Categories
भाषा

मराठी भाषेला अभिजात दर्जा 

३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्रीय मंत्री मा. श्री अश्विनी वैष्णव जी यांनी पाच भाषांना अभिजात दर्जा जाहीर​ केला. यात मराठीचा समावेश होता. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली घेतला गेलेला हा निर्णय सर्व मराठी भाषकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या संदर्भात मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार जी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. तसेच गेली दहा वर्षे या संदर्भात अनेक साहित्यिक, अभ्यासक आणि इतर मान्यवर व्यक्तींनी यासाठी योगदान दिले आहे. या सर्वांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. 

भाषेच्या संदर्भात मोदीजींच्या सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत​. मातृभाषेतून विज्ञान विषयांचे शिक्षण देणे, कोर्टाच्या निकालांमध्ये महत्त्वाचे भाग मातृभाषेत अनुवादित करणे इ. मराठीला अभिजात दर्जा मिळणे ही या संदर्भात एक महत्त्वाची पायरी आहे. आता सर्व विद्यालयांमध्ये मराठीचा अभ्यास सुरू होईल​. मराठीच्या विकासासाठी मिळणाऱ्या निधीचा उपयोग मराठीच्या विकासासाठी केला जाईल​. मराठी भाषेतील उत्तम साहित्यकृती इतर भाषांमध्ये अनुवादित करता येतील​.

या संदर्भात एका मुद्द्याकडे लक्ष वेधावेसे वाटते. हा मुद्दा या संदर्भात जितके लेख वाचले त्यामध्ये कुठेही आलेला नाही. 

साधारण २००७-८ साली देवनागरी टायपिंग लोकप्रिय व्हायला लागलं. त्यानंतर अनेक हौशी लेखकांनी ब्लॉग लिहायला सुरूवात केली. दुर्दैवाने हा उत्साह काही वर्षेच टिकला. त्याचबरोबर मराठीतील व्यावसायिक लेखक, शास्त्रज्ञ​, विचारवंत, अभिनेते, दिग्दर्शक या माध्यमाकडे वळलेच नाहीत​. (आज दुर्गाबाई किंवा शांताबाई असत्या तर त्यांनी नक्की हे माध्यम स्वीकारलं असतं अशी चुटपूट मनाला लागून जाते. दुर्गाबाईंचं  ‘दुपानी’ हे पुस्तक म्हणजे त्या काळातला ब्लॉगच आहे.) ब्लॉग एक असं माध्यम आहे जिथे संपादक आणि प्रकाशक यांच्या मान्यतेची गरज न लागता थेट वाचकांपर्यंत पोचता येतं. आजही पुस्तक प्रसिद्ध करणे हीच मराठी लेखकांची सर्वोच्च महत्त्वाकांक्षा आहे त्यामुळे हे माध्यम पूर्णपणे दुर्लक्षिलं गेलं. बरं, जे हौशी लेखक उत्साहाने लिहीत होते, ते फेसबुक किंवा इतर माध्यमांवर लेख टाकू लागले. फेसबुकवर तत्काळ लाइक्स मिळायच्या पण दोन दिवसात तो लेख गर्दीत हरवून जायचा. याउलट स्वत​:चा ब्लॉग असला तर तिथे पाच​-पाच वर्षे जुने लेखही वाचले जातात​. या मार्गात तत्काळ परतावा मिळत नाही पण जर एखाद्या लेखकाला आपली स्वतंत्र ओळख निर्माण करायची असेल तर ब्लॉगहून उत्तम मार्ग नाही.

आता तुम्ही म्हणाल हा प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा विषय आहे. ज्याला जिथे लिहावसं वाटतं त्याने तिथे लिहावं. याचा आणि मराठीच्या विकासाचा काय संबंध​? संबंध आहे आणि तो महत्त्वाचा आहे. वर दिलेल्या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम असा झाला की आज इंटरनेटवर मराठीमध्ये फार कमी माहिती उपलब्ध आहे. (फेसबुकवर टाकलेल्या पोष्टी शोध घेताना सापडतीलच असं नाही. त्यात पोस्ट कशी शेअर केली आहे, तिच्या प्रायव्हसी सेटींग्ज काय आहेत इ. ब​ऱ्याच भानगडी आहेत​.)

गूगल​, बिंग किंवा च्याटजीपीटीवर एकच गोष्ट इंग्रजी आणि मराठीत शोधून बघा, फरक चटकन लक्षात येईल​. म्हणून मराठीतून शोध घेणाऱ्या विद्यार्थ्याला इंग्रजीतून शोध घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या तुलनेत फार कमी माहिती उपलब्ध आहे.

यावर काय उपाय करता येईल​ हा एक​ गहन प्रश्न आहे. शासन निधी देईल​, सुविधा देईल​, पण नेटवर मराठीतून सकस लिखाण करण्याची जबाबदारी मराठी माणसांचीच आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यावर अधिकाधिक लेखक इंटरनेटवर सक्रिय होतील अशी आशा आहे.

माय मराठीचा सन्मान केल्याबद्दल पुनश्च पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी आणि केंद्रिय मंत्रीमंडळाचे अनेकानेक आभार​. 

Categories
भाषा

श्री चावुण्डराजे करवियले

रोमच्या कलोसियमजवळ उत्खनन करताना एक व्याकरणाचं हस्तलिखित सापडलं. याचा काळ अंदाजे इ. स. ३०० च्या आसपास असावा. यात एका भाषाशिक्षकाने त्याच्या विद्यार्थ्याच्या चुका दुरूस्त केल्या आहेत. त्या काळात लॅटीन ही राजभाषा होती. सगळे अधिकृत व्यवहार लॅटीनमधून चालायचे, पण रोजच्या संभाषणात ही कुठलीही सुरकुती न पडू देणारी भाषा कामाची नव्हती. त्यासाठी लोक लॅटीनची वेगवेगळी भ्रष्ट रूपे वापरत असत. त्या विद्यार्थ्याने शब्दांची त्या काळी भ्रष्ट समजली जाणारी रूपे लिहीली होती आणि शिक्षकाने त्यावर काट मारून त्या शब्दांचे शुद्ध लॅटीन रूप लिहीले होते. हजार-बाराशे वर्षानंतर इटालियन भाषा अस्तित्वात आली तेव्हा विद्यार्थ्याने लिहीलेले शब्द अधिकृत झाले होते आणि शिक्षकाची लॅटीन भाषा लयाला जाण्याच्या मार्गावर होती.

हे आठवायचं कारण म्हणजे नुकतेच मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने काही लेख वाचले. दरवर्षी पावसाळा येतो तसंच नित्यनेमाने मराठी कशी धोक्यात आहे यावर लेखही येत असतात. लेखकाच्या आवडीनुसार हा धोका ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट या पातळीमध्ये कुठेतरी असतो. लेख मराठी कशी भ्रष्ट होते आहे, तिची दैन्यावस्था वगैरे नेहेमीच्याच चीजा वेगवेगळ्या सुरांमध्ये आळवणारे होते. इथे लेखकांशी काही प्रमाणात सहमत आहे. म्हणजे किमान वृत्तपत्रांमध्ये निर्दोष मराठी वाचायला मिळावं ही माफक अपेक्षा आहे. लेखक आणि संपादक भाषेच्या बाबतीत अधिक काटेकोर असायला हवेत. दुध, केशवसूत अशा चुका टाळायला हव्यात.

पण याचबरोबर मराठीचं बदलतं रूपही लक्षात घ्यायला हवं. पूर्वी सर्व इंग्रजी शब्द हद्दपार केले पाहीजेत असं म्हणणारे भाषारक्षक आता जरा मवाळ होत आहेत असं वाटतय. इंग्रजी शब्द चालतील, पण त्यांना मराठीचे नियम लागू पडत असतील तरच असा वेगळा वाटणारा पवित्रा काही लोक घेतात. अर्थात नंतरच्याच वाक्यात मराठीत परकीय शब्दांची भेसळ फार वाढली आहे आणि त्यामुळं मराठी भ्रष्ट होते आहे असं म्हणून समतोल साधला जातो. खरी गोम अशी आहे की इंग्रजी शब्दांसाठी संस्कृतमधून आणलेले प्रतिशब्द ज्याने तयार केले आहेत ते त्याच्याव्यतिरिक्त कुणीच वापरायला तयार नाही. काही दिवसांनी त्याला स्वत:लाही कंटाळा येतो. सारखं-सारखं भ्रमणध्वनी, कार्यालय किंवा उपाहारगृह कोण म्हणणार? प्रतिशब्द तयार करणं फार सोपं आहे, ते लोकांना वापरायला लावणं दहा-बारा मांजरांना एका रांगेत आणण्याइतकं अवघड आहे.

भाषा हे साधन आहे, साध्य नव्हे. भाषा जपायला हवी पण याचा अर्थ तिला राजपुत्र सिद्धार्थाप्रमाणे कोणत्याही दु:खी अनुभवापासून दूर ठेवायचं असा नाही. असं केलं तर भाषा कृत्रिम, तकलादू होते, तिचा आत्मा हरवतो. भाषेला संस्कृतीशिवाय वेगळं अस्तित्व नाही, भाषा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पण याचा परिणाम म्हणजे संस्कृती जशी बदलते तशी भाषाही बदलत जाते. मराठी आणि जगातील इतर सर्व भाषा बदलत आहेत आणि बदलत राहणार. त्यांच्यावर इतर भाषांचे अधिकाधिक प्रभाव पडत जातील. या संक्रमणातून जी तावून सुलाखून निघते त्या भाषेला आपला लहेजा असतो. त्यातून जी भाषा तगेल ते तिचे तत्कालीन स्वरूप. बाकी सगळं बदलत असताना भाषा तशीच राहील अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे.

इथे एक मूलभूत गैरसमज असावा असं वाटतं तो म्हणजे मोठमोठे भाषातज्ज्ञ, पंडित भाषेचे नियम ठरवतील आणि जनता निमूटपणे ते नियम पाळेल. असं झाल्याचं उदाहरण इतिहासात कुठेही सापडत नाही. जे घडतं ते नेमकं उलट असतं. जनता भाषा वापरते, तिला वेगवेगळी वळणे देते, तिच्यात वैविध्य आणते आणि भाषेचे अभ्यासक ते नियम संकलित करून त्याला व्याकरण म्हणतात. म्हणूनच प्रत्येक भाषेला तिची स्वत:ची अशी वैशिष्ट्ये असतात. यातूनच कोणतेही नियम नसताना प्रत्येक वस्तूला ती, तो, ते म्हणण्याचा प्रघात पडतो किंवा बहुतेक सर्व क्रियापदांची रूपं नियमानुसार वागत नाहीत. भाषा कवायत करणार्‍या सैनिकांप्रमाणे शिस्तीत वागत नाही, तिला मनसोक्त हुंदडायला आवडतं.

एखाद्या व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे भाषेत आमूलाग्र बदल होतच नाहीत असं नाही. पण ती व्यक्ती शेक्सपियर, दान्ते किंवा तुकाराम असावी लागते. यातही महत्वाचा मुद्दा असा की या सर्वांचा मूळ हेतू भाषेची समृद्धी नव्हता. त्यांना सखोल आशय असलेलं काहीतरी सांगायचं होत, त्यासाठी त्यांनी आपली भाषा निवडली. हे व्यक्त करण्यासाठी जिथे ती भाषा तोकडी पडत होती तिथे तिला नवीन आधार दिले, नवीन शब्द बनवले. या लोकांनी हजारांनी वाक्प्रचार तयार केले आणि ते आजही वापरात आहेत. का? कारण त्या वाक्प्रचारांच्या माध्यमातून त्यांनी जे व्यक्त केलं ते जनतेला विसरणं अशक्य झालं. फॅक्टरीमधून निघावेत तसे किलोकिलोनी नुसते नवीन शब्द तयार करायचे पण त्यातून व्हॅलेंटाइन डेच्या कविता आणि विडंबनं यापलिकडे काही निघणार नसेल तर असे शब्द आणि त्यामागचा आशय कुणाच्या लक्षात राहणार? भाषा बदलायची असेल तर त्यासाठी प्रतिभावंत कवी हवेत, पण असे प्रतिभावंत तयार करता येत नाहीत. फार फार तर ते तयार होतील असं वातावरण बनवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मराठीत गेल्या पन्नास वर्षात नवीन शब्दकोष झालेला नाही. नवीन शब्दांची भर घालून शब्दकोष अद्ययावत ठेवणं ही जबाबदारी जे पंडित भाषा बुडाली असं सतत ओरडत असतात त्यांची आहे.

जगातील सर्व भाषांमध्ये परकीय आक्रमण होतय म्हणून आरडाओरड चालू आहे. फ्रेंच मध्ये इंग्रजी शब्द, इंग्रजी आणि चिनी भाषेमधून तयार झालेलं चिंग्लीश. फ्रेंचवरून आठवलं, प्रत्येक वेळी मराठीची दुर्दशा सांगताना तिची तुलना फ्रेंच किंवा जपानी लोकांच्या भाषाप्रेमाशी केली जाते. “फ्रेंच बघा आपल्या भाषेवर किती प्रेम करतात नाहीतर आपण!” हा मराठीवर अन्याय आहे. फ्रेंच एका देशाची भाषा आहे. तिच्यामागे त्या देशाची संपत्ती, कित्येक शतके चालत आलेल्या साम्राज्याची ताकद आहे. फ्रेंच माणसाला जन्मल्यापासून मरेपर्यंत दुसरी कोणतीही भाषा आली नाही तरी त्याच्या देशात त्याचे काही बिघडत नाही. याउलट भारतात कुठेही जन्माला आलात तर किमान तीन भाषा शिकाव्याच लागतात, आणि कानावर किमान पाच-सहा भाषा नक्कीच पडतात. मराठी ही प्रादेशिक भाषा आहे, राष्ट्रीय भाषा नव्हे. तिला २२ अधिकृत आणि कित्येकशे बोलीभाषांच्या सहवासात रहावं लागत आहे. त्यांचा परिणाम तिच्यावर होणारच. महाराष्ट्राची तुलना फ्रान्सशी न करता भारताची तुलना युरोपशी करायला हवी.

लेखाच्या सुरूवातीला जे उदाहरण आलं त्याचा शेवट रोचक आहे. तेराव्या शतकापर्यंत इटालियन भाषेला स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. वेगवेगळ्या भागांमध्ये बोलल्या जाणार्‍या गावंढळ बोलीभाषा घरादारात वापरताना सगळेच वापरायचे पण साहित्य, कला किंवा अधिकृत व्यवहारांमध्ये लॅटीन श्रेष्ठ मानली जायची, तिथे या बोलीभाषांना प्रवेश नव्हता. तेराव्या शतकात दांते अलिगिएरीच्या रूपाने इटालियन भाषेला तिचा तारणहार मिळाला. ‘ला कॉमेदिया’ लिहीण्यासाठी दांतेनं लॅटीन न वापरता मध्य इटलीच्या तोस्कानी भागात बोलल्या जाणार्‍या बोलीभाषेची निवड केली. या भाषेला त्यानं इटालियन असं नाव दिलं. ला कॉमेदिया प्रकाशित झाल्यावर इटालियन लोक या महाकाव्याने वेडे झाले. ज्याच्या त्याच्या तोंडी दांतेच्या ओळी होत्या. इटालियन लोकांना त्यांची स्वत:ची अशी ओळख मिळण्यामध्ये कॉमेदियाचा महत्वाचा वाटा आहे. आजही कोणत्याही इटालियन माणसाला दांतेची पानेच्या पाने पाठ असतात. त्याचा वाक्प्रचार ऐकू आला नाही असा दिवस इटलीमध्ये काढणं अशक्य. रॉबेर्तो बेनिन्यीने केलेली कॉमेदियाची वाचने आजही हाउसफुल असतात.

मला मराठी लई आवडते. (आवडत नसती तर इथे इतकं खरडलं असतं का?) पण ती जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे किंवा ती बोलतो म्हणून मी सुदैवी असं मला वाटत नाही. बंगाली, उर्दू, इटालियन, जपानी, पंजाबी, मालवणी मला तितक्याच आवडतात. त्या मातृभाषा असत्या तरी हरकत नव्हती. ‘सारे जहां से अच्छा’ पटत नाही ते अशासाठी की ते खरं नाही. आपलीच रेघ सर्वात मोठी असं दाखवणं निदान आजच्या जगात तरी कालबाह्य मानलं जावं अशी अपेक्षा आहे.

—-

१. श्रवणबेळगोळ येथील हा शिलालेख मराठीतील पहिला शिलालेख आहे (इ. स. १११६-१७) असं मानलं जात होतं. अक्षी इथे सापडलेला इ. स. १०१२ मधला शिलालेख आता पहिला मानला जातो.

Categories
भाषा

केम छो? मजा मां

मला शब्द निरखायचा छंद आहे . एखादा शब्द अचानक समोर येतो, त्याला वेगवेगळ्या बाजूंनी बघितलं की त्याचे अनेक पदर उलगडत जातात. इतर भाषांबाबत हे सहजपणे होतं कारण नवीन भाषा शिकताना बरेच शब्द परिचित नसतात. पण मराठीच्या बाबतीत काही कळायच्या आतच शब्दांशी मैत्री झाली होती त्यामुळे मराठी शब्दांचं वेगळेपण कळायला त्या शब्दांकडे थोडं लांब उभा राहून, अलिप्तपणे बघावं लागतं.

असाच एक शब्द आहे मजा. एक ‘म’ आणि एक ‘जा’. या दोन अक्षरांमध्ये कितीतरी अर्थ भरले आहेत. जवळून पाहिलं तर विचित्र वाटतो, पण हे तर काहीच नाही. जेव्हा आपण मजा वापरतो तेव्हा खरी मजा येते. पहिली गोष्ट म्हणजे मजा नेहेमी येते किंवा जाते. ती जेव्हा येत असते तेव्हा ती येतच राहते, मग काहीतरी होतं आणि सगळी मजा जाते. ही कुठून येते आणि कुठे जाते तिलाच ठाउक. मग दुसर्‍या दिवशी लोक विचारतात ‘मजा आली का?’ जेव्हा लोकांना तिच्या येण्याची अपेक्षा किंवा खात्री असते तेव्हा ते इतरांना म्हणतात, “चल ना, मजा येईल.” कधीकधी मजा लुटताही येते.

पण ही नुसती प्रवासातच असते असं नाही. जेव्हा ती येते तेव्हा लोक मजा करतात. ”लॉंग विकेंडेना, मजा करा लेको.” आणि जे लोक नेहेमी अशी मजा करतात ते मजेत असतात, पण मजेदार किंवा मजेशीर मात्र असू किंवा नसू शकतात. लोकांना ही विशेषणं लागली की थोडी वेगळीच मजा होते. यांचा अर्थ किंचित स्क्रू ढिला किंवा विचित्र स्वभाव असाही होऊ शकतो, “आमचा बॉस ना, मजेशीर प्राणीये एकदम.” म्हणजे बॉस विनोदीही असू शकतो किंवा ज्याचा मोबाईल नेहेमी मिटिंगमध्ये वाजतो असाही असू शकतो. आणि कुणीच मजा न करताही ती आली तर ती होते. लहान मुलांच्या आयुष्यात ही नेहेमी होते पण तेव्हा तिला आणखी एक ज लागतो, “आज किनई शाळेत मज्जाच झाली.” काही लोक मजेचं स्त्रीलिंगी रूप स्वीकारत नाहीत. त्यांना ‘मझा’ येतो. हा मझा म्हणजे आपल्या मजेचा गंभीर काका वगैरे वाटतो. मजा म्हणजे मिलीमधली जया असेल तर मझा म्हणजे गोलमालमधला उत्पल दत्त. बराच शिस्तशीर आहे. मजा गल्लीबोळात कुठेही हुंदडते, हा मझा येतो पण जाताना फारसा दिसत नाही आणि करता येतो की नाही याबद्दल शंका आहे. फक्त बिचारा नेमाने येत राहतो. मझा वापरण्यात तेवढी मजा येत नाही.

मजा फक्त मराठीत आहे असं नाही. मात्र हिंदीत गेल्यानंतर जांबुवंताचा ‘ज’ जाऊन जहाजाचा ‘ज’ येतो . हिंदीतही मजे लेना, मजे करना, मजे होना, मजे लूटना अशी रूपे आहेत. “जाडों में गर्म चाय की चुस्कीयों के मजे लूटो.” हिंदीत मजेदार बर्‍याच अर्थी वापरला जातो – रोचक, वैविध्यपूर्ण, विनोदी – मजेदार चुटकुले, मजेदार किस्से. मात्र ‘पकोडे बहोत मजेदार बने है’ इथे मजेदारचा अर्थ स्वादिष्ट. जी गोष्ट मजेदार असते तीच मजेकी बातही असते. “मजे की बात यह है की..” अशी वाक्याची सुरूवात बरेचदा दिसते. मजा गुजराथीतही आहे पण तिकडे फारसा वशिला नसल्याने “केम छो? मजा मां” च्या पुढे गाडी जात नाही.

शब्द कसे तयार होतात आणि रूळतात हे बरेचदा कोडंच असतं. “टू ऍंड अ हाफ मेन” मालिकेत सात-आठ वर्षांच्या जेकला शाळेत शिक्षिकेला मधलं बोट दाखवल्याबद्दल शिक्षा होते. तो बापाला बाकीची बोटं दाखवतो आणि विचारतो, “फिल एनीथिंग?” बाप नकारार्थी मान हलवतो. जेक मधल्या बोटाकडे बघतो आणि म्हणतो, “आय डोंट गेट इट. हू डिसाइड्स?” मजासारखे शब्द भेटले की मला नेहेमी असाच प्रश्न पडतो. मजा येते आणि जाते, चालत, पळत किंवा धावत का नाही? हू डिसाइड्स? भाषाशास्त्रामध्ये याची उत्तरं मिळणं अपेक्षित असतं आणि मिळत असतीलही. पण भाषाशास्त्रातले निबंध इतके क्लिष्ट असतात की आमच्यासारख्या पामरांना त्याचा काहीच उपयोग नाही.

स्वत:च्या ब्लॉगवर काही खरडलं तरी चालतं. अपनी गली में टॉमी भी शेर होता है. हे शाळेत लिहीलं असतं तर शिक्षकांनी कान पकडून विचारलं असतं, “निबंध लिहायला सांगितला होता ना? हे काय लिहीलय? अभ्यास म्हणजे काय मजा वाटते का तुला?”

———————

१. चांगला संवादलेखक असेल तर चित्रपट बघताना हे आपोआप होतं. हृषिदांच्या चुपके-चुपके मध्ये गुलजारने ‘परिमल तो तुम्हारा बहोत दोस्त है’ अशी वाक्यरचना वापरली आहे. ‘परिमल और तुम्हारी बहोत दोस्ती है’ असं पुस्तकी वाक्य न टाकता ‘बहोत दोस्त है’ असं म्हटल्यावर त्याला एक वेगळाच टच येतो. या चित्रपटातले बरेच संवाद मस्त आहेत. उदा. “मुझे बॉटनी का बी तक नही आता. कहीं किसी ने पूछ लिया के तितली फूल पर क्यों बैठती है तो क्या जवाब दूंगा?”

२. याचं एक वेगळं रूप म्हणजे कट्ट्यावरचे लोक ऐश करतात. ऐश करता येते किंवा होते.

३. पहिल्यांदा दिल्लीला गेलो तेव्हा एक मुख्य आकर्षण हे होतं की मनसोक्त हिंदी ऐकायला आणि बोलायला मिळेल आणि तसं झालंही. भाषा मनसोक्त ऐकण्यात एक वेगळंच सुख असतं.

Categories
बुके वाचिते भाषा

… आणि हॅरी पॉटर मेला.

पुस्तकांच्या दुकानात हॅरी पॉटरचा मराठी अनुवाद दिसला, उत्सुकतेने चाळायला घेतला आणि “जमीन फटने लगी, आसमान टूट पडा और हमारी आंखों के आगे अंधेरा छाने लगा.” असे व्हायचे कारण म्हणजे पुस्तक चाळताना आम्ही जे पान उघडले त्या पानावर नेमका हॅरी आणि व्होल्डेमॉर्ट यांच्यातील अंतिम सामना होता. व्होल्डेमॉर्ट हॅरीवर नेम धरतो आणि ओरडतो, “मृत्युदंश!”

मृत्युदंश?मृत्युदंश?? हॅरीला त्याच्या आईच्या प्रेमाने संरक्षण दिले होते, पण त्याने जर हा शाप ऐकला असता तर बिचारा जागीच हाय खाऊन आईला भेटायला गेला असता. मृत्युदंश?

अनुवाद करणारा किंवा करणारी यांच्यावरची जबाबदारी फार महत्वाची आणि नाजुक असते. मूळ कथेतील गाभ्याला कोणताही धक्का न लागू देता, त्या कथेतील संवाद आणि वर्णन आपल्या भाषेत आणायचे असते. इथे प्रत्येक तपशिलाचे रूपांतर करायचे किंवा नाही हा निर्णय क्रिकेटमधील नो बॉलप्रमाणे असतो. पाय थोडा पुढे गेला तर चालून जाते पण अर्ध्याहून अधिक पुढे गेला तर चालत नाही. मृत्युदंश हा सरळसरळ नो बॉल आहे.

हॅरी राहतो लंडनमध्ये, बोलतो इंग्रजी आणि शाप देताना मात्र त्याच्या तोंडून संस्कृत शापवाणी बाहेर पडते? हे काय लॉजिक आहे? हॅरी पॉटरमधील मंत्र हे त्या कथानाकाचे अविभाज्य भाग आहेत. ते बदलणार असाल तर मग पुढे जाऊन हॅरी पॉटरचे हरी पाठक करा, त्याला मुंबईत आणा, दादरच्या शाळेत घाला (अभिनव जादूविद्यालय?), व्होल्डेमॉर्टचे विक्राळ विंचू (छकुला..छकुला..छकुला!) करा, त्याला धारावीमध्ये टाका. वाटच लावायची आहे तर सगळीच लावून टाका.

मृत्युदंश हे ज्याचे रूपांतर आहे तो मूळ शाप अव्हादा केदाव्रा (Avada Kedavra) असा आहे. याचे मूळ आरेमैक भाषेत आहे. हॅरी पॉटरमधील मंत्रांची यादी बघितली तर रिड्डीक्युलस हा एकमेव मंत्र इंग्रजीमध्ये आहे. बाकी बहुतेक सर्व मंत्र लॅटीन किंवा इटालियन भाषांमधून घेतलेले आहेत. फिनिते इनकंटाटम, इंपेडिमेंटा, प्रोतेगो, एक्सपेलियार्मस. रोलिंगबाईंनी असे का बरे केले असेल? त्यांना इंग्रजी भाषेत मंत्र तयार करणे अवघड होते का?

रोलिंगबाईंनी असे केले याचे कारण त्यांची विविध भाषांची जाण सखोल आहे.

इंडो-युरोपियन भाषांमध्ये लॅटीनमधून आलेल्या रोमान्स भाषा (इटालियन, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीझ, रोमानियन आणि कातालान या मुख्य भाषा) आणि जर्मेनिक भाषा (इंग्रजी, जर्मन, स्विडीश, डॅनिश) असे दोन प्रमुख गट पडतात. या दोन गटात अनेक फरक आहेत, त्यातील एक महत्वाचा फरक म्हणजे रोमान्स भाषा, विशेषत: इटालियनमध्ये प्रत्येक शब्दात स्वरांची रेलचेल आहे. ‘के सरा सरा’ गाताना स्वर कितीही वेळ लांबवता येतो. ऑपेराचा जन्म इटलीमध्ये झाला हा अपघात नव्हता, त्याला इटालियन भाषेचा मधुर स्वभाव कारणीभूत होता. याउलट जर्मनसारख्या भाषेत व्यंजनांचा सुळसुळाट आणि तीही इंग्रजीत ज्याला ‘हार्ड’ म्हणतात तशी कठीण व्यंजने. यामुळे जर्मन भाषेत स्वर लांबवता येणे शक्यच नाही, ही खटक्यांची भाषा आहे. परिणामत: जेव्हा जर्मन लोकांनी इटालियन ऑपेरा आपल्या मातृभाषेत नेला तेव्हा त्यांना ते करताना मूलभूत बदल करावे लागले. इटालियन ऑपेरा गाणी आणि गायक यांच्यावर विसंबून असतो, जर्मन ऑपेरामध्ये ते शक्य नव्हते म्हणून वाद्यवृंदाला अधिक महत्व प्राप्त झाले. मोझार्ट आणि वॅग्नर यांच्या ऑपेरांमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे त्याचे मूळ या दोन भाषांच्या वेगळ्या स्वभावामध्ये आहे.

जर्मन लोकांनी इटालियन ऑपेराची नक्कल करून त्यांच्या ऑपेरात तसेच गायचे ठरवले असते तर काय झाले असते? त्यांचा मृत्युदंश झाला असता. अव्हादा केदाव्रा या दोन्ही शब्दांचा शेवट आ मध्ये होतो. म्हणून व्होल्डेमॉर्ट ‘अव्हादाsssss केदाव्राsssss’ असे ओरडतो तेव्हा त्याला शेवटचा आ कितीही वेळ लांबवता येतो. ज्याच्यावर कोणताही उपाय नाही असा शाप म्हणायची पद्धतही तितकीच प्रभावी असायला हवी. असे ‘मृत्युदंश’मध्ये करून बघा करता येते का? एकतर या शब्दामध्ये कठीण व्यंजने आहेत, स्वरांचा पत्ता नाही आणि शेवटचा श संपला की पुढे काही नाही. हा शाप न वाटता रेलवे स्टेशनवर ‘दोन दादर’ असे म्हटल्यासारखे वाटते. इतर शापांची काय वाट लावली आहे हे बघण्याचे धैर्य झाले नाही हे इथे नमूद करावेसे वाटते.

नवीन शब्द शोधताना संस्कृतकडे धावणे या अगम्य सवयीची परिणिती मृत्युदंशमध्ये झाली आहे. आपली भाषा म्हणजे २४ क्यारट सोन्यासारखी शुद्ध, त्यात परकीय शब्द म्हणजे भेसळ असे समज जोपर्यंत कायम आहेत तोपर्यंत असेच होत रहाणार. खरे तर संपूर्णपणे लोकशाही पद्धतीने चालणार्‍या ज्या काही थोड्या पद्धती अस्तित्वात आहेत त्यात भाषा येतात. मारून मुटकून भाषेचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे एकही उदाहरण इतिहासात नाही. १९८४ सारखे ‘थॉट पोलिस’ असतील तर गोष्ट वेगळी पण प्रत्यक्षात असेही प्रयत्न टिकत नाहीत हे १९९१ मध्ये दिसलेच.

शेक्सपियर किंवा तुकाराम यांनी भाषेला भरपूर दिले, समृद्ध केले पण हे करताना त्यांचा हेतू भाषा सुधारणे हा नव्हता. त्यांनी भाषा हे संवादाचे एक माध्यम आहे हे जाणले आणि त्यात गरज पडली तसे बदल केले. ते करण्याची प्रतिभा त्यांच्याकडे होती. एका भाषेतील शब्दा-शब्दामागे त्या समाजाचे आर्थिक, सामाजिक, नैतिक संचित उभे असते. लोकांमुळे भाषा घडते, हस्तिदंती मनोर्‍यात बसून तिचे स्वरूप कसे असावे हे ठरवणारे पंडित भाषेचे स्वरूप ठरवत नाहीत, ठरवू शकत नाहीत. म्हणूनच प्रत्येक भाषेच्या व्याकरणाच्या नियमांमध्ये अपवादच जास्त असतात. ‘यू वॉज’ न होता ‘यू वेअर’ होते. लोक जशी भाषा वापरतात तसे व्याकरणाला बदलावे लागते आणि यामुळेच प्रत्येक भाषेला तिचा स्वभाव येतो. नाहीतर कोबोलपासून जावापर्यंत दिले ते काम चोख करणार्‍या भाषा आहेतच की. पण त्या भाषांमध्ये ‘जब कि तुझ बिन कोई नही मौजूद, फिर ये हंगामा ऐ खुदा क्या है?’ लिहीता येईल का? भाषा प्रवाही असते. नायगाराला (किंवा तेवढेही परकीय उदाहरण नको असेल तर गंगा) बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला तर बांध फोडून तो कुठूनही बाहेर पडतो.

हॅरी पॉटर कधी मेला या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘मृत्युदंश ऐकल्यावर.’

—-

तळटीपा

[१] गेल्या हजार वर्षात इंग्रजी भाषेचे स्वरूप किती बदलले याचे उदाहरण रोचक आहे. हजार वर्षात परकीय शब्द, व्याकरण यांचा अर्थ किती संकुचित होतो हे इथे दिसते.

1000 AD:

Wé cildra biddaþ þé, éalá láréow, þæt þú taéce ús sprecan rihte, forþám ungelaérede wé sindon, and gewæmmodlíce we sprecaþ…

2000 AD:

We children beg you, teacher, that you should teach us to speak correctly, because we are ignorant and we speak corruptly…