Author: Raj

  • ऍलिस, कृष्णविवर आणि जळत्या भिंतीचे रहस्य

    समजा ऍलिस आणि बॉब दोघेही कृष्णविवराच्या क्षितिजावर उभे आहेत. ऍलिस म्हणते, लय बिल झालं बॉस! आता मी बघतेच उडी मारून. ती उडी मारते आणि बॉब बाहेरच थांबतो.

    या वर्षीच्या उन्हाळ्यात कॅलिफोर्नियातील सांता बार्बरा विज्ञापीठाच्या जोसेफ पोल्चिन्स्की आणि सहकाऱ्यांनी एक निबंध प्रकाशित केला. निबंधाचा विषय होता कृष्णविवरामध्ये पडल्यावर माणसाचे नक्की काय होते? या निबंधामध्ये मांडलेल्या कल्पनांनी आतापर्यंतच्या कृष्णविवराबाबत असलेल्या समजुतींना छेद दिला. निबंधाचे निष्कर्ष बरोबर आहेत असे गृहीत धरले तर विरोधाभास (Paradox) निर्माण होऊन सामान्य सापेक्षता किंवा पुंजभौतिकी यांच्यापैकी एका विषयाच्या गृहीतकाला तिलांजली द्यावी लागेल. हे लक्षात आल्यावर पदार्थविज्ञान जगतामध्ये बरीच खळबळ माजली आणि त्यावरील गरमागरम चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

    सूर्यासकट कोणत्याही ताऱ्यामध्ये मुख्यत्वे दोन प्रकारची परस्परविरोधी बले कार्यान्वित असतात. ताऱ्याच्या वस्तुमानामुळे जे गुरुत्वाकर्षणाचे बल निर्माण होते त्यामुळे तारा आकुंचन पावत असतो पण ताऱ्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या अणुप्रक्रियांमुळे या बलाच्या विरोधी बल निर्माण होते आणि तारा संतुलित राहू शकतो. पण केंद्रातील इंधनाचा साठा संपला की विविध प्रक्रिया होऊन शेवटी तारा गुरूत्वीय बलाखाली आकुंचन पावतो. ताऱ्याचे सुरुवातीचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या चौपट किंवा अधिक असेल तर त्याचे कृष्णविवरामध्ये रूपांतर होते. १९७४-७६ मध्ये स्टीफन हॉकिंग यांनी कृष्णविवरांबाबत क्रांतिकारक सिद्धांत मांडले. कृष्णविवरांमधून कोणतीच गोष्ट – अगदी प्रकाशकिरणेही – बाहेर येऊ शकत नाहीत हा समज तंतोतंत खरा नाही असे हॉकिंग यांनी सिद्ध केले. कृष्णविवरांमधून विविध किरणे आणि कण वेळोवेळी फेकले जातात. या किरणांना ‘हॉकिंग रेडिएशन’ असे नाव देण्यात आले. हॉकिंग रेडिएशन कृष्णविवराच्या क्षितिजावरून बाहेर फेकले जाते. या क्षितिजाला ‘इव्हेंट होरायझन’ असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे कृष्णविवराचे वस्तुमान हळूहळू कमी होत जाते आणि शेवटी कृष्णविवर नष्ट होते. हॉकिंग यांचा दुसरा सिद्धांत अधिक धक्कादायक होता. पुंजभौतिकीच्या नियमांप्रमाणे विश्वातील प्रत्येक प्रणालीबरोबर (system) एक वेव्ह फंक्शन असते. त्या प्रणालीबद्दलची सर्व माहिती या वेव्ह फंक्शनमध्ये साठवलेली असते. हॉकिंग यांच्या सिद्धान्तानुसार कृष्णविवर नष्ट झाल्यानंतर त्याच्याबरोबर त्या प्रणालीचे वेव्ह फंक्शन आणि सर्व माहितीही नष्ट होते. याचे वर्णन हॉकिंग यांनी “Not only does God play dice, but he sometimes confuses us by throwing them where they can’t be seen.” अशा शब्दात केले. माहिती नष्ट झाली तर असा काय फरक पडणार आहे असे वाटू शकते पण इथे पदार्थविज्ञानातील काही मूलभूत तत्त्वांना आव्हान दिले गेले आहे.

    १९९३ मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक लेनी ससकिंड यांनी यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. ससकिंड यांच्या मते माहिती नष्ट होत नाही. कृष्णविवराच्या आत आणि बाहेर असणाऱ्या सर्वांना एकाच प्रकारची माहिती उपलब्ध असते. बाहेर असणाऱ्यांना ही माहिती हॉकिंग रेडिएशनच्या रूपात मिळते. ससकिंड आणि हॉकिंग यांच्यात या मुद्द्यावरून बरेच वादविवाद झाले. हॉकिंग आणि किप थॉर्न यांनी कॅलटेक विद्यापीठातील प्रेस्कील यांच्याबरोबर पैजही लावली होती. २००४ मध्ये हॉकिंग यांनी माहिती नष्ट होत नाही असे मान्य केले. मात्र सध्या चालू असलेल्या वादविवादांनंतर हॉकिंग यांचे आधीचेच मत बरोबर होते की काय अशीही चर्चा चालू आहे.

    पोल्चिन्स्की आणि सहकाऱ्यांनी एक रोचक प्रश्न विचारला. जर ऍलिसला कृष्णविवरामध्ये टाकले तर काय होईल? आतापर्यंत याचे उत्तर होते – नो ड्रामा सिनारियो. आईन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षता सिद्धान्तानुसार ऍलिसला काहीही जाणवणार नाही. कृष्णविवराच्या केंद्रापाशी गेल्यावर मात्र गुरुत्वाकर्षण तीव्र झाल्यामुळे तिचे शरीर ताणले जाईल आणि ती ऑफ होईल. पण पोल्चिन्स्की यांच्या सिद्धान्तानुसार ऍलिसने उडी मारल्याबरोबर तिला एक प्रचंड आगीच्या भिंतीचा सामना करावा लागेल. केंद्रापर्यंत जाण्याचीही गरज नाही, ती लगेचच ऑफ होईल. आता तुम्ही म्हणाल की येनकेनप्रकारे बिचारी ऍलीस मरणारच आहे तर ती कशीही मेली तरी काय फरक पडतो?

    यावर शास्त्रज्ञ म्हणतील ‘फर्क तो पडता है भय्या.’ ऍलिस नक्की कशी मरणार यावर पदार्थविज्ञानातील काही मूलभूत तत्त्वांचे भवितव्य अवलंबून आहे.

    एखाद्या प्रक्रियेतून दोन किंवा अधिक कण तयार झाले तर त्या कणांचे एकमेकांशी नाते तयार होते. याला पुंजभौतिकीच्या भाषेत ‘एनटॅंगलमेंट’ असे म्हणतात. एकदा तयार झाल्यानंतर हे कण परस्परांपासून कितीही दूर गेले तरीही त्यांची एनटॅंगलमेंट अबाधित राहते. यामुळे एका कणाचे वेव्ह फंक्शन मोजले तर दुसऱ्या कणाबद्दल माहिती मिळू शकते. एनटॅंगलमेंट अनेक प्रयोगांमध्ये सिद्ध झाली आहे. समजा ऍलिस आणि बॉब दोघेही कृष्णविवराच्या क्षितिजावर उभे आहेत. ऍलिस म्हणते, लय बिल झालं बॉस! आता मी बघतेच उडी मारून. ती उडी मारते आणि बॉब बाहेरच थांबतो. हे दोघेही एनटॅंगल्ड आहेत. कृष्णविवरातून हॉकिंग रेडिएशन बाहेर पडते आहे, त्यामुळे कृष्णविवर आणि सभोवतालचा प्रदेश आधीच एनटॅंगल्ड आहेत. इथे बॉबला ऍलिसशी एनटॅंगल्ड असल्यामुळेही माहिती मिळते आहे आणि हॉकिंग रेडीएशनमुळेही. बॉबला कोणत्यातरी एका पद्धतीने माहिती मिळणे शक्य आहे, दोन्ही पद्धतींनी नाही. जेव्हा ऍलिस उडी मारते तेव्हा तिला काय दिसेल? वर म्हटल्याप्रमाणे तिला काहीच फरक जाणवणार नाही. बॉब – जो बाहेर आहे त्याला काय दिसेल? त्याला हॉकिंग रेडिएशन दिसेल. पण बॉब आणि ऍलिस एनटॅंगल्ड आहेत त्यामुळे ऍलिसलाही हॉकिंग रेडिएशन दिसायला हवे. पण तसे झाले तर त्या रेडिएशनमुळे ती लगेच जळून खाक होईल.

    एकुणात शास्त्रज्ञांपुढे अवघड पर्याय आहेत. ऍलिस जळाली तर कृष्णविवराच्या आत सामान्य सापेक्षता सिद्धान्ताला रामराम. ऍलिसला क्षितिजाजवळ काहीच झाले नाही तर सापेक्षता सिद्धांत वाचतो पण एनटॅंगलमेंटचा बळी जातो आणि माहिती नष्ट होते, म्हणजे पुंजभौतिकी गडगडते. हे म्हणजे पाणी हवे का ऑक्सिजन असे विचारण्यासारखे आहे. निबंध लिहिल्यानंतर पोल्चिन्स्की यांनी तो इतर तज्ज्ञांना दाखवून यात काही चूक असली तर दाखवा असे सांगितले. आतापर्यंत यात कुणालाही चूक सापडलेली नाही.

    गुरुत्वाकर्षण आणि पुंजभौतिकी यांचे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. यांचे समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नामध्ये ‘क्वांटम ग्रॅव्हिटी’ हे नवीन क्षेत्र उदयाला आले. बहुतेक वेळा यांचा संबंध येत नाही कारण पुंजभौतिकी अत्यंत सूक्ष्म अंतरांवर प्रभावी असते आणि गुरुत्वाकर्षणाचा विचार मोठ्या अंतरांवर होतो. मात्र कृष्णविवरासारख्या ठिकाणी दोघेही एकमेकांसमोर येतात. पोल्चिन्स्की यांच्या अभिनव ‘थॉट एक्सपेरिमेंट’मुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातून जे उत्तर मिळेल ते क्रांतीकारी असेल हे नक्की.

    —-

    विसू : लेखातील सगळ्या कल्पना स्पष्ट झाल्या नाहीत तर त्यात आश्चर्यकारक काहीच नाही. हे विषय जगातील अत्यंत गहन आणि जटिल विषयांमध्ये येतात. यातील प्रत्येक मुद्दा अनेक पुस्तके भरतील इतका विस्तृत आहे. यात सर्व आयुष्य घालवल्यानंतरही केवळ प्रश्नांचे स्वरूप कळू शकते. उत्तरे शोधायची तर त्याला आईन्स्टाईन किंवा हॉकिंगसारखी प्रतिभा लागते. समस्यांचे स्वरूप जरी लक्षात आले तरी पुष्कळ झाले. बाडी में क्या रख्खा है, भावनाओं को समझो.

  • गॅरी कास्पारोव्ह आणि बर्लिनची भिंत

    क्रामनिकने ३…घो एफ ६ ही खेळी केल्याबरोबर कास्पारोव्हने चमकून क्रामनिककडे बघितलं, किंचित हसला आणि मान हालवली. ही खेळी रॉय लोपेझ या प्रकारातील बर्लिन बचाव या उपप्रकारात येते. बर्लिन बचाव १९ व्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला खेळला जात असे.

    बुद्धिबळ विश्वविजेतेपद स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू स्पर्धेआधी आणि नंतर ढीगभर मुलाखती देतात पण यामध्ये बहुतेक वेळा महत्त्वाचे तपशील उघड केले जात नाहीत. यामागे बरीच कारणे आहेत. एक तर बहुतेक वेळा मुलाखत घेणारे पत्रकार ‘आता कसं वाटतंय?’ यापलीकडे जातच नाहीत. जे थोडे बहुत जातात त्यांना उत्तरे देतानाही दोन्ही खेळाडू सावध असतात. उदा. मागची स्पर्धा जिंकल्यानंतरही कार्लसनने त्याचे सेकंड्स कोण आहेत हे जाहीर केलं नाही कारण या वर्षी त्याला परत स्पर्धा खेळायची आहे. यामुळे होतं काय की बुद्धिबळाची विश्वविजेतेपद स्पर्धा म्हणजे दोन खेळाडू खेळणार आणि त्यातला एक विजयी होणार यापलीकडे याबद्दल फारशी माहिती बाहेर येत नाही. आणि याबाबतीत हिमनग ९/१० पाण्याखाली असण्याची उपमा अगदी सार्थ आहे.

    नेहमी होणाऱ्या स्पर्धा आणि विश्वविजेतेपद स्पर्धा यात अनेक महत्त्वाचे फरक आहेत. विश्वविजेतेपद स्पर्धा एकाच खेळाडूबरोबर असते त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सखोल अभ्यास करता येतो. इथे काही बाबतीत पोकर या खेळाशी साम्य जाणवतं. दोन्ही खेळाडू बुद्धिबळाच्या सर्व ‘ओपनिंग्ज’ कोळून प्यायलेले असतात. मग प्रतिस्पर्ध्याला चकित कसं करणार? प्रतिस्पर्ध्याच्या आवडत्या ओपनिंग्ज कोणत्या आहेत हे लक्षात घेतलं जातं. पण प्रतिस्पर्ध्यानं तुम्ही हे लक्षात घेणार हे लक्षात घेतलेलं असतं. त्यामुळे कदाचित तो पूर्वी कधीही न खेळलेली ओपनिंग खेळू शकतो. किंवा त्याहीपुढे जाऊन तुम्ही तो त्याच्या आवडत्या ओपनिंग्ज खेळणार नाही हे गृहीत धरणार असं गृहीत धरून त्याच्या आवडत्या ओपनिंग्ज खेळूनच तुम्हाला चकित करायचा प्रयत्न करतो. इंग्रजीत ‘कॉलिंग युअर ब्लफ’ नावाचा वाक्प्रचार आहे तो इथे चपखल बसतो. अर्थातच हे फार ढोबळ आणि प्राथमिक अंदाज आहेत. स्पर्धेची तयारी नेमकी कशी होते हे कधीही बाहेर येत नाही. खुद्द खेळाडू किंवा त्यांचे सेकंड्स यांनी याबद्दल लिहिलं तरच हे शक्य होतं आणि हे फारच क्वचित घडतं.

    ९० च्या दशकामध्ये बुद्धिबळ विश्वविजेतेपदाची स्पर्धा पूर्णपणे फिडेच्या नियंत्रणाखाली नव्हती. १९९३ साली कास्पारोव्ह आणि शॉर्ट यांनी फिडेशी काडीमोड घेऊन आपली वेगळी चूल मांडली. त्यावेळी कास्पारोव्ह विश्वविजेता होता. यानंतर फिडे आणि कास्पारोव्ह यांनी स्वतंत्र स्पर्धा घेतल्या त्यामुळे काही काळासाठी बुद्धिबळाच्या जगात एक सोडून दोन विश्वविजेते होते. १९९९ मध्ये कास्पारोव्हने विश्वविजेतेपद स्पर्धेसाठी आनंदशी बोलणी केली. आनंदने १९९५ सालच्या स्पर्धेचा कटू अनुभव लक्षात घेऊन ‘बक्षिसासाठी प्रायोजकांचे पैसे बॅकेत जमा झालेले दाखव’ अशी मागणी केली. नंतर ही बोलणी फिसटकली. २००० साली कास्पारोव्ह आणि क्रामनिक अशी स्पर्धा निश्चित झाली.

    Book cover for From London to Elista

    त्या काळात क्रामनिकचा सेकंड बारीव्ह आणि जवळचा मित्र लेव्हिटॉव्ह यांनी नंतर ‘फ्रॉम लंडन टू एलिस्ता’ हे पुस्तक लिहिलं. पुस्तकात पडद्यामागची तयारी उलगडून दाखवताना बारीव्ह आणि लेव्हिटॉव्ह यांच्या गप्पा दिलेल्या आहेत. शिवाय आवश्यक तिथे क्रामनिक, कास्पारोव्ह आणि इतरांची मतंही मांडलेली आहेत. पुस्तकात प्रत्येक डावाचं अत्यंत खोलात जाऊन विश्लेषण केलं आहे त्यामुळे बुद्धिबळात ज्यांना इतका रस नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक नाही. रस असेल तर स्पर्धेची तयारी किती खोलात जाऊन केली जाते हे बघायला मिळतं. क्रामनिक रोज डाव खेळून आल्यानंतर आज रात्री काय करायचं हे सेकंड्सना सांगत असे. उदा. १४ व्या चालीत राजा सी८ ऐवजी ई८ वर नेला तर काय होईल? सकाळी क्रामनिक उठल्यावर रात्रभर काय काम झालं बघत असे. आधी म्हटल्याप्रमाणे प्रतिस्पर्ध्याला चकित करण्यावर सगळं अवलंबून असतं. सातव्या डावात क्रमनिकच्या ४…ए६ या खेळीमुळे कास्पारोव्ह इतका चक्रावून गेला की त्याने पटकन ११ खेळ्यांतच बरोबरीचा प्रस्ताव मांडला. कास्पारोव्हशी जिंकल्यानंतर क्रामनिकचा पुढचा सामना पीटर लेकोशी झाला. पुस्तकाचा दुसरा भाग यावर आहे. तिसऱ्या भागात २००६ साली झालेल्या टोपोलॉव्हबरोबरच्या सामन्याचं वर्णन आहे.

    विश्वविजेतेपद स्पर्धेची तयारी ज्या पातळीवर केली जाते त्याची कल्पना करणंही अशक्य आहे. जगातील सर्व एलीट ग्रॅडमास्टर्स या स्पर्धेकडे डोळ्यात तेल घालून बघत असतात. याचं मुख्य कारण असं की दोन्ही खेळाडू स्पर्धेसाठी जी तयारी करतात आणि त्यातून ज्या नवीन चाली उघड होतात त्यातून इतर खेळाडूंना बरंच शिकायला मिळतं. हे एक प्रकारे बुद्धिबळाच्या क्षेत्रात नवीन संशोधन प्रकाशित करण्यासारखं असतं. बरेचदा विश्वचषक स्पर्धेत वापरल्या गेलेल्या नवीन चाली नंतर काही काळ प्रामुख्याने वापरल्या जातात. स्पर्धेची तयारी चालू असताना क्रामनिकचा दिनक्रम काहीसा असा होता. सकाळी ९ ला उठायचं, १० ला नाश्ता, ११ ते १ सराव, १ ते २ समुद्रावर फिरायला जाणं, २.३० जेवण, ३ ते ४ वामकुक्षी, ४ ते ८ सराव, ८ ते ९ जेवण, ९ ते पहाटे ३ सराव.

    पहिल्या डावात कास्पारोव्हकडे पांढरे मोहरे होते. त्याने १. ई४ ही त्याची आवडती खेळी केली. यातून त्याची प्रतिस्पर्ध्यावर सुरुवातीलाच वर्चस्व गाजवण्याची मनीषा स्पष्ट झाली. डावातील पुढील खेळ्या अशा होत्या. १. ई४ ई५ २. घो एफ ३ घो सी ६ ३. उं बी ५ घो एफ ६ क्रामनिकने ३…घो एफ ६ ही खेळी केल्याबरोबर कास्पारोव्हने चमकून क्रामनिककडे बघितलं, किंचित हसला आणि मान हालवली. ही खेळी रॉय लोपेझ या प्रकारातील बर्लिन बचाव या उपप्रकारात येते. बर्लिन बचाव १९ व्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला खेळला जात असे. नंतर उच्च दर्जाच्या स्पर्धांमध्ये हा जवळजवळ दिसेनासाच झाला. क्रामनिकने ही खेळी केल्यावर त्याने कसून तयारी केली आहे हे कास्पारोव्हच्या लक्षात आलं. त्या काळात बर्लिन बचाव काहीसा खालच्या दर्जाचा मानला जात असे. हा खेळल्यावर काळ्याला बचाव करायला फारसा वाव नाही असं बहुतेकांचं मत होतं. नंतर कास्पारोव्हने उघड केलं की त्याच्या टीमने पेट्रॉव्ह बचावाची तयारी केली होती, त्यांना बर्लिन बचावाची अजिबात अपेक्षा नव्हती. हा डाव बरोबरीत सुटला पण पुढच्या डावात मात्र काळ्याकडून खेळताना कास्पारोव्हने चूक केली आणि डाव गमावला. नंतर काळ्या बाजूने खेळताना क्रामनिकने बर्लिन बचावाचा पुरेपूर उपयोग केला. शेवटापर्यंत कास्पारोव्हला ही बर्लिनची भिंत भेदता आली नाही. तिसऱ्या डावानंतर कास्पारोव्ह आणि टीमच्या लक्षात आलं की बर्लिन बचाव क्रामनिकचं मुख्य अस्त्र आणि मग त्यांनी यावर तयारी सुरू केली, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. आता क्रामनिक एका गुणाने आघाडीवर होता. बाकीचे सर्व डाव बरोबरीत सुटले असते तर त्याला विजेतेपद मिळालं असतं.

    पाचव्या डावाआधी क्रामनिकच्या हेरांनी बातमी आणली की आज कास्पारोव्ह टॉयलेटबद्दल खुसपट काढून तमाशा करणार आहे आणि तसंच घडलं. कास्पारोव्हने मागणी केली की क्रामनिक टॉयलेटला जाताना एक गार्ड बरोबर हवा आणि त्याने दार संपूर्ण लवता कामा नये. क्रामनिकने मागणी मान्य केली पण कास्पारोव्हलाही हे लागू होणार असेल तरच. या सर्वामुळे फारसा फरक पडला नाही. मानसिक दबाव टाकण्याचा कास्पारोव्हचा प्रयत्न फुकट गेला. दहाव्या डावात कास्पारोव्ह परत एकदा हरला. क्रामनिकची आघाडी दोन गुणांची झाली. तेराव्या डावानंतर क्रामनिक परत जात असताना पाच दारुड्यांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. क्रामनिकने जीव वाचवून पळ काढला. नंतर एका सिक्युरिटी गार्डची सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली. स्पर्धेत अनेकदा संधी मिळूनही कास्पारोव्ह तिचं विजयात रूपांतर करू शकला नाही. मागच्या वर्षी आनंदची जी अवस्था झाली होती तशी अवस्था त्याचीही होती.

    या स्पर्धेनंतर बर्लिन बचावाला पुनरुज्जीवन मिळालं. मागच्या विश्वचषक स्पर्धेतही याचा वापर करण्यात आला. पांढऱ्याच्या ई ४ ला भक्कम बचाव म्हणून आज बर्लिन बचाव लोकप्रिय आहे.

  • संवादाचा सुवावो

    आपल्याकडच्या बर्‍याच गुन्हेगारांचं तिकडे पुनर्वसन झालं. मराठीतल्या शिष्टला तिकडे म्यानर्सच्या क्लासमध्ये घातलं, त्याचा अर्थ बंगालीत सुसंस्कृत असा झाला. संस्कृतचे कितीतरी शब्द मराठीत उपरे, औपचारिक वाटतात, त्यांचा बंगालीत पूर्ण कायापालट होतो.

    बंगाली चित्रपट बघताना माझी पंचाईत होते. एखाद्या छोटुकल्याला पहिल्यांदा सर्कसला न्यावं, आणि समोर मौत का कुआ सारखे चित्तथरारक खेळ चालू असताना त्याचं सगळं लक्ष मात्र विदूषकाकडे असावं, तसं काहीस होतं. याचं कारण म्हणजे बंगाली भाषा. एखादा मस्त शब्द कानावर पडतो, सबटायटलमुळे त्याचा अर्थ लागतो आणि तो शब्द निरखण्याकडेच सगळं लक्ष जातं. पहिल्यांदा उत्तमकुमार-शर्मिलाचा ‘नायक’ बघताना असंच झालं. त्यात उत्तमकुमार एके ठिकाणी म्हणतो, “आपणा नाम शोनेछी, लेखा पोढेछी, तेयाप्रोशान आलाप केरी गेलान.” (ऐकलं तसं, चूभूद्याघ्या) ते ऐकल्यावर मला लगेच “शुंदर! ओद्भुत!” असं ओरडावसं वाटलं. जन्मभर क्लार्क केंटला सरळ भांग पाडून, ढापण्या लावून, बावळटपणा करताना पहावं आणि एखादे दिवशी त्यालाच सुपरमॅनच्या वेशात जग वाचवताना पहावं. की चोमोत्कार!

    संस्कृतच्या आजोळी  ‘लप’ या धातूपासून आलाप हा शब्द झाला. तिथून तो मराठी, हिंदी आणि बंगालीत आला. पण हिंदी-मराठीमध्ये या शब्दाची कुचंबणा झाली. एखाद्या बोर्डीग शाळेत कडक शिस्तीत पोरं जशी काटेकोरपणे वागतात तसा हा बिचारा आलाप संगीताची उपासना करणारे गायक, रसिक, समीक्षक यांच्या कडक देखरेखीखाली, सकाळ संध्याकाळ रियाज करत, शिस्तीत वाढला. याउलट कोलकात्याला गेल्यावर शांतिकेतनमध्ये ऍडमिशन झाली, तिथं त्याला सांगितलं, “तुला जे आवडेल ते कर.” तिथं तो बहरला आणि “आलाप करणे” असा त्याचा पुनर्जन्म झाला. नाही म्हणायला हिंदीमध्ये “वार्तालाप करना” अशी एक व्होकेशनल स्कालरशिप मिळाली त्याला, पण आलाप करण्यात जे मार्दव आहे ते वार्तालापात नाही. जे आपल्याकडे नाही ते दुसरीकडे पाहीलं की त्याची निकड जास्त जाणवते. मला मराठीचं प्रेम नाही अशातला भाग नाही. पण बंगालीत जी गोडी आहे ती मराठीत नाही हे कबूल करण्यावाचून पर्याय नाही. आलापला उत्तर म्हणून मराठीत “मला तुमच्याशी बोलायचं आहे” अगदी रोखठोक वाटतं. किंवा “मला तुमच्याशी चर्चा करायची आहे” (नको! महाराज, माफी!) म्हणजे आता ‘अमेरिकेच्या अर्थसंकल्पाचे तिसर्‍या जगात उमटलेले पडसाद’ यावर एक तास स्वगत ऐकावं लागणार असं वाटतं. आलापला तोडीस तोड प्रतिशब्द फक्त उर्दूमध्ये आहे, गुफ्तगू करना. इथे अर्थाच्या सूक्ष्म छटांमध्ये मात्र फरक आहेत. गुफ्तगू म्हणजे थोडासा प्रायव्हेट मामला वाटतो.

    आपल्याकडच्या बर्‍याच गुन्हेगारांचं तिकडे पुनर्वसन झालं. मराठीतल्या शिष्टला तिकडे म्यानर्सच्या क्लासमध्ये घातलं, त्याचा अर्थ बंगालीत सुसंस्कृत असा झाला. संस्कृतचे कितीतरी शब्द मराठीत उपरे, औपचारिक वाटतात, त्यांचा बंगालीत पूर्ण कायापालट होतो. ‘नायक’मधलाच उत्तमकुमारचा आणखी एक संवाद, “देखलेन तो, आपणार देबोतुल्य नायक?” मराठीमध्ये ‘देवतुल्य नायक’ रोजच्या संभाषणामध्ये वापण्याची कल्पनाही करवत नाही. बंगालीत ही उपजत गोडी कुठून आली? नाही म्हणायला गुजराथीही कानाला गोड आहे पण काही वेळातच एक किलो जिलबी खाल्ल्यानंतर जसा गोडपणा नकोसा वाटेल तसं गुजराथीचं होतं. याउलट बंगाली म्हणजे मधुर हापूस आंबा. ओनुमान, प्रयोजन, ब्यॅपार, शोत्यकोथा, पोरिष्कार​ – आपल्याकडे कडक इस्त्रीचा सफारी सूट, हातात फाइल आणि कपाळावर आठ्या अशा शासकीय पेहेरावात वावरणारे हे सगळे शब्द तिकडे जीन्स, टी शर्ट घालून, रे ब्यान लावून मोकळेपणाने हिंडत आहेत असं कधीकधी वाटतं.

    ‘संवादाचा सुवावो’ हे महेश एलकुंचवार यांनी प्राचार्य राम शेवाळकरांशी मारलेल्या गप्पांचं पुस्तक नुकतंच वाचलं. संवादाचा सुवावो – संवादाचा अनुकूल वारा – ही सुंदर शब्दरचना ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातील आहे.

    म्हणोनि संवादाचा सुवावो ढळे |

    तर्‍ही हृदयाकाश सारस्वते बोळे |

    आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे |

    मांडला रसु ||

    (संवादाचा अनुकूल वारा सुटला की, हृदयाकाश सारस्वताने भरून येते. मग श्रोत्यांचे मन थार्‍यावर नसले, तरी वितळते व त्यातून रस उत्पन्न होतो.)

    आलाप करणे, गुफ्तगू करणे यांच्या तोडीचा वाक्प्रचार आज मराठीत प्रचलित नसला तरी कधीकाळी नक्कीच होता.