वृक्षझऱ्यांचे गूढ मधुर गुज

man rowing a boat

दाऊद इब्राहीमला चारचौघात कुणी विचारलं की तुम्ही काय करता तर तो काय उत्तर देतो माहीत नाही. आणि प्रश्न विचारणारा उत्तर ऐकण्यासाठी शिल्लक राहतो का ते ही माहीत नाही. पण आपल्याकडचे काही पालक दाऊदलाही त्याच्या प्रोफेशनमध्ये ‘स्कोप’ आहे का हे विचारायला कमी करणार नाहीत. हे सांगायचं कारण म्हणजे मला हा प्रश्न बरेचदा विचारण्यात येतो. प्रश्न विचारणारे कोण आहेत त्यावर माझं उत्तर बदलतं. पदार्थविज्ञानामध्ये पीएचडी असं उत्तर ऐकलं तर प्रश्नकर्ते जर पालक असतील तर लगेच त्यांचे डोळे लकाकतात. त्यांचं पिल्लू कुठेतरी जवळपास खेळत असतं त्याची मानगूट धरून त्याला समोर आणलं जातं, “आमच्या अमुकतमुकला जरा गाइड करा ना.” पिल्लू बिचारं भेदरलेल्या नजरेनं बघत असतं, १० वर्षं ‘बामुशक्कत’ सक्तमजुरी मिळालेल्या कैद्यासारखा त्याचा चेहरा होतो. आता आपल्यावर आणखी कोणती बंधनं येणार आहेत या जाणिवेनं बिचारं घाबरून जातं. इकडे अंतर्मनात उगीचच ‘अंदाज अपना-अपना’चा जगदीपचा डायलॉक वाजतो, “ये तुझे हीरो बनाएगा? खुद तो चपरासी बन नही सका.”

विचारलेला प्रश्न साधा वाटला तरी त्यामागच्या अपेक्षा हिमालयाच्या आकाराच्या असतात आणि मुख्य म्हणजे या अपेक्षा पिल्लाच्या नाही, पालकांच्या असतात. आपल्या मुलाला चारचौघात सांगताना भारदस्त वाटेल अशी एखादी पदवी मिळावी, लगेच लठ्ठ पगाराची नोकरी, यूएस मध्ये पोस्टिंग (‘हिच्या मावशीचे मिस्टर सिलीकॉन व्हॅलीत असतात, ग्रीन कार्डसाठी अप्ल्लाय केलंय म्हणे’) वगैरे वगैरे. अपेक्षांना अंत नसतो. अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही किंवा सर्वांनी भारतातच राहावं असंही म्हणायचं नाही. ज्याला जिथे आवडतं त्याला तिथे राहण्यात कुणाचीही आडकाठी नसावी. अडचण ही आहे की ९९ % लोक या दिशेने जात असताना आपण त्या दिशेने का जात आहोत याचा विचार करणारे खूपच कमी दिसतात. अमुक शाखेत ‘स्कोप’ आहे म्हणून मुलाला इच्छा नसतानाही त्याच्यावर ते लादायचं, लवकरच मुलालाही ती सवय होते आणि तो ही स्वतःच्या अंतर्मनाचा कौल झिडकारून ९ ते ५ च्या जाळ्यात अडकतो. आणि एकदा जबाबदाऱ्या आल्या की सुटकेची शेवटची शक्यताही नष्ट होते.

समजा ‘टाइम-ट्रॅव्हल’ शक्य झालं आणि असे एखादे पालक त्यात बसून गेले तर काय होईल? पालक मनाने अजूनही २०१३ मध्येच आहेत (आणि राहतील) याची नोंद घ्यावी.

स्थळ : फ्लोरेन्स, इटली. साल : १५१०

पालक : “तुम्ही काय करता?”
दा विंची : “मी चित्रं काढतो.”
पालक : “अरे वा, सध्या इंटीरियर मध्ये बराच ‘स्कोप’ आहे म्हणतात. आमच्या बॉसच्या भाच्याला अंबानींच्या नव्या बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, आहात कुठे?”
दा विंचीला काहीच कळत नाही म्हणून तो गप्प राहतो.
पालक : “बरं, दर महिन्याला किती चित्रं काढता? कमिशन बेसिसवर का?”
दा विंची : “महिन्याला इतकी असं ठरवून काढत नाही, मूड आला की काढतो. कधीकधी शिल्पंही बनवतो.”
पालक : “अरे वा, म्हणजे इंटीरियरचं सगळंच तुमच्याकडे. बरेच सुटत असतील मग. बरं, हे काय?”
द विंची : “हे मानवी शरीराचे आराखडे आहेत.”
पालक : “त्याचा काय उपयोग? हल्ली एमआरआयमध्ये सगळं दिसतं की. आणि हे काय? पाना-फुलांची चित्र वाटतं?”
दा विंची : “हो, मी फ्लोरेन्सजवळच्या जमिनीचा अभ्यास करायला गेलो होतो तेव्हा सापडली.”
पालक : “जमिनींचा अभ्यास? तुम्ही नक्की काय काय करता?”
दा विंची : “मी चित्र काढतो, शिल्पं बनवतो, जमिनींचा अभ्यास करतो, नकाशे बनवतो, नदी आणि झरे कसे वाहतात त्यांचा अभ्यास करतो, सूर्य आणि पृथ्वी यांच्या कक्षांचं निरीक्षण करतो, माझा मित्र लूका पिच्चोली याच्याबरोबर भूमितीचा अभ्यास चालू आहे, पूल बांधतो, माणसाला उडता येईल असं यंत्र बनवण्याचा प्रयत्नही चालू आहे, एक नवीन प्रकारचं वाद्य बनवण्याचा प्रयत्न चालू आहे, पाण्यावर कसं चालता येईल याचा शोध घेतोय, सूर्याच्या उर्जेचा वापर कसा करावा यावर विचार चालू आहे, आणि बाकीच्या वेळात जमेल तसं लिहितो.”
पालक : “अरेरे, म्हणजे थोडक्यात एक ना धड भाराभर चिंध्या. तुमच्यात टॅलंट आहे हो, पण जिथे स्कोप आहे तिथे ते वापरावं. आता झाडांची चित्रं काढून काय उपयोग होणार? किंवा ते वाद्य तरी कशाला बनवायचं? आणि ते सूर्य, पृथ्वी वगैरे – वेस्ट ऑफ टाइम आय टेल यू, अनलेस यू कॅन लँड अप अ पर्मनंट पोस्ट इन नासा, ह्यॅ ह्यॅ. कसं आहे ना, एकदा एका लाइनमध्ये आपला जम बसला की ती सोडू नये. नवीन लाइनमध्ये परत सगळं पहिल्यापासून, नवीन कॉन्टॅक्ट जमवा. तरी सोशल नेटवर्किंगमुळे हल्ली सोपं झालंय म्हणा, आमच्या वेळी ‘कोल्ड कॉल’शिवाय पर्याय नव्हता.”
सुदैवाने दा विंचीलाही याही वेळी काही कळत नाही. तो मान हालवतो आणि स्टुडियोत परत जातो.

यात अर्थातच अतिशयोक्ती आहे पण फार नाही. आणि याला आपली शिक्षणसंस्थाही जबाबदार आहे. आपली शिक्षणसंस्था बरीचशी गॉडफादरसारखी आहे. एकदा तुम्ही एक लाइन पकडली की बदलणं शक्य नाही. वकिलाने जन्मभर वकिलीच करायची, इंजिनियराने पूलच बांधायचे इ. काही डॉक्टरांनी ही बंधनं झिडकारून आतला आवाज ऐकला आणि ते रंगभूमीकडे वळले हे मराठी माणसाचं भाग्य. माणसाला एकाहून अधिक गोष्टींमध्ये रस असू शकतो किंवा त्याची आवड काही काळानंतर बदलू शकते या शक्यता कुठेही विचारात घेतलेल्या नाहीत. अर्थात फक्त भारत नाही तर जवळजवळ सगळ्या देशांमध्ये हीच परिस्थिती आहे. आइसलँडसारखे काही अपवाद आहेत.

एरिक वायनरनं लिहिलेला एक पुस्तक आहे, ‘द जिओग्राफी ऑफ ब्लिस.’ एरिक जगभर फिरला आणि प्रत्येक ठिकाणी त्यानं फक्त एकच शोध घेतला – कुठले लोक आनंदी आहेत आणि कुठले नाहीत. त्याने भेट दिलेल्या देशांमध्ये आइसलँडचा क्रमांक बराच वर होता कारण बऱ्याच सर्वेक्षणांमध्ये आइसलँड जगातील सर्वात आनंदी देश आहे असं आढळलं आहे. आइसलँडची एक खासियत आहे. तुम्ही कुणाला विचारलं की तुम्ही काय करता तर त्याचं उत्तर दा विंचीशी मिळतं-जुळतं असतं, “मी दोन वर्षं संगीतकार होतो, आणि आता कविता करतो.” आइसलँडमध्ये जवळजवळ प्रत्येक जण कवी आहे. तिथे एखादी गोष्ट वर्ष-दोन वर्षं करून बघायची, मग दुसरी करायची हा ‘नॉर्मल पॅटर्न’ आहे. एखाद्या गोष्टीत अयशस्वी होणं हे तिथे लज्जास्पद मानलं जात नाही, उलट अयशस्वी झालेल्या लोकांना तिथे सन्मानाची वागणूक मिळते. कालेजात जाणाऱ्या मुलाने रॉक बँड सुरू केला तर त्याचे आईवडील ‘शिक्षणाचं बघा आधी, चाललेत संगीतकार व्हायला’ असे कुजकट शेरे न मारता त्याला पूर्ण प्रोत्साहन देतात. शास्त्रज्ञांना असं दिसून आलं आहे की मेंदूचा आनंद नियंत्रित करणारा भाग आणि भाषा नियंत्रित करणारा भाग एकच असतात. यात तथ्य आहे की नाही ठाऊक नाही पण आइसलँडकरांचा आनंदीपणाकडचा ओढा त्यांच्या भाषेतही दिसून येतो. एकमेकांना भेटल्यावर ते म्हणतात, “komdu sæll,” याचा शब्दशः: अर्थ “come happy” आणि जाताना म्हणतात “vertu sæll,” म्हणजे “go happy.”

भारत आणि आइसलँडमध्ये बरेच फरक आहेत त्यामुळे इथे ते होईल अशी अपेक्षा करणं भाबडेपणाचं ठरेल. पण किमान या दिशेने विचार करता आला तरी खूप झालं. आपल्याला मनापासून आवडणाऱ्या गोष्टींकडे पाठ फिरवून आठवड्याला ४०-५० किंवा अधिक तास काम कशासाठी करायचं? जितकी कंपनी मोठी तितकी तिची रचना कृत्रिम. याबाबत प्रोग्रामर पॉल ग्रॅहॅमचा लेख वाचनीय आहे. बहुतेक वेळा असं दिसतं की नोकरीतून वेळात वेळ काढून विकांताला लोक जे करतात ती त्यांची खरी आवड असते. आजच्या जगात आरामदायी जगण्याचे निष्कर्ष बदलले आहेत. आयप्याडपासून ते प्ले स्टेशनपर्यंत सर्व वस्तू आवश्यक वर्गात मोडतात. यामागे ‘साधी राहणी, उच्च विचार’ सारखा भोंगळ विचार नाही पण हे सगळं मिळवण्यासाठी आपल्या बहुमूल्य वेळाची जी किंमत आपण चुकवतो ती योग्य आहे का हा विचार ज्याचा त्याने करावा इतकंच. आपलं काम आपल्याला किती आवडतं हे बघण्याचा सोपा मार्ग म्हणजे रविवारी संध्याकाळी आपल्याला कसं वाटतं? संशोधनाच्या क्षेत्रात काम करताना दर रविवारी संध्याकाळी सोमवारच्या मीटिंगा, रिपोर्ट लिहिणे, विद्यार्थ्यांवर मेंढपाळाची नोकरी या सर्वांचा उबग यायला लागला. आणि हे सगळं कशासाठी तर एक वर्षांनी एखादा पेपर निघतो, लकी असाल तर सायटेशन मिळतात. आठ दिवसात त्याची नवलाई संपते.

मूळ प्रश्नाकडे यायचं तर मला त्या पालकांना सांगावंसं वाटतं, “मुलाला मनसोक्त हवं ते करू द्या. एखादं वर्षं नापास झाला तरी काही फरक पडत नाही. आणि ते दहावी-बारावीचं भूत उगीच त्याच्या मानगुटीवर ठेवू नका. नंतर त्याचा काहीही उपयोग होत नाही.” मुलांना कसं शिकवायला हवं याची कल्पना शंभर वर्षांपूर्वीच गुरुदेवांना आली होती. ‘वंगचित्रे’मध्ये पुलं म्हणतात,”यंत्रयुगाची चाहूल या कवीला वसंतऋतूच्या चाहुलीसारखी फार आधी लागली होती. माणूस निसर्गापासून दूर जाईल, त्याची उदात्ताची ओढ कमी होईल. कारकून बनवायच्या इंग्रजांनी काढलेल्या शाळा-कॉलेज नामक फ्याक्टऱ्यांमध्ये त्याचा आत्मा केवळ पोटभरू वृत्तीतच रंगेल….वृक्षझऱ्यांचे गूढ मधुर गुज ऐकण्याची इच्छाच संपली की जीवनातल्या सौंदर्याला पूर्णविराम मिळतो. आणि फक्त कोरडा पाशवी उपयुक्ततावाद तेवढा उरतो. जीवनातले गाणे संपते.”

खरंतर देशभरात शांतिनिकेतनच्या धर्तीवर शाळा-कालेजं निघायला हवी होती पण त्याऐवजी आयाआयपीएमसारख्या धंदेवाईक संस्थांचा सुळसुळाट होतो आहे. हे बघायला आज टागोर नाहीत तेच बरं आहे, नाही का?