भारतीय गुप्तचर यंत्रणेचे वास्तव : एस्केप टू नोव्हेअर

हेरगिरी हा लेखकांचा आणि चित्रपट निर्मात्यांचा आवडता विषय असतो कारण यात कथानक मनोरंजक करण्यासाठी आवश्यक असलेले बरेचसे घटक आधीच असतात. अर्थात याचा अर्थ हेरगिरीचं सर्व चित्रण वास्तवाला धरून असतं असा नाही. ‘मिशन इम्पॉसिब्ल’मध्ये सीआयएमध्ये प्रवेश करायला टॉम क्रूझला अर्धा चित्रपट लागतो, तेच काम ‘बॉर्न अल्टीमेटम’मध्ये जेसन बॉर्न अडीच मिनिटात करतो. खरं काय कुणास ठाऊक. अर्थात अपवाद आहेत. जॉन ल कारेचे गुप्तहेर ‘मार्टीनी – शेकन, नॉट स्टर्ड’ वगैरे मागताना दिसत नाहीत, उलट अकाउंट्सने पेन्शन मंजूर न केल्यामुळे खस्ता खाताना दिसतात.

Book cover for Escape to Nowhere

या पार्श्वभूमीवर अमर भूषण यांची ‘एस्केप टू नोव्हेअर’ ही कादंबरी बऱ्याच बाबतीत उल्लेखनीय आहे. अमर भूषण २००५ साली कॅबिनेटमधून ‘स्पेशल सेक्रेटरी’ या पदावरून निवृत्त झाले. जवळजवळ चाळीस वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणेचा जवळून अनुभव घेतला. कादंबरी एका सत्य घटनेवर आधारित आहे. २००४ मध्ये एजन्सीचा – संपूर्ण पुस्तकात रॉचा ‘एजन्सी’ असा उल्लेख आहे – एक वरिष्ठ अधिकारी अचानक गायब झाला. या अधिकाऱ्यावर देशाची गुप्त माहिती विकण्याच्या संशयावरून पाळत ठेवली जात होती. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर झालेल्या गदारोळात अनेक दोषारोपांच्या फैरी झडल्या, एजन्सीच्या प्रमुखांवर ठपका ठेवण्यात आला. ही कादंबरी म्हणजे अमर भूषण यांनी या प्रकरणाचं त्यांच्या दृष्टिकोनातून केलेलं वर्णन आहे.

एजन्सीच्या सुरक्षा विभागाचा प्रमुख, जीवमोहन. एकदा ‘सायबर ऑपरेशन्स’चा विभाग प्रमुख वेंकट त्याला भेटायला येतो, भेटायचं कारण असतं रवी मोहनविरुद्ध तक्रार. रवी पूर्व एशिया विभागाचा ‘सिनियर अनालिस्ट’. वेंकटच्या म्हणण्यानुसार रवी त्याला वरचेवर त्याच्या कामाबद्दल विचारत राहतो. फक्त त्यालाच नही तर इतर सर्व विभागातील लोकांशीही रवीचा संपर्क असतो आणि त्या सर्वांकडून रवी नेहमी माहिती काढून घेत असतो. वेंकटला रवी परदेशी गुप्तहेर यंत्रणेसाठी काम करत आहे असा संशय असतो. आरोप गंभीर असल्यामुळे जीव त्याचा सहाय्यक अजय आणि ‘काउंटर एस्पियोनाज युनिट’चा प्रमुख कामथ या दोघांना बोलावतो. कामथ रवीवर पाळत ठेवण्याची व्यवस्था करतो. जीव त्याचा वरिष्ठ वासनला भेटून सर्व कल्पना देतो. कादंबरीमध्ये प्रकरणांऐवजी पहिला दिवस, दुसरा दिवस असे भाग आहेत – एकूण प्रवास पंचाण्णव दिवसांचा. (कित्येक वर्षानंतर पंचाण्णव हा शब्द लिहिण्याची संधी आली.) रवी ‘झाएर क्लब’ नावाच्या एका महागड्या जिमचाही मेंबर असतो पण तिथे प्रवेश मिळवण्यासाठी कामथ आणि सहकाऱ्यांना बऱ्याच अडचणी येतात. रवीला ऑफिसमध्ये भेटण्यासाठी बरेच लोक येत असतात – आर्मीचे उच्चपदस्थ अधिकारी, एजन्सीच्या विविध विभागाचे प्रमुख. याशिवाय रवी नेहमी ओबेरॉयसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्ट्याही देत असतो. एकुणात रवीचं राहणीमान त्याच्या पगारापेक्षा खूप वरचं असतं. रवीचा कार्यालयातील फोन टॅप करण्यात येतो. शिवाय या ऑपरेशनसाठी एक वेगळी ‘नर्व्ह सेंटर’ नावाची कंट्रोल रुम उघडण्यात येते. तिथे टॅप केलेल्या संवादांचं शब्दांकन करण्यात येतं. रवीच्या टेलिफोन कॉलवरुन फारशी माहिती मिळत नाही, रवी फोनवर बोलताना काळजी घेऊन फारसं महत्त्वाचं बोलत नाही असं लक्षात येतं. काही दिवसानंतर जीव कामथला रवीच्या ऑफिसमध्ये चालत असलेलं बोलणं रेकॉर्ड करायला सांगतो. दरम्यान जीव रवीच्या गेल्या दहा वर्षात झालेल्या सगळ्या पोस्टींग्ज, त्याने घेतलेल्या रजा इत्यादींची माहिती मागवतो. यात रवी बाल्टिमोर, वॉशिंग्टन, काठमांडू, बॅंकॉक, इत्यादी ठिकाणी नेहमी जात असल्याचं दिसून येतं.

एजन्सीच्या एका वरिष्ठ तंत्रज्ञाला विश्वासात घेऊन रात्री ९ वाजता रवीचं ऑफिस उघडण्यात येतं. पुढचे सात तास खोलीत वेगवेगळ्या ठिकाणी रेकॉर्डर बसवण्यात येतात. पहाटे चार वाजता कामथला ‘मिशन सक्सेसफुल’ असा फोन येतो. दरम्यान रवीने झेरॉक्स इंडियाला केलेल्या एका कॉलमुळे कामथ सतर्क होतो. रवी झेरॉक्सच्या तंत्रज्ञाला त्याच्या घरी असलेला श्रेडर बिघडला असल्याचं सांगतो आणि तो लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी करतो. इथे रवीवर असलेला संशय बळकट होतो. घरी श्रेडर आहे याचा अर्थ रवी घरी नियमितपणे कागदपत्रे नष्ट करतो आहे. रवी त्याला भेटायला येणाऱ्या लोकांकडे काश्मीर, पाकिस्तान, बांग्लादेश, भारत-चीन संबंध, अशा अनेक विषयांवरील गोपनीय माहितीची नेहमी मागणी करत असतो. बरेचदा अधिकारी त्याला कागदपत्रांच्या प्रतीही देत असतात. अजूनही ठोस पुरावा हाती आलेला नसतो. यानंतर रवीच्या ऑफिसमध्ये आणि कारमध्ये कॅमेरे बसवण्यात येतात आणि तो ऑफिसमध्ये रोज काय करतो याचं चित्रण केलं जातं. इथे एक महत्त्वाचा दुवा सापडतो. रोज रवी जेवणानंतर खोलीचं दार बंद करतो आणि कधी २५ तर कधी ४० अशा संख्येमध्ये कागदपत्रे झेरॉक्स करतो. संध्याकाळी आपल्या बॉगमध्ये ही कागदपत्रे तो घरी नेतो. बॅग कधीही प्यूनजवळ देत नाही. आता प्रश्न येतो की तो नेमके कोणते कागद झेरॉक्स करतो आहे? यासाठी कॅमेरा हालवण्यात येतो पण झेरॉक्सच्या प्रकाशात काही वाचणं शक्य होत नाही. इथे जीव एक युक्ती सुचवतो. फोटो डिव्हिजनच्या अधिकाऱ्याला बोलावून झेरॉक्स केलेली कागदपत्रे मेमरीमध्ये साठवू शकेल असं मशीन विकत घ्यायला सांगतो. रवी ब्रुनेईला गेलेला असताना त्याच मशीन नादुरुस्त करण्यात येतं. परत आल्यावर त्याने तक्रार केल्यानंतर हे नवीन मशीन त्याला तात्पुरतं म्हणून देण्यात येतं. अखेर रवी नेमकं काय करतो आहे याचे पुरावे मिळतात.

अजूनही रवीला अटक करणं शक्य नसतं कारण मिळालेले पुरावे न्यायालयात फारसे उपयोगी नसतात. रवीला ३११(२)(c) च्या खाली बडतर्फ केलं जाऊ शकतं पण तो कोर्टात गेला तर मी कागदपत्रे घरी अभ्यास करण्यासाठी नेत होतो असं म्हणू शकतो. जोपर्यंत रवीच्या बाहेरच्या गुप्तचर संस्थेमध्ये कॉन्टॅक्ट कोण आहे याचा पत्ता लागत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नसतो. रवीच्या घरातही कॅमेरे बसवण्यात येतात. दरम्यान एक दिवस रवी अचानक प्युनला त्याच्या ऑफिसमध्ये असलेल्या फायली कारमध्ये ठेवायला सांगतो. प्यून फायली घेऊन जात असताना काउंटर एस्पियोनाज युनिटचे दोन अधिकारी त्याला हटकतात आणि फायली जप्त करतात. जीवला हे कळल्यावर तो वासनला सांगतो. आता जर फक्त रवीच्या फायली जप्त केल्या तर त्याला संशय येईल म्हणून ते त्या दिवशी संध्याकाळी बाहेर जाणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची बॅग तपासतात आणि कागदपत्रे जप्त करतात. हे रूटीन चेक आहे असं सर्वांना सांगण्यात येतं. आता वासनचा धीर सुटायला लागतो. प्रकरण पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार – प्रिंसिपल सेक्रेटरी उर्फ प्रिंसीपर्यंत गेलेलं असतं. प्रिंसी भारत-अमेरिका संबंध सुधारण्याच्या मागे असतो त्यामुळे त्याला हे प्रकरण शक्यतो आतल्या आतच मिटवावं असं वाटत असतं. यावर बोलताना वासन इस्रोचं उदाहरण देतो. इस्रोच्या दोन शास्त्रज्ञांना हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने दोघांना निर्दोष जाहीर केले. नंतर ब्युरोच्या शताब्दी समारंभात बोलताना अब्दुल कलाम यांनी या प्रकरणावरून ब्युरोला शालजोडीतले दिले होते.

ही कादंबरी असली तरी सत्य घटनेवर बेतलेली असल्याने पारंपरिक कादंबरीचे स्वरूप घेत नाही. खरं तर याला मोहन यांच्या आठवणी म्हणता येऊ शकेल पण असं करण्यात कदाचित ‘ऑफिशियल सीक्रेट्स ऍक्ट’चा भंग होऊ शकेल. शिवाय नकळत गुप्तचर यंत्रणेच्या कामाबाबत महत्त्वाचे धागेदोरे उघड होण्याचाही संभव आहे. यासाठीच मोहन यांनी सत्य आणि कल्पना यांची सरमिसळ केली असावी. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कादंबरी लिहीण्याचा मोहन यांचा मुख्य उद्देश एजन्सीत काम करणाऱ्या तरूण लोकांना एजन्सीच्या कामातील खाचखळग्यांची जाणीव करुन देणे हा आहे. सरकार, प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणेचे अनेक पैलू इथे बघायला मिळतात. आपली गुप्तचर यंत्रणा पंतप्रधानांच्या हाताखाली काम करते. आपल्या राजकीय नेत्यांचा आवाका बघता याचा अर्थ एजन्सीचा बराच कारभार प्रिंसीच्या हातात असावा असं वाटतं. दर वेळी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या गप्पा सुरू झाल्या, समझोता एक्सप्रेस धावायला लागली की वरून एजन्सीला आपलं काम सौम्य करण्याचे आदेश येतात. मात्र आयएसआय असं करत नाही म्हणूनच त्यांचं भारतातील जाळं अधिक कार्यक्षम आहे असा अंदाज कादंबरीच्या पात्रांच्या बोलण्यावरून येतो. याखेरीज शेजारी देशातील फुटीर कारवायांना उत्तेजन देणे, पैसा पुरवणे, तिथल्या खबऱ्यांना पोसणे अशा एजन्सीच्या सहसा उघड होत नसलेल्या कामांबद्दलही चर्चा होते. आर्मी, नेव्ही, ब्यूरो, सीबीआय यांच्यातील नेहमी होणारे संघर्षांची कल्पना येते. भारतीय गुप्तचर यंत्रणेचे कधीही न समोर आलेले रूप या कादंबरीत बघायला मिळते.