‘मिर्झापूर सिझन २’ चा पहिला भाग जरा कंटाळवाणा वाटला. तीच ती गुंडगिरी, प्रत्येक दोन शब्दानंतर माता-भगिनी स्मरण, डास-चिलटे मारावीत तशी माणसे मारणे – हे सगळे कथानकाच्या ओघात आले तर ठीक वाटते. हे सोडून दुसरे काही कथानकच नसेल तर कंटाळा यायला लागतो. एक भाग बघितला आहे आता बहुधा फास्ट फारवर्ड करून शेवटी कोण मरतो आणि कोण…
‘मिर्झापूर सिझन २’ चा पहिला भाग जरा कंटाळवाणा वाटला.
तीच ती गुंडगिरी, प्रत्येक दोन शब्दानंतर माता-भगिनी स्मरण, डास-चिलटे मारावीत तशी माणसे मारणे – हे सगळे कथानकाच्या ओघात आले तर ठीक वाटते. हे सोडून दुसरे काही कथानकच नसेल तर कंटाळा यायला लागतो. एक भाग बघितला आहे आता बहुधा फास्ट फारवर्ड करून शेवटी कोण मरतो आणि कोण राहतो ते बघावे आणि मुक्ती मिळवावी.
पुढचे भाग बघितल्यावर अगदी सोडून देण्याइतकी वाईट आहे असे वाटत नाही. अभिनय चांगला आहे त्यामुळे एकदा बघू शकतो. पण आधीचा मुद्दा आत्ताही ग्राह्य आहे. सगळ्या सीझनचा एकच हेतू आहे – बदला. त्यामुळे हिंसाचार अती झाला आहे. हिंसाचार असणेही गैर नव्हे पण तो कसा दाखविला आहे यावर बरेचसे अवलंबून असते. ‘गॉडफादर’ हा गुन्हेगारीवरचा अजरामर चित्रपट. पण त्यात पडद्यावर फारच कमी हिंसा दाखवली आहे. तरीही तो परिणामकारक आहे. मिर्झापूरमधली हिंसा बटबटीत आहे त्यामुळे ती बघायचा कंटाळा येतो. उघड हिंसा कलात्मक रीतीने दाखवणे फार कमी लोकांना जमते. टेरेन्टीनोची ‘किल बिल‘ मालिका ठळक अपवाद.
पंकज त्रिपाठी हा या मालिकेचा आधारस्तंभ. त्याचा अखंडा त्रिपाठी लक्षात राहतो. त्याची मुलाखत बघितल्यावर त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी किती समृद्ध हे लक्षात येतं.
‘गॉडफादर’वरून आठवले. सहाव्या एपिसोडमध्ये गोलू आणि गुड्डू बिहारमध्ये बोलणी करायला जातात तो प्रसंग गॉडफादरवरून जसाच्या तसा उचलला आहे. तिथे डॉन कोर्लिओने सोलोझ्झोबरोबर बोलणी करताना कोकेन व्यापाराला नकार देतो. इथे दद्दा अफीम व्यापाराला नकार देतो. आणि दद्दाचं पात्र ‘गेम ऑफ थ्रोन्स‘च्या टायरियन लॅनिस्टरवर बेतलेलं आहे.
या सिझनची एक खासियत म्हणजे स्त्रियांना समान हक्क दिले आहेत. त्यामुळे गुंडांबरोबर गुंडिणीही बघायला मिळतात. (यक्ष : यक्षिणी, गुंड : गुंडिणी). ह्याआधी हे ‘सुबुर्रा : ब्लड इन रोम‘ या इटालियन मालिकेत बघितले होते.
इटलीमध्ये प्रत्येक भागात मिळणाऱ्या पिझ्झाची चव वेगळी असते. नेपल्स ही पिझ्झाची जन्मभूमी. तिथला पिझ्झा अवर्णनीय असतो. बहुतेक वेळा इटालियन पिझ्झा कापू देत नाहीत त्यामुळे सुरीने आपल्यालाच कापावा लागतो.
१. पहिला पदार्थ अर्थातच पिझ्झा. इटलीला जाण्याआधी मी डॉमिनोजचा पिझ्झा खाल्ला होता. इटलीला जो पिझ्झा मिळतो त्यात आणि डॉमिनोज पिझ्झामध्ये फारसं साम्य नाही. मला बहुतेक पिझ्झ्यांचं भारतीय रूप आवडत नाही – म्हणजे पनीर किंवा इतर भारतीय मसाले घालून केलेलं. इटालियन पिझ्झा दिसायला ओबडधोबड असतो, त्यात टॉपिंग नावाचा प्रकार नसतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पिझ्झा भट्टीत केलेला असतो त्यामुळे कधीकधी थोडासा जळालेला असतो. समजा म्याकडोनाल्डने झुणका-भाकरीची फ्रॅंचाईझ घेतली आणि निर्जंतुक वातावरणात यंत्राने भाकऱ्या केल्या तर त्यात आणि बायजाबाईने केलेल्या चुलीवरच्या भाकऱ्यांच्या चवीत जो फरक असेल तोच इथेही आहे. इटलीमध्ये प्रत्येक भागात मिळणाऱ्या पिझ्झाची चव वेगळी असते. नेपल्स ही पिझ्झाची जन्मभूमी. तिथला पिझ्झा अवर्णनीय असतो. बहुतेक वेळा इटालियन पिझ्झा कापू देत नाहीत त्यामुळे सुरीने आपल्यालाच कापावा लागतो.
नेपल्सचा पिझ्झा मार्गारिटा
याखेरीज तिथे दुकानात पिझ्झाचे चतकोर तुकडेही विकतात. वेगवेगळ्या चवीचे दोन-तीन तुकडे घेतले तर मजा येते.
२. इटलीच्या लिगुरिया भागात (पश्चिम इटली) फोकाच्या (Focaccia) नावाचा पदार्थ मिळतो. फोकाच्या हा ब्रेडचाच एक प्रकार आहे. पीठ, ऑलिव्हचं तेल आणि वेगवेगळ्या प्रकारचं मीठ. ताजा खाल्ला तर नरम, वाळलेलाही छान लागतो. हा सँडविचसाठीही वापरता येतो.
फोकाच्या
३. रिझोत्तो आल फुंगी (Risotto al funghi) म्हणजे मश्रूम आणि भात. इटालियन जेवणाचं एका वैशिष्ट्य म्हणजे मसाले फारसे नसतात त्यामुळे बहुतेक पदार्थ त्यांच्या मूळ चवीनुसार लागतात. इथे मश्रूम आणि कांदा ऑलिव्हच्या तेलात आणि/किंवा लोण्यात परतून घेतात. कधी थोडी व्हाइट वाईनही घालता. मग त्यात चिकन किंवा इतर ब्रॉथ घालून तांदूळ घालतात आणि शिजवतात. नंतर वरून पार्मेजान चीज.
रिझोत्तो आल फुंगी
४. तिरामिसु (Tiramisu). यात कॉफी, अंडी, साखर आणि मस्कारपोने चीज यांचं मिश्रण. मग वरून कोकोची पावडर पेरायची. मला गोड फारसं आवडत नाही पण तिरामिसु आवडतं.
तिरामिसु
५. एखाद्या वाईनची चव कशी आहे हे नेमकं सांगण्यासाठी इग्रजीत खास वेगळे शब्द आहेत. मराठीत हे शब्द नसताना वाईनची चव सांगणं अशक्य आहे. मला दोन वाईन आवडतात – कियांती क्लासिको (Chianti Classico) आणि प्रिमितिव्हो (Primitivo). दोन्ही रेड वाईन आहेत.
‘तुंबाड’विषयी बोलायचं झालं तर अनेक गोष्टी उल्लेखनीय आहेत. पहिलं म्हणजे याचा जॉन्र. बॉलिवूडला काही प्रकारच्या चित्रपटांचं वावडं आहे. उदा. हिंदी चित्रपटसृष्टीत शेरलॉक होम्स, एर्क्यूल प्वारो किंवा अगदी आपले देशी ब्योमकेश बक्षी यांची गादी चालवू शकेल असं कुणीही नाही. बॉलिवूडला डिटेक्टिव्ह फारसे रुचत नाहीत. तीच गट भयपटांची. नाही म्हणायला रामसे बंधूंनी ‘शैतानी दरवाजा’ वगैरे काढले पण…
‘तुंबाड’विषयी बोलायचं झालं तर अनेक गोष्टी उल्लेखनीय आहेत. पहिलं म्हणजे याचा जॉन्र. बॉलिवूडला काही प्रकारच्या चित्रपटांचं वावडं आहे. उदा. हिंदी चित्रपटसृष्टीत शेरलॉक होम्स, एर्क्यूल प्वारो किंवा अगदी आपले देशी ब्योमकेश बक्षी यांची गादी चालवू शकेल असं कुणीही नाही. बॉलिवूडला डिटेक्टिव्ह फारसे रुचत नाहीत. तीच गट भयपटांची. नाही म्हणायला रामसे बंधूंनी ‘शैतानी दरवाजा’ वगैरे काढले पण त्यात राम तर सोडा, सीता, सुग्रीव किंवा जाम्बुवंतही नव्हते. नुकतेच आलेले ‘स्त्री’सारखे अपवाद सोडले तर बॉलिवूडमध्ये भयपटांची वानवाच असते.
‘तुंबाड’नं हे बदललं आणि असं बदललं की ‘एक ही मारा लेकिन सॉलिड मारा’. त्यांनी केवळ भयपट केला नाही तर त्याला गूढ दंतकथेची जोड दिली. हे बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही झालेलं नाही. (‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’मध्ये काही गडद छटा आहेत पण एकूणात चित्रपट रोमांचकारी साहसपट आहेत.)
“लोकेशन, लोकेशन, लोकेशन!”
रिअल इस्टेटचा हा मूलमंत्र चित्रपटांनाही लागू पडतो. आपल्या चित्रपटांमध्ये कोकणभाग किती दुर्लक्षित आहे हे लक्षात आलं तेव्हा खुर्चीवरून खाली पडायचा बाकी होतो. शिमला, काश्मीर इथला इंच न इंच कुठल्यातरी चित्रपटात दाखविला गेला आहे. तीच गत स्वित्झर्लंड किंवा इटलीची. तुंबाड महाराष्ट्राच्या कोकण आणि पुण्याजवळच्या निसर्गरम्य भागात चित्रित केला आहे आणि बघताना डोळे सुखावतात.
डोळे सुखावतात याचं कारण अप्रतिम छायांकन (cinematography). या तोडीचं छायांकन हिंदी चित्रपटात यापूर्वी बघितल्याचं आठवत नाही. बरंचसं चित्रीकरण पावसाळ्यात, खऱ्या पावसात केलं गेलं आणि यासाठी चार पावसाळे खर्ची पडले. पूर्ण चित्रपटाला सहा वर्षे लागली. हे करायला अमर्याद संयम आणि कामाप्रति असीम निष्ठा यांची गरज असते.
सोहम शाह, आनंद एल. राय, आनंद गांधी, मुकेश शाह, अमिता शाह (निर्माते), राही अनिल बर्वे, आनंद गांधी (दिग्दर्शक), पंकज कुमार (छायांकन), मितेश शाह, आदेश प्रसाद, राही अनिल बर्वे, आनंद गांधी (पटकथा), राज शेखर (गीतकार), अजय-अतुल, जेस्पर किड (संगीतकार), संयुक्त काझा (संकलन) आणि चित्रपटाची सर्व टीम यांचं मन:पूर्वक अभिनंदन. या सर्वांची नावे देण्याचं कारण हे की ही मंडळी नेहेमी पडद्यामागेच राहतात. अभिनेते आणि दिग्दर्शक यांची नावे सर्वच समीक्षक देतात. संकलक,छायाचित्रकार आणि गीतकार यांची नावे एखादवेळेस द्यायला काय हरकत आहे?
तुंबाड रूढार्थाने भयपट असला तरी चित्रपटात ठाशीव भयप्रसंग कमीच आहेत. त्याऐवजी वातावरण आणि प्रेक्षकांच्या कल्पनेतून भयनिर्मिती केली आहे. लोकेशनबद्दल बोलायचं तर बघूनच जागा झपाटलेल्या आहेत असं वाटतं. बहुतेक चित्रपट वाड्यांमध्ये घडतो. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी असे निर्जन वाडे शोधले जिथे चिटपाखरूही नव्हतं. ते जीर्ण वाडे, करकरणारे दरवाजे, गंजलेली कुलुपे. चित्रपटात छोट्या-छोट्या गोष्टींकडेही पूर्ण लक्ष दिलेलं आहे.
चित्रपटाचा मुख्य हेतू भयनिर्मिती असला तरी नीट पाहिलं तर त्यात त्या काळाच्या अन्यायांचंही चित्रण दिसतं. उदा. विनायक राव (सोहम शाह) याचं नंतरच्या काळातील घर. घरात बायको, तीन मुलं आणि एक रखेल. बायकोची स्थिती एका मोलकरणीपेक्षा वेगळी नाही आणि रखेल घरावर सत्ता गाजवते आहे. गंमत म्हणजे ती घरात आली तेव्हा परिस्थिती नेमकी उलटी होती. विनायकाचा मुलगा सदाशिव (रुद्र सोनी). हा तुमच्या बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्ये नेहेमी मुलं दिसतात तसा निष्पाप, निरागस मुळीच नाही. पौगंडावस्थेतील मुलांच्या मनोव्यापारात डोकावण्याचं धाडस भलेभले दिग्दर्शक करत नाहीत. इथे ते केलंय. स्पिलबर्गचा ‘एम्पायर ऑफ द सन‘ हा एक उल्लेखनीय अपवाद.
इतकी मेहनत करूनही चित्रपटाने केवळ ₹१३.५७ कोटींचा गल्ला जमवला. शिरा पडों हेंच्या तोंडार! आपल्या प्रेक्षकांनी ‘माझिया प्रियाला, मला आणि प्रेक्षकांना काहीच कळेना’ याचे ७६४ भागच बघावेत. सुदैवाने ओटीटीवर हा चित्रपट आहे आणि बराच काळ राहील. पूर्वीच्या चित्रपट पडला की शब्दश: डब्यात जायचा. आता ती वेळ येत नाही.
चांदोबातल्या गोष्टीत राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा माझा जीव चित्रपटात कोणती भाषा बोलत आहेत याकडे लागलेला असतो. कथा मराठी माणसांची, महाराष्ट्रातली तरीही पात्रे हिंदी बोलतात कारण हा हिंदी चित्रपट आहे. बहुतेकवेळा हे वैतागवाणं होतं उदा. गमन हा चित्रपट. पण इथे तसं झालं नाही. एकतर चित्रपट इतक्या पातळींवर उत्कृष्ट आहे की या छोट्याशा तपशीलाबद्दल फारसं काही वाटत नाही. आणि दुसरं म्हणजे चित्रपटात संवाद मुळातच कमी आहेत.
तरीही मराठीत हा चित्रपट कसा वाटला असता हा विचार मनात आल्यावाचून रहात नाही. माझ्या मते आदर्श चित्रपटात प्रत्येक पात्र त्याला नैसर्गिकपणे जी भाषा येते ती बोलेल. ‘दि लोंगेस्ट डे‘ हा असा एक चित्रपट.
श्री. ना. पेंडसेंच्या ‘तुंबाडचे खोत’वरून तुंबाड हा शब्द घेतला आहे. कथा नारायण धारप यांच्या एका कथेवर बेतलेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी लेखकांना फारसं स्थान मिळालेलं नाही – विजय तेंडुलकर किंवा महेश एलकुंचवार हे सन्माननीय अपवाद. भविष्यात गोनीदा, जयवंत दळवी किंवा जीएंच्या कथा रुपेरी पडद्यावर बघायला मिळतील अशी आशा आहे.