समोर येईल तो चित्रपट बघितल्यानंतर हल्ली चित्रपट बघण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाल्याचं जाणवतं. अमुक वेळी अमुक चित्रपट बघायचा की नाही याचे निकष बरेच बदलले आहेत आणि त्यात विक्षिप्तपणा आला आहे. चित्रपटांचं जे अनेक प्रकारे वर्गीकरण केलं जातं ते बहुधा दोन ढोबळ प्रकारांमध्ये बसवता येईल. ज्यावर विचार करावा लागत नाही असे आणि करावा लागतो असे चित्रपट. ही दोन टोकं झाली. यात मध्ये असणारे चित्रपटही असतात. पैकी विचार न करावा लागणारे चित्रपट बघण्यात फारशी अडचण येत नाही. मूड, वेळ आहे की नाही इतकाच प्रश्न येतो. गंभीर चित्रपट बघताना मात्र निकष वाढतात. मूड, वेळ यांचा प्रश्न असतोच, शिवाय त्या क्षणी त्या (प्रकारच्या) चित्रपटाचा आस्वाद घेण्याची मन:स्थिती आहे की नाही हे ही बघावं लागतं. त्यात परत असे चित्रपट एकापाठोपाठ एक बघणं जमत नाही. कुरोसावा, बर्गमन यांच्या एका चित्रपटात इतकं काही सापडतं की ते आत्मसात करण्यात बराच वेळ जातो. असा एक चित्रपट पाहिल्यानंतर पाटी कोरी करून नवीन अनुभव घ्यायला तयार होईपर्यंत दुसरं काही बघावं अशी इच्छा होत नाही. म्हणून रिट्रोस्पेक्टीव्ह सारख्या प्रकारांशी आमची कुंडली जुळत नाही. परत हल्ली बहुतेक चित्रपट घरी बघता येत असल्यामुळे सोय वाढली आहे. घरी चित्रपट हवा तिथे थांबवता येतो, एखादा प्रसंग किंवा संवाद कळला नाही तर परत बघता येतो किंवा चक्क मध्ये थांबून आपण काय बघत आहोत याचा विचार करता येतो. अनेक चित्रपट उपलब्ध आहेत म्हणून सगळे एकापाठोपाठ एक बघून टाकायचे की जमेल, रुचेल तोच चित्रपट निगुतीने बघायचा यात सध्या तर मत दुसऱ्या प्रकाराला आहे. ही अर्थातच टीका नाही. उलट मायक्रोसॉफ्टला गुरुस्थानी मानून आमच्यात असलेल्या ‘बग’ला ‘फीचर’चं रूप देण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. चित्रपट बघण्याची अमुक पद्धत बरोबर, अमुक चूक असं काही नसतं.
अर्थातच या सर्व विक्षिप्तपणाची किंमत द्यावी लागते. न पाहिलेल्या चित्रपटांची यादी इतकी लांब आणि लाजिरवाणी आहे की ती गुप्त ठेवण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत एखादा गाजत असलेला चित्रपट बघण्यात आला तर विशेष समजायचं. सध्या युरोपमध्ये गाजत असलेला ‘ला ग्रांदे बेल्लेझ्झा’ – ‘द ग्रेट ब्यूटी’ हा चित्रपट नुकताच पाहिला. इटली आणि फ्रान्स यांच्या सहनिर्मितीने बनलेल्या या चित्रपटाचा ऑस्करच्या सहाच्या यादीत नुकताच समावेश झाला आहे. एकदा बघितल्यावर परत एकदा बघितला. इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर परिणामकारक असा नवीन चित्रपट बरेच दिवसांनी बघायला मिळाला.
चित्रपट सुरू होतो रोम शहरात. कॅमेरा एखाद्या प्रवाशासारखा फिरत राहतो. गाण्यांचा सराव करणारा क्वायर, जपानी पर्यटक, त्यांना माहिती देणारी गाईड, अचानक एक पर्यटक चक्कर येऊन पडतो. प्रसंग बदलल्यानंतर आता एक पार्टी चालू असलेली दिसते. लोक नाचत आहेत, काही क्षण कॅमेरा काही व्यक्तींवर रेंगाळतो पण कुठेही ही प्रमुख व्यक्तिरेखा आहे हे जाणवण्याइतपत तिला महत्त्व देत नाही. अखेर जवळजवळ दहा मिनिटांनंतर मुख्य व्यक्तिरेखा समोर येते – जेप गांबार्देल्ला. जेप हा एक प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार आहे आणि ही पार्टी त्याच्या वाढदिवसाची आहे. पार्टीत उच्चभ्रू लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांचं वागणं पाहून गोविंद निहलानी आणि एलकुंचवार यांच्या पार्टी चित्रपटाची आठवण होते. (मुळात पार्टीची प्रेरणा टॉलस्टॉयच्या ‘वॉर ऍंड पीस’ची पहिली काही प्रकरणे आहेत हे नुकतंच लक्षात आलं. यातील साम्यस्थळे रोचक आहेत. हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल.) जेप समोर आल्याबरोबर एक प्रश्न विचारतो, “आयुष्यात तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं?” याचं उत्तर किंवा उत्तरे मिळवण्यात बाकीचा चित्रपट खर्ची होतो असं म्हणता येऊ शकेल. पण फक्त या प्रश्नाची उत्तरं मिळवणे हाच चित्रपटाचा हेतू नाही. तसं असतं तर त्याचा आवाका फार लहान झाला असता. जेप आता साठीच्या आसपास आहे. त्याने आतापर्यंत फक्त एक कादंबरी लिहिली आहे. ही इतकी प्रसिद्ध झाली की तेव्हापासून तो इटालियन साहित्यातील महत्त्वाचा लेखक मानला जातो. (इथे ‘कॅचर इन द राय’ आणि ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ ची आठवण होणे अपरिहार्य आहे.) संपूर्ण चित्रपटात लोक जेपला वेळोवेळी विचारत राहतात की तू त्यानंतर आणखी काही का लिहिलं नाही. लेखकांना हा प्रश्न किती वैताग देणारा असतो याची जाणीव असते. जेप कधी हे तर कधी ते उत्तर देत राहतो. या कदाचित फसव्या उत्तरांमध्ये त्याला कधी कधी खरी उत्तरंही गवसतात. ही उत्तरं शोधणं हा चित्रपटाचा आणखी एक हेतू.
पण इथेही चित्रपट थांबत नाही. दिग्दर्शक पाओलो सोरेंतिनोची महत्त्वाकांक्षा किती प्रचंड आहे हे हळूहळू लक्षात यायला लागतं आणि आपण अवाक होऊन बघत राहतो. जेप स्वत: लेखक त्यामुळे साहित्याचे बरेच संदर्भ येतात. त्यातील सर्वात महत्त्वाचे दोन – मार्सेल प्रूस्त आणि गुस्ताव्ह फ्लोबेर. वेळोवेळी जेप आपल्या गतायुष्यातील आठवणींमध्ये हरवतो. कधी फ्लॅशबॅकमधून या आठवणी दिसतात. फ्लोबेरला ‘नथिंग’बद्दल एक कादंबरी लिहायची होती पण ते त्याला कधीच जमलं नाही. जेप रगेल आणि रंगेल माणूस. त्याचं बहुतेक आयुष्य पार्ट्या करण्यात गेलेलं. अशाच एका पार्टीत तो त्याच्या हाउसकीपरला म्हणतो, “हे माझं आयुष्य. यात अर्थपूर्ण असं काहीच नाही. यावर मी काय लिहिणार? जे फ्लोबेरला जमलं नाही ते मला काय जमणार?”
इथे चित्रपट थांबला असता तरी एक उत्तम चित्रपट ठरला असता. पण सोरेंतिनो त्याच्याही पुढे जातो. सगळ्या चित्रपटात भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यात प्रवास करताना नवं आणि जुनं यांची सतत तुलना होत राहते. एका पार्टीत जेप आणि एक मित्र बोलत असतात. कुणीतरी अर्धवट टाकून दिलेली डिश समोर असते. जेप विचारतो, “केटरिंगचा दर्जा खालावलाय, नाही?” मित्र म्हणतो, “रोमचा दर्जा खालावलाय.” हे नवं-जुनं दाखवताना सोरेंतिनो वेळोवेळी कलेचा संदर्भ देतो आणि प्रसंगी यावर मर्मभेदी कॉमेंट करतो. ही पार्टी इटलीमधील एका प्रसिद्ध मॉडर्न आर्ट कलेक्टरने दिलेली असते. त्याची आठ-दहा वर्षांची मुलगी खेळत असते. तिला इच्छेविरुद्ध ओढून आणलं जातं. एक भव्य पांढरा कॅनव्हास, रंगांचे डबे ठेवलेले आणि सभोवताली सगळे प्रेक्षक जमलेले. मुलगी चिडलेली असते, ती रडत-रडत एकेका रंगाचे डबे कॅनव्हासवर मोकळे करते, नंतर हाताने रंग पसरवते. हे चित्र नंतर लाखो युरोंना विकलं जाईल. जेपबरोबर त्याची मैत्रीण असते तिला हे बघवत नाही. ते दोघे निघतात आणि तिथे त्यांना तो मित्र भेटतो. हा माणूस साधासुधा नाही, राजेरजवाड्यांचा केअरटेकर आहे. त्यांच्या सगळ्या किल्ल्या याच्याकडे आहेत. जेपच्या विनंतीला मान देऊन तो हा खजिना खुला करतो. रेनेसान्सपासून जोपासलेल्या कलासंस्कृतीमधून आलेली शिल्पे आणि चित्रे या खजिन्यात असतात. ही तेव्हाची कला आणि ही आताची, विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो. कलेचा संदर्भ फक्त या बाबतीतच घेतलेला नाही. पार्श्वसंगीतही याला साजेसं आहे. चित्रपटात मुख्यत्वे दोन प्रकारचं पार्श्वसंगीत आहे – पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत आणि आताचं आधुनिक. जेप आणि त्याची मैत्रीण चित्रे बघत असताना मागे बिझेच्या संगीताची हेलावून टाकणारी धून वाजत असते. तेव्हाचं आणि आताचं. ढासळलेली मूल्ये आणि त्यांच्याबरोबर गर्तेत गेलेली आयुष्यं. एकदा एका पार्टीत जेप म्हणतो, “We’re all on the brink of despair, all we can do is look each other in the face, keep each other company, joke a little…”
सोरेंतिनो ज्या परंपरेतून आला आहे ती नावं फार मोठी आहेत. दि सिका, फेल्लिनी, रोस्सेलिनी, अन्तोनियोनी. चित्रपटावर अन्तोनियोनीचा – विशेषत: ‘ला नोत्ते’ चा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. अन्तोनियोनीप्रमाणेच सोरेंतिनो संथ लयीत शहराचं वैविध्य टिपत असतो. सोरेंतिनोचा नायकही लेखक आहे. तो ही सगळं स्पष्ट करण्याच्या भानगडीत न पडता कधी सूचकपणे उत्तरांकडे निर्देश करतो तर कधी निर्णय प्रेक्षकांवर सोपवतो. हॉलिवूडच्या चित्रपटांवरचा माझा एक मुख्य आक्षेप म्हणजे त्यातील युरोपचं चित्रण. कित्येकदा युरोपच्या वाऱ्या करूनही बहुतेक दिग्दर्शक पर्यटकाच्या भूमिकेतून बाहेर आलेले दिसत नाहीत. मग ‘बॉर्न आयडेंटिटी’सारख्या उत्तम चित्रपटातही सीआयएचा इटालियन एजंट दाखवला की तो नेमका कलोसियमच्या पुढूनच जात असतो. स्कूटरशिवाय इतर कोणतंही वाहन त्याला सापडत नाही. किंवा पॅरिस म्हटलं की एजंटच्या खिडकीतून आयफेल टॉवर दिसायलाच हवा. जसं भारत म्हटलं की स्लमडॉग, भिकारी किंवा साधूबाबा तसं. बहुधा या मर्यादा लक्षात घेऊनच की काय, कपोलाने कधीही अमेरिकेच्या बाहेरचा विषय हाताळला नाही. (उप आक्षेप : विचार न करता दिलेलं बिनडोक पार्श्व संगीत. ‘स्पाय गेम’ ला विवाल्दीचे ‘फोर सीझन्स’ वापरणार असाल तर आधी त्या गुप्तहेरांचं पिस्तूल आमच्या कानशिलावर लावा आणि आमच्या यातना तरी थांबवा.)
युरोपियन दिग्दर्शकांच्या कॅमेऱ्यातून युरोप बघण्यात वेगळीच मजा आहे. फेलिनीच्या ‘ला दोल्चे व्हिता’प्रमाणेच रोम शहर हा या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गंमत म्हणजे जेपचं घर कलोस्सियमच्या शेजारीच असतं. पण कधीही कॅमेरा ‘हे बघा कलोस्सियम’ असा अट्टहास करताना दिसत नाही. कलोस्सियमच्या भिंती दिसतात पण त्या ओझरत्या. आणि मग हे भग्न अवशेष ढासळणाऱ्या जगाचं एक मूक प्रतीक बनून राहतात. कला आणि तिचं व्यवसायीकरण यावर कॉमेंट करताना एक वेगळीच गंमत दिसते. सुरुवातीला ‘बांका पोपोलारे दि व्हिचेंझा’ हे सहनिर्माते असल्याची पाटी येते – सिंहासनमध्ये ‘बॅंक ऑफ महाराष्ट्’ची येते तशी. इटलीमध्ये बॅंक काढणे हा एक लोकप्रिय व्यवसाय आहे, प्रत्येक गल्लीत एक बॅक असते. एका प्रसंगात या बॅंकेची केलेली ओझरती जाहिरात रोचक वाटते. ही नुसती जाहिरात समजायची की दिग्दर्शकाने खास आधुनिक शैलीत केलेली ‘सेल्फ रेफरन्शियल कॉमेंट’?
पूर्वाधात कलेच्या अनुषंगाने जाणाऱ्या चित्रपटाचा फोकस उत्तरार्धात धर्मावर येतो. कॅथॉलिक धर्माला इटली आणि युरोपमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. चर्चचा शेकडो वर्षांचा इतिहास, सत्तेसाठी झालेल्या लढाया याचे अनेक संदर्भ यात येतात. या सर्वांची संगती तिथे जन्मापासून राहिल्याशिवाय लागणे शक्य नाही. इथे प्रश्न येतो की अशा प्रकारच्या चित्रपटांचे संदर्भ आंतरराष्ट्रीय पातळीवर किती लोकांना लागत असतील? आणि संदर्भ न लागल्यामुळे जर चित्रपटावर कमी योग्यतेचा शिक्का लागला तर चूक कुणाची? असो. एक १०४ वर्षे वयाची सिस्टर पोपला भेटायला येणार असते. तिच्या स्वागताप्रीत्यर्थ जेपच्या घरी मेजवानी होते. या सिस्टरने तरुणपणी जेपची कादंबरी वाचलेली असते. सिस्टरला फक्त जमिनीवर झोपायची सवय. हाटेलातल्या गाद्यांवर तिला झोप येत नाही. मेजवानी संपल्यावर सिस्टर गायब होते. सगळे जण शोधाशोध करायला लागतात, शेवटी ती एका खोलीत जमिनीवर डाराडूर झोपलेली दिसते. पहाटे जेप गच्चीवर येतो. नुकतंच उजाडतंय. पहाटेचा प्रकाश, ओझरतं दिसणारं कलोस्सियम आणि डौलदार राजहंस. सगळी गच्ची राजहंसांनी भरलेली, पश्चिमेकडे जाताना काही काळ विसावा घ्यायला थांबलेले. सिस्टर त्याला विचारते, तू आणखी का लिहिलं नाहीस. जेप समोरचं दृश्य बघतो आणि निःश्वास टाकून म्हणतो, “I was looking for the great beauty, but…I didn’t find it.”
कोणत्याही चित्रपटात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे चित्रपटाचा मूड, लय किंवा टोन. हा सांभाळण्याचं काम लेखक, दिग्दर्शक, कलाकार या सर्वांचं असतं. ‘पार्टी’ गंभीर चित्रपट आहे आणि अंगावर आणणारी वास्तवता चित्रित करताना कुठेही विनोदाला स्थान नाही. याउलट काही चित्रपट दुसऱ्या टोकाकडून येतात. समस्यांनाही विनोदी ढंगाने समोर आणतात. ‘अमेली’ एक उदाहरण. रोबेर्तो बेनीन्यिचा ‘ला व्हिता ए बेल्ला’ हे टोकाचं उदाहरण.’ला ग्रांदे बेल्लेझ्झा’मध्ये सोरेंतिनो ही दोन्ही टोकं नाकारून मधला मार्ग पत्करतो. चित्रपटात अनेक गंभीर मुद्द्यांना स्पर्श केला आहे पण त्यांच्यावर चित्रपट रेंगाळत नाही. जसं आहे तसं वास्तव दाखवून पुढे जातो. आणि हा प्रवास अत्यंत सहजपणे झालेला दिसतो. कधी गंभीर, कधी किंचित विनोदी, कधी भावनिक पण मेलोड्रामा टाळणारा असा हा प्रवास आहे. ही सहजता सांभाळणं म्हणजे डोंबाऱ्याच्या दोरीवरून चालण्यासारखं आहे. किंचित तोल गेला तरी सगळं ओमफस्स. ‘ला ग्रांदे बेल्लेझ्झा’ ज्या सफाईने हा तोल सांभाळतो त्याला दाद द्यावीशी वाटते. हे सगळं वर्णन हिमनगाचं टोक आहे, चित्रपटात आणखी अनेक उल्लेखनीय गोष्टी सापडतील.
मागच्या आठवड्यात अमीन सायानीने रेडिओ सिटीवर खय्यामसाहेबांची मुलाखत घेतली होती. त्यांना विचारलं, “तुमची सगळी गाणी नेहमी संथ का असतात?” ते म्हटले, “संथ लय नसेल तर उत्तम काव्याचा आस्वाद घेता येत नाही.” इथे अर्थातच ‘छैंय्या छैंय्या’ सारखे अपवाद आहेत पण बरंच तथ्यही आहे. ‘ला ग्रांदे बेल्लेझ्झा’ हा चित्रपट संथ लयीत चालणारा एक अविस्मरणीय दृक-श्राव्य अनुभव आहे. कॅमेरा कुठेही नेता येण्याचं तांत्रिक सामर्थ्य आहे म्हणून तो तिथे न्यायलाच हवा असा अट्टहास नाही. फिरवता येतो म्हणून गरगरा फिरवणं नाही. रंगसंगती अत्यंत साजेशी, कुठेही कृत्रिम शेड वापरलेल्या नाहीत. कितीतरी फ्रेम लक्षात राहण्यासारख्या. आणि त्या फ्रेम बघताना ऐकू येणारं अप्रतिम पार्श्वसंगीत.
चित्रपटात जेपचा एक जादूगार मित्र जिराफ अदृश्य करून दाखवतो. कसं केलं तर म्हणतो, “It’s just a trick.” चित्रपटाच्या शेवटी जेप दुसरी कादंबरी लिहायला घेतो. “Therefore…let this novel begin. After all… it’s just a trick. Yes, it’s just a trick.”
इथे ट्रिक म्हणजे नेमकं काय? कादंबरी लिहिणं? आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे शोधणं? हा सर्व चित्रपट? की आपलं आयुष्य?
—-
ता.क. चित्रपट संपल्यावर पाट्या येताना लगेच उठू नका. पुढची सहा-सात मिनिटे रोमच्या टायबर नदीतून केलेली संध्याकाळची सफर आहे. पार्श्वभूमीत रशियन संगीतकार व्हादिमिर मार्टीनॉव्ह याच्या ‘द बिटीट्यूड्स’ या कोरल पीसचे क्रोनोस क्वार्टेट या ग्रूपने केलेले रूपांतर आहे. चित्रपट संपला तरी दॄक-श्राव्य अनुभव चालू राहतो. कॅन चित्रपट महोत्सवात चित्रपट संपल्यानंतर बरेच लोक हा अनुभव घेत बसून राहीले होते किंवा उभे होते, उशीर होतो आहे वगैरे फिकीर न करता.