Category: बुद्धिबळ

  • कार्लसन जिंकला पण चकी झळकला

    या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेमध्ये सध्याचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला कोण आव्हान देणार याचं उत्तर अखेर मिळालं. लंडनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कॅंडिडेट्स स्पर्धेत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने निसटता विजय मिळवला. कार्लसन आणि रशियाचा व्ह्लादिमिर क्रामनिक या दोघांनाही ८.५ गुण मिळाले होते. असं झालं तर काय करायचं याविषयी प्रत्येक स्पर्धेचे नियम वाटेल तसे असू शकतात. इथे कार्लसनला क्रामनिकपेक्षा जास्त विजय मिळाले म्हणून त्याला विजेता ठरवण्यात आलं. बिचाऱ्या व्ह्लादचा ‘क्राइम मास्टर गोगो’ झाला. मात्र क्रामनिकनं हा काहीसा अन्यायकारक निर्णय खिलाडू वृत्तीनं स्वीकारला.

    ही स्पर्धा या वर्षीच्या सगळ्या स्पर्धांमध्ये सर्वोच्च दर्जाची होती याचं कारण यातले आठही खेळाडू ज्यांना ‘सुपर-जीएम’ किंवा सुपर ग्रॅंडमास्टर्स म्हणता येईल असे होते. कार्लसन, क्रामनिक, अरोनियन, मागच्या वर्षीचा आव्हानवीर गेलफांड, इव्हानचुक, स्विडलर, ग्रिश्चुक आणि राजाबोव्ह. या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे एक कार्लसन सोडला तर बाकीच्या सर्व खेळाडूंना रशियन भाषा येत होती. रशिया आणि बुद्धिबळ यांचं सख्य बरंच जुनं आहे आणि आजही विश्वविजेतेपद रशियाकडे नाही हे रशियाच्या खेळाडूंना बोचत असतं. म्हणूनच या स्पर्धेआधी कास्पारोव्हने नेहमीप्रमाणे दर्पोक्ती केली, “विश्वविजेतेपद भारतातून नॉर्वेकडे जाण्याआधी रशियात यायला हवं.” विश्वविजेतेपद भारतातच राहील ही शक्यता अर्थातच कास्पारोव्हने जमेला धरलेली नाही पण ती धरली तर मग तो कास्पारोव्ह कसला? अर्थात कास्पारोव्हला बाकीचे मुद्देही टोचत असणार. एकतर विश्वविजेतेपदाची स्पर्धा परत फिडेच्या ताब्यात गेली आहे, सगळे खेळाडू नियमानुसार वागत आहेत आणि मुख्य म्हणजे यात तो कुठेच नाही. तर रशियाला निदान या वर्षी तरी चान्स नाही हे नक्की झालं.

    कार्लसन स्पर्धा जिंकणार याविषयी मिडियात बरीच चर्चा होती. कास्पारोव्हचा सर्वोच्च इलो रेटिंगचा विक्रम (२८५१) नुकताच कार्लसनने मोडला. आधीच तो मिडियाचा फेवरिट होता आता तर स्टार झालाय. ब्रिटीश ग्रॅंडमास्टर शॉर्टने तर त्याच्यामुळे बुद्धिबळात ‘रनेसान्स’ येणार आहे असं म्हणायचंही शिल्लक ठेवलं नाही. कार्लसन दिसायला चांगला आहे, मॉडेलिंग करतो त्यामुळे लोकप्रियही आहे. मुद्दा आहे तो रनेसान्स या शब्दाबद्दल. याचं थोडंसं अमेरिकन ‘ऑस्सम’सारखं झालंय. पिझ्झा आवडला तर तो ‘ऑस्सम’ आणि नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला तर ते ही ‘ऑस्सम’, अधेमधे काही नाही. अमेरिकेच्या पाच लेखकांनी थोर कादंबऱ्या लिहिल्या की तो झाला ‘अमेरिकन रनेसान्स’. रनेसान्सचा अर्थ पुनरुज्जीवन असा घेतला तरी शॉर्टच्या लेखातून काहीच अर्थबोध होत नाही. बुद्धिबळात आता नवीन खेळाडू येत आहेत हे मान्य, आणि जर ते आनंदपेक्षा चांगले खेळत असतील तर त्याला हरवतीलच. आनंदचा खेळ आधीइतका आक्रमक नाही पण त्याचबरोबर त्याने सलग तीन विश्वविजेतेपद स्पर्धा जिंकल्या आहेत हे का सोईस्करपणे विसरलं जातंय? आणि या सर्व स्पर्धांमध्ये दोन्ही खेळाडू तरुण नव्हते हे ही विशेष. मग फक्त कार्लसन मॉडेलिंग करतो आणि तरुण वर्गामध्ये लोकप्रिय आहे म्हणून त्याला रनेसान्स म्हणायचं का? मग आमच्याकडे तर रनेसान्सची आख्खी टीम आहे, आहात कुठे?

    तर आता आनंदची गाठ आहे कार्लसनशी. कार्लसनचा अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे जिद्द. अगदी शेवटापर्यंत निकराने लढत राहून तो प्रतिस्पर्ध्याच्या सहनशक्तीचा अंत बघतो. बरेचदा हा ताण सहन न झाल्यामुळे त्याचे प्रतिस्पर्धी चुका करतात आणि त्याचा फायदा त्याला मिळतो. वेगवेगळ्या ओपनिंगमधून फायदा मिळवण्याचं कसब त्याच्याकडे फारसं नाही – त्याचा भर असतो तो मिडल आणि एंड गेमवर. याउलट ओपनिंगमध्ये सध्या आनंदची गणना जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये व्हावी. आनंदचं बचावतंत्रही भक्कम आहे आणि मुख्य म्हणजे जागतिक विश्वविजेतेस्पर्धांचा भरपूर अनुभव त्याच्याकडे आहे. या सर्वांचा तो पुरेपूर उपयोग करेलच. आणि कार्लसनही पूर्ण तयारीनिशी उतरणार यात शंका नाही. आनंदची टीम ठरलेली आहे, कार्लसन कुणाचं साहाय्य घेतो आहे हे बघणं रोचक ठरावं.

    या स्पर्धेमध्ये कार्लसनचा खेळ म्हणावा तितका चांगला झाला नाही. स्पर्धेच्या पहिल्या भागात त्याने चांगला खेळ केला पण दुसऱ्या भागात तो काही वेळा अडचणीत आला. तुलनेने क्रामनिकचा खेळ बऱ्यापैकी समतोल आणि उच्च दर्जाचा होता. कार्लसन ही स्पर्धा एकहाती जिंकणार असा अंदाज क्रामनिकने सपशेल खोटा ठरवला. शेवटच्या क्षणापर्यंत तो जिंकणार की कार्लसन असा प्रश्न होता. अरोनियनने सुरुवातीला चांगला खेळ केला आणि आघाडी घेतली पण शेवटी ताणाखाली येऊन बऱ्याच चुका केल्या आणि तो चवथ्या क्रमांकावर गेला. तिसरा क्रमांक स्विडलरने पटकावला.

    याखेरीज स्पर्धेत एक वाइल्डकार्ड होतं ते म्हणजे युक्रेनचा व्हॅसिली इव्हानचुक. इव्हानचुक आनंद आणि क्रामनिकच्या पिढीचा. एका वाक्यात सांगायचं तर जिनियस पण उलट्या खोपडीचा माणूस. नुसतं टॅलेंट असेल पण त्याला शिस्तीची जोड नसेल तर काय होतं याचं उत्तम उदाहरण. स्वत:वर नियंत्रण ठेवता आलं असतं तर नक्की विश्वविजेतेपद मिळालं असतं. त्याचा मूड असेल तर मग समोर कास्पारोव्ह असो की आणखी कुणी, खात्मा ठरलेला. मूड नसेल तर इतक्या दळभद्री चुका करतो की ज्याचं नाव ते. बरं, बाकीचे खेळाडू विश्वविजेतेपद, विजय किंवा रॅंकिंग यांच्यासाठी खेळतात, चकीला कशाचीच पर्वा नाही. १९९५ मध्ये एका स्पर्धेत खेळताना साहेबांचा मूड नव्हता म्हणून प्रत्येक गेममध्ये दहा-पंधरा खेळ्या झाल्या की तो बरोबरीचा प्रस्ताव ठेवायचा. समोरचा ‘सुटलो! देवा, तुझे उपकार​ कोणत्या जन्मात आणि कसे फेडू तेवढं कळव’ असं मनातल्या मनात म्हणून प्रस्ताव लगेच स्वीकारायचा. पण बारीव्ह आणि बेलियाव्हस्की लय शाणे, ते म्हनले नाय आम्हाला जित्तायचंच हाय, मंग तेनला धू-धू धुतलं गड्यानं. सगळ्या स्पर्धेत फक्त एक पराभव – क्रामनिककडून. एकदा लिनारेसच्या स्पर्धेत फ्लाइटचे गोंधळ निस्तरताना पोचायला पहाटेचे पाच वाजले. दुपारी स्पर्धा सुरू. पहिला डाव कुणाशी तर खुद्द कास्पारोव्हशी. तरी पठ्ठ्या जिंकला, पाचव्या राउंडमध्ये कार्पोव्हलाही धूळ चारली आणि स्पर्धा जिंकली. गेल्या दहा वर्षात कास्पारोव्हनं स्पर्धा जिंकली नाही असं पहिल्यांदाच झालं.

    असा हा इव्हानचुक किंवा ‘चकी’. लंडनच्या स्पर्धेत त्याच्याबरोबर डाव असलेल्या प्रत्येकाला आज बाबाचा मूड कसा आहे याची धास्ती पडलेली. सुरुवातीला चकीला सूर सापडत नव्हता. प्रत्येक वेळी घड्याळ जिंकायचं, वेळ पुरायचा नाही. राजाबोव्ह, अरोनियन आणि ग्रिश्चुककडून हरला. नवव्या डावात राजाबोव्हला हरवून परतफेड केली. दहाव्या डावात अरोनियनबरोबर खेळताना त्याने चक्क ‘बुडापेस्ट गॅंबिट’ वापरली. हा प्रकार या दर्जाच्या खेळामध्ये कधीही वापरला जात नाही. हा डाव त्यानं अरोनियनला सहजी जिंकू दिला असंही बरेच लोक म्हणाले. त्याचा राग येऊन की काय, बाराव्या डावात त्याने चक्क कार्लसनला हरवलं आणि एकच खळबळ माजली. गेल्या अडीच वर्षांमध्ये कार्लसन कुणाकडूनही हरला नव्हता. या पराभवामुळे क्रामनिक पहिल्या क्रमांकावर आला. अर्थात पुढच्याच डावात कार्लसनने राजाबोव्हला हरवून बरोबरी साधली. शेवटच्या डावात कार्लसन आणि क्रामनिक दोघेही पहिल्या क्रमांकावर होते आणि क्रामनिकचा सामना होता चकीशी. परत चकी फॉर्ममध्ये आला आणि त्याने क्रामनिकलाही हरवलं. संपूर्ण स्पर्धेतील हा क्रामनिकचा एकमेव पराभव. चकीने स्पर्धेच्या दोघाही विजेत्यांना हरवलं!

    नेहमीप्रमाणे भारतीय मिडियाला असं काही चाललं आहे याचा पत्ताही नव्हता. टाइम्स ऑफ इंडिया आणि एक्सप्रेस यांचा अपवाद वगळता साधी बातमीही नाही. त्यातही एक्सप्रेसच्या बातमीत तपशिलाच्या इतक्या चुका – कोणता राउंड कुणी कुणाशी खेळला यासारख्या गोष्टी जाणून घ्यायला आजच्या काळात लंडनला जावं लागत नाही. तुलनेनं पाश्चात्त्य दैनिकांचं कव्हरेज पाहिलं की या भारतभूची आणि आपल्या थोर्थोर वगैरे संस्कृतीची दया यायला लागते. एरवी भारत म्हटलं की मिडियाच्या उड्या पडतात. या पार्श्वभूमीवर ही अनास्था आश्चर्यकारक आहे कारण या स्पर्धेचा विजेता आनंदशी खेळणार आहे.

    —-

    १. ‘बेगानी शादी में अब्दुला दीवाना’ सिंड्रोम. होनुलुलुपासून ग्वाटेमालापर्यंत कुणाचाही, कशाचाही भारतभूशी दूरान्वयानेही संबंध सापडला की “बजाव रे बजाव.”

    एक्झिबिट अ. “सुनीता विल्यमसनं आकाशात सामोसे नेले होते!! धतडं ततडं.” “अहो सामोसे नेऊ द्या नाहीतर वडेवाल्या जोश्यांचं आख्खं दुकान नेऊ द्या. तुम्ही का निपाणी बुद्रुकमध्ये उड्या मारताय?”

    एक्झिबिट ब. हिग्ज बोझॉन सापडला, बोझॉन-बोस-सत्येंद्रनाथ बोस-मेरा भारत महान. धतडं ततडं.

  • गॅरी कास्पारोव्ह आणि बर्लिनची भिंत

    बुद्धिबळ विश्वविजेतेपद स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू स्पर्धेआधी आणि नंतर ढीगभर मुलाखती देतात पण यामध्ये बहुतेक वेळा महत्त्वाचे तपशील उघड केले जात नाहीत. यामागे बरीच कारणे आहेत. एक तर बहुतेक वेळा मुलाखत घेणारे पत्रकार ‘आता कसं वाटतंय?’ यापलीकडे जातच नाहीत. जे थोडे बहुत जातात त्यांना उत्तरे देतानाही दोन्ही खेळाडू सावध असतात. उदा. मागची स्पर्धा जिंकल्यानंतरही कार्लसनने त्याचे सेकंड्स कोण आहेत हे जाहीर केलं नाही कारण या वर्षी त्याला परत स्पर्धा खेळायची आहे. यामुळे होतं काय की बुद्धिबळाची विश्वविजेतेपद स्पर्धा म्हणजे दोन खेळाडू खेळणार आणि त्यातला एक विजयी होणार यापलीकडे याबद्दल फारशी माहिती बाहेर येत नाही. आणि याबाबतीत हिमनग ९/१० पाण्याखाली असण्याची उपमा अगदी सार्थ आहे.

    नेहमी होणाऱ्या स्पर्धा आणि विश्वविजेतेपद स्पर्धा यात अनेक महत्त्वाचे फरक आहेत. विश्वविजेतेपद स्पर्धा एकाच खेळाडूबरोबर असते त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सखोल अभ्यास करता येतो. इथे काही बाबतीत पोकर या खेळाशी साम्य जाणवतं. दोन्ही खेळाडू बुद्धिबळाच्या सर्व ‘ओपनिंग्ज’ कोळून प्यायलेले असतात. मग प्रतिस्पर्ध्याला चकित कसं करणार? प्रतिस्पर्ध्याच्या आवडत्या ओपनिंग्ज कोणत्या आहेत हे लक्षात घेतलं जातं. पण प्रतिस्पर्ध्यानं तुम्ही हे लक्षात घेणार हे लक्षात घेतलेलं असतं. त्यामुळे कदाचित तो पूर्वी कधीही न खेळलेली ओपनिंग खेळू शकतो. किंवा त्याहीपुढे जाऊन तुम्ही तो त्याच्या आवडत्या ओपनिंग्ज खेळणार नाही हे गृहीत धरणार असं गृहीत धरून त्याच्या आवडत्या ओपनिंग्ज खेळूनच तुम्हाला चकित करायचा प्रयत्न करतो. इंग्रजीत ‘कॉलिंग युअर ब्लफ’ नावाचा वाक्प्रचार आहे तो इथे चपखल बसतो. अर्थातच हे फार ढोबळ आणि प्राथमिक अंदाज आहेत. स्पर्धेची तयारी नेमकी कशी होते हे कधीही बाहेर येत नाही. खुद्द खेळाडू किंवा त्यांचे सेकंड्स यांनी याबद्दल लिहिलं तरच हे शक्य होतं आणि हे फारच क्वचित घडतं.

    ९० च्या दशकामध्ये बुद्धिबळ विश्वविजेतेपदाची स्पर्धा पूर्णपणे फिडेच्या नियंत्रणाखाली नव्हती. १९९३ साली कास्पारोव्ह आणि शॉर्ट यांनी फिडेशी काडीमोड घेऊन आपली वेगळी चूल मांडली. त्यावेळी कास्पारोव्ह विश्वविजेता होता. यानंतर फिडे आणि कास्पारोव्ह यांनी स्वतंत्र स्पर्धा घेतल्या त्यामुळे काही काळासाठी बुद्धिबळाच्या जगात एक सोडून दोन विश्वविजेते होते. १९९९ मध्ये कास्पारोव्हने विश्वविजेतेपद स्पर्धेसाठी आनंदशी बोलणी केली. आनंदने १९९५ सालच्या स्पर्धेचा कटू अनुभव लक्षात घेऊन ‘बक्षिसासाठी प्रायोजकांचे पैसे बॅकेत जमा झालेले दाखव’ अशी मागणी केली. नंतर ही बोलणी फिसटकली. २००० साली कास्पारोव्ह आणि क्रामनिक अशी स्पर्धा निश्चित झाली.

    Book cover for From London to Elista

    त्या काळात क्रामनिकचा सेकंड बारीव्ह आणि जवळचा मित्र लेव्हिटॉव्ह यांनी नंतर ‘फ्रॉम लंडन टू एलिस्ता’ हे पुस्तक लिहिलं. पुस्तकात पडद्यामागची तयारी उलगडून दाखवताना बारीव्ह आणि लेव्हिटॉव्ह यांच्या गप्पा दिलेल्या आहेत. शिवाय आवश्यक तिथे क्रामनिक, कास्पारोव्ह आणि इतरांची मतंही मांडलेली आहेत. पुस्तकात प्रत्येक डावाचं अत्यंत खोलात जाऊन विश्लेषण केलं आहे त्यामुळे बुद्धिबळात ज्यांना इतका रस नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक नाही. रस असेल तर स्पर्धेची तयारी किती खोलात जाऊन केली जाते हे बघायला मिळतं. क्रामनिक रोज डाव खेळून आल्यानंतर आज रात्री काय करायचं हे सेकंड्सना सांगत असे. उदा. १४ व्या चालीत राजा सी८ ऐवजी ई८ वर नेला तर काय होईल? सकाळी क्रामनिक उठल्यावर रात्रभर काय काम झालं बघत असे. आधी म्हटल्याप्रमाणे प्रतिस्पर्ध्याला चकित करण्यावर सगळं अवलंबून असतं. सातव्या डावात क्रमनिकच्या ४…ए६ या खेळीमुळे कास्पारोव्ह इतका चक्रावून गेला की त्याने पटकन ११ खेळ्यांतच बरोबरीचा प्रस्ताव मांडला. कास्पारोव्हशी जिंकल्यानंतर क्रामनिकचा पुढचा सामना पीटर लेकोशी झाला. पुस्तकाचा दुसरा भाग यावर आहे. तिसऱ्या भागात २००६ साली झालेल्या टोपोलॉव्हबरोबरच्या सामन्याचं वर्णन आहे.

    विश्वविजेतेपद स्पर्धेची तयारी ज्या पातळीवर केली जाते त्याची कल्पना करणंही अशक्य आहे. जगातील सर्व एलीट ग्रॅडमास्टर्स या स्पर्धेकडे डोळ्यात तेल घालून बघत असतात. याचं मुख्य कारण असं की दोन्ही खेळाडू स्पर्धेसाठी जी तयारी करतात आणि त्यातून ज्या नवीन चाली उघड होतात त्यातून इतर खेळाडूंना बरंच शिकायला मिळतं. हे एक प्रकारे बुद्धिबळाच्या क्षेत्रात नवीन संशोधन प्रकाशित करण्यासारखं असतं. बरेचदा विश्वचषक स्पर्धेत वापरल्या गेलेल्या नवीन चाली नंतर काही काळ प्रामुख्याने वापरल्या जातात. स्पर्धेची तयारी चालू असताना क्रामनिकचा दिनक्रम काहीसा असा होता. सकाळी ९ ला उठायचं, १० ला नाश्ता, ११ ते १ सराव, १ ते २ समुद्रावर फिरायला जाणं, २.३० जेवण, ३ ते ४ वामकुक्षी, ४ ते ८ सराव, ८ ते ९ जेवण, ९ ते पहाटे ३ सराव.

    पहिल्या डावात कास्पारोव्हकडे पांढरे मोहरे होते. त्याने १. ई४ ही त्याची आवडती खेळी केली. यातून त्याची प्रतिस्पर्ध्यावर सुरुवातीलाच वर्चस्व गाजवण्याची मनीषा स्पष्ट झाली. डावातील पुढील खेळ्या अशा होत्या. १. ई४ ई५ २. घो एफ ३ घो सी ६ ३. उं बी ५ घो एफ ६ क्रामनिकने ३…घो एफ ६ ही खेळी केल्याबरोबर कास्पारोव्हने चमकून क्रामनिककडे बघितलं, किंचित हसला आणि मान हालवली. ही खेळी रॉय लोपेझ या प्रकारातील बर्लिन बचाव या उपप्रकारात येते. बर्लिन बचाव १९ व्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला खेळला जात असे. नंतर उच्च दर्जाच्या स्पर्धांमध्ये हा जवळजवळ दिसेनासाच झाला. क्रामनिकने ही खेळी केल्यावर त्याने कसून तयारी केली आहे हे कास्पारोव्हच्या लक्षात आलं. त्या काळात बर्लिन बचाव काहीसा खालच्या दर्जाचा मानला जात असे. हा खेळल्यावर काळ्याला बचाव करायला फारसा वाव नाही असं बहुतेकांचं मत होतं. नंतर कास्पारोव्हने उघड केलं की त्याच्या टीमने पेट्रॉव्ह बचावाची तयारी केली होती, त्यांना बर्लिन बचावाची अजिबात अपेक्षा नव्हती. हा डाव बरोबरीत सुटला पण पुढच्या डावात मात्र काळ्याकडून खेळताना कास्पारोव्हने चूक केली आणि डाव गमावला. नंतर काळ्या बाजूने खेळताना क्रामनिकने बर्लिन बचावाचा पुरेपूर उपयोग केला. शेवटापर्यंत कास्पारोव्हला ही बर्लिनची भिंत भेदता आली नाही. तिसऱ्या डावानंतर कास्पारोव्ह आणि टीमच्या लक्षात आलं की बर्लिन बचाव क्रामनिकचं मुख्य अस्त्र आणि मग त्यांनी यावर तयारी सुरू केली, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. आता क्रामनिक एका गुणाने आघाडीवर होता. बाकीचे सर्व डाव बरोबरीत सुटले असते तर त्याला विजेतेपद मिळालं असतं.

    पाचव्या डावाआधी क्रामनिकच्या हेरांनी बातमी आणली की आज कास्पारोव्ह टॉयलेटबद्दल खुसपट काढून तमाशा करणार आहे आणि तसंच घडलं. कास्पारोव्हने मागणी केली की क्रामनिक टॉयलेटला जाताना एक गार्ड बरोबर हवा आणि त्याने दार संपूर्ण लवता कामा नये. क्रामनिकने मागणी मान्य केली पण कास्पारोव्हलाही हे लागू होणार असेल तरच. या सर्वामुळे फारसा फरक पडला नाही. मानसिक दबाव टाकण्याचा कास्पारोव्हचा प्रयत्न फुकट गेला. दहाव्या डावात कास्पारोव्ह परत एकदा हरला. क्रामनिकची आघाडी दोन गुणांची झाली. तेराव्या डावानंतर क्रामनिक परत जात असताना पाच दारुड्यांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. क्रामनिकने जीव वाचवून पळ काढला. नंतर एका सिक्युरिटी गार्डची सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली. स्पर्धेत अनेकदा संधी मिळूनही कास्पारोव्ह तिचं विजयात रूपांतर करू शकला नाही. मागच्या वर्षी आनंदची जी अवस्था झाली होती तशी अवस्था त्याचीही होती.

    या स्पर्धेनंतर बर्लिन बचावाला पुनरुज्जीवन मिळालं. मागच्या विश्वचषक स्पर्धेतही याचा वापर करण्यात आला. पांढऱ्याच्या ई ४ ला भक्कम बचाव म्हणून आज बर्लिन बचाव लोकप्रिय आहे.